महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ महाराष्ट्राचाच आहे, असं कसं म्हणता येईल ?
असा विठोबा आपलं आराध्यदैवत असूनही कुणाचंही कुलदैवत नाही, असं इरावती कर्वे यांनी म्हटलं आहे (महाराष्ट्र: एक अभ्यास, पृ. ११). अर्थात, ते अतिशय कमी लोकांचं कुलदैवत आहे, असं त्या म्हणतात. ‘ खुद्द विठ्ठलाची पूजा करणारे सहा- सात तऱ्हेचे लोक तिथे आहेत. बडवे, डिेंग्रे, दिवटे, पुजारी, बेणारे वगैरे त्यांच्यापैकी कोणाचंही विठ्ठल हे कुलदैवत नाही,’ असं त्यापुढे त्या म्हणतात. ‘ तेव्हा ज्याअर्थी कुलदैवत नाही त्या अर्थी इथल्या मूळच्या लोकांचा तो देव नसावा,’ अशी शंका त्यांनी १९७१ मध्ये प्रकाशित उपरोक्त पुस्तिकेत व्यक्त केली. १९७४ मध्ये प्रकाशित ‘कुलदैवत’ या डॉ. सरोजिनी बाबर यांनी संपादन केलेल्या व महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथातही विठोबाला स्थान नाही. त्यातून इरावतीबाईच्या मताला पुष्टीच मिळाली आहे. मग हा विठोबा कुणाचा आहे ? वारकऱ्यांचा की बडव्यांचा ? जैनांचा की बौद्धांचा, शैवांचा की वैष्णवांचा ? रुक्मिणीचा की राधेचा ? लखुबाईचा की पुंडलिकाचा ? पंढरपूरचा की माढ्याचा ? कर्नाटकांचा की महाराष्ट्राचा ? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यात विद्वान संशोधकाच्या तीन पिढ्या राबल्या. पण त्याची जाणीव कुणाला आहे ? श्रद्धाळू वारकऱ्यांना त्याचा मागमूसही नाही. आषाढी–कार्तिकी एकादशी आली की, त्याची पावले आपसूकच पंढरीची वाट चालायला लागतात. ज्ञानबा-तुकारामच्या गजरात सारा आसमंत निनादून उठतो. गावंच्या गावं विठोबाच्या ओढीने जागी होतात. ही सारी किमया कशाची, हा एक प्रश्नच आहे. या प्रश्नातूनच वर्षोनुवर्षे अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. त्यापैकी एक प्रश्न आहे-
विठोबा वारकऱ्यांचा की बडव्यांचा ?
नियमितपणे येरझारा करणे म्हणजे वारी व ती करणारा तो वारकरी. अशा अनेक देवतांच्या उपासकांमध्ये आपल्या इष्ट देवतेच्या भक्तासाठी वारी करण्याची परंपरा आहे. पण विठोबाच्या भक्तांची संख्या व त्याचा भक्तिभाव उठून दिसणारा असल्यामुळे प्रामुख्याने पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तांना वारकरी असं म्हणतात. त्याच्या वैशिष्टयपूर्ण भजन व किर्तनाच्या पद्धतीमुळे त्याला संप्रदायाचं स्वरूप प्राप्त झालं व त्यातून वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आषाढी एकादशीला या संप्रदायात अतिशय महत्व आहे. कारण की या दिवशी त्यांचं आराध्यदैवत विठोबा विष्णू झोपी जातो. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. चार महिन्यांनी तो उठतो, त्या दिवसाला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. मधला काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. चातुर्मास्यात विवाहासारखे मंगलकार्य करायचे नसतात. त्यामुळे चातुर्मास्यापूर्वीचा व नंतरचा काळ वारकऱ्यांच्या दृष्टिने महत्वाचा आहे.
वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला महत्वाचं स्थान आहे. ही माळ घालणारा तो माळकरी. गावामध्ये त्याच्याकडे मोठया आदराने पाहिलं जातं. कारण एकदा माळ घातली की, साऱ्या व्यसनांपासून तो मुक्त होतो. विशेषत: मांसाहाराचा त्याग करून तो पूर्णपणे शाकाहारी झालेला असतो. सदाचाराचं महत्व मानवी जीवनात बिंबवणारा असा हा वारकरी संप्रदाय अतिशय लोकप्रिय व निरुपद्रवी समजला जातो. या संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचं स्थान महत्वाचं आहे, परंतु नामदेवापूर्वीही वारीची परंपरा चालू होती. यावरून जनमानसात ठाण मांडून बसलेली ही परंपरा बरीच जुनी असली पाहिजे, हे स्पष्ट होतं. आंध्र व कर्नाटक या शेजारच्या राज्यांमधूनही वर्षानुवर्षे वारकरी पंढरपूरला येतात. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्यामुळे अठारापगड जातीचे संत यात उदयाला आलेत. भेदाभेद हा एक भ्रम असून तो अमंगळ आहे, असं संत तुकोबारायांनी म्हटले आहे. त्यातून समतेचा संदेश सगळीकडे पोहोचला. पण ही समता केवळ मंदिराच्या आतच होती. बाहेर निघाल्यावर जातीपातीच्या भिंती कायमच होत्या. त्यामुळे साऱ्या वारकऱ्यांची माऊली विठोबा असतानाही तिची लेकरं मात्र भेदभाव पाळत असत. आजही तीच स्थिती होती. त्यामुळे वारकरी संतांनी उच्च आदर्श व उदात्त हेतू प्रस्थापित केला असला, तरी तिला अभिप्रेत असं सामाजिक परिवर्तन घडून आलं नाही. याउलट वर्णव्यवस्थेचं समर्थन आजही वारकरी करतात. त्यामुळे त्यांचा विठोबा वारकरी संप्रदायाशी सुतराम संबंध नसलेल्या उत्पात– बडव्यांचा ताब्यात गेला. त्याविषयी वीस वर्षे वारकरी कीर्तन केलेल्या पंडित का. शि. संकाये यांनी पुढील विधान केलेलं आहे. ते म्हणतात-
‘ पुंडलिकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत विठ्ठलाचे पुजारी ब्राह्मण बडवे नव्हते. विठ्ठलाचे पुजारी बडवे हे मूळचे कर्नाटकातील आहेत. ते पंधराव्या शतकात पंढरपूरला आलेले आहेत. हे बडवे पंढरपूरला यायच्या अगोदर विठ्ठलाचे पुजारी कोण होते, याचा आजपर्यंत तरी शोध लागलेला नाही.’ (वारकरी पंथ शैवपंथ आहे, वैष्णवपंथ मुळीच नाही, पृ. १२) पंरतु संत चोखामेळा या तेराव्या शतकातील संताला बडव्यांनी मारल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगात आहे. (बडवे मज मारिती, काय असा अपराध) त्यावरून तेराव्या शतकात या मंदिरावर बडव्यांचा ताबा होता, हे दिसून येतं.
बडवे हटाव मोहीम भारत पाटणकर व त्यांच्या सहकारी चळवळ्या लोकांनी सुरू केली होती. पण जिथे मुख्यमंत्र्यांनी विठोबाला अर्पण केलेला रत्नहार पळवायलाही बडवे भीत नाहीत, तिथे पाटणकरांच्या बडवे हटाव मोहिमेने बडव्यांच्या पोटातलं पाणी कसं हलणार ? पांडुरंगाच्या तीर्थकुंडात मुतायलाही जे मागेपुढे पाहात नाहीत, त्यांचं वाकडं कोण करणार ? पुरता विठोबा बडवांच्या ताब्यात गेला होता. जोपर्यंत वारकऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात उठाव करण्याइतपत हिम्मत येत नाही, तोपर्यंत विठोबा बडवे आणि कंपनीच्याच ताब्यात राहणार आहे ; असे अनेकांना वाटत होते. परंतु चाळीस वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश येऊन शेवटी विठोबा बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला. आज पंढरपूरचे पुजारी शासन नियुक्त असतात. त्यामुळे कोणत्याही जातीच्या योग्य व्यक्तींना पुजारीपणाची जबाबदारी दिली जाते. एका महिलेलाही हा सन्मान त्यामुळे मिळालेला आहे. बडव्यांच्या ताब्यात येण्यापूर्वी तो कोणकोणत्या लोकांच्या ताब्यात होता, याचा इतिहास मात्र संशोधकांच्या प्रयत्नांनी उपलब्ध झाला आहे, तो असा-
