शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा

आमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले जाते,की जन्मतःच आकाशातील लालबुंद सूर्य पाहून मारुतीला वाटले की,ते फळ आहे. म्हणून ते खायला नुकताच जन्मलेला व भुकेने व्याकूळ झालेला मारुती सूर्याला गिळायला लागला. सूर्याच्या उष्णतेने त्याचे तोंड लालबुंद झाले, म्हणून त्याला लाल मारुती म्हणतात. काळा मारुती हा लंका दहनामुळे काळाशार झालेला व अशात त्याने समुद्रात उडी घेतल्यामुळे काळाठिक्कर पडला. त्याच्या त्वचेला इजा होऊ नये म्हणून त्यावर भक्त मंडळी तेल टाकतात. त्यामुळे त्याचे काळेपण अधिक उठून दिसते. असा हा काळा मारुती फारसा पाहायला मिळत नसल्यामुळे आमच्या परिसराचे आकर्षण बनला होता.

दरवर्षी हनुमान जयंती आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साजरी होत असे. त्यानिमित्ताने आठवडाभर कीर्तन-प्रवचने ऐकण्याची संधी सर्वांना मिळत असे. त्यातून मारुतीविषयीची तीच ती माहिती नव-नव्या प्रतिभावंतांच्या मुखातून ऐकण्याचा आनंद काही औरच होता. आमच्या भाव-विश्वाचा अविभाज्य भाग झालेला असा मारुती माकडाच्या तोंडाचा कसा हा प्रश्नही आम्हाला पडत असे. पुढे व्यायाम शाळेत गेल्यावर त्यापुढे नतमस्तक होणारे पुष्ट पहेलवान पाहिले की, मारूतीविषयी अधिकच अभिमान वाटे असाच अभिमान भारतीय लोकांना वाटत असतो. त्यामुळे त्याच्या विचित्र शरीर रचनेविषयी जी माहिती ऐकायला मिळते, तिची चिकित्सा करण्याची गरज वाटत नाही. पण थोडी तर्कबुद्धी जागी झाली की, अनेक प्रश्न मनात येतात. त्या प्रश्नांची उत्तरं कुणी देत नाही. पण काही ग्रंथांची पानं उलगडली की, त्यांचा धांडोळा घेणं सहज शक्य होतं. ग्रंथ हे आपले गुरू होत, असं जे म्हणतात ते खरंच आहे.

हनुमान कसा झाला?

भारतीय संस्कृतीकोशाच्या दहाव्या खंडात (पृ.२५७ वर) ‘हनुमान’ या टिपणाखाली जी माहिती दिली आहे, ती नुसार हनुमानाचं चरित्र असं – ‘वाल्मिकी रामायणात हनुमानाचं चरित्र तीन ठिकाणी आलेलं आहे. (किष्किंधा. ६६-६७, युद्ध. २८; उत्तर. ३५-३६) किष्किंधाकांडात जांबवानानं याचं चरित्र पुढीलप्रमाणे निवेदन केलं आहे. पुंजिकस्थला नावाची एक सुंदर व श्रेष्ठ अप्सरा होती. ऋषीच्या शापामुळे ती वानर योनीत जन्माला आली. स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचं सामर्थ्य तिच्या ठायी होतं. महात्मा कुंजर या नावाच्या वानराची ती मुलगी होती आणि पुढे केसरी वानराची अंजना नामक पत्नी झाली. अंजना एकदा सुंदर स्त्रीचं रूप धारण करून पर्वतावर हिंडत असता वायूने तिला पाहिलं आणि तो तिच्यावर आसक्त झाला. अंजनेला तो आलिंगन देत असताना गोंधळून गेलेली ती पतिव्रता म्हणाली, ‘माझे पातिव्रत्य भ्रष्ट करण्याची कोण इच्छा करीत आहे?’ त्यावर वायू तिला म्हणाला-

मनसाऽस्मि गतो यत्त्वां परिष्वज्य यशस्विनि ।

वीर्यवान् बुद्धिसम्पन्न्स्तव पुत्रो भविष्यति ॥

महासत्त्वो महातेजा महाबल पराक्रम: ।

लङ्घन प्लवने चैव भविष्यति मया सम: ॥

( किष्किन्धा.६६.१८.१९)

अर्थात, हे यशस्विनी तुला अलिंगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपभोगाच्याच इच्छेने तुझ्या ठिकाणी आपलं तेज ठेवलं आहे, त्या अर्थी तुला वीर्यवान व बुद्धिसंपन्न पुत्र होंईल. तो पुत्र महाधैर्यवान, महातेजस्वी, महाबलाढय व महापराक्रमी होऊन मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करील.

हा वर मिळाल्यावर संतुष्ट झालेली अंजना एका गुहेमध्ये प्रसूत झाली आणि तिने हनुमंताला जन्म दिला. नंतर नुकत्याच उगवलेल्या सूर्याला पाहून ते फळ आहे, असं तो समजला व ते घेण्यासाठी त्याने उडी मारली. ते पाहून इंद्र रागावला आणि त्याने त्याला वज्र फेकून मारले. त्यामुळे त्याची डावी हनु मोडली. तेव्हापासून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. मुलावर वज्र प्रहार झाल्याचं पाहून वायू कुद्ध झाला आणि त्याने आपलं वाहणं बंद केलं. त्यामुळे सर्व देव घाबरून वायूला प्रसन्न करण्यासाठी धडपडू लागले. मग वायू प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने हनुमंताला वर दिला की, युद्धात शस्त्राने तुझा वध होणार नाही. परंतु इंद्र म्हणाला की, हा इच्छामरणी होईल. केसरीचा क्षेत्रज पुत्र आणि वायुचा औरस पुत्र असं सांगून जांबवानाने हे चरित्र संपवलं आहे.

युद्धकांडात रामसैन्याचा परिचय करून देताना शुक्राने रावणाला हनुमानाचं लघुचरित्र सांगितलं आहे. हा लहान असताना याला भूक लागली. पृथ्वीवरील पदार्थांनी आपली भूक भागायची नाही, या विचाराने त्याने सूर्याकडे झेप घेतली; परंतु सूर्यासमीप न जाताच तो उदयाचल पर्वतावर पडला आणि त्याची हनु किंचित दुखावली म्हणून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. उत्तरकाडांतील हनुमंताचं चरित्र हे तुलनेने अर्वाचीन असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. हे चरित्र अगस्त्य ऋषीने रामाला सांगितलं आहे. स्थूल मानाने हे चरित्र किष्किंधाकांडातील चरित्राप्रमाणेच आहे. हनुमंताच्या चरित्रातील अनेक पैलू मानवाला दिङमूढ करणारे आहेत.

