शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या बोडक्या आवारातील बोडक्या वातावरणात मेघडंबरीविरहित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित लहानसा पुतळा बसवला. शिवरायांचा हा पुतळा तेथे बसविण्यामागे विधिमंडळाची अधिकृत भूमिका संशयास्पद आहे. मुळातच बोडका पुतळा अयोग्य जागी बसविल्यामुळे शिवरायांची बदनामीच जास्त होते. यातच आता महाराष्ट्र व देशाने शिवरायांना ‘मराठा’ ठरविले आहे. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राने ‘मराठा’ या शब्दाची आतातरी निश्चित व्याख्या करावी.

मराठी बोलतो तो मराठा. महाराष्ट्रात राहतो तो मराठा. मराठा ही जात नसून, एक अभिमानास्पद प्रवृत्ती आहे. अशाप्रकारे ‘मराठा’ या शब्दाबद्दल मत-मतांतरे होत असतात. त्यातूनच राष्ट्रगीतात ‘मराठा’ आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र झोळीत पडला होता; परंतु मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत ‘मराठी’ माणूस व्यापारी, भांडवलदार, कारखानदार, नोकरशाही, मोक्याची सत्तास्थाने इथे नव्हता. होता तो अमराठी लोकांकडून नागवल्या जात होता. या नागवल्या जाणाऱ्या ‘मराठी’ माणसावर सन १९६५ मध्ये मा. प्रबोधनकार ठाकरेंनी ‘शिवसेना’ स्थापून आशेचे व मायेचे कापड पांघरले. ‘मराठी माणूस’ आपले हक्क-अधिकार विसरला होता. त्याला जागे करण्यासाठी मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘उठ मराठ्या उठ…’ हे स्फूर्तिगीत रचले. वीररसात गायिले. त्या आवाजाने ‘मराठी माणूस’ जागा झाला होता. त्यावर अजून शिवसेना राजसत्तेत आहे.

मराठी संस्कृती व मराठी माणूस जेव्हा जेव्हा अन्यायग्रस्त होतो; तेव्हा तेव्हा या अन्यायाविरोधात ‘मराठा’ म्हणूनच आवाज उठविल्याचा इतिहास आहे. महात्मा फुले, बा, गं. टिळक, चिपळूणकर, मुकुंदराव पाटील, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, राजर्षी शाहू महाराज इत्यादी अनेकांनी ‘मराठा’ हा शब्द गुणवाचक म्हणूनच वापरलेला आहे. समाजशास्त्रीयदृष्ट्या अलीकडच्या काळात ‘मराठा’ हा शब्द एका घटकाला उद्देशून ‘जात’ या अर्थाने वापरल्या जात आहे. शिवरायांच्या इतिहासाला ‘मराठा इतिहास’ म्हणल्या गेले. साहित्यिक व टीकाकारांनी सामाजिक स्थित्यंतराचे विदारक चित्र रंगविताना, ‘कुणबी माजला पाटील झाला, पाटील माजला देशमुख झाला, देशमुख माजला मराठा झाला, मराठा माजला राजपूत (सिंह) झाला, राजपूत माजला नि प्रतिगामी सत्ताधीश झाला.’ असे अर्थपूर्ण विवेचन केलेले आहे. माजणे हा शब्द ‘आर्थिक उन्नती’ याच अर्थाने घेतलेला आहे. मुळातच समाजशास्त्रात कुणबी हा शब्द इसवीसनपूर्व सातव्या शतकापासून वापरात असल्याचे स्पष्ट आहे. ‘शेती करणारा व शेतीशी पूरक रोजगार करणारा समूह म्हणजे कुणबी.’ अशी कुणबी या शब्दाची व्याप्ती आहे. मूळ शेती करणारा वा शेती धारण करणारा समूह ‘शेतकरी’ म्हणजे कुणबी झाला. तर पूरक रोजगार करणारे समूह बलुतेदार वा अलुतेदार झाले. पुढच्या काळात कोरडवाहू शेती करणारा समूह ‘कुणबी’ राहिला तर ओलिताची शेती करणारा समूह ‘माळी-कुणबी’ झाला. मराठा हा शब्द इसवीसनापूर्वीच्या तिसऱ्या शतकापासून व्यवहारात वापरात असल्याचे काही शिलालेखावरून आढळते. याचाच अर्थ ‘कुणबी’ व ‘मराठा’ हे सामाजिक कृषी जीवन स्पष्ट करणारे शब्द महाराष्ट्रात जन्मलेल्या व राहत असणाऱ्या, मराठी भाषा बोलणाऱ्या समाजास उल्लेखून गेल्या साडेतीन-तीन हजार वर्षांपासून वापरात आहेत. मानववंशशास्त्रीय विचार केल्यास पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती प्रथम शेतकरी म्हणजे ‘कुणबी’ असायची व नंतर ती व्यवसायाच्या नावाने मराठा, माळी, तेली, धनगर, धोबी, शिंपी, कुंभार, चांभार, महार, मातंग, घिसाडी, जोशी इत्यादी असायची. समाजाच्या बदलत्या प्रवाहात ‘मराठा जात’ वेगळी झाली आहे. स्वतंत्र भारतात व संयुक्त महाराष्ट्रात ‘मराठा’ ही एक प्रगत जात मानल्या गेली. मूळचाच ‘मराठी’ असलेला हा ‘मराठा समाज’ इतर शेतकरी समूहापासून तोडण्यात आला असून, त्याला ‘अमराठी’ मानण्यात येत असल्याचे दिसते.