बुद्ध-विठ्ठल : अनुबंध
विठ्ठल हा मुळात बुद्धच आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ठाम मत होतं. या विषयावर त्यांनी एक ग्रंथच लिहायला सुरुवात केली होती. पण तो ग्रंथ पूर्ण झाला नाही. त्यातील त्यांचं मत संक्षेपाने असं होतं की- ‘पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मुळात बुद्धाची मूर्ती आहे. यावर मी एक प्रबंध लिहीत आहे व तो पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून निर्माण झाला आहे. पुंडरीक म्हणजे कमळ व पाली भाषेत कमळाला पांडुरंग असं म्हणतात. यावरून स्पष्ट होतं की, पांडुरंग म्हणजेच बुद्ध आहे, दुसरा कुणीही नाही.’ (धनंजय कीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पृ. ५०१)
डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनीही विठोबा बुद्ध असल्याबद्दल अनुकूल मत व्यक्त केलं आहे. जॉन विल्सनच्या ‘ मेमोयरस ऑन् दी केव्ह टेम्पल ‘ या ग्रंथात विठ्ठल मंदिर बुद्धाचं होतं, असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (अ.रा. कुलकर्णी, धर्मपद, पृ. १२९)
डॉ. के जमनादास यांनी विविध वाङ्मयीन व पुरातत्वीय पुराव्यांचा संदर्भ देऊन विठ्ठलाची मूर्ती ही मुळातील बुद्धमूर्ती होय, हे पटवून दिलं आहे. ते म्हणतात, ‘ पंढरपूर के देवता बुद्ध है और अन्य कुछ नही, ऐसी महाराष्ट्र में गहरी परम्परा पुरातन काल से चली आ रही है. और महाराष्ट्रीय जनमानस में जम गई है. हमारे बचपन में, प्राथमिक पाठशाला में मुलाक्षर और अंको का जो किताब होता था उस में दशावतारों के चित्र होते थे. नववा अवतार बुद्ध काय दर्शाया जाता था. और जो चित्र था वह अजिंठा या एलोरा आदि से बुद्ध या बोधिसत्व का न होकर पंढरपूर के विठ्ठल का होता था. विठोबा यह बुद्ध ही है ऐसी गहरी मानसिकता महाराष्ट्रीय जनमानस में बसी थी, यह बात इससे स्पष्ट होती है.’ (तिरूपती बालाजी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र, पृ. २३)
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विठोबाच्या मूर्तीसंबंधी सखोल संशोधन करून ‘श्री. विठ्ठल : महासमन्वय’ हा ग्रंथ निर्माण केला आहे. त्यातही विठ्ठलाकडे बुद्ध म्हणून मराठी संतांनी पाहिलं होतं, हे अनेक पुराव्यांनी सिद्ध केलं आहे. नामदेवाची शिष्या जनाबाई म्हणते-
होऊनीया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला माझा सखा ॥ (३४४)
संत एकनाथ महाराजांनाही विठ्ठल बौद्धरूप आहे ; असं वाटत होते. ते म्हणतात–
नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरूप ॥
बौद्ध अवतार घेऊन । विटे समचरण ठेवून
पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडिला ॥
बया दार लाव । बौद्धाई बया दार लाव ॥ ३९११॥
संत शिरोमणी नामदेव महाराजही म्हणतात –
गोकुळी अवतारु सोळा सहस्रां वरु ।
आपण योगेश्वरु बौद्धरूपी ॥ (१५०३)
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ॥(१०९६)
ऐसा कष्टी होऊनि बौद्ध राहिलासी । (१०९८)
संत तुकोबारायांनाही विठ्ठल बुद्ध वाटला म्हणून ते म्हणतात-
बौद्ध अवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखे निष्ठा धरियेली ॥
