भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९ वर ते म्हणतात, ”रामदेवराय यादवाचा करणाधिप व चतुर्वर्ग चिंतामणी इत्यादि संस्कृत ग्रंथाचा कर्ता हेमाद्री किंवा हेमाद्रीपंत याचं नाव सुविख्यात आहे. त्याने विद्वानांना उदार आश्रय दिला. स्वतः अनेक विषयांवर ग्रंथरचना केली. मोडी लिपी प्रचलित केली व स्वतःच्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेली हेमाडपंती स्थापत्य पद्धती प्रचारात आणली. असा हा महापंडित यादवनृपती महादेव व रामदेव यांच्या दरबारी त्यांचा करणाधिप किंवा लेखनाध्यक्ष व मंत्री होता.”
डॉ.मिराशी यांनी अनेक अस्पर्श विषयांवर संशोधने करून इतिहासलेखनाच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्याबद्दल त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखून त्यांचे हे विधान कितपत खरे आहे,याची शहानिशा करायला हरकत नाही. केवळ मिराशींनी असे विधान केले असते,तर ते एकटेच याविषयी जबाबदार ठरले असते. परंतु अशी विधाने अनेक अभ्यासक तसेच संशोधकांनीही केलेली आहेत. जनमानसात रूढ असलेल्या एका अपसमजाला प्रतिष्ठा देण्यात अनेकांनी आपली प्रतिभा खर्ची घातलेली दिसून येते. नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ.ओ.पी.वर्मा यांनी लिहिलेले ‘ए सर्व्हे ऑफ हेमाडपंती टेम्पल्स इन महाराष्ट्र’ या शीर्षकाचे पुस्तक नागपूर विद्यापीठानेच प्रकाशित केले आहे. त्याला प्रस्तावना लिहिताना डॉ.शां.भा.देव यांनी ‘सो-कॉल्ड हेमाडपंती टेम्पल्स ऑफ महाराष्ट्रा’ असा शब्दप्रयोग करून त्याविषयी अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला आहे. पण पुढे त्यांनीही परंपराशरण होऊन हेमाडपंती टेम्पल्स असाच शब्दप्रयोग केला आहे.
डॉ.वर्मा यांच्या उपरोल्लेखित पुस्तकात अभ्यासाला घेतलेले पहिले मंदीर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर आहे. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन मंदिर शिल्प परंपरेचे आरंभस्थान या शब्दात त्याचा गौरव करून पुरातत्वज्ञ म.श्री.माटे यांनी हे मंदिर शिलाहार राजा चित्तराज याने सन १०३० ते १०४० च्या दरम्यान बांधले,असे म्हटले आहे.महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या ’कला व शिल्प मध्ययुग,पश्चिम महाराष्ट्र’ या पुस्तकात त्यांचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी दिलेल्या कालखंडानुसार अंबरनाथचे मंदिर हेमाद्रीपंताच्या २०० वर्षे आधीच बांधलेले आहे. माळव्यामध्ये उत्तर भारतीय मंदिर शैलीची एक भूमिज या नावाने प्रचलित शाखा होती. तिच्यात हे मन्दिर मोडते. परमार राजांनी काही काळ महाराष्ट्राचा उत्तर भाग (खानदेश).कोंकणचा उत्तर भाग व विदर्भात राज्य केलं. त्यांनी ही शैली महाराष्ट्रात आणली. गडचिरोली जिल्ह्यातील विख्यात मार्कंडी देवालय तसेच यवतमाळलगतच्या लोहारा येथील कमळेश्वर मंदिर याच राजवंशाने बांधवले. पण या मंदिरांनाही हेमाडपंती मंदिरे याच शब्दांनी संबोधले जाते.
डॉ.वर्मा यांनी लोहारा येथील मंदिराचाही समावेश आपल्या पुस्तकात केलेला आहे. म.श्री.माटे यांच्या मते,ही मंदिरे काही ठिकाणी यादवांच्या आश्रयाने निर्माण झालीत. म्हणून त्यांना यादव मंदिर शैली म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ द्वारा प्रकाशित ‘महाराष्ट्र पुरातत्त्व’ या शीर्षकाखाली डॉ.हंसमुख सांखलिया व म. श्री.माटे यांनी एक पुस्तक संपादित केलेले आहे. त्यात म.श्री.माटे यांनी पृ.९० वर स्पष्टपणे म्हटले आहे की, ’यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री किंवा हेमाडपंत हा या मिश्र शैलीचा जनक आहे,अशी सर्वसामान्य समजूत असल्याने अशा देवळांना व सामान्यपरत्वे सगळ्याच यादवकालीन मंदिरांना हेमाडपंती असं नाव दिलेलं आढळते. विशेषतः याच घाटाची जी निकृष्ट व कलाहीन मंदिरे दिसतात,त्यांना हे नाव हटकून लावण्यात येते. वस्तुतः त्याचा व या मंदिरशैलीचा संबंध नाही.’
