विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २

जदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते. शहाजी राजांच्या या स्वप्नाची पूर्ती व्हावी, याचसाठी जिजाबाईंनी बाल शिवाजीवर संस्कार केला. हा संस्कार करताना गुलामगिरीची सावलीही मुलावर पडू नये, यासाठी जिजाबाई निग्रहाने शहाजी राजांपासून दूर राहिल्या. त्यांच्या मनात जर शहाजीराजे हलक्या कुळातले असल्याचा साल असता, तर दोघांच लग्नही झालं नसतं आणि त्यांनी शहाजीचं स्वराज्याचं स्वप्न शिवरायांच्या मनात उतरवलं नसतं. त्याकाळी लग्नं बालवयात होत असे.

जिजाबाईंचा विवाह वडिलांनी आणि घरातल्या जाणत्यांनी ठरवला होता. त्यांनी त्यावेळच्या रीतीनुसार शहाजीराजांचं कुळ-मूळ तपासूनच त्यांच्याशी जिजाबाईंचा विवाह नक्की केला असणार. तथापि, ज्यांच्या डोक्यात कुळाचे खूळ आहे, अशा सनातनी किड्यांच्या वळवळीतूनच शहाजी आणि जिजाबाईंमधील नीच-उच्च कुलाची निपज झाली असणार आणि जेम्स लेनच्या डोक्यात ती भरली असणार. जिजाबाईंच चारशे वर्षांपूर्वी नवर्‍यापासून दूर राहणं. त्याचं स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याच पाहणं, हे बहुजन समाजातील स्त्री एकाकीपणे अशी काही कर्तबगारी दाखवू शकते, याकडे आजही प्रश्नार्थक नजरेने पाहणार्‍यांना छळू शकतं. हा दोष पाहणार्‍यांचा नसून वैचारिक सोवळ्याचा आहे. या सोवळ्यात जेम्स लेन फसलाय.

त्यामुळेच शिवरायांची कुचेष्टा नोंदवण्यासाठी त्यांनी जो महाराष्ट्रीयन असा उल्लेख केलाय ते महाराष्ट्रीय लोक म्हणजे पेशवाईतल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी शिवरायांच्या अस्सल मराठेशाहीला अफजुलखानी आवेशात डंख मारणारे अट्टल कोब्रा नाग आहेत, असं समजायला हरकत नाही. कारण या पुस्तकाच्या संदर्भसुचीत प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, डॉ.आंबेडकर, गोविंद पानसरे यांच्या शिवराय आणि शिवराज्य या संबधीची माहिती देणार्‍या पुस्तकांचा समावेश नाही. चार महिन्यापूर्वी जेम्स लेनच पुस्तक प्रसिद्ध झालं. ७ सप्टेंबर २००३ च्या दैनिक सामनाच्या रविवारच्या पुरवणीत या पुस्तकाचं कौतुक करणारं अनंत देशपांडे यांचं परीक्षण आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आणि शिवराय हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आहे. तसे शिवराय मराठीजनांच्या अस्मितेचा विषय आहेत. महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत. या दैवताची जेम्स लेन याने पेशवाई किड्यांच्या नादाला लागून काय धूळधाण उडविली, याची माहिती राज्यकर्त्यांना असणे शक्य नाही, हे समजू शकतो. पण या बदकर्माची कल्पना परीक्षण लिहिणार्‍यास नसावी, हे पटण्यासारखं नाही.

ह्यात संपादकाच्या मोकळेपणाचा फायदा उठवला गेला असेल तर कपटनीती यशस्वी झाली, असंच म्हणावं लागेल. दरम्यानच्या काळात या पुस्तकाच्या विरोधात कुजबुज सुरु झाली. त्या गेल्या आठवडयात वर्तमानपत्रातून वाचा फुटली. त्याचबरोबर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने ताबडतोब क्षमायाचना करून सदर पुस्तकाची आवृत्तीच रद्द करीत असल्याचं जाहीर केलं आणि वितरण थांबवलं. परंतु तोपर्यंत जगभर वितरीत झालेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. त्या पुढच्या काळात संदर्भासाठी वापरल्या जाणार, हे स्पष्ट आहे. अनंत देशपांडेनीही सामनातील परीक्षणात एक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो, असं म्हटलं आहे. शिवरायांच्या संबंधित एखादं प्रकरण निघालं कि, त्यावरून देणार्‍या संस्थेने अथवा त्याला मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींपैकी कुणीही शिवरायांना कलंकित करणार्‍या पुस्तकाचा जाहीर निषेध केलेला नाही. मूळ गुन्हेगार परदेशात असल्यामुळे त्याला जोडयाने बडवता येत नाही.  त्यामुळे त्याला साथ देणार्‍यांना निगरगट्टपणे मजा अनुभवता येतेय.

साभार:
ज्ञानेश महाराव,
(गर्जे शिवरायांची तलवार)

Leave a Reply