संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

-महावीर सांगलीकर

मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण त्यांचा हा मनसुबा उधळून लावला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांनी मराठीत घुसवलेले संस्कृत शब्द आपण वापरण्याचे जाणून-बुजून बंद करायला पाहिजेत.

संस्कृत ही भाषा मूळ नाही हे संस्कृतवाद्यांना माहीत असते, पण बहुजनांच्या मराठी, हिंदी वगैरे भाषांना दुय्यम ठरवण्यासाठी ते लोक नेहमी संस्कृत भाषेचे महात्म्य उगळत बसलेले असतात, संस्कृत ही भाषा इतर सगळ्या भाषांची जननी असल्याचे सांगत रहातात. या खोटारडेपणाला बळी पडून बहुजन समाजाच्या मनात आपल्या भाषेविषयी न्यूनगंड तयार होतो. हे टाळायचे असेल तर आपणास संस्कृतचे स्तोम उधळून लावले पाहिजे. त्यासाठी आपणास ‘संस्कृत हटवा, मराठी वाचवा’ ही मोहीम राबवली पाहिजे. या मोहीमेचा पहिला भाग म्हणजे आपण मराठी भाषेतून संस्कृत शब्दांची हकालपट्टी केली पाहिजे.

मनुवाद्यांच्या मनात संस्कृत भाषेबद्दल न्यूनगंड तयार करणे हे बहुजनांचे धोरण असले पाहिजे. मनुवाद्यांचा जीव संस्कृत भाषा आणि वेद यांच्यात आहे. या दोन्ही गोष्टींचे महात्म्य संपवले की मनुवाद्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक दहशतवाद संपलाच म्हणून समजा.

संस्कृत शब्द कसे ओळखावेत?

मूळात संस्कृत भाषा ही आमचेच अनेक शब्द उचलून, त्यावर संस्कार करून तयार झाली आहे. त्यामूळे कोणते शब्द आपले आहेत आणि कोणते शब्द संस्कृत आहे हे ओळखणे तसे जरा अवघड आहे, पण पुढील बाबी ध्यानात ठेवल्या तर संस्कृत शब्द ओळखणे फारच सोपे आहे.

१. ज्या शब्दात क्ष, ज्ञ, ष, ऋ, ङ, ञ ही अक्षरे आहेत ते सगळे शब्द संस्कृत आहेत, कारण ही अक्षरे आपल्या मूळ मराठी भाषेत नाहीत तर ती संस्कृत भाषेतून मराठीत आली आहेत.

२. ज्या शब्दात ’र’युक्त जोडाक्षर असते असे सगळे शब्द जास्तकरून संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. ही जोडाक्षरे ‘पोटफोड्या’ र (जसे प्र, क्र, ब्र, त्र, द्र वगैरे), रफार (अर्क, तर्क वगैरे), कृ, गृ, वगैरे

३. इंग्लिश भाषेतील शब्दांना बदली शब्द म्हणून संस्कृत शब्द तयार हा संस्कृतवाद्यांचा आवडता उद्योग असतो. जसे भ्रमणध्वनी, संगणक वगैरे.

मराठी भाषेतील संस्कृत शब्द हाकलण्याची पहिली व सगळ्यात सोपी पायरी म्हणजे वरील भ्रमणध्वनी, संगणक यासारखे बनावट संस्कृत शब्द वापरण्याचे बंद करणे. आपण टेबलला टेबल म्हणतो, सायकलला सायकल म्हणतो, तसेच कॉंम्प्यूटरला कॉंम्प्यूटर आणि मोबाईल फोनला मोबाईल फोनच म्हणावे. उगीच संगणक, भ्रमणध्वनी असले फालतू संस्कृत शब्द वापरू नयेत.

दुसरे म्हणजे मराठी भाषेत रूळलेले हिंदी, कन्नड, अरबी, फारसी, इंग्लिश वगैरे भाषेतील शब्द नेहमीच वापरावेत. संस्कृतवादी लोक आपल्याला या भाषांचा द्वेष करायला शिकवतात. पण आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे की या भाषांनी आपल्यावर कधीही अन्याय केला नाही. या भाषा शिकायला आपल्याला कधीही बंदी नव्हती व नाही. याउलट संस्कृत भाषा ही आपल्यावर अन्याय करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल आपुलकी बाळगायचे आपल्याला कांहीच कारण नाही. याउलट संस्कृतचे उरले-सुरले महात्म्य संपवण्यात आपले बरेच फायदे आहेत.

Leave a Reply