जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.

 

चाभरा चाटू – संजय राऊत..

शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाकर्‍यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी हेतूने हे सगळे खेळ केले जात आहेत.

तशीही शिवसेनेची स्थापना शिवरायांची बदनामी करण्याच्या छुप्या हेतूने झालेली होती. महाराजांची बदनामी करण्याची एकही शिवसेनेने गेल्या चार दशकांत सोडलेली नाही. जेम्स लेन प्रकरण घडविण्यामागे सेनेच्या इशार्‍यावर काम करणारी पिलावळ होती, हे आता लपून राहिलेले नाही. सेनेने या संपूर्ण प्रकरणात गप्प राहून महाराजांच्या बदनामीचा आनंद लुटला. संजय राऊत यांचे वर्णन तर नुसते “चाभरा” या विशेषणाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी “चाभरा चाटू” हे विस्तारित विशेषण अधिक उपयोगी ठरेल.

दै. सामनामधून वायफळ आग ओकण्याचे काम सातत्याने करणार्‍या चाटूसाहेबांची लेखणी लेन प्रकरणात लुळी पांगळी का झाली होती? आज थोरले ठाकरे विकल झाले आहेत, परंतु लेन प्रकरणाच्या काळात चाटूसाहेबांची लेखनी थोरल्या ठाकर्‍यांपेक्षाही जास्त विकल झालेली होती. चाटूसाहेब, आपल्या लेखनीला तेव्हा अचानक असे घुर्रे का बरे आले? आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते, तर त्यांनी आधी या “चाभर्‍या चाटू”ला टकमक कड्यावरून फेकले असते. त्यानंतर ठाकर्‍यांचाही बंदोबस्त केला असता.

दोन शिवजयंत्या व दोन राज्याभिषेक सोहळे घडविण्याच्या पापामागील कुजका मेंदू याच “चाभर्‍या चाटू”चा आहे. शिवसेनेचे कार्यकारी सध्या चाटूसाहेबांच्याच सल्ल्याने कारभार हाकत आहेत. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा तारखेऐवजी तिथीनुसार साजरा व्हावा, असा युक्तीवाद चाटूसाहेब सामनामधून सातत्याने करीत आहेत. पण सर्व ठाकर्‍यांचे वाढदिवस हा तारखेनुसार साजरे होतात. खूद्द “चाभर्‍या चाटू”चा वाढदिवसही तारखेनुसारच साजरा होतो. मग महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार का हवा? याचे उत्तर चाटूसाहेबांकडे आहे का?

बाळ ठाकरे यांनी चार दशकांपेक्षाही जास्त काळ महाराष्ट्रात दादागिरी केली. ती केवळ मराठ्यांच्या बळावर..! थोरल्या ठाकर्‍यांना या उपकारांची जाणही होती. दोन्ही चाभरे कार्यकारी मात्र हे उपकार विसरले आहेत. राज्यकर्त्यांनी जनतेचे उपकार विसरायचे नसतात. कारण जनतेमुळेच राजकारण्यांना भाजी भाकरी मिळत असते. शेवटी शेतावर पाळलेले कुत्रेही खाल्ल्या भाकरीला जागते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

-अनिता पाटील

श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले

‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही.

अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही नाही!

 

 सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडं अंतरही ठेवतात. पण मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं.

उदयनराजेंबद्दल सातार्‍यातच नव्हे तर राज्यभर अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सातार्‍यातील पत्रकारांमध्ये तर या आख्यायिका मोठया चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे नेहमीच मद्यधुंद अवस्थेत असतात, किंवा त्यांच्या जलमंदिर वाडय़ावर त्यांना आड जाणार्‍यांना ते चाबकाने फोडून काढतात, या अशाच काही आख्यायिका. त्या खोटया असतील, कदाचित खर्‍याही असतील. पण त्यामुळे उदयनराजेंच्या इतर चांगल्या-वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं काही कारण नाही.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार बनलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातार्‍यातला दबदबा वाढला आहे. याचा अर्थ त्यापूर्वी त्यांचा दबदबा नव्हता असा नाही. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘थेट’ तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंविषयी सातारकरांच्या हृदयात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना प्रेमाने ‘महाराज साहेब’ म्हणतात. आजही बरेचसे लोक त्यांना (अर्धवट) मुजरा करतात. भले मग उदयनराजेंचं त्यांच्याकडे लक्ष असो वा नसो.