पराक्रम हा त्याचा एक प्रमुख विशेष आहे. रामाच्या मते, हनुमान म्हणजे शौर्यमूर्ती होय. त्याच्या शौर्याची मुक्तकंठाने प्रशंसा करताना रामाने म्हटलं आहे,ते असे –

शौर्यं दाक्ष्यं बलं धैर्यं प्राज्ञता नयसाधनम् ।

विक्रमश्च प्रभावश्च हनूमति कृतालया: ॥

दृष्टवैव सागरं वीक्ष्य सीदन्तीम कपिवाहिनीम् ॥

समाश्वास्य महाबाहुर्योजनानां शतं प्लुत: ॥

धर्षयित्वा पुरीं लड्कां रावणान्त: पुरं तदा ।

दृष्टा सम्भाषिता चापि सीता ह्याश्वासिता तथा ॥

(रामायण – उत्तरकांड ३५-३-५)

अर्थात शौर्य, दक्षता, बल, धैर्य, बुद्धिमत्ता, राजनीती, राजकीय कृत्य शेवटाला नेण्याची हातोटी, पराक्रम व प्रभाव यांनी हनुमानाचा आश्रयच केलेला आहे. समुद्र दिसताक्षणी खचत चाललेल्या वानरसेनेला धीर देऊन त्या महापराक्रमी हनुमानाचे शंभर योजने उड्डाण केलं. लंका नगरीवर व रावणाच्या अंत:पुरावर हल्ला करून त्याने सीता पाहिली. इतकंच नव्हे तर तिच्याशी संभाषण करून त्याने तिला आश्वासनही दिलं.

ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव, जांबवंत इ. वी निश्चेष्ट पडले असता वानरांना धीर देण्यासाठी विभीषण हनुमंतासह हातात दिवटी घेऊन फिरत फिरत जांबवानापाशी आला. त्यावेळी जांबवानाने हनुमानाच्या पराक्रमाचं वर्णन केलं आहे.

वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे, परंतु हनुमानाने जर प्राणत्याग केला असेल तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत. (वाल्मिकी रामायण, युद्धकांड, ७४.२१)

वाल्मिकी रामायणात आलेलं हे त्रोटक हनुमान चरित्र आहे. या चरित्रात प्रामुख्याने हनुमान हे नाव त्याला का पडलं, याचं स्पष्टीकरण करण्यासाठी कथा रचलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे त्याचे वीरत्व सूचित करणारी लक्षणंही आढळतात. क्वचितप्रसंगी रामापेक्षाही त्याचा पराक्रम मोठा होता, हेही स्पष्ट केलेलं आहे. असा महावीर हनुमान रामाचा दास कसा व केव्हा झाला, हा एकच प्रश्नच आहे. मुळात ‘हनुमान’ या शब्दाचा अर्थ बळकट हनुवटी असलेला असा होतो. पण हनुमानचरित्रात त्याची हनुवटी कशी दुखावली गेली व हनवटी नसलेला म्हणून ‘हनुमान’ असा शब्द वापरण्यात येतो, असं सांगण्यात येतं. यात कितपत तथ्य आहे,ते आता पाहूया.

हनुमंत म्हणजे नर–वानर

हनुमान हा शब्द तमीळ भाषेतून आला आहे. त्याविषयी भारतीय संस्कृती कोशाच्या दहाव्या खंडात (पृ. २६५ वर) माहिती आलेली आहे. त्यानुसार ‘ वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख आढळत नाही. हनुमंत हा शब्द तमीळचं संस्कृत रूप असावं, असं एफ. ई. पार्जिटर, डॉ. सुनितीकुमार चॅटर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचं मत आहे. द्रविड शब्दाचं संस्कृत रूप बनवताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. उदा : इडुंबिकाचे (गर्विष्ठ स्त्री) हिडिंबा. त्याचप्रमाणे तामिळ ‘आणमंदि’ (आण-कपि, मंदि-नर) शब्दांचे संस्कृतीकरण म्हणजे ‘हनुमंत’ होय. तसंच या प्रदेशात हनुमंताला ‘अनुमंडन’ असं म्हणतात. म्हणजेच संस्कृतातील ‘ह’कार इथे लोप पावतो, असं दिसतं.’

‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात (पृ.३८) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘ तमिळमध्ये ‘अणूमन्ति’ म्हणजे नर-वानर (The Male Monkey), त्याचे ऋग्वेदामध्ये (१०.८६),एका सूक्तात भाषांतरित नाम झालं ‘वृषाकपि’ म्हणजे हनुमान. याचा इंद्रपुत्र म्हणून साशंकतेनेच स्वीकार करण्याचा वैदिकांनी प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न हनुमानाच्या अंतर्भावाचं सूतोवाच ठरलं. सामान्यजनांनी तमिळ नामाचं संस्कृतीकरण ‘हनुमान’ असं केलं.

वृषाकपि इंद्रपुत्र की मित्र?

साधारणपणे हनुमान या दैवताचा शोध घेताना प्राच्यविद्यापंउीत ऋग्वेदाकडे धाव घेतात. इतर प्राचीन संदर्भ शोधतांनाही तसं करावं लागतं. कारण की, ऋग्वेद हा जगातील सर्वात पहिला सुसंबद्ध ग्रंथ आहे. वृषाकपि म्हणजे हनुमान या विद्वानांनी काढलेला एक निष्कर्ष आहे. तर्कतीर्थांनीही वृषाकपि हे नर-वानर या शब्दाचे ऋग्वेदीय रूप असल्याचं सूचित केलं आहे. त्याला इंद्रपुत्र म्हणूनही स्वीकारल्याचं ते म्हणतात. याउलट कॉ.शरद पाटील यांनी आपल्या ‘दास शूद्रांची गुलामगिरी (भाग-१) या ग्रंथात (पृ.२२) माहिती दिली आहे. ते म्हणतात, ’१०.८६.२-६ या ऋचांमध्ये इंद्राणी इंद्रापाशी तक्रार करते की, ती समनाला (एकत्र येण्याला) गेली असता वृषाकपिने तिची छेडछाड (बहुधा बळजबरीने संभोग) केली असताही (१०.८६.१०) इंद्र त्याची मैत्री सोडायला तयार नाही.’ या संदर्भातून वृषाकपि हा इंद्रपुत्र नसून इंद्राचा मित्र असल्याचं स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे आपल्या मित्राच्या पत्नीशी तो लगट करीत असावा हेही दिसून येतं.

