मराठा नेते कोठे आहेत?

ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.

वरील सर्व आंदोलन करणार्‍या नेत्यांवर नजर फिरवली तर आपल्या असे लक्षात येते की, यामध्ये एकही मराठा नेता नाही. अगदी जातीसहीतच सांगायचे झाले तर ऊसप्रश्नावर आंदोलन कराणारे नेते खा. राजू शेट्टी (जैन), कापूस प्रश्नावर आंदोलन करणारे आ. रवी राणा (राजपुत), आ. गिरीष महाजन (गुजर), कापूस प्रश्न संसदेत घेऊन जाणारे खा. गोपीनाथराव मुंडे (वंजारी), खा. चंद्रकांत खैरे (बुरूड), कापूसदिंडी काढणारे दिवाकर रावते (माळी), आ. पाशा पटेल (मुसलमान), विजेच्या प्रश्नावर मोर्चा काढणारे आ. प्रशांत बंब (मारवाडी) आहेत.

या सर्व नेत्यांच्या जाती दाखवून मला जातीवाद करायचा नाही, पण एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो, या यादीत एखाद्या तरी मराठा नेत्याचे नाव दिसते काय, मराठा नेत्यांना या प्रश्नांचे गांभीर्य नाही का? यांचा शेतीशी संबंध येत नाही का? गावांशी संपर्क तुटला आहे की त्यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क तूटला आहे? का मराठा नेते प्रस्थापित झाले आहेत? यावर महाराष्ट्रातील मराठा तरूण अत्यंत गांभीर्याने विचार करीत आहेत.

अगोदरच मराठा आरक्षण प्रश्नी सर्व मराठा नेते गप्प असल्यामुळे मराठा तरूण संतप्त आहेत. आजपर्यंत मराठा आरक्षणाला मुंडे-भुजबळ विरोध करतात, असे कारण सांगून मुख्यमंत्री मराठयांना आरक्षण देत नव्हते. परंतु परवा बीड येथील मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना खा. गोपीनाथराव मुंडे म्हणाले की, मी सत्तेत असताना वंजारी समाजाला सवलती दिल्या, यात माझे काय चुकले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार मराठा असताना ते मराठयांना आरक्षण का देत नाहीत. मराठा नेत्यांत मराठयांना आरक्षण देण्याची धमक नाही. कदाचित मी मुखमंत्री झाल्यावरच मराठयांना आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. असा दणका खा. मुंडे यांनी दिल्यामुळे मराठा समाज मराठा नेत्यांवर बिथरला आहे. आरक्षणप्रश्नी मराठा नेते बोलत नाहीत. ऊस, कापूस, वीजप्रश्नी मराठा नेते गप्पच आहेत. हे पाहून मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे.

ज्या नेत्याला समाजमन कळत नाही त्याचे नेतृत्व टिकत नाही, हा राजकारणाचा नियम आहे. बहुतेक मराठा नेते मराठा मतदान गृहीत धरतात. त्यामुळे ते समाजाच्या कार्यक्रमास विचारपिठावर येण्यासाठी उत्सुक नसतात. मराठयांचे एखादे काम केले तर आपल्यावर जातीवादी शिक्का बसेल याची त्यांना भीती वाटते. मराठा आरक्षण प्रश्न फक्त मुख्यमंत्र्यांनी सही केली तरी हा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण मराठा मुख्यमंत्री सही करीत नाही. कारण त्यांना वाटते मराठयांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला तर आपल्यावर जातीवादाचा शिक्का बसेल, इतर समाज नाराज होईल व आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल. आपल्याला मराठे सुध्दा मतदान करतात हे ते विसरतात. याचा अर्थच असा की, मराठा समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे आता हे जमणार नाही. आता समाज नेता जातीपेक्षा मातीच शोधत आहे. आजपर्यंत नेता लग्न, मौत, गृहप्रवेश याला हजर राहीला तरी लोक त्याला मतदान करीत. परंतु समाजाला आता लग्न, मौत, गृहप्रवेश याला हजर राहणार्‍या नेत्यापेक्षा समाजहिताचे काम करणारा, परिसराचा विकास करणारा नेता हवा आहे. म्हणुनच लोक खा. राजू शेट्टी, आ. बच्चू कडू यांना नोट आणि व्होट दोन्ही देऊन निवडून देत आहेत. खा. गोपीनाथराव मुंडे यांना भारतात सर्वात जास्त मतदान झाले आहे. त्यात विशेषतः कितीही अफवा पसरविल्या तरी मराठयांनी त्यांना भरभरून मतदान केले आहे.