सातारा शहराच्या मधोमध वसलेल्या जलमंदिर या भोसले घराण्याच्या परंपरागत वाडय़ापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘हॉटेल राजकुमार रिजन्सी’मध्ये उदयनराजे भेटले तेव्हा असे अनेक अनुभव आले. ‘महाराज साहेबां’मधल्या सामान्य माणसाला जाणून घेता आलं. उदयनराजे म्हणजे एकदम रांगडा गडी! फर्स्ट इम्प्रेशनच झक्कास. त्यात तुमच्या नशिबाने महाराज साहेबांचा मूड असेल तर बातही क्या!

‘माझ्या आईवडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी मला अगदी पहिलीपासूनच शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवलं. त्यामुळे राजघराण्याच्या वारशाचं ओझं मला लहानपणी कधी जाणवलंच नाही. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असंही कधी वाटलं नाही. शाळेत जो मला चॉकलेट द्यायचा तो माझा मित्र! राजेशाहीपासून मी खूपच लांब होतो,’ उदयनराजे सांगत होते.

शालेय शिक्षण डून स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर उदयनराजेंनी पुण्यात इंजिनीअरिंग केलं. तिथेही भरपूर दंगा-मस्ती केली. त्यावेळी आपण कधीतरी राजकारणात पडू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं ‘फॉर्मुला वन रेस’मध्ये भाग घ्यायचं. खरं तर त्यात त्यांना करीअरच करायचं होतं. आपल्या या स्वप्नाविषयी बोलताना ते हरखून गेल्यासारखे वाटले. ते म्हणाले, ‘मला वेगाचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच असेल कदाचित, राजकारणात पडण्यापूर्वी मी रेसिंगमध्येच करीअर करायचा विचार खूप गंभीरपणे केला होता. पण ते काही जमून आलं नाही.’

‘फॉर्मुला वन’मध्ये सहभागी होता आलं नाही म्हणून वेगवान ड्रायव्हिंगची आवड कमी झाली नाही. पुणे-सातारा मेगाहायवेच्या रूपाने त्यांना नवा ट्रॅक सापडला. सातारा-पुणे हे ११० किमीचं अंतर उदयनराजेंनी फक्त ३५ मिनिटांत पार केल्याची आख्यायिका सातार्‍यात ऐकायला मिळते. उदयनराजेंनीही हे खरं असल्याचं सांगितलं. (वर, खोटं वाटत असेल तर पुण्यात सोडू का; म्हणूनही विचारलं. आता बोला!) फेरारी किंवा बुगाटीसारखी एखादी चांगली रेसिंग कार घेण्याची बर्‍याच दिवसांपासून इच्छा आहे, असं मनमोकळेपणाने सांगत ‘हॉर्स रायडिंगही मी चांगलं करतो, पण आता पूर्वीसारखा वेळ मिळत नाही,’ अशी खंत ते व्यक्त करतात.

हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग अशा आवडी असलेले उदयनराजे म्हणजे एकदम हाय-फाय माणूस, असं एखाद्याला वाटेल, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. फॉर्मल क्लोथचा त्यांना तिटकारा. मग राजेशाही वेशभूषेची बातच सोडा. राजकीय सभांच्या वेळी अगदी नाइलाज म्हणून ते सदरा लेंगा घालतात. त्याला ते ‘पांढरी गोणी’ म्हणतात. ‘जीन, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल’ हा महाराज साहेबांचा फेवरेट ड्रेसकोड!

दिनचर्येचा विषय निघाला तेव्हा ‘राजकारण करायचं असेल तर सकाळी लवकर उठावं लागतं, हा पवार्रफुल अलार्म आठवला. रात्री झोपायला कितीही उशीर झाला (उशीर होण्यासाठी अनेक कारणं आहेत) तरी महाराज साहेब सकाळी साडेसहा वाजताच उठतात! (असं त्यांनी सांगितलं.) त्यानंतर व्यायाम असतोच. त्यांच्या शब्दात भरपूर व्यायाम. जॉगिंग दररोजचं.