थोडक्यात ज्याची – ज्याची आर्थिक प्रगती झाली त्याने – त्याने ‘कुणबी’ या शब्दाशी नाळ तोडली. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात मराठा विरुद्ध मराठेतर वाद चांगलाच पेटलेला आहे. लोकसंख्येचा फायदा म्हणून व प्रत्येक जातीच्या मतदारांची संख्या म्हणून राजकारणात मराठा लोकप्रतीनिधींची संख्या जास्त आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक राज्यास राजपूत, रेड्डी, पटेल, यादव, ठाकूर, कुर्मी असे हेच तत्त्व लागू होते. त्यामुळे प्रत्येक राज्यात त्या – त्या राज्यातील मोठा जातसमूह आपले मोठे संख्याबळ टिकवून आहे. असे असले तरी बंगाल, ओरिसा, केरळसारख्या अनेक राज्यांत बहुजन मुख्यमंत्री होऊ वा टिकू शकला नाही. महाराष्ट्रात ‘मराठा’ जात अत्यंत प्रगत, श्रीमंत, सत्ताधीश, उच्चशिक्षित, सुधारलेली समजल्या जाते. याच कारणास्तव ‘मराठा जातीचा’ समावेश ओबीसी समूहात करण्यात अनेक ओबीसी जातींचा तीव्र विरोध आहे. वास्तविक ‘मराठा’ ही जात फक्त महाराष्ट्रातच आहे. याउलट अनेक ओबीसी जाती अखिल भारतीय आहेत. राज्यघटनेनुसार शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण ओबीसीसाठी गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज नावाची मोठमोठ्या उद्योगपतींची एक संघटना वा संस्था आहे. या नावात ‘मराठा’ शब्द आहे; पण स्थापना झाल्यापासून या संस्थेत एकही मराठा नाही. म्हणजेच ‘मराठा’ श्रीमंत नाही. या नावास कोणीही आक्षेप घेतलेला नाही. तद्वतच भारतातील शंभर श्रीमंतांची यादी प्रकाशित झाली. त्यातही एकही ‘मराठा व्यक्ती’ नाही.

भारत सरकार व महाराष्ट्र सरकार काही नागरी पुरस्कार देत असते. भारत सरकारचा ‘भारतरत्न’ हा क्रमांक एकचा सर्वोच्च, तर ‘पद्मविभूषण’ हा क्रमांक दोनचा पुरस्कार मानल्या जातो. महाराष्ट्र सरकारही ‘महाराष्ट्र भूषण’ नावाचा पुरस्कार देत असते. तो मानाचा सर्वोच्च पुरस्कार मानल्या जातो. त्याचप्रमाणे देश व राज्य विविध क्षेत्रांतील समृद्धी निर्माण करणाऱ्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीस पुरस्कार देत असतात. यातून देशाची व राज्याची ‘सांस्कृतिक ओळख’ जगाला होत असते. महाराष्ट्र शासन लोकराज्य नावाचे मासिक मुखपत्र चालविते. लोकराज्य मासिकाचा मे-२०११ चा अंक हा ‘सुवर्ण सांगता’ विशेषांक आहे. या मासिकात ‘महाराष्ट्रातील’ ज्या – ज्या मान्यवरांना भारत सरकारचे व महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची वर्षवार नावांची यादी आहे. मराठा समाजाची ओळख कला, साहित्य, नाटक, चित्रपट, कादंबरी, सिरियल्स, शिल्पे, गीते, तमाशा, पोवाडे अशा माध्यमांतून क्रूर, रानटी, अत्याचारी रंगविण्यात आलेली आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला असला तरी तो ‘सांस्कृतिक दृष्ट्या’ आजही ‘रानटी, अविकसितच’ आहे. माझे म्हणणे वाचकांना पटण्यासाठी लोकराज्यमधील माहिती वाचा. त्यावरून तयार केलेल्या तक्त्यात ‘मराठा शोधा.’ म्हणून मराठ्या- शोध मराठा.