वारं फिरलं आहे. मराठा नेत्यांनो सावधान!

महाराष्ट्रात असा एक मतदारसंघ दाखवा की, ज्या मतदारसंघात मराठा मतदार नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला आहे. उदा. ना. राजेंद्र दर्डा जैन समाजाचे कमी मतदान असतानाही निवडून येतात. ना. हसन मुश्रीफ कागलमध्ये मुस्लीम मतदान कमी असतानाही निवडून येतात. ना. जयदत्तजी क्षीरसागर बीडमधून तेली समाज नसतानाही निवडून येतात. अपवाद सुध्दा नाही. याचा अर्थ असा की, सध्यातरी मराठा नेते हे मराठयांचे मतदान पडल्याशिवाय निवडून येऊच शकत नाहीत. त्यामुळे मराठा उमेदवारांना मराठा मतदारांना नाराज करून निवडून येणे शक्यच नाही. आजपर्यंत मराठा नेते जातीचे भावनिक आवाहन करून निवडून येत होते. आता मात्र जातीच्या भावनिक आवाहनावर निवडून येण्याचे दिवस संपले आहेत. याची जाणिव मराठा नेत्यांनी ठेवावी.

शेती जुगारी धंदा आहे. शेती पिकत नाही. पिकली तर विकत नाही. विकले तर भाव मिळत नाही. नोकरी लागत नाही. धंदा करण्यास भांडवल नाही. भांडवल असेल तर धंद्याचा अनुभव नाही. त्यामुळे तरूण दिशाहीन झाला आहे. ही सर्व शेतकरी व मराठा समाजाची अवस्था आहे. ज्यावेळेस तो निराश होईल त्यावेळी तो आत्महत्या करतो. कारण शेतकर्‍यांला ब्राम्हणी धर्मसंस्थेने प्रयत्नवादी बनविण्याऐवजी देववादी, दैववादी व व्यक्तीपूजक बनविले आहे. त्यामुळे त्याला वाटते कोणीतरी देव मदतीला येईल. नशीब साथ देईल. किमान आपल्या भागाचा नेता आपल्या समस्या सोडविल. देव आणि नशीबाने तर त्याला पिढ्यानपिढ्या साथ दिली नाही. ज्याला आपले म्हणावे तो नेता पक्षश्रेष्ठीचा उदोउदो करण्यात, हुजरे करणार्‍या, भाटगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांच्या गराड्यात, दिल्ली, मुंबईच्या वार्‍या करण्यात, आपल्या जवळील पैशाची गुंतवणूक करण्यात मग्न असेल व जनतेकडे दुर्लक्ष करीत असेल तर येणार्‍या काळात त्याला काळ आणि जनता दोन्हीही माफ करणार नाहीत.

शेतकर्‍यांकडे दूर्लक्ष करणार्‍या मराठा नेत्यांनो सावध व्हा! नसता भविष्यात मराठा समाजच मराठा नेता पाडो अभियान हाती घेईल व तुम्हाला भूईसपाट करेल. सावध व्हा! लोकांशी नाळ तुटून देवू नका. जनमत समजून घ्या. लोकांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करा. एक पाय जनतेत व एक पाय प्रगतीकडे टाका व आहेत त्या खुर्च्या, पदे, सत्ता किमान शाबूत ठेवा. तूर्त एवढेच..

-प्रदीप सोळुंके

साभार-दैनिक पुण्यनगरी (दिनांक २५ नोव्हेंबर 2011)

शेतकरी, बंदुका आणि शरद जोशी

महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या “दैनिक देशोन्नती” चे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा शरद जोशींचा मुखवटा फाडणारा लेख!

‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकर्‍यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा पुन्हा एकदा अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यांचे कोणतेही आंदोलन शेतकर्‍यांच्या हितासाठी कधीच नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतकर्‍यांचे हित साधल्या गेले नाही. ऐन निर्णायक क्षणी पेटलेले आंदोलन मागे घेऊन त्यांनी प्रत्येकवेळी शेतकर्‍यांचा विश्वासघातच केला. आंदोलन सुरू केल्यावर शेतकर्‍यांनी, दुसर्‍या फळीतील नेत्यांनी आपले सर्वस्व त्यात ओतायचे, घर-दार, पोरंबाळं, आपला संसार वार्‍यावर सोडून आपल्या पंचप्राणासाठी रस्त्यावर उतरायचे आणि त्या पंचप्राणाने मात्र आंदोलन यशस्वी ठरतेय, असे लक्षात येताच अनाकलनीय पद्धतीने संशयास्पदरित्या पेटते आंदोलन अचानक मागे घ्यायचे, हा अनुभव एकदा नव्हे अनेकदा आला आहे. खरेतर असे म्हणता येईल की, शरद जोशींच्या प्रत्येक आंदोलनाची अखेर अशीच विश्वासघाती झाली आहे. रस्त्यावर उतरायचे कुणी, पोलिसांच्या लाठया खायच्या कुणी, केसेस आपल्या मागे लावून घ्यायच्या कुणी आणि नेता म्हणून मिरवायचे मात्र शरद जोशींनी! साधारण 1990 पर्यंत हाच प्रकार सुरू होता.संघटनेत सुरूवातीपासून सुरू असलेला किंवा मुद्दामहून सुरू ठेवलेला वैचारिक गोंधळ नव्वदपर्यंत कायम होता. राजकारणात उतरलो तर जोडे मारा, हे त्यांचे तेव्हाचे भावनिक आवाहन होते. खरेतर राजकारण करायचे नाही, ही काही त्यांची तात्विक भूमिका नव्हती. ती सोयीची राजकीय भूमिका होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांना हे फार उशिरा लक्षात आले.

परिवर्तन घडवून आणायचे असेल तर राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातूनच ते शक्य असते, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही, परंतु स्वत:चा कावेबाज चेहरा झाकण्यासाठी त्यांनी हा तत्त्वाचा, त्यागाचा मुखवटा चढविला होता. कालांतराने तो गळून पडणार होताच आणि तसा तो गळून पडलादेखील, परंतु तत्पूर्वी शरद जोशींनी ज्या कामाची सुपारी घेतली होती ते काम तडीस नेले. राजकारणापासून अलिप्त राहण्याचे नाटक करीत शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करणार्‍या शरद जोशींनी शेतकर्‍यांची वैचारिक दिशाभूल करण्याचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले. भारत सरकार डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी करेपर्यंत या प्रस्तावाच्या संदर्भात शेतकर्‍यांचा संभाव्य विरोध दडपून टाकण्यात शरद जोशी कमालीचे यशस्वी ठरले. हा प्रस्ताव शेतकर्‍यांसाठी कसा उपयुक्त आहे, हे शेतकर्‍यांच्या गळी उतरविण्यात अर्थतज्ज्ञ असल्यामुळे शरद जोशींना फारसे प्रयास पडले नाही. सरकारच्या बरोबरीने शरद जोशींनी जागतिक बाजारपेठेचे, आर्थिक स्वातंत्र्याचे भ्रामक स्वप्न शेतकर्‍यांसमोर उभे केले. डंकेल प्रस्ताव स्वीकृत होईपर्यंत शेतकर्‍यांसमोर या प्रस्तावाची काळी बाजू येणार नाही, याची दक्षता शरद जोशींनी घेतली. भारत सरकारने डंकेल प्रस्ताव स्वीकारला आणि शरद जोशींची पहिली प्रतिक्रिया आली, ती होती ‘माझे अवतारकार्य आता संपले.’ म्हणजेच माझा करार आता संपला. शेगाव अधिवेशनात शरद जोशींनी शेतकरी आता आर्थिक गुलामगिरीतून बाहेर आला आहे, शेतकर्‍यांसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे, शेतकर्‍यांनी आनंदोत्सव साजरा करावा, अशी घोषणा केली. त्याच अधिवेशनात त्यांनी शेतकरी संघटनेचे आंदोलन आता आर्थिक बाबींशी निगडित नसून आता लक्ष्य राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे असल्याचे सांगितले. राजकारणात उतरलो तर जोडे मारा, ही घोषणा आता मागे पडली आणि शेतकर्‍यांच्या या पंचप्राणाने शेतकर्‍यांच्या विश्वासाची राजकीय किंमत वसूल करायला सुरुवात केली.

