सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया

बहुजन समाजात सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा समाजातून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि. १५ फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन!

महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकारामांपासून  संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संत बहुजन समाजात होऊन गेलेत. बहुजन समाजाचाच एक घटक असलेल्या बंजारा जातीत सामाजिक समतेचे उद्गाते ‘संत सेवाभाया’ या मूलनिवासी महापुरुषाचा जन्म झाला. १५ फेब्रुवारी हा त्यांचा जयंती दिन. म्हणून हा लेखन-प्रपंच. खऱ्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, सर्व संत व महापुरुष यांचा लढा वर्णव्यवस्थेविरुद्ध, विषमतेविरुद्ध अर्थात ब्राम्हणी वर्णश्रेष्ठत्वाविरुद्ध होता. त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी, ब्राम्हणी थोतांड अर्थात पोथीपुराण नाकारण्यासाठी समाज-प्रबोधन केलेले आहे. म्हणून मनुवाद्यांनी त्यांचा छळ केलेला आहे. वैकुंठ नाकारणाऱ्या संत तुकारामाला सदेह वैकुंठाला पाठवून त्यांचा खून पचविण्यात आला.

संत सेवाभाया यांचा लढा विषमतेविरुद्ध होता हे त्यांच्या बंजारा बोलीमध्ये ‘भायार बोल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वचनावरुन दिसून येते. ते म्हणतात

कोर-गोर कछ मन भाया।
केरे घर करु म वाया।’

याचा अर्थ – संत सेवाभाया देवीला म्हणतात की – ‘मला सर्व बहुजन समाज (कोर-गोर) भाया म्हणजे भाऊ म्हणतात म्हणून मी कोणत्या जातीतील मुलीशी लग्न (वाया) करु?’ असा प्रतिप्रश्न विचारतात. अर्थात ते कोर म्हणजे गैरबंजारा व गोर म्हणजे बंजारा या सर्वांना (अर्थात बहुजनांना) समान दृष्टीने पाहत होते. शेवटी ते अविवाहित राहिले.

देवीने म्हणजे कुलदैवताने सेवाभायासमोर लग्नासाठी सर्व पर्याय खुले ठेवले होते – म्हणजे जातीतील मुलगी किंवा जातीबाह्य मुलगी (कोर किंवा गोर) असे सेवाभायाने केलेल्या प्रतिप्रश्नावरुन दिसून येते. त्याच प्रमाणे – ‘कोर-गोर एक विह्य’ असेही सेवा भाया यानी सांगितल्याचे सर्व बंजारा बांधवांना माहीतच आहे. यातून संत सेवालाल या संताला असे सुचवायचे असावे की, समाजात सर्व जाती पुन्हा एक होतील. सर्वच संतांनी ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध लढा दिलेला आहे. बहुजन समाजाला शोषणमुक्त, भटमुक्त करण्यासाठी समाजप्रबोधन केलेल आहे. हा इतिहास आहे. त्याला संत सेवालाल कसे अपवाद राहतील?

संत सेवालाल अर्थात ‘सेवाभाया’ हे मानवतावादी क्रांतिकारी महापुरुष होते. त्यांच्या कार्यामुळे बंजारा समाजात स्वतंत्र संस्कृतीगणव्यवस्था संस्कृती आहे. त्यालाच तांडा संस्कृती म्हणतात. त्यात ‘नायक’ व ‘कारभारी’ हे तांडाप्रमुख पंचायत भरवून न्यायदान करतात. यालाच गोर बोलीत ‘नसाब’ म्हणतात. बंजारा संस्कृती ही अवैदिक अर्थात अब्राम्हणी संस्कृती आहे याचा पुरावा म्हणजे बंजारा संस्कृतीत श्राद्ध घालत नाही तर त्याऐवजी होळी व दिवाळी या सणाला चुलीच्या बाहेर, विस्तव काढून आपल्या पूर्वजांना गोडपदार्थाचे नैवेद्य दाखवतात. त्याला ‘धुवाडी’ असे म्हणतात. यात कोणताही ब्राम्हणी संस्कार नसतात. संत सेवाभायांनी कोणतेही ब्राम्हणी, कर्मकांड केलेले नाही व तसा उपदेशही दिलेला नाही परंतु आता मात्र तांड्यामध्ये ब्राम्हणी-कर्मकांडाचा शिरकाव होऊ लागलेला आहे. असे खेदाने म्हणावे लागते. कारण एखादा समाज जेव्हा संत पुरुषाचा भक्त बनतो तेव्हा तो त्याच्या विचरापासून दूर जातो. वर्षातून एक दिवस जयंती साजरी करतो व त्या संताला, महापुरुषाला डोक्यावर घेऊन नाचतो पण त्याचे विचार डोक्यात घेऊन त्याचा प्रचार व प्रसार करीत नाही, हे काम ‘अनुयायी’ करतात.