मराठा पुरस्कार तक्ता

हे मराठा समाजाचे सन २०११ सालातील ‘असांस्कृतिक दर्शन’ आहे. सर्वसत्ताधीश समजल्या जाणाऱ्या मराठा समाजालाच जेव्हा महाराष्ट्रात ‘असांस्कृतिक’ ठरविल्या जाते; तेव्हा इतर बहुजन जाती-जमाती-आदिवासीबाबात शोध घेणे चूक आहे. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य आहे, असे सतत भासवल्या जाते. सन १९९७ पासून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा व विज्ञान या क्षेत्रात कामगिरीबद्दल दिल्या जातो. डॉ. विजय भटकर यांना सन २००० मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यासाठी अक्षरशः भांडावे लागले. मुख्यमंत्री मा.ना. विलासराव देशमुख यांचा प्रचंड विरोध होता. प्रा. रामकृष्ण मोरे, सांस्कृतिक कार्य मंत्री होते. तेही दबावाखाली होते. शेवटी मा.ना. रोहिदास पाटील व आमदार रेखाताई खेडेकरांनी आग्रह धरला. मा. विलासरावांनी सन २००० चा पुरस्कार डॉ. विजय भटकरांना, तर सन २००१ चा पुरस्कार क्रिकेटपटू मा. सचिन तेंडुलकर यांना एकाच दिवशी जाहीर केले. वर फक्त दहाच पुरस्कारांची यादी दिली आहे. अजून भारत सरकारचेच शेकडो व महाराष्ट्र सरकारचेही शेकडो पुरस्कार आहेत. कॉम्रेड शरद पाटील व डॉ. आ. ह. साळुंखे, सातारा या दोन मराठा माणसांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात जी भर टाकलेली आहे, तिचे मोजमाप कशानेही होणार नाही. प्रा. भालचंद्र नेमाडेंना ‘पद्मश्री’ पुरस्कार -२०११ मध्ये जाहीर झाला आहे. ते जन्माने जरी जळगाव जिल्ह्यातील ‘मराठी’ असले. तरी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार महाराष्ट्र राज्य कोट्यामधून मिळालेला नाही. त्यांची किंमत उत्तर भारतातील हरयाणा, पंजाब, हिमालय प्रदेश अशा राज्यांनी केली आहे.