त्याच्याविषयी म.म.सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोशात (पृ.९०२वर) माहिती देताना ते भागवत विष्णूचं नाव असल्याचं महाभारताच्या शांतीपर्वाच्या आधारे (३४२.८९) म्हटलं आहे. तो एकादश रूद्रांपैकी एक (महा. अनु. १५०.१२-१३) असून भूत व सरूपा यांचा मुलगा असून त्याने देवासुर युद्धात जम्भाशी युद्ध केलं होतं. (भा.६.६.१७) तसंच एका ऋषिकचंही नाव वृषाकपि असल्याचं (महा. अनु.६६.२३) ते नोंदवतात. वृषाकपि ऐन्द्र हे वैदिक मंत्रदृष्टया ऋषीचं (ऋ.७.१३.२३,१०.८६.३) एक नाव आहे, अशीही माहिती देतात. लोकमान्य टिळकांनी ‘आर्यांचं मूलस्थान’ या ग्रंथात (पृ.२५१) दक्षिणायन बिंदू जवळील सूर्यालाच ऋग्वेदात ‘वृषाकपि’ म्हटलं आहे, असं लिहिलं आहे. ‘भारतीय मिथ्याचा मागोवा’ या ग्रंथात विश्वनाथ खैरे यांनी ‘वानरायण’ या लेखामध्ये (पृ.३३) धूमकेतू आणि शेंडे नक्षत्राशी हनुमानाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमानाचं वानर रूप व केसाळ शरीर तसेच शेपूट पाहून त्यांनी हा तर्क केला असावा. सर्वसामान्यांप्रमाणे हनुमानाच्या बाह्यरूपाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात पुराणिक तसंच विद्वानांचाही मोठा गोंधळ उडालेला दिसतो.

वायुपुत्र हनुमान

प्रचलित पुराकथांचा अर्थ आदिम धारणांच्या द्वारे लावण्याचा प्रयत्न काही संशोधकांनी केलेला आहे. त्यापैकी एक आहेत कालवश डॉ. स. अ. डांगे. ‘पुराकथांचा अर्थ’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘ वायुपुत्र हनुमान ही कल्पना सर्वच पुराणात येते असे नव्हे. हनुमंताच्या जन्माच्या संबंधात विविध कथा येतात, त्या नमूद करण्याचं प्रयोजन नाही . वायूशी समागम करून अंजनेला हनुमान झाला ही कथा त्रोटकपणे ब्रह्मपुराणात येते. (८४.१व पुढे) अंजना व अद्रिका या केसरीच्या बायका होत्या. अंजनेचं डोकं माकडीचं तर अद्रिकेचं मांजरींचं होतं, असा उल्लेख या पुराणात येतो. जनविश्वासाप्रमाणे वायू हा सर्वत्र गर्भधारण करणारा आहे. मलाया देशातील जनविश्वासाप्रमाणे ऋतुमती स्त्री चौथ्या दिवशी एखाद्या उंचवटयावर (एकान्तात) आपल्या मांडया विलग करून उभी राहिली तर आत जाणाऱ्या वायूपासून तिला गर्भधारणा राहते. पाहा जी.एम गोम (Gomme), Folk–lore as an Historical science) पृ. २४३”

वायुपुत्र कल्पनेचा विस्तार

वायुपुत्र या संकल्पनेचा पुराणकारांनी कसा विपर्यास केला, त्याविषयी (पृ.१९३ वर) त्यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘ याच संदर्भात हनुमानाच्या संबंधातील एक पुराकथा पाहणे इष्ट होईल. असं सांगतात की, हनुमंताने कैलास पर्वतावरून शिवलिंग आणताना जरा उशीर केला. हे काम त्याला रामाने सांगितलं होतं. त्याला उशीर होंत आहे असं पाहून रामाने वाळूपासून एक शिवलिंग तयार केलं आणि त्याची स्थापना केली. हनुमंताने हे पाहून वाळूचं शिवलिंग फुंकरीने उडवून लावण्याचा प्रयत्न केला.(तो वायुपुत्र होता ना ! म्हणजे त्याची फुंकरही बलशाली वायूच !! ) पण त्या प्रयत्नात तो खाली आदळला. त्याच्या नाकातून, तोंडातून-फार काय, गुदद्वारातूनही रक्त ओघळू लागले. ते सर्व एका कुंडात साचलं आणि शुद्ध जलात रूपांतरित झालं. पुढे त्या कुंडाचं नाव हनुमत्कुंड असं पडलं व ते तीर्थक्षेत्र झालं.’ (स्कंद पु.१.४५.७३ व पुढे) स. अं. डांगे यांनी वायुपुत्र या संकल्पनेचा विस्तार कसा झाला हे सांगताना वरील उदाहरण दिलं. ते म्हणतात, ‘ वायू हा पुंबीज पसरवतो ही प्राचीन कल्पना येथे उपयोगात आणली आहे. तसंच या संबंधीची प्रसिद्ध पुराकथा अंजनी आणि वायू यांची होय. अंजनीचा पती खरं तर केसरी हा वानर, पण तिच्या ठिकाणी गर्भ ठेवणारा तो वायू !’ वाल्मिकी रामायणात जांबवानही, ‘ हा केसरीचा क्षेत्रज पुत्र आणि वायूचा औरस पुत्र आहे.’ असं म्हणतो. यामागील पुराकथाशास्त्रीय कारण सांगण्याचा प्रयत्न डॉ. डांगे यांनी केलेला आहे. पण हनुमानाला केसरीचा क्षेत्रजपुत्र म्हणण्यामागे बीज-क्षेत्र न्याय हा विचार असू शकतो. यानुसार स्त्रीला क्षेत्र म्हणजे जमीन मानून तीत बीज कोणतंही असो, शेती करणे म्हणजे प्रजोत्पादन करणे महत्त्वाचं आहे. प्राचीन नियोग पद्धतीत एखाद्या राजाला वारस नसेल तर योग्य व्यक्तीकडून त्याच्या राणीला गर्भधारणा करवून घेणे, शास्त्रसंमत मानलं जात असे. केसरीन हा सुमेरू या गिरिराज्याचा राजा होता व किष्किंधेच्या सुग्रीव या वानर राजाचा अमात्य, त्याचा पुत्र हनुमान होता. हनुमानाचा जन्म वायू अर्थात मरूत् या देवतेच्या बीजातून झाला. अंजनेशी मरूताचा नियोग घडवून त्याला जन्माला घातलं असावं.