‘पूर्वी मी कराटेसुध्दा शिकलो होतो. अधूनमधून बॉक्सिंग खेळतो. आजही मी एका मुठीत तीन विटा तोडतो,’ हे सांगताना उदयनराजेंना स्वतचाच अभिमान वाटतो. त्यानंतर एक मोठा ग्लास मोसंबी ज्यूस पिऊन महाराज साहेब ऑफिसमध्ये पोहोचतात तोवर साडेआठ वाजलेले असतात. मग लोकांच्या गाठीभेटी. अनेक लोक आपल्या तक्रारी घेऊन किंवा कामं करून घेण्यासाठी त्यांची वाट पाहत असतात. काम करण्याची महाराज साहेबांची एक विशेष पद्धत आहे, अगदी राजाला शोभेल अशीच. आलेल्या माणसाने आपली समस्या काय आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल; इतकंच महाराज साहेबांना सांगायचं. जास्त काथ्याकूट करायचा नाही. ‘काम होईल,’ म्हणून महाराज साहेब सांगतात, तेव्हा तो गरजवंत आश्चर्यचकीत झालेला असतो. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून.

दुपारी कोल्हापुरात असतील तर महाराज साहेब जेवायला घरी म्हणजे वाडय़ावर परततात. ‘मी शाकाहारी आहे. कारलं सोडून सगळ्या भाज्या खातो. नॉनव्हेजचं म्हणाल तर क्वचित मटण खातो. पण मला ते फारसं आवडत नाही.’ लोकांमध्ये सहजतेने मिसळणारा आणि त्यांच्यातच राहायला आवडणारा हा राजामाणूस देवधर्म, आणि त्यानुषंगाने येणारी कर्मकांडे यांबाबत उदासीन, म्हटलं तर पुरोगामी आहे. ‘माझा फक्त पंचतत्त्वांवर विश्वास आहे. पण कर्मकांडे मला पटत नाहीत,’ असं ते स्पष्टपणे सांगतात. पण लगेचच ‘राजघराण्यातील परंपरा-रूढी पटो न पटो त्या पाळल्याच पाहिजेत,’ असंही ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते या रूढी-परंपराच आपली (म्हणजे त्यांची) ओळख आहे. ही त्यांची भूमिका थोडी सोयीस्कर वाटते. पण त्यावर महाराज साहेबांकडे वाद किंवा चर्चा होऊ शकत नाही.

पुढच्या पिढीनेही रूढी-परंपरा पाळून बेधडक लोकांची सेवा करत जगायला हवं, इति उदयनराजे.

उदयनराजेंची पुढची पिढी- त्यांचा मुलगा वीरप्रतापसिंहराजे पुण्यात त्याच्या आई कल्पनाराजेंसोबत असतो. उदयनराजेंच्या आई अर्थात श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले सातार्‍याच्या जलमंदिर वाडय़ात राहतात. उदयनराजे लोकांमध्ये मिसळतात, तर कल्पनाराजे त्यांच्या नेमक्या विरुद्ध. लोक आजही त्यांना घाबरतात. जलमंदिरात त्यांच्याशी तब्बल दोन तास गप्पा मारण्याची संधी मिळाली. पण ऑफ द रेकॉर्ड! घराण्यातलं द्वेषाचं राजकारण, संधिसाधूपणा, विश्वासघात, अवहेलना (संदर्भ: अभयसिंह आणि शिवेंद्रराजे भोसले) याविषयी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शेक्सपिअरने लिहिलेली सगळी नाटकं त्या दोन तासांत समजली.

घराणेशाहीतल्या कलहामुळे मधली बरीच वर्ष कल्पनाराजेंना बरंच सोसावं लागलं. त्याचा राग त्यांच्या मनात आजही आहेच. मध्यंतरी निवडणुकीच्या राजकारणातही त्यांनी उतरून पाहिलं. पण नशिबाने काही त्यांना साथ दिली नाही. आता वय झाल्यानंतर उदयनराजेंच्या राजकीय कारकीर्दीवरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय. पण तिथेही स्वत:च्या मुलाच्या कार्यपद्धतीशी त्यांची नाळ जुळत नाही. त्याचंही दुख आहेच. उदयनराजेंचे वडील म्हणजे प्रतापसिंहमहाराज यांचे धाकटे बंधू अभयसिंहराजे भोसले यांनीच घराण्याच्या नावाचा आणि समाजावरील प्रभावाचा फायदा घेत स्वतची राजकीय पोळी भाजली, असं कल्पनाराजेंचं स्पष्ट मत आहे.