डंकेल प्रस्तावाने आपल्याला कोणत्या खड्डयात लोटले आहे, याची कल्पना शेतकर्‍यांना आली नव्हती. डंकेल प्रस्तावाचे चटके आपल्यावर आंधळा विश्वास ठेवणार्‍या या बावळट शेतकर्‍यांना प्रत्यक्ष बसायला सुरुवात होईपर्यंत आपली राजकीय पोळी शेकल्या जाऊ शकते, हा हिशोब करुन जोशी अँड कंपनी राजकारणात उतरली. ग्रामीण भागातील जनतेला नेतृत्व देऊ शकणारे तरुण अर्थातच हरकले आणि जोशींच्या भुलभुलैय्याला बळी पडून संघटनेत सामील झाले. त्यांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवून पुरते गारद करण्याचे काम शरद जोशींनी केले. दरम्यानच्या काळात भाजप-सेना यांना भगवी गिधाडे म्हणत म्हणत शेवटी त्याच पक्षाचा प्रवास करीत जोशींनी राज्यसभेची खासदारकी, ‘टास्क फोर्स’चे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते. ज्यांच्या जीवावर जोशींनी हे सगळे राजकीय वैभव कमावले ते सामान्य कार्यकर्ते मात्र फसलेल्या आंदोलनाचे खटले अंगावर ओढून घेऊन बरबाद झाले. या कोर्ट केसेसने हजारो कार्यकर्त्यांची आयुष्ये उध्वस्त झालीत. शरद जोशींचे काय नुकसान झाले? ‘कुणब्याच्या पोरा लढायला शिक’ असे भावनिक आवाहन करीत शरद जोशींनी या पोरांच्या आयुष्याचे मातेरे केले.

आता पुन्हा एकदा शरद जोशींचे नवे नाटक सुरु झाले आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता बंदुका हातात घ्याव्यात, असे आवाहन करीत ते फिरत आहेत. हातात घेतलेल्या बंदुका कोणावर रोखायच्या, या प्रश्नाचे शरद जोशींजवळ काय उत्तर आहे? त्यांचा इशारा सरकार आणि प्रशासनाकडे असेल तर ते स्वत:च सरकारचा एक भाग आहेत, हे त्यांनी विसरु नये. राजकीय व्यवस्था शेतकर्‍यांना न्याय देऊ शकत नाही आणि इतर कोणत्याही संसदीय मार्गांनी हा न्याय मिळू शकत नाही, अशी शरद जोशींची खात्री पटली असेल तर त्यांनी स्वत: आधी हातात बंदूक घ्यावी. ते खासदार आहेत. बंदूक हातात घेऊन त्यांनीच सरकारला जाब विचारला तर कदाचित शेतकर्‍यांच्या वेदना सरकारपर्यंत लवकर पोहचतील. आतापर्यंत कुणब्याच्या पोराला लढायला लावून त्यांनी दुरुन तमाशा पाहण्याचे काम केले. किमान आतातरी त्यांनी आधी रस्त्यावर उतरावे. पोलिसांच्या लाठीचा मार कसा असतो, कोर्टाच्या केसेसमध्ये माणूस कसा बेदम होतो आणि या सगळ्या त्रासाची फलनिष्पत्ती जेव्हा शून्य येते, तेव्हा अगदी कणखर माणूसही कसा कोलमडून पडतो, हे शरद जोशींनी एकवेळ स्वत: अनुभवावे. हाती बंदूक घेण्याचा सल्ला देणे फार सोपे असते. मात्र, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी जो त्याग करावा लागतो त्याची किमत संपूर्ण घरादाराला चुकवावी लागते. निष्पाप बायका-पोरांची आयुष्य बरबाद होतात.