हनुमानाविषयी माहिती देंताना तो वानर होता हा उल्लेख वाल्मिकी रामायणापासून तो साऱ्या पुराणांमध्ये आहे. त्यामुळेच त्याच्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे कठीण झालं आहे. म.म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ‘भारतवर्षीय प्राचीन चित्रकोशा’त म्हणतात, ‘हनुमत्की इस देवताविषयक धारणा में इसका अर्थ वानराकृति रूप यही सबसे बडी भूल कही जा सकती है । सुग्रीव, वालिन आदि के समान यह वानरजातीय अवश्य था,किंतु बंदर न था ,जैसा जनश्रुती मानती है । वाल्मिकी रामायण में निर्दिष्ट अन्य वानरजातीय वीरोंके समान य हसंभवत: उन आदिवासीयों मे से एक था, जिनमें वानरों को देवता मानकर पूजा की जाती थी (पृ.१०९९) ।

वानरवंशाची संकल्पना

म.म.चित्रावशास्त्रींनी उपरोक्त चरित्रकोशात (पृ.८२२) वानरवंशाविषयी विस्ताराने माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘ दक्षिण भारत में निवास करनेवाला एक प्राचीन मानवजातिसमूह, जिसका अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख वाल्मिकी रामायण में प्राप्त है । ……… रामायण में निर्दिष्ट वानर, मनुष्यों की तरह बुद्धिसंपन्न है, मानव भाषा बोलते है, कपडे पहनते है, घरों में निवास करते है, विवाह संस्कार को मान्यता देते है, एवं राजा के शासन के अधीन रहते है । इससे स्पष्ट है की, रामायण काल में ये लोक आजकी तरह गिरे हुए जानवर नहीं, बल्कि वास्तव में एक मानवजाती के लोग थे ।‘

चिं. विं. वैद्य के अनुसार, ये सचमुच ही वानर के समान दिखते थे , अत : इन्हे वानर नाम प्राप्त हुआ था । कई अन्य अभ्यासकों के अनुसार, आजकाल के आदिवासीयों के समान ये लोग वानर, वृक्ष, गीध आदि की पूजा करते थे । इसी कारण विभिन्न प्राणियों की पूजा करनेवाले आदिवासीयोंको क्रमश: वानर, ऋक्ष (जांबवत) एवं गीध (जटायू, संपाती) नाम प्राप्त हुए ।

रे. बुल्के के अनुसार, रामकथा में निर्दिष्ट वानर विंध्यप्रदेश एवं मध्यभारत मे रहनेवाली अनार्य जातीयाँ थी । छोटा नागपूर में रहनेवाली उराओं तथा मुण्डा जातियों में, आज भी तिग्गा, हलमान, बजरंग, गडी, नामक गोत्र प्राप्त है, जिनका सबका अर्थ ‘बंदर’ ही है । सिंघभूम की भुईया जाति के लोक अपना वंश ‘पवन’ अथवा हनुमत् बताते है । (बुल्के रामकथा पृ.१२१-१२२)

कुलचिन्ह पूजा व मरूतगण

आजही आदिवासी जमातीमंध्ये वृक्ष, प्राणी, वस्तू यांची कुलचिन्ह म्हणून पूजा करण्याची रीत आहे. विशिष्ट समारंभाच्या वेळी कुलचिन्ह, डोक्यावर मुखवटे वा इतर रूपात धारण करून नृत्य करणे हा कुळाचाराचा भाग ते मानतात. त्यातूनच मूलनिवासी लोकांची दैवत निर्माण झालीत. गणपती, नंदी (शिव), नरसिंह, खंडोबा, नाग, हनुमान इ. दैवते कुलचिन्ह पूजा पद्धतीची परिणती आहे.

मर्कट हे माकड शब्दाचं संस्कृत रूप असून ते गोंडी भाषेपासून तयार झालं आहे. ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ या ग्रंथात कालवश व्यंकटेश आत्राम यांनी (पृ.१२२ वर ) याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘ मर्कट या शब्दात गोंडीतील ‘मरा’ म्हणजे वृक्ष आणि ‘कईट’ म्हणजे हात लावणे अशा शब्दांचा ‘मराकईट’ हा झाड हाताळणे या अर्थाचा अस्स्ल गोंडी शब्द उत्पन्न झाला.’

प्रख्यात प्राच्यविद्यापंडित कालवश डी.डी.कोसंबी ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या ग्रंथात (पृ.२३ वर) म्हणतात, ‘माकडाचे तोंड असणारा जो हनुमान जो एका हातावर पर्वत पेलणारा दाखवला जातो, तो एखाद्या शक्तीमान आदिवासी सारखा उडया मारताना दिसतो. ‘हनुमत्’ याचा अर्थ हनुवटी असलेला आहे आणि हे एकच मानवी शरीर वैशिष्टय माकडात नसतं, दैवी प्रेरणेने उंच उडया मारणारे ‘हनुमान’ नृत्यकार अजूनही दक्षिण कोकणातील होळीच्या वासंतिक उत्सवात आढळून येतात.’

कुलचिन्ह पूजा इतर समाजातही विवाहप्रसंगी ‘देवककार्य’ या नावाने केली जाते. कुल म्हणजे काय? कुलचिन्ह कशी तयार होतात? त्यांच्या पूजेमागील भूमिका कोणती? या प्रश्नावर नंतर चर्चा करून त्यावर विस्ताराने माहिती पाहू.