याच पुस्तकात पुरातत्वज्ञ डॉ.गो.ब.देगलूरकर यांचा कला व शिल्प: मध्ययुग-विदर्भ’ या शीर्षकाचा शोधनिबंध आहे. त्यात पृ.१०४ वर ते लिहितात, ’विदर्भाच्या आठही जिल्ह्यात हेमाडपंती देवळे आहेत.’ ज्या म.श्री.माटे यांनी आपल्या लेखात हेमाडपंताचा या मंदिरशैलीशी काही संबंध नाही असे म्हटले होते,तेच पृ.१२३ वर ’यांना यादव किंवा हेमाडपंती असं कोणतेही नाव देता येईल. या मंदिराचे स्वरूप पूर्णपणे परंपरानिष्ठ असं आहे आणि त्यासाठीच त्यांना महाराष्ट्री नाव द्यावयास हरकत असू नये’,असं विधान करतात. पुढे मात्र तेच ‘शिवकाळात बांधलेली मंदिरे हेमाडपंती पद्धतीची होती. अर्थात,ती ओबड-धोबड होती. त्यातले शिल्प नव्हे,तर स्थापत्यही अतिशय सामान्य दर्जाचे होते,असे असले तरी त्यांनी यादव मंदिरेच आदर्श म्हणून स्वीकारलेली होती हे महत्वाचे आहे.’ असं म्हणतात.
महाराष्ट्र शासनाने १९७६मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात प्रख्यात इतिहास संशोधकांनी घातलेला हा गोंधळ आहे. वास्तविक १९६२मध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा ‘मिथ एंड रिअलिटी’ हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. त्याचं मराठी भाषांतर १९७७ मध्ये ‘पुराणकथा व वास्तवता’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालं होतं. त्यात ते म्हणतात, ’मराठी भाषिक परंपरेत हेमाद्री याचे नाव बाजरीच्या प्रसाराशी,क्लिष्ट मोडी लिपीशी आणि हेमाडपंती वास्तूशी चुकीने निगडित झालेले आहे. ही हेमाडपंती देवळे म्हणजे १२ व्या शतकात बांधलेल्या अत्यंत बोजड व श्रीमंतीने सजलेल्या यादवकालीन प्रतिकृती आहेत.’(पृ.५४)
मराठी साहित्याची आचार्य पदवी पहिल्यांदा प्राप्त करण्याचा बहुमान ज्यांना मिळाला,अशा डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे यांनी ‘महाराष्ट्र संस्कृती’ या शीर्षकाखाली एक ग्रंथ १९७९मध्ये प्रकाशित केला. त्यात पृ.२३८वर ते म्हणतात.’ रामदेवराय यादवांचा प्रधान हेमाडपंत याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली. म्हणून या शिल्पपद्धतीस हेमाडपंती असे नाव पडले.’ पुढे तर त्यांनी अधिकच कहर केला. ते म्हणतात, ’अकराव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रात अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांमध्ये अंबरनाथ,बलसाणे,महेश्वर,सिन्नर ई. देवालये महत्त्वाची आहेत. त्यातील शिलाहार राजांनी बांधलेले शिवमंदिर हेमाडपंती आहे.’ तेराव्या शतकात होऊन गेलेल्या हेमाद्रीपंताने आपल्या जन्मापूर्वीच निर्माण झालेल्या अकराव्या शतकातील मंदिरांची बांधणी करण्याचा चमत्कार इतिहासकार व लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीने आजवर साकारलेला आहे.
यावरून लब्धप्रतिष्ठित इतिहासकार व लेखकही ऐतिहासिक नोंदींच्या बाबतीत किती बेफिकीर आहेत हे स्पष्ट होते. ज्या मंदिर शैलीचा हेमाडपंताशी दुरान्वयानेही संबंध नाही,तिच्या निर्मितीचे श्रेय त्याला देण्यामागे त्यांचा कोणता हेतू असावा? लोकसमजुतीच्या आहारी जाऊन या सर्वांनी इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची खबरदारी का घेतली नाही? प्रत्येक ठिकाणी पुराव्याचा आग्रह धरणारे हे इतिहासकार हेमाडपंती शैलीच्या निर्मितीचा पुरावा आजवर का शोधू शकले नाही? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. किमान यानंतरच्या इतिहासकारांनी तरी ही चूक करू नये असे मला वाटते.
–
डॉ. अशोक राणा
(युवा इतिहास संशोधक व पत्रकार विवेक चांदुरकर यांनी लिहिलेल्या ‘उद्ध्वस्त वास्तू,समृद्ध इतिहास’ या आगामी पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.)