गेल्या १२५ वर्षांत काँग्रेसला महाराष्ट्राने समृद्ध केले. त्या महाराष्ट्राच्या वाट्यावर सन १९१२ मध्ये फक्त एकदाच अकोल्याचे बॅरि. मुधोळकर यांच्या रूपाने अ.भा. अध्यक्षपद मिळाले आहे. आजतागायत एकही मराठा काँग्रेसचा अ. भा. अध्यक्ष झालेला नाही. सन १९९७ मध्ये मराठागडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मा. ना. शरदराव पवारांनी अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यावेही मा. केसरी जिंकले. मा. शरदराव हारले. त्यानंतर त्यांनी १० जून १९९९ रोजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हा. अ.भा. पक्ष काढला; पण तोपर्यंत दिल्लीतील नेत्यांनी मा. शरदरावचे पंखच काय सारे काही कापून टाकले होते. आपापल्या राज्यात सर्वेसर्वा असणारे नेते मा. मायावती, मा. करुणानिधी, मा. ममता बॅनर्जी, मा. जयललिता पाहिल्यावर आज मे – २०११ मध्येतरी महाराष्ट्रात असा ‘स्ट्राँग मराठा’ दिसत नाही. पुढच्या पन्नास वर्षांत शक्यता नाही. महाराष्ट्राला प्रधानमंत्रिपद नाही. मा.ना. यशवंतराव चव्हाणांना सन १९७९ मध्ये राष्ट्रपती डॉ. निलम संजीव रेड्डी प्रधानमंत्री पदाची शपथ देण्यास तयार होते. त्यावेळी मा. यशवंतरावांमधील साधनशुचिता जागी झाली, तर मा. शरदराव पवारांना तीनवेळा प्रधानमंत्रिपदाने हुलकावणी दिली. आता महाराष्ट्राच्या वाट्यावर राष्ट्रपतीपद आलेले आहे. त्यामुळे ‘दिल्लीचे तख्त राखणे’ हेच कवी राजाबढेंना अपेक्षित ‘महाराष्ट्र धर्माचे काम’ मा. शरदराव व इतर मराठे करत आहेत. करत राहतील यात शंका नाही. परिणामी शेतकऱ्यांबरोबर राजकीय आत्महत्याही वाढतील.

भारताला स्वातंत्र्य देताना इंग्लंडमधील तत्कालीन विरोधी पक्षनेते विरोधात होते. त्यांचे नाव सर विन्स्टन चर्चिल. चर्चिलचे म्हणणे होते, “भारत स्वतंत्र झाला तरी तेथील जनतेला गुलामीची एवढी सवय झाली आहे, की त्यांना स्वातंत्र्याचा अर्थच कळणार नाही. त्यामुळे फारतर भारतावरील मूळच्या गोऱ्या इंग्रजांचे राज्य संपेल; पण तेथील सामान्य जनतेवर काळे इंग्रज जास्त अन्याय करतील. ‘इंग्लंडच्या पार्लियामेंटमध्ये सन १९४५-४६ मध्ये झालेल्या या चर्चेचा आज भारत, महाराष्ट्र व मराठे अनुभव घेत आहेत. गोऱ्या इंग्रजांचे राज्य ‘महाराणी’च्या नावाने चालत असे. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी देश ताब्यात घेऊन राजकीय सत्ता स्थापन केली. १८५८ ला राणीचा जाहीरनामा आला. त्यानंतरच्या व्हाईसरायने अनेक कायदे करून सामाजिक सुधारणा राबवल्या. गुन्हेगारी कायद्यामध्ये लिंग, धर्म, जात, प्रांत, भाषा असे विशेषाधिकार नाकारून कायद्यासमोर सर्व एक झाले. किमान या क्षेत्राततरी एकवर्णवाद आला. प्रत्यक्ष शासन व प्रशासन सामान्य शेतकरी, कष्टकरी, कुणब्यास पोषक नव्हते म्हणून महात्मा जोतीबा फुलेंनी इंग्लंडच्या राजकुमाराची शेतकरी वेशात भेट घेऊन समाजाची कैफियत मांडली होती. त्यावेळी महात्मा जोतीबा फुले म्हणाले होते,

सत्ता तुझी राणीबाई। डोळे उघडोनि पाही।।
जिकडे तिकडे ब्राह्मणशाही। कुणब्याची दाद नाही।।

आज दीडशे वर्षांनंतर ‘राणीबाई’ची जागा ‘सोनियाबाईंनी’ घेतली आहे. इतर दुरवस्था चर्चिलने भाकीत केल्याप्रमाणेच आहे. भारतात सुमारे सहा टक्के व राज्यात सुमारे पन्नास टक्के असलेल्या ‘मराठ्यांनो’ हे २०११ मधील ‘मराठा चित्रण’ आहे. लोकशाही व्यवस्थेतून तुम्हाला आपला विकासाचा वाटा मिळवायचा आहे. राजसत्ता म्हणजे केवळ राजकारण व सर्वसत्ता नाही. आम्हाला पुढाऱ्याची – स्टेटस्मनची जास्त गरज आहे. अद्यावत राहणी व अद्यावत विचारांची गरज आहे. ते स्वतःचे स्वतःच करावे लागेल. तेव्हा काय चालले आहे, ते समजण्यासाठी आतातरी ‘शोध मराठ्या- शोध मराठा’..


पुरुषोत्तम खेडेकर
(संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ)

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.