प्राचीन गणसंस्थेमध्ये गणचिन्हं पवित्र मानली जात. मरूतगण हा एक प्राचीन गण होता. रूद्र गणाचा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याला रूद्रपुत्र असं म्हटलेलं आहे. (ऋ.५.५७) मरूतगणांचा इंद्राशी संघर्ष झाल्याच्या कथा सापडतात. त्यामुळेच हनुमानाला इंद्राने वज्रप्रहार करून मूर्च्छित केल्याचे उल्लेख दिसून येतात. हनुमान हा मरूतपुत्र असल्यामुळे त्याला मारूती म्हणतात.

वीर मारूती व दास मारूती

कुलचिन्ह पूजा करणाऱ्या समूहांचे महानायक यक्ष किंवा वीर या नावाने गौरविले जात असत. प्रसंगोपात्त यक्षसंस्कृतीविषयी नंतर माहिती पाहू. हनुमान, नरसिंह हे यक्षसंस्कृतीचे अवशेष होत. जैनांमध्ये यक्षपूजा अजूनही शिल्लक आहे. ‘लोकसंस्कृतीची क्षितिजं’ या पुस्तकात रा.चिं ढेरे यांनी (पृ. ९३वर) यावर विस्तृत माहिती दिली आहे. लोकसंस्कृतीनुसार मारूती हाही एक यक्षच असून त्याच्या शौर्याविषयी आदर व्यक्त करण्याकरिता त्याच्या भव्य मूर्ती स्थापन केल्या गेल्या. यक्षाच्याही अशा भव्य मूर्ती उभारल्याचे उल्लेख वाङ्ग्मयिन पुराव्यात सापडतात.

हनुमान किंवा मारूती हा स्वतंत्रपणे पूजिला जाणारा वीर आहे. पण त्याची ओळख रामकथेच्या संदर्भातच जनमानसात रूजली आहे. हनुमान व वानरांच्या कथांनी सातशे पानांच्या संस्कृत रामायणाची तीनशे पानं व्यापली आहेत. पण हनुमानाचे चरित्र मात्र त्रोटकपणे त्यात आलं आहे. राममंदिरापुढे विनम्रतेने उभा असलेला मारूती दासमारूती म्हणून ओळखला जातो तर युद्धाच्या पावित्र्यात उभा असलेला वीर मारूती होय. वीर मारूतीची मंदिरं स्वतंत्र असतात. वीर व यक्ष तसंच अद्भूत हे समानार्थी शब्द आहेत. बावन्न वीरांमध्ये कपिलउंबीर या नावाने हनुमानाची गणना केली जाते. महाराष्ट्रात फाल्गुन मासात काही ठिकाणी वीर मिरविण्याची रीत आहे. त्यावेळी हे वीर मारूतीच्या दर्शनालाच चाललेले असतात. कारण की, मारूती महावीर आहे. हनुमानाचं दक्षिण दिशेकडील मुख त्याच्या दक्षिणेकडील उपासकांमुळे दाखविलं जातं.

हनुमान जयंती भारतभर साजरी होते, पण रामायण – महाभारतात मात्र हनुमानाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाही. आनंद रामायणात (१.१३,१६२-१६३) चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे तर अगस्त्यसंहितेत कार्तिक वद्य चतुर्दशी मंगळवारी, स्वाती नक्षत्र व मेष लग्नावर हनुमानाचा जन्म झाला, असं म्हटलं आहे. परंपरेप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंती साजरी होते.

हनुमानाचे ब्रह्मचर्य

हनुमान हा ब्रह्मचारी असल्याचा समज जनमानसात रूढ आहे. त्यामुळे त्याच्या मंदिरात महिलांना प्रवेश वर्ज्य मानला जातो. ब्रह्मचारी जीवन त्यागून वैवाहिक जीवनाचा स्वीकार करण्यापूर्वी नवरदेव हनुमानाच्या दर्शनास जातो. त्यामागे आपण त्याच्यासारखे आता राहणार नसू अशी भावना आहे. त्यामुळेच प्रत्येक गावात एक तरी हनुमान मंदिर असतेच. कारण की त्याशिवाय विवाह संस्कार शक्य नसतो. परंतु या साऱ्या समजुतीमागे हनुमानाचे ब्रह्मचारीपण नसून तो गावाचा रक्षक या नात्याने क्षेत्रपाल आहे,ही समजूत कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे पहेलवान जरी हनुमानाला ब्रह्मचारी मानून ब्रह्मचर्य व्रताने वागत असले तरी हनुमान हा ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित होता,ही धारणा मात्र पुराव्यांवर टिकणारी नाही. कारण की, त्याला पुत्र असल्याचे उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहेत. म्हणून त्याच्या पुत्राविषयी माहिती पाहूया. आनंद रामायणाच्या सारकांडात आलेली कथा मूळ वास्तवावर चढविलेला कल्पिताचा मुलामा या स्वरुपाची आहे. परंतु,तीमधून हनुमान ब्रह्मचारी नव्हता,या वास्तवाला मात्र उजाळा मिळाला आहे. हनुमानाचा मुलगा मकरध्वज असल्याचे उल्लेख या ग्रंथामध्ये येतात.

हनुमानाचा मुलगा मकरध्वज

सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेला गेला असता तो रावणपुत्र मेघनादाच्या हाती लागला. त्याने रावणाच्या दरबारात हनुमानाला सादर केल्यावर रावणाने त्याच्या शेपटाला आग लावली. आपल्या जळत्या शेपटाने हनुमानाने साऱ्या लंकेला पेटविले. त्यानंतर त्याने आपल्या शेपटाची आग विझविण्याकरिता तिला समुद्राचा पाण्यात भिजविले. लंका दहन करताना हनुमानाला खूप घाम आला होता. समुद्रात शेपूट विझविताना त्याच्या घामाचे थेंब समुद्रात पडले. ते घामाचे थेंब आपले अन्न समजून एका मासोळीने गिळले, त्यामुळे ती गर्भवती झाली. एकदा पाताळाचा राजा अहिरावण याच्या सेवकांना ती मासोळी मासेमारी करताना सापडली. तिचे पोट चिरत असता त्यांना वानराच्या सारखा मनुष्य तीमध्ये असल्याचे दिसले. त्याला बाहेर काढून ते अहिरावण या आपल्या राजाकडे घेऊन गेले. अहिरावणाने त्याला पाताळपुरीचा रक्षक म्हणून नेमले. त्याला मकरध्वज या नावाने संबोधले गेले .

राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळी रावणाच्या आज्ञेनुसार अहिरावणाने राम-लक्ष्मणाचे अपहरण केले व त्यांना तो पाताळपुरीमध्ये घेऊन गेला. त्यांना पाहून वानरसेना भयभीत तसेच शोकाकुल झाली. बिभीषण हा रामाच्या बाजूला असल्यामुळे त्याने हनुमानाला ही गोष्ट सांगितली. तेव्हा राम-लक्ष्मणांना सोडविण्याकरिता हनुमान पाताळात गेला. तेथे त्याने पाताळाच्या प्रवेशद्वारावर एका वानराला पाहिले,तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. आपल्यासारख्याच माणसाला पाहून त्याने त्याची विचारपूस केली,तेव्हा तो म्हणाला की, “मी हनुमानाचा पुत्र मकरध्वज असून पाताळाचा द्वारपाल आहे ”.

मकरध्वजाच्या तोंडून हे वाक्य आल्यावर हनुमान क्रोधित झाला व त्याला म्हणाला की,’ दुष्ट बालका,तू काय बरळतोस. मी ब्रह्मचारी आहे,मग तू कसा काय माझा पुत्र असू शकशील ? आपल्या पित्यास पाहून मकरध्वज त्याच्या चरणावर लीन झालाआणि त्याने आपल्या जन्माची कथा हनुमानाला सांगितली. ती ऐकून हनुमानाने आपला पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला. परंतु आपण राम-लक्ष्मणांना घ्यायला आलो आहे,असे जेव्हा हनुमानाने त्याला सांगितले, तेव्हा मात्र त्याला विरोध केला. तो म्हणाला की,” मी आपला पुत्र असलो तरी,आपल्या मालकाच्या सेवेत आहे. त्यामुळे आपणास आत जातं येणार नाही. हनुमानाने त्याची मिनतवारी केली,तरीही त्याने आपल्या पित्याचे ऐकले नही. त्यामुळे या बाप-लेकात तुंबळ युद्ध झाले. शेवटी हनुमानाने मकरध्वजाला आपल्या शेपटाला बांधले आणि पाताळात प्रवेश केला. तेथील देवीच्या मंदिरात गेल्यावर त्याला दिसले की, अहिरावण राम-लक्ष्मणांना बळी देण्याच्या तयारीत होता. हनुमानाला पाहून चामुंडा देवी पाताळातून निघून गेली. तेव्हा हनुमान स्वतः देवीचे रूप धारण करून देवीच्या जागी उभा राहिला. काही काळानंतर अहिरावण तेथे आला आणि पूजा अर्चा करून त्याने देवीला राम-लक्षणाचा बळी देण्याकरिता तलवार उचलली. इतक्यात देवीच्या रूपातील हनुमान प्रकट होऊन त्याने अहिरावणाचा वध केला.

हनुमानाने राम-लक्ष्मणांना मुक्त केले, तेव्हा रामाने विचारले की,” तुझ्या शेपटाला हा कोण बांधलेला आहे ? तो तर तुझ्यासारखाच दिसतो. त्याला सोडून दे.” रामाची आज्ञा ऐकून हनुमानाने मकरध्वजाची ओळख सांगून त्यला मुक्त केले. नंतर मकरध्वजाने रामाला शिरसाष्टांग प्रणिपात केला. तेव्हा रामाने त्याचा राज्याभिषेक करून त्याला पाताळाचा राजा म्हणून घोषित केले आणि आपल्या पित्याप्रमाणे त्यानेही इतरांची सेवा करावी असा आशीर्वाद दिला. मकरध्वज हा हनुमानाप्रमाणेच महान पराक्रमी आणि तेजस्वी होता, अशी माहिती रामायणामध्ये येते. या कथेमध्ये त्याने हनुमानाप्रमाणे इतरांची सेवा करावी असे रामाने म्हटलेले आहे. जर तो पाताळाचा राजा असेल तर तो इतरांची सेवा कशी करणार असा प्रश्न या कथेच्या रचयित्याला पडत नाही. कारण की, ही कथा रामाचे महत्व सांगणारी आहे. परंतु राम-लक्ष्मणांना बंदिस्त कण्याची क्षमता असणारा अहिरावण हा त्यांच्यापेक्षा बलाढ्य होता,हेही तीमधून सूचित केले गेले आहे. त्याचप्रमाणे राम-लक्ष्मणांना अहिरावणाच्या कैदेतून सोडविणारा हनुमान त्यांच्यापेक्षाही बलवान होता, हेही स्पष्ट झाले आहे. या कथेच्या निमित्ताने हनुमान हा ब्रह्मचारी नसून विवाहित होता ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्वतःला ब्रह्मचारी म्हणविणाऱ्या लोकांनी हनुमानाशी आपले नाते जोडणे कितपत योग्य आहे,याचा विचार करावा. मकरध्वजाची ही कथा ज्याप्रमाणे हनुमानाच्या तथाकथित ब्रह्मचर्याचे रहस्य उलगणारी आहे,तसेच तत्कालीन मानवी समूहांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारीही आहे. म्हणून तिच्यातून सूचित होणाऱ्या काही तथ्यांचा परामर्श घेऊया.

मकरध्वज कथेचे तात्पर्य

मकर या शब्दाचा अर्थ मगर असा होतो. ध्वज हा शब्द निशाण किंवा चिन्ह या अर्थाचा आहे. निशाण हे एखाद्या समूहाच्या सत्तेचे प्रतीक म्हणूनही वापण्यात येते. ज्याप्रमाणे राजकीय पक्ष आपल्या मिरवणुकीच्या अग्रभागी आपल्या पक्षाचा ध्वज मिरवितात,त्याचप्रमाणे प्राचीन काळातील लोकसमूह आपल्या गणाचे प्रतीक म्हणून गणचिन्ह असलेला ध्वज मिरवीत असत. मकरध्वज या शब्दाचा अर्थ मगरीचे चिन्ह असलेला गण असा होतो . वानर हे ज्या गणाचे चिन्ह होते,त्या गणाचा प्रमुख हनुमान होता,तर मगर हे ज्याचे चिन्ह होते,अशा गणाचा प्रमुख हा मकरध्वज होता. पित्याच्या गणाचे चिन्ह तो मिरवीत नव्हता. कारण की,तो त्या गणाशी संबंधित नव्हता.