खुद्द उदयनराजेंच्या विरोधातही अभयसिंहराजे आणि त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे (म्हणजे उदयनराजेंचे चुलतबंधू) यांनी निवडणुकीचं राजकारण केलं. १९९६ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उदयनराजेंनी निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाटय़ाला पराभव आला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले, आणि त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पण १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.

कल्पनाराजे हा अपमानास्पद भूतकाळ विसरलेल्या नाहीत. आज उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार बनले आहेत, आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पूर्ण पकड आहे. शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्याशी पॅच-अप केलंय. पण राजमातांना ही गोष्ट पटलेली नाही. राजमातांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी राजघराण्याच्या अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केलेला आहे. आज जलमंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या वाडय़ातली बहुतेक बांधकामंही त्यांनीच करून घेतली आहेत. त्याचा त्यांना अभिमान वाटतो. कल्पनाराजेंना मराठीत संवाद साधणं मात्र कठीण जातं. बोलताना अनेकदा मराठी शब्द न सुचल्याने त्या इंग्रजी शब्द, सराईतपणे वापरतात. आपला साडेचार वर्षांचा नातू म्हणजे श्रीमंत छत्रपती वीरप्रतापराजे फ्ल्यूएंट इंग्रजी आणि हिंदीत बोलतो, याचं त्यांना अपार कौतुक! विशेष म्हणजे, राजमाता कल्पनाराजे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे सुध्दा बहुतेकदा एकमेकांशी अस्खलित इंग्रजीतच संवाद साधताना दिसतात!

खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर कौतुक वाटलं होतं. भारावलेल्या सातारकरांनी उदयनराजेंचा लोकसभेत भाषण करतानाचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात होर्डिगवर लावला. शिवाय, स्थानिक लोकल चॅनल्सने त्याची व्हिडिओ टेप वारंवार दाखवली होती. आपले महाराज साहेब इंग्रजीत बोलतात यावरच सातार्‍यातली प्रजा खूष आहे. मग असंतोषाला जागा राहतेच कुठे?

(साभार- लोकप्रभा दिवाळी अंक २००९)

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.


 

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो.

ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी महाराजांसाठी नव्हे तर “भवानी-भारतीसाठी” समर्पित आहे. भारतीय इतिहासासाठी ते वास्तूसंग्रहालय उभारत आहेत. “पुरातन काळापासून भारतीयांनी देश हा स्त्रीशक्तीला समर्पित केल्याचे कौतुक वाटते” असे ही ते लेखाच्या मध्यात लिहितात. लेखाच्या शेवटी त्यांनी भारताला पर्यायी शब्द म्हणून “भवानी-भारती, इंडिया” असे शब्द सुचवले आहेत. गोतीयेंच्या वरील तिन्ही मुद्यांवरून असे जाणवते की त्यांना “भवानी-भारती” या पुरातन स्त्री देवतांना केंद्रस्थानी ठेऊन वस्तुसंग्रहालय बनवायचे आहे. तसेच श्री गोतीये हे पुरातन काळातील “भवानी-भारती” या देवतांचा धागा शाक्तधर्मीय शिवरायांपर्यंत आणून ठेवतात. आई भवानी बद्दल सर्व महाराष्ट्रीय तसेच भारतीय जनतेला आपुलकी आणि आदर आहे. भवानी मातेचे महत्व असाधारण आहे. पण गोतीये भवानी मातेचे नाव घेत भारती या वैदिक देवतेचे महत्व वाढवू पाहत आहेत असे दिसते. तसेच भवानी या देवतेचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसताना भवानीचे वैदिकीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे जाऊन ते असंबंधपणे आर्य आक्रमक हे परकीय की भारतीय या मुद्याला हात घालतात. ख्रिश्चन मिशनरी आणि मार्क्सवादी इतिहासकारांना दोष देत जाणीवपूर्वक विषयांतर करतात. हे जाणीवपुर्वकचे विषयांतर त्यांच्या प्रेरणा कोण हे दर्शवत आहे. गोतीये “आम्हाला शिवाजी महाराजांना आधुनिक भारताचे राष्ट्रीय हिरो करायचे आहे” असे म्हणत विविध सात भाषा जाणणार्‍या शिवाजी महाराजांना मराठी-अमराठी प्रादेशिक मुद्यामध्ये अडकवू इच्छितात. त्यासाठी अमराठी मिर्झा राजेंना शिवरायांचा शत्रू म्हणून सांगायला विसरत नाहीत. स्वतः फ्रेंच असूनही मराठीचा अभिमान असल्याचे सांगतात. संग्रहालयाची भाषाही मराठी आहे असे लिहितात. अमेरिकेसारखे बलाढय देश आज शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राचा वापर आणि अभ्यास त्यांच्या लष्करात करत आहेत. अशा जागतिक हिरोला गोतीये मराठी आणि हिंदू धर्म या संकुचित मुद्यांमध्ये अडकवत आहेत. वरून त्यांना राष्ट्रीय हिरो करण्याचा खोटा दिखावा करत आहेत.

