राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त.

आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेला, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारा असा हा लोकराजा होता. आपले छत्रपतिपद, अधिकार, आपले वेगळेपण हे आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी वापरणाऱ्या शाह महाराजांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या प्रत्येक पैलूतून दीनदुबळे वशोषित घटकांबद्दलची तळमळच प्रतित होते. मग, ते मागासवर्गीय असोत, भटके विमुक्त असोत किंवा स्त्रीवर्ग असो.

राजर्षी शाहूंच्या परिवर्तनवादी विचारांच्या संकल्पनेत व्यापक सामाजिक समतेची उत्स्फूर्त जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले. स्त्रीदास्याची शृंखला खंडित करायची असेल, तर प्रथम स्त्रीवर्ग शिक्षित झाला पाहिजे, याची जाणीव महात्मा फुल्यांप्रमाणे शाहू महाराजांनाही झाली आणि मग स्त्री शिक्षण हा त्यांच्या सुधारणावादी कारभाराचा एक भागच बनला. कोल्हापूर संस्थानचा कारभार हातात येताच शिक्षण प्रसाराचे व्रत त्यांनी घेतले आणि सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. या प्राथमिक शिक्षणावर ते संस्थानच्या उत्पन्नातून दरवर्षी एक लाख रुपये खर्च करत होते. पुढे हा खर्च तीन लाखांवर गेला. यासाठी त्यांनी श्री. परांजपे हे शिक्षणमंत्री नेमले होते. राजर्षी शाहूंच्या शिक्षण प्रसाराच्या या सर्व खटाटोपामध्ये स्त्री शिक्षण समाविष्ट होते. शाहू महाराजांनी डोंगरी, ग्रामीण व मागासलेल्या भागांमध्ये मुलींसाठी शाळा काढल्या. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या ४-५ वर्षांतच त्यांनी भुदरगडसारख्या सह्याद्री लगतच्या मागासलेल्या भागात मुलींच्या शाळा स्थापन केल्या. ज्या ठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शाळा नाहीत, अशा ठिकाणी मुलींनी शाळेत येऊन मुलांच्या बरोबरीने एकत्रित शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी उत्तेजन दिले. मुलींना शिक्षित करण्यासाठी समाजातील जातिभेदाचा विळखा सैल होण्याची वाट न पाहता त्यांनी चांभार व ढोर मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढून त्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. मुलींच्या शिक्षणात शिक्षकांनी अधिक रस घ्यावा म्हणून मुलांच्या शाळेत पास होणाऱ्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना बक्षिसे देण्याची अभिनव कल्पना महाराजांनी राबवली.

प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी विशेष लक्ष घातले आणि १९१९मध्ये एक खास हुकूम काढून जाहीर केले की, मागासलेल्या जातीतील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रौढ स्त्रियांच्या राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था दरबारकडून मोफत केली जाईल. हुषार मुलींनी पुढील शिक्षण घ्यावे, यासाठी महाराजांनी दरबारतर्फे अशा मुलींसाठी शिष्यवृत्त्या ठेवल्या. आपली कन्या आक्कासाहेब महाराजांच्या विवाहाप्रीत्यर्थही महाराजांनी प्रत्येकी ४० रुपयांच्या पाच शिष्यवृत्या ४ थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुरू केल्या. अशा शिष्यवृत्त्या त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरातमधील मुलींसाठीही चालू केल्या.

शाहू महाराजांनी मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावरच भर दिला असे नाही, तर त्यांना उच्च शिक्षण देण्याकडेही लक्ष दिलेले दिसते. अत्रिकाबाई डॅनियल बेकर या ख्रिश्चन मुलीला उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला पाठवले. राधाबाई सूर्यवंशी, ताराबाई खानोलकर यांच्यासह पाच मुलींना त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. कृष्णाबाई केळवकर यांना मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्यांना डॉक्टर बनवले. पुढे याच कृष्णाबाईंना महाराजांनी उच्च वैद्यकीय अभ्यासासाठी इंग्लडलाही पाठवले. ही इतिहासाला ज्ञात असलेली शाहूंच्या प्रोत्साहनाने उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

शाहू महाराजांचा स्त्रीच्या उन्नतीविषयीचा दृष्टिकोन स्त्री कर्तृत्वाला आकाश मिळवून देणारा होता. त्यांनी कोल्हापुरात फिमेट ट्रेनिंग स्कूल सुरू केले आणि तेथे रखमाबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. रखमाबाईंनी आपली निवड सार्थ ठरवत कोल्हापूर संस्थानातील स्त्री शिक्षणाच्या कार्याला गती दिली. शिक्षणाधिकारी असणाऱ्या मिस लिटल निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी महाराजांनी याच रखमाबाईंची नेमणूक केली. सर्व स्तरांतील स्त्रियांना केवळ शिक्षणाची दारे खुली करून महाराज थांबले नाहीत, तर स्त्रिच्या राजकीय सहभागाचीही त्यांना आवश्यकता वाटत होती. म्हणून त्यांनी १८९५ मध्ये मुंबईला भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला कृष्णाबाई व रखमाबाई केळवकर या दोन विद्वान भगिनींना स्वयंसेविका म्हणून कोल्हापुरातून पाठवले.

शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाचा परिघ त्यांची स्नुषा इंदुमतीदेवी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इंदुमती ११ व्या वर्षी विधवा झाल्या. तेव्हा सर्व राजकुटुंबाचा रोष पत्करून महाराजांनी त्यांना शिक्षित करायचे ठरवले. शाहूंसारखा कर्ता सुधारक व पोलादी मनाचा सासरा इंदुमतींच्या पाठीशी उभा राहिला. इंदुमतींच्या शिक्षणाची सोय त्यांनी सोनतळीला केली. त्यांच्याबरोबर चार वेगवेगळ्या जातींतील मुलींचीही शिक्षणाची सोय केली. विशेष म्हणजे, त्यात एक ख्रिश्चन मुलगीही होती. महाराजांनी इंदुमतींना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांना जीवनातील अनंत आव्हानांना सामोरे जाता यावे म्हणून सारथ्य, शिकार, अश्वारोहण, मोटार ड्रायव्हिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या. इंदुमतींचे आयुष्य म्हणजे शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणविषयक कल्पना राबवण्याची उत्तम प्रयोगशाळाच होती. इंदुमतींना डॉक्टर करण्याची महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज झनाना मेडिकल कॉलेजमध्ये इंदुमतींचे अॅडमिशनही केले होते; पण दुर्दैवाने हा संकल्प पूर्ण होण्याआधीच महाराजांचे निधन झाले.

अशाप्रकारे शिक्षणाचे वंगण घातल्याशिवाय स्त्री जीवनाच्या परिवर्तनाचे चाक फिरणार नाही, हे शाहू महाराजांनी ओळखले होते; पण त्यांना याचीही जाणीव होती की, स्त्री जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी जहाल सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता आहे. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा असेल, तर फक्त तीला शिक्षित करून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या राजदंडाचा वापर करून स्त्रीदास्य विमोचनाचे कायदेच केले पाहिजेत. म्हणून त्यांनी स्त्रीउद्धाराचे पाच कायदे करून सामाजिक क्रांतीच्या प्रांगणामध्ये आपले पाऊल टाकले.

१९१७ मध्ये शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा आपल्या संस्थानात केला. हिंदु धर्मशास्त्रांनी व सामाजिक बंधनांनी विधवा स्त्रीस पुनर्विवाहास बंदी घातली होती. ही बंदी कायदेशीर मार्गाने दूर करून महाराजांनी स्त्रीच्या पुनर्विवाहाचा मार्ग मोकळा केला. नुसताच हा कायदा करून महाराज थांबले नाहीत, तर आपली स्नुषा इंदुमतींसमोरही त्यांनी पुनर्विवाहाचा पर्याय ठेवला होता. स्त्री उद्धाराबरोबरच राष्ट्राच्या एकात्मतेला पुष्टी देणारा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कायदा शाहू महाराजांनी १९१९ मध्ये केला. त्याकाळी आंतरजातीय – धर्मीय विवाह करणाऱ्यांचे विवाह बेकायदेशीर व संतती अनौरस ठरवली जात होती, तरीही धाडसाने एखाद्या स्त्रीने असा विवाह केलाच, तर तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असे. म्हणून महाराजांनी हा कायदा करून असा विवाह करणाऱ्यांचे विवाह व संतती दोन्हीलाही कायदेशीर मान्यता दिली. या कायद्याचे एक विशेष म्हणजे, यातील एका कलमात महाराजांनी १८ वर्षांवरील मुलीस जोडीदार निवडण्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही, असे म्हटले आहे. स्त्री स्वातंत्र्याचा ऐलान करणारे हे कलम आहे. येथेही सुधारणेची सुरुवात महाराजांनी स्वत:च्या घराण्यापासून केली. त्यांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचा चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर घराण्यात करून दिला. १०० वर्षांपूर्वी समाजमनावर मात करून असे विवाह घडवून आणताना महाराजांना कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा तिसरा कायदा शाहू महाराजांनी केला, तो म्हणजे ‘स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा.’ हा कायदा करायला स्वतंत्र भारतात २००५ वर्ष उजडावे लागले. या कायद्यात महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागविण्याचे बंद करण्याबद्दल नियम दिले आहेत. या क्रूरपणाच्या वागणुकीत त्यांनी स्त्रीचा केवळ शारीरिक छळच नव्हे, तर मानसिक क्लेश देणेही शिक्षेस पात्र मानले आहे. शाहू महाराजांनी स्त्रीला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, तसेच तीला नको असणाऱ्या जोडीदारापासून बंधनमुक्त होण्याचे स्वातंत्र्यही दिले. १९१९ मध्ये काडिमोड कायदा करून महाराजांनी जातपंचायतीच्या लहरीवर चालणारी काडिमोड पद्धत बंद केली आणि स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार दिला.

असे अनेक कायदे करून शाहू महाराजांनी स्त्रीच्या हातात संरक्षणाचे एक हत्यारच दिले. एका एत्तदेशीय राजाने आपल्या संस्थानात इंग्रज सरकारहून प्रगत कायदे केले, ही गोष्ट भारताच्या इतिहासात क्रांतिकारक ठरावी अशी आहे. स्त्रीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणाऱ्या पद्धती त्यांनी हुकूम काढून बंद केल्या. १९२१ मध्ये शिमग्याच्या सणात स्त्रियांबद्दल बिभत्स भाषा वापरण्याचे बंद करण्याबद्दल त्यांनी हुकूम काढला. मराठा समाजामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या घोशा, पडदा पद्धतीचा निषेध करत ते म्हणतात की, ‘या पडदा पद्धतीने स्त्रियांमधील विरत्वाचे गुण नष्ट होतात.’ शाहू महाराजांचा स्त्री प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्त्रीच्या अस्मितेच्या सर्व कक्षांना स्पर्श करणारा होता आणि या दृष्टिकोनातूनच त्यांनी स्त्री उद्धाराचा ध्वज आपल्या हाती घेतला.

प्रा. डॉ. मंजुश्री पवार

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.