मकरध्वजाची ही कथा आनंद रामायणात आलेली आहे. या कथेत हनुमानाच्या घामाचा थेंब दक्षिण सागरात राहणाऱ्या एका मगरीच्या शरीरात गेला व त्यामुळे मकरध्वजाची उत्पत्ती झाली असा उल्लेख आहे. यावरून त्याची आई ही मगर हे कुळचिन्ह असलेल्या गणाची होती हे स्पष्ट होते. वानर गणाच्या हनुमानाचा शरीरसंबंध मगर गणाच्या स्त्रीशी झाला होता,या वास्तवाचा बोधही यातून आपणास होतो. मकरध्वज हा आपल्या आईच्या गणाशीशी संबंधित होता, म्हणजेच तो मातृसत्ताक गणाचा सदय होता. त्याचे पाताळाचा राजा होणे म्हणजे भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशाचा राजा होणे होय. वानर गणाच प्रमुख हनुमान हा रामाशी जुळल्यामुळे रामाने त्याला राजा बनविण्याची कथा रचली गेली. ही कथा उत्तरकालीन आहे. परंतु तिच्या रचनेमागे मकरध्वज या क्षेत्रपालाचे अस्तित्व अधोरेखित करणे हाही एक हेतू असावा.

मकरध्वज: एक क्षेत्रपाळ

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात भटाळा हे एक पुरातत्वीय स्थान आहे. याठिकाणी प्राचीन काळी शिल्पे कोरली जात असत,म्हणून त्याला शिल्पग्राम असेही म्हणतात. या गावाबाहेर मकरध्वजाची एक मूर्ती आहे. तिची पूजा गावकरी करतात. अशा आणखी तीन मूर्ती गावाच्या चारही दिशांना आहेत व त्यांचीही पूजा गावकरी करतात. देशात अनेक ठिकाणी अशा मूर्ती आढळू शकतात. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्याच्या करहिया भागात असलेल्या अरण्यात मकरध्वजाचे एक मंदिर आहे. या मंदिर परिसरात पाण्याचा एक झरा सतत वाहत असतो. मकरध्वजाचे हे देशातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी अनेक नैसर्गिक गुहासुद्धा आहेत. या गुहांमध्ये राम व रावण यांच्या गाथा सांगणारी एक गुहा असल्याची जनश्रुती आहे. सत्खंडा या नावाची एक प्राचीन सात मजली इमारत सुद्धा याठिकाणी आहे.

प्राचीन काळी अनेक क्षेत्रपाळ देवतांची उपासना केली जात असे. गावाचे तसेच शेतीचे रक्षण करणारे ते क्षेत्रपाळ होत. प्राचीन यक्ष संस्कृतीमधून ते आलेले आहेत. गणपती, हनुमान, खंडोबा, म्हसोबा, विरोबा इ. लोक दैवते ही क्षेत्रपाळ दैवते होत. परंतु त्यांचा तसा उल्लेख केला जात नाही. जैन धर्मामध्ये मात्र क्षेत्रपाळ या नावानेच त्यांची स्वतंत्र उपासना प्रचलित आहे. आनंद रामायणाने मकरध्वजाची कथा जपली आहे.लोक्दैवातांच्या उपासनेची अशारितीने दखल या रामायणाच्या रचयित्याने घेतल्याचे दिसोन येते.

आनंद रामायण हा ग्रंथ इ.स.च्या १५ व्या शतकात रसिक संप्रदायाच्या लेखकाने रचलेला आहे. त्याविषयी माहिती देताना भारतीय संस्कृती कोशात ( खंड पहिला,पृ.४४४) म्हटले आहे की,” या ग्रंथात

बारा हजार दोनशे बावन्न श्लोक असलेल्या या रामायणाची एकूण नऊ कांडे आहेत. पहिल्या कांडात रामजन्म ते सीताहरण,दुसऱ्यात रामचंद्राची तीर्थयात्रा,तिसऱ्यात रामाश्वमेघ,चौथ्यात सीतेचे नखशिखांत वर्णन,रामसीतेची जलक्रीडा व विहार, रामचंद्राने एकपत्नीव्रत घेतल्यामुळे पुढील अवतारात त्याला अनेक भार्या मिळतील,असे आश्वासन मिळाल्याची कथा,पाचव्यात लव-कुशांचा जन्म व त्यांचे रामाच्या सैन्याशी युद्ध,सहाव्यात आठ पुत्रांचा विवाह व सातव्यात विजययात्रा, ई. विषय आहेत. त्या कांडाच्या एकविसाव्या सर्गात एक दासी रामाचा तांबुलरस पिते व त्यामुळे तिला राधा होण्याचे वरदान मिळते,असा विषय आहे. आठव्या कांडात रामोपासनेचा विधि असून,नवव्या कांडात कुशाचा अभिषेक व रामाचे स्वर्गारोहण हे विषय आहेत.” या कथेच्या निमित्ताने हनुमान हा ब्रह्मचारी असल्याची समजूत मोडीत काढली आहे.जैन रामायणात तर या वास्तवावर अधिक प्रकाश टाकलेला आढळतो. म्हणून या जैन हनुमानाची थोडक्यात माहिती पाहूया.

जैन हनुमान

भारतीय संस्कृतीमध्ये वेदोक्त व पुराणोक्त अशा दोन परंपरा अस्तित्वात आहेत. त्यांना वैदिकी व तांत्रिकी,वैदिक व अवैदिक, ब्राह्मणी व अब्राह्मणी इ. शब्दांनीही संबोधले जाते. वैदिक परंपरा प्रामुख्याने ब्राह्मण व क्षत्रीय वर्गाच्या हिताची आहे. याउलट अवैदिक परंपरा असून, तिने नेहमी शूद्र वर्णातील जाती-जमातींच्या संस्कृतीचे चित्रण केलेले आहे. पुराणांची रचना सूत,चारण, मागध,बंदी,कुशीलव इ.शुद्रांनी केली,परंतु ती जेव्हा वैदिकांच्या ताब्यात गेलीत,तेव्हा त्यांचे ब्राह्मणीकरण करण्यात आले. त्यामधून व्यक्त झालेली वर्णने वैदिकांच्या हिताचे संवर्धन करणारी आहेत. याउलट अवैदिक पुराणांमध्ये सर्वसामान्य वर्गातील लोकांचे हित जोपासण्यात आले आहे.