पुढे गोतीये “शिवराय हे निधर्मी होते तरीही ते समर्पित हिंदू होते” असे हास्यास्पद विधान करतात. जर शिवराय निधर्मी म्हणजे धर्माला न मानणारे असे होते तर पुन्हा ते कोणा एका धर्माचे समर्पित अनुयायी कसे होतील? गोतीये शिवाजी महाराजांना “देव नव्हे तर देवाचे एक साधन” मानतात त्यासाठी ते विभूती हा शब्द वापरतात. त्यासाठी अरबिंदो बोस यांनी नेपोलियनला विभूती म्हटल्याचा असंबंध दाखलाही देतात. नेपोलीयनला कोणी विभूती, देव अथवा भूत जरी म्हणाले तरी त्याचा शिवरायांना विभूती ठरवण्याशी काय संबंध? अमावस्येच्या अंधार्‍या रात्रीचा आधार घेत मुहूर्त न पाहता लढाया जिंकणारे शिवराय हे अंधश्रद्धेला भिक घालणारे नव्हते. कोणालाही विभूती मानने ही एक अंधश्रद्धा आहे. तसेच ते त्या व्यक्तीचे कर्तृत्व नाकारणारे आहे. त्यांना विभूती म्हणणे त्यांच्या क्रांतीकारक विचारांचा अवमान करणे आहे.

सर्वात गंभीर, संवेदनशील आणि संतापजनक मुद्दा म्हणजे गोतीये लिहितात कि “मी फ्रेंच असून… शिवाजी कोणत्या जातीचे होते? त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे वडील कोण होते? हे मुद्दे माझ्यासाठी गौण आहेत..” या गोतीये महाशयांना शिवराय मराठी असल्याचा अभिमान आहे. ते निधर्मी असूनही यांना ते समर्पित हिंदू वाटतात. शिवरायांचे मराठीपण आणि हिंदू असणे यांना गौण वाटत नाही. पण त्यांची जात कोणती? त्यांचे गुरु कोण? व वडील कोण? हे गौण वाटते! एक वेळ जात आणि गुरूचा मुद्दा सोडूनही द्या पण वडील कोण? हा प्रश्न निर्माण करायची गोतीयेची हिंमत तरी कशी होते? हा प्रश्न होऊच कसा शकतो? शिवरायांच्या जयंती पासून मृत्यूपर्यंत अनेक मुद्दे संवेदनशील झाले असताना. कसलीही वैचारिकता नसणार्‍या, असंबंध, विस्कळीत,गोंधळलेले लिखाण करणार्‍या, शिवचरित्राबाबत काडीचेही गांभीर्य नसणार्‍या गोतीयेला वस्तुसंग्रहालय उभारू देऊ नये.

गोतीयेलाच काय पण भारतात कोठेही शिवरायांबाबत अथवा कोणाही महामानवांबाबत काहीही लोकाभिमुख (प्रचारक) कलाकृती, साहित्य निर्माण होत असेल तर त्यात जाणकारांचा सहभाग असला पाहिजे नाहीतर लोक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यातून संघर्ष आणि अशांतता निर्माण होऊ शकते. मुळात एक सामान्य पत्रकार असणार्‍या गोतीयेकडे १०० कोटी आलेच कोठून? त्यांच्या पाठीशी कोण कोण आहेत? याची चौकशी व्हावी. जेम्स लेनमुळे शिवप्रेमींच्या मनावर झालेली जखम अजून खपली धरत नसताना हा नवा लेन महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होऊ नये याची महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल घ्यावी.

-अविनाश जाधव