तेव्हा बंजारा समाजाने भक्त न बनता अनुयायी बनले पाहिजे व संत सेवाभायाच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला पाहिजे. त्यासाठी आपला बंद पडलेल ‘थाळी-नगारा’ पुन्हा बाहेर काढून ‘झांबरा’ सुरु केला पाहिजे. तसेच बुद्धिजीवी वर्गाने आपली नाळ परिवर्तनवादी बहुजनवादी चळवळीशी जोडली पाहिजे. त्याशिवाय समाजाची गुलामगिरी नष्ट होणे नाही.

संत सेवाभाया हे विज्ञाननिष्ठ व द्रष्टे पुरुष होते; हे त्यांच्या खालील वचनावरुन दिसून येते. ते म्हणतात

बना बळदेर गाडी चालीय।
रप्या कटोरो पाणी वकीय।’

याचा अर्थ भविष्यात बिना बैलाची गाडी चालेल. हे भाकीत त्यांनी अडीचशे वर्षापूर्वी केले व आज खरोखर मोटार गाड्या, आगगाड्या धावत आहेत. त्यामुळे ते दैवी पुरुष नव्हते तर ते विज्ञान निष्ठ प्रागतिक विचाराचे द्रष्टे-पुरुष होते. माणसाने विज्ञानाची कास धरली तर नक्कीच प्रगती होईल असा आत्मविश्वास त्यांना होता.

दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे. एक रुपयाला एक कटोरा पाणी विकत मिळेल. अर्थात ते द्रष्टे पुरुष होते. निरीक्षणाच्या व अनुभवाच्या बळावर त्यांना समजलेले होते की, नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा मर्यादित असतो व लोकसंख्या वाढल्यास फुकट मिळणारी वस्तू कालांतराने विकत मिळू लागेल. आज आपण बिसलरी वॉटर १२ रु. लिटरने घेत आहोत. पाण्याचे महत्त्व ओळखून त्यांनी ते सांभाळून वापरण्याबाबत इशारा दिलेला आहे. यात पर्यावरण-शिक्षण आहे, जलसाक्षरता आहे.

परिवर्तनवादी संघटनेच्या एका कार्यकर्त्याशी माझी भेट झाली व समजले की, संत सेवाभायाच्या इतिहासाचे संशोधन चालू आहे, ‘मूलनिवासी नायक’ या मुखपत्रात सेवाभाया विषयी सुनिता राठोड औरंगाबाद यांचा लेख वाचून मी अवाक झालो. त्या म्हणतात “सेवाभायांचे विचार सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. गोरबोलीमध्ये सेवाभाया म्हणतात –

तम सोता तमारे जीवनेम दिवो लगा सको छो।
कोई केनं भजो मत
, पूजो मत, कोई केती कमी छेनी,
सोतार ओळक
, सोता करन दिजो।
भजनेम वेळ घालेलपेक्षा
, करणी करेर शिको।
मारे शिकवाडीप ध्यान दिजो। जाणजो
, छाणजो, पचच मानजो।”

अर्थ :- सर्वप्रथम माणसाचा विश्वास स्वत:वरच असला पाहिजे. कोणीतरी येईल आणि आपला उद्धार करेल यावर विसंबून राहू नये. तुम्ही स्वत:च प्रकाशमान आहात. तुम्ही स्वयंप्रकाशित होऊ शकता. स्वत:ची ओळख कतृत्वाने जगाला करुन द्या. मानव, पशू, वृक्ष, नदी, डोंगर, वायू, प्रकाश हे आपले पूजनीय आहेत. जे मी सांगतो आहे ते अंतिम समजू नका, अनुभव घ्या, माझ्या शिकवणीवर एकदम विश्वास ठेवू नका. सेवाभाया नम्रपणे सांगतात, त्क कार्याची छाननी करा, मूलतप्रल्यमापन करा, खरे-खोट्याचे परीक्षण करा, स्वत: समजून घ्या, मगच विचाराला मान्यता द्या.

संत सेवाभायांच्या शिकवणीमध्ये सिद्धार्थ तथागत बुद्धाच्या विचाराचा परिणाम दिसून येतो. भटकंती करणाऱ्या ब्राम्हणी धर्मग्रंथाना तडा देत तत्कालीन मोडी, मराठी लिहिणे, गणित, हिशेब इ. आत्मसात करुन युद्धाचे डावपेच आखणे हे कार्य सेवाभाया करायचे.

गोरु रो राज लांयूअसे सेवाभायाचे स्वप्न स्वातंत्र्याच्या साठ वर्षातही दिसत नाही.

संत सेवाभाया यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ साली गोलार डोडी तांडा, ता. गुंती, जि. अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला. या दिवशी देशभरात सेवा भायाची जयंती साजरी होते. त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन व सर्व बहुजनांना शुभेच्छा!


धनराज नथू चव्हाण
जळगाव

Source: 1

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.