लोकायत,जैन व बौद्ध हे अवैदिक परंपरेतील धर्म असल्यामुळे त्यांच्या साहित्यातील कथा वैदिक परंपरेतील कथांपेक्षा वेगळ्या आहेत. वैदिक परंपरेत पुराणे व उप-पुराणे अशी विभागणी आढळते, तशी जैन परंपरेत आढळत नाही. ब्राह्मणी पुराणे व महाकाव्यांनी ऐतिहासिक वास्तवाशी फारकत घेऊन अतिमानवी शक्तींना अधिक महत्त्व दिले, त्यामुळे ती काल्पनिक मानली गेलीत. याउलट अब्राह्मणी साहित्य वास्तवाशी अधिक भिडणारे आहे, त्यामुळेच भारतीय संस्कृतीची खरी ओळख अब्राह्मणी अशा जैन पुराणांमधून आपणास होते. दिगंबर जैन पुराणांमध्ये पद्मपुराण हे एक वैशिष्ठ्यपूर्ण पुराण आहे. जैन कवी विमलसुरी याने पउमचरिय नावाचा रामचरित्रपर प्राकृत ग्रंथ लिहिला. त्यावर आधारित अपभ्रंश भाषेतील पद्मपुराण रइधू या कवीने इ.स.५७७ च्या सुमारास रचलेले असून इ.स.७०५ मध्ये संस्कृत भाषेतील पद्मपुराणाची रचना आचार्य रविषेण यांनी केली. जैन परंपरेत त्यानंतर अनेक पद्मपुराणे रचली गेली आहेत. त्यात सोमतेन, धर्मकीर्ती, चंद्रकीर्ती,ब्रह्म जीनदास यांच्या पद्मपुराणांचा समावेश होतो. या सर्व पदमपुराणांचा विषय रामकथा सांगणे हा असला तरी, वाल्मिकीच्या रामायणाचा आधार त्यांनी घेतला नसून जैन परंपरेतील संकेतानुसार रामकथा सांगितली गेली आहे. वैदिक परंपरेतील वैष्णव पद्मपुराणाची रचना इ.स.१२ ते १५ व्या शतकाच्या दरम्यान झाली असून त्याचा विषय रामकथा नाही.

जैन परंपरेत रामाला पद्म हे नाव असून पद्मपुराणाला पद्मचरित तसेच पद्मचरिऊ असे प्राकृत भाषेत म्हणतात. राम हा जैन असल्याची जैन धर्मियांची समजूत आहे व तो आठवा बलभद्र या नावानेही ओळखला जातो. जैन परंपरेत हनुमान हा चरमशरिरी महापुरुष मानला जातो. तो रावणाचा मित्र असून त्याने रावणाची बाजू घेऊन वरुणाविरुद्ध युद्ध केले. या युद्धात विजय प्राप्त झाल्यावर त्याला रावणाची बहीण चंद्रनखा हिची अनंगकुसुमा नावाची मुलगी दिली.

सीतेला रावणाच्या कैदेतून सोडविण्याकरिता रामाचा संदेश घेऊन हनुमान लंकेला गेला होता,अशी कथा जैन पद्मपुराणात येते. त्याचप्रमाणे सीतेला खुणेची अंगठी त्याने दिली आणि लंकेची खूप नासधूस केली असेही तेथे म्हटले आहे. वाल्मिकी रामायणातील तपशिलाशी जुळणाऱ्या या गोष्टी आहेत. अशाच काही कथा पारंपरिक रामकथेशी साधर्म्य साधणाऱ्या असल्या तरी त्यातील नावे मात्र भिन्न आहेत.

हिंदू धर्मातील हनुमान वानरमुखी व शेपूट असलेला दाखविला जातो,तसा जैन धर्मात नसून तो २४ कामदेवांपैकी एक असल्याचे जैन मानतात. ज्याप्रमाणे २४ तीर्थंकर जन्म घेतात,त्याचप्रमाणे त्या-त्यावेळी कामदेवही जन्म घेतात. जैन तत्त्वज्ञान आत्मसात करून ते दिगंबर मुनी होऊन तीर्थंकरांचे रक्षण करतात. कामदेव हे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे पुरुष असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात स्त्रिया फिदा होतात,असे जैन परंपरा मानते. एवढेच नव्हे तर विवाहित आणि मुले असलेल्या स्त्रियाही त्याच्याकडे आकर्षित होतात. हनुमानाने अनेक वर्षे आपल्या राज्याची धुरा वाहून शेवटी आपले राज्यपद सोडले आणि दिगंबर मुनी झाला. तपस्येच्या मार्गाने त्याने खूप ज्ञान ग्रहण केले. आपल्या आयुष्याच्या अखेरीस सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ति प्राप्त होऊन त्याला मोक्ष मिळाला आणि त्याच्या आत्म्यास परमगती प्राप्त झाली. अशी कथा प्रचलित असलेल्या जैन धर्माने हनुमानाचे विवाहित स्वरूप अधिक स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका निवडणूक सभेत हनुमान हा दलित होता असे विधान केले होते. त्यानंतर अनेक जाती आणि धर्मातील लोकांनी हनुमान कसा आपल्या धर्मातील होता हे सांगण्याची जणुकाय स्पर्धाच सुरू केली होती. या गदारोळात जैन मुनी निर्भयसागर यांनी जैन ग्रंथांच्या आधारे तो जैन असल्याचे प्रतिपादन करून तो दलित नसून क्षत्रिय होता,असे म्हटले आहे. परंतु हनुमान हे दैवत यक्ष संस्कृतीमधून जैन परंपरेत आले. यक्ष संस्कृतीमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्हती त्यामुळे हनुमान क्षत्रिय होता या म्हणण्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. हनुमानाची ही पुराणोक्त सत्यकथा तथाकथित संस्कृतीरक्षकांची असत्यक कृत्ये उघडी पाडण्यास मदत करणारी आहे.

डॉ.अशोक राणा यवतमाळ

______________________________________________________

(‘सण-उत्सव’ या डॉ.अशोक राणा यांच्या आगामी ग्रंथामधून)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.