वास्तवाचे हे चटके शरद जोशींनी कधी सोसलेच नाही आणि सोसण्याची त्यांची तयारीही नाही. शेतकरी किंवा शेतकर्‍यांच्या समस्या हे त्यांच्या ध्येयसिद्धीचे लक्ष्य कधीच नव्हते. त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता स्वार्थाची चौकट कधीच ओलांडू शकली नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्याकरिता प्रचंड वैचारिक गोंधळ या माणसाने शेतकर्‍यांमध्ये पसरवला. त्यात शरद जोशींचे काहीच नुकसान झाले नाही. त्यांची स्वत:ची आर्थिक आणि राजकीय प्रगती नेहमी चढत्या श्रेणीत राहिली. खरी किंमत चुकविली ती त्यांच्या भ्रामक विचारांना बळी पडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी. राजकारणात उतरलो तर जोडे मारापासून काल मोर्शीत उच्चारलेल्या शेतकर्‍यांनी आता बंदुका हाती घ्याव्यात, इथपर्यंत शरद जोशींच्या मागे जाणार्‍यांचा प्रवास केवळ शून्यापासून शून्यापर्यंत जाणारा ठरला. या प्रवासाने शेतकर्‍यांच्या पदरी केवळ निराशा आणि निराशाच टाकली. शरद जोशींचे प्रत्येक आंदोलन हे केवळ एक नाटक होते. नाटकांच्या या नायकाने आता नवे नाटक सुरु केले आहे. हे नाटकदेखील विस्मृतीत जाईल आणि पुन्हा नव्या नाटकाची घोषणा होईल. त त्यांचा स्वभावच आहे. तीच त्यांची वैचारिक प्रवृत्ती आहे. फक्त त्यांच्या पाठीशी असलेल्या उरलेल्या मोजक्याच गरीब आणि आशाळभूत शेतकर्‍यांना या नाटकातील फोलपणा किती लवकर लक्षात येतो, हाच एक प्रश्न आहे.

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९ च्या दै.देशोन्नती मधील लेख.
नक्षलवादाचे वास्तव…

दै.देशोन्नती

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे।
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे ॥धृ o॥

नांदतो सुखे गरिब-अमिर एक मतानी। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी।
स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि वसू दे। दे वरचि असा दे॥१॥

सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना। हो सर्वस्थळी मिळुनि सामुदायिक प्रार्थना।
उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे। दे वरचि असा दे ॥२॥

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही। अस्पृश्यता समुळ नष्ट हो जगातुनी।
खळ निंदका मनीहि सत्य न्याय वसू दे। दे वरचि असा दे ॥३॥

सौंदर्य रमो घरा-घरात स्वर्गियापरी। ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बाहेरी।
तुकड्यादास सदा सर्वदा सेवेत कसू दे। दे वरचि असा दे ॥४॥

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

विदर्भवीर…!

निवडणुकीत पडला की, लोक ठेवत नाहीत उभा
मग तो फुगवतो, स्वतंत्र विदर्भाचा फुगा!

शिवाजीचं नाव घेऊन, विदर्भ पेटवतो
रात्री लागलं मुतायला, की बायकोला उठवतो!

सत्तेत असताना, आठवत नाही विदर्भ
पक्षातून काढलं की, देतो मागचे संदर्भ!

विदर्भ पाहिजे असल्यास, आधी करा विकास
मजुराच्या हातातली, काढून टाका टिकास!

हातात घ्या फावडं, करा भ्रष्टाचार साफ
भाषणं देऊन तोंडाची, घालवू नका वाफ!

तुम्हीच बसा उपोषणाला, तुम्हीच व्हा शहीद
तुमचे नाव लिहु आम्ही, विदर्भाच्या वहित…!

-दिवाकर देशमुख