मराठा आरक्षण आंदोलन शिवनेरी २००९

२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय प्रबोधनाच्या मार्गाने मराठा समाजापर्यंत घेऊन जाण्याबाबत एकमत झाले. मराठा आरक्षण हा त्यातलाच एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय !

संभाजी ब्रिगेडबाबत युवकांमध्ये आकर्षण वाढत होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी ही योग्य संधी होती. ब्रिगेडने तो विडा उचलला आणि गावोगावी जाऊन आरक्षणाबाबत नकारात्मक असणाऱ्या मराठा समाजाला सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न चालवले. त्यांच्या भाषणातुन राजर्षी शाहू महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, इत्यादिंची आरक्षणाबद्दलची भुमिका मांडली जाऊ लागली. मराठा आरक्षण का आणि किती गरजेचे आहे याचे महत्व समाजाला पटत होते. हे आरक्षण मिळवण्यासाठी लढा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातुनच मराठा समाजाचे आरक्षण मेळावा, आरक्षण परिषद, आरक्षण जनजागृती कार्यक्रम होऊ लागले. निवेदनाच्या पातळीवरील आंदोलन होऊ लागली. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे ही एकमुखी मागणी समोर आली.

सप्टेंबर २००४ मध्ये नेमलेल्या बापट आयोगाने २००८ मध्ये आपला अहवाल दिला, त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळु नये यासाठी हीन पातळीवरचे राजकारण होऊन मराठा आरक्षण नाकारण्यात आले. त्यानंतर मराठा आरक्षणाने हिंसक रुप घेतले. रास्ता रोको, रेल रोको, बस तोडफोड, टायर जाळपोळ झाली. महाराष्ट्रातील मराठा संघटनांनी एकत्र येत मराठा आरक्षण समन्वय समिती स्थापन केली. १ फेब्रुवारी २००९ रोजी मुंबईत महामेळावा झाला. त्यातुन फारसे काही निष्पन्न झाले नाही उलट नंतर त्यातही राजकारण होऊन विभागणी झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न वाऱ्यावर सोडुन चालणार नव्हतं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणल्याशिवाय त्यांना १९ फेब्रुवारी २००९ च्या शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवुन देणार नाही असा थेट इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक ऍड.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी दिला. १५ फेब्रुवारीपासुन सर्वत्र मेसेज फिरले. राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुण्याकडे धाव घेतली. १७ फेब्रुवारीपर्यंत अनेकजण पुण्यात हजर झाले. १८ फेब्रुवारीला शांताराम कुंजीर यांनी लालमहाल येथे सर्वांची बैठक घेऊन सर्वांना शपथ दिली आणि आपल्याला जमेल त्या मार्गाने शिवनेरी गाठा अशा सुचना दिल्या. प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते पुण्यातुन शिवनेरीच्या दिशेने निघाले. वाटेत पोलिसांनी अडवल्यानंतर विकास पासलकरांनी त्यांना आम्ही शांततेत कार्यक्रम करणार आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा अशी विनंती केल्यानंतर पोलिसांनी मार्ग मोकळा केला. संध्याकाळ होता होता परत पोलिसांनी त्यांना शिवनेरीच्या पायथ्याला अडवले. तरीही रात्री पोलिसांना गुंगारा देत सर्वजण गडावर पोचले. गडावर अगोदरच भरपुर कार्यकर्ते गोळा झाले होते. पहाटे पोलिसांनी गडावर जमलेल्या सर्वांना खाली हाकलुन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांच्या संख्येपुढे पोलिसांनी नंतर माघार घेतली.

१९ फेब्रुवारी २००९ ची सकाळ उजडली. कार्यकर्ते महाराजांचे दर्शन घेऊन हेलिपॅडजवळ जमा झाले. सुरक्षेसाठी पोलिसांची संख्या वाढविण्यात आली होती. पोलिसांनी सर्वांना हेलिपॅडपासुन दूर नेले. कार्यकर्ते मोकळ्या जागेवर येऊन बसले. जमलेल्या लोकांमधुन काहीजण उठुन भाषण करायला लागले. पोलिसांनी भाषण बंद करण्यास सांगितले. त्यावर जमलेल्यांनी आम्हाला भाषण करु द्या, आम्ही कायदा हातात घेणार नाही अशी विनवणी केली. तरीही वयाच्या सत्तरीत नाशिकवरुन शिवनेरीवर आलेले डी.डी.गोर्डे अण्णा भाषण करत असताना पोलिसांनी त्यांना खाली खेचले आणि काठीने त्यांच्या पायावर जोरात प्रहार केले. जमलेले लोक पोलिसांच्या अंगावर धावुन गेल्यावर पोलीस घाबरुन शांत बसले. परंतु कार्यकर्ते आता चिडले होते.

तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर येत असल्याच्या सुचना पोलिसांनी केल्या. कार्यकर्त्यांनी हेलिपॅडच्या दिशेने धाव घेतली. फोन वरुन खेडेकर साहेबांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले, परंतु कुणीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हेलिपॅडजवळ जमलेल्या लोकांवर पोलिसांनी बेदम लाठीचार्ज सुरु केला. आता मात्र मॉब भडकला होता.आकाशात हेलिकॉप्टर दिसताच दगडांचा प्रचंड वर्षाव झाला. त्यात पोलिसही प्रचंड मार खात होते. मागे दरी असल्याने सर्वजण पुढे असणाऱ्या पोलिसांवर तुटुन पडले. दगडांचा वर्षाव झेलत हेलिकॉप्टर खाली उतरले. पण त्यात मुख्यमंत्री नव्हते. कार्यकर्त्यांनी हेलिकॉप्टरच्या काचा फोडल्या.

दरम्यान खेडेकर साहेब, प्रवीणदादा गायकवाड ही मंडळी गडावर आली. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मदतीने त्यांनी कार्यकर्ते आणि पोलिसांमधील वातावरण शांत केले. सर्वांना घेऊन ते मुख्य सभेच्या ठिकाणी आले. वातावरण शांत झाल्याचे पाहुन मुख्यमंत्री अशोक चव्हाण गडावर आले. शिवजन्मोत्सव शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर जमलेल्या लोकांना संबोधित करताना अशोक चव्हाणांनी “मी सुद्धा मराठा आहे, पंधरा दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो” असे आश्वासन देऊन ते निघुन गेले.

शिवनेरी मराठा आरक्षण आंदोलनाच्या सगळ्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडच्या एकुण २८ जणांवर केसेस झाल्या. त्यात शांताराम कुंजीर, राहुल दत्तात्रय पाटील, विलास कुंजीर, जयदीप किल्लेदार, संतोष किल्लेदार, प्रवीण चौगुले, राहुल रंगनाथ पाटील, महेश चव्हाण, निशांत किल्लेदार, दत्तात्रय गोरडे, सोमेश्वर आहेर, गोरख दळवी, कृष्णांत पवार, संतोष गव्हाणे, ज्योतिबा नरवडे, सुभाष भगत, रमेश मोरे, रमेश खेडेकर, अमोल चव्हाण, विजय वरखेडे, राजू चन्नाळे, मनोज देशमुख, मदन रसाळ, अरविंद मोळक, संजय सुरवसे, राजेश मोरे, भैरु डोंगरे, राजेंद्र पाटील हे सर्वजण होते. त्यापैकी अनेकजण नांदेड, परभणी, नाशिक, बीड, सोलापुर, कोल्हापुर, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबातील होते. आंदोलनानंतर सर्वांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. जेलमध्ये असतानाही मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा दिलेला शब्द न पाळल्याने जेलमध्येच सर्वांनी उपोषण सुरु केले. त्यांना पाठिंबा म्हणुन जेलमधील बाकी अडीचशे कैद्यांनीही उपोषण केले. शेवटी खेडेकर साहेब, प्रविणदादा गायकवाड यांना बोलावुन सर्वांचे उपोषण सोडवले. त्यानंतर पंधरा दिवस येरवड्यात घालवल्यानंतर सर्वांना जामीन मंजुर झाला.

गेल्या दहा वर्षांत या प्रकरणी १२० कोर्ट तारखा पार पडल्यानंतर २९ जानेवारी २०१९ रोजी दहा वर्षांनंतर खेड अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे सहजिल्हा न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. प्रकरण पुणे कोर्टात असताना कोर्टात ऍड.समीर घाडगे, ऍड.ढमाले, ऍड.सुनील बांगर यांनी योग्यरित्या बाजु मांडली. खेड कोर्टात ऍड.मुकुंद आवटे, ऍड.रमेश वाघुले, ऍड.अनिल राक्षे, ऍड.संतोष दाते, ऍड.अनिल ढवळे यांनी चांगल्या प्रकारे युक्तिवाद केला.

सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणुन ऍड.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. मा.प्रवीणदादा गायकवाड यांनी केसचा आर्थिक भार उचलल्यामुळे कार्यकर्त्यांना गेल्या दहा वर्षांत कसलाही आर्थिक त्रास झाला नाही. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिवनेरीच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जेलमध्ये असताना नाशिकच्या डी.डी.गोर्डे अण्णा यांनी “मराठा आरक्षण संग्राम : शिवनेरी ते येरवडा जेल” ही सविस्तर पुस्तिका (जिजाई प्रकाशन पुणे) लिहली आहे. तसेच खेडेकर साहेबांनी “मराठा आरक्षण” हे पुस्तक लिहुन शिवनेरीच्या आंदोलनाची भूमिका व मराठा आरक्षणाचा विषय सविस्तरपणे मांडला आहे. नांदेडचे संतोष गव्हाणे यांनी फेसबुकवरुन “शिवनेरी आंदोलन २००९” या सदरात आपला आंदोलनातील अनुभव मांडला आहे. तारखेसाठी पुण्यात मुक्कामी येणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत माझाही गेल्या तीन चार वर्षांचा स्नेह आहे. भांडारकर प्रकरणातील ७२ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता शिवनेरी मराठा आरक्षण आंदोलनातील २८ बांधवांची निर्दोष मुक्तता ही आनंद देणारी घटना आहे. सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !

अनिल माने.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.