याशिवाय अनेक संत व महंतांनी विठ्ठलाला बुद्ध म्हटल्याचं डॉ. ढेरे यांनी दाखवून दिलं आहे. पूर्वी पंचांगांवर दशावतार चित्रं राहायची तेव्हा त्यात बुद्धाच्या ऐवजी विठोबाचं चित्र असायचं. पण त्याखाली बुद्ध वा बौद्ध असं लिहिलेलं असे. या सर्व पुराव्यावरून डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, ” ज्ञानदेव–नामदेवांच्या काळात निकटपूर्वी सतत हजार–दीड हजार वर्षे सारा महाराष्ट्र भगवान बुद्धाच्या अनुयायांनी व्यापलेला होता…. भिक्षू हा आदराचा विषय बनलेला होता. त्या आदराची निदर्शक म्हणून भिकोबा अन् भिकुबाई ही स्त्री–पुरुषांची नावं खेडोपाडी प्रचलित झालेली होती……. ज्ञानोबा–तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करुणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरवला, त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणाऱ्या असंख्य भिक्षूंच्या निवासभूमीत झालेला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखं नाही…….आणि म्हणूनच मला असं नि:संकोचपणाने म्हणावसं वाटतं की, महाराष्ट्रात हजार-दीड हजार वर्षापर्यंत नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करुणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात जाता-जाता इथे उपडा केला अन् मग त्याची धारा धष्टपुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळविले. महाराष्ट्रात तरी कालक्रमाने आलेले तांत्रिक विकृतीसारखे आपल्यातील सारे हीन दूर दवडून बौद्ध धर्म भागवत धर्माच्या रुपाने पुन्हा अवतरला….. बौद्ध हा नवा भागवती अवतार म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातलं वैचारिक पातळीवरचं एक महान युगांतर आहे.’ (पृ. २३५)
जैनांचा देव विठ्ठल :
‘वरील ग्रंथातच ‘विठ्ठल आणि जिन’ या लेखात पंढरीचा विठ्ठल हा जैनांचा देव आहे, असा जैनांचा दावा बहुधा अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उच्चारला जात असावा, असं मानायला जागा आहे ’ असं डॉ. ढेरे म्हणतात. त्रिपुटीच्या गोपाळनाथांचे शिष्य गोविंदनाथ(शके १६४३-१७३३) यांनी आपल्या अभंगात मात्र या दाव्यांचं खंडन केलं आहे, ते असं–
‘पंढरीचा देव म्हणती जैनांचा । तया गाढवाचा जन्म वृथा ॥‘
पद्मपुराणात पांडुरंगाला बाळ दिगंबर म्हटलं आहे. यातील दिगंबर शब्द जैनवाचक आहे, असं वाटून जैनांनी विठ्ठलाला नेमिनाथ रूपाने मानण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, तसंच खंडोबालाही आपलासा केला होता, असं डॉ. ढेरे म्हणतात (पृ. २४०) रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी ‘भरत–खंडाचा अर्वाचीन कोश’ या ग्रंथात पुंडलिकाविषयी जे टिपण लिहिलं आहे, त्यातून जैनांचा विठ्ठलावरील दावा कसा होता याची कल्पना येते.
ते म्हणतात– ‘पुंडरिक हा जातीचा ब्राह्मण होता व मोठा विद्वानही होता. जैन लोक असं म्हणतात की, युधिष्ठिर शके १७२४ मध्ये विद्यारत्नाकर नावाच्या एका जैन पंडिताशी याचा वाद होऊन त्यात त्याचा पराभव झाला व हा जैनधर्म स्वीकारून अहिंसा धर्माप्रमाणे आचरण करू लागला. हा वाद भीमरथीच्या तिरी म्हणजे भीमा नदीच्या काठी असणाऱ्या लोहदंड क्षेत्रात झाला व त्या वेळेला चंद्रगुप्ताचा मुलगा व अशोक राजाचा बाप वारिसार याची कारकीर्द होती. जर ही वर लिहिलेली गोष्ट खरी असेल, तर या गोष्टीस आज गतकलीच्या ४९८० व्या वर्षी ३१५६ वर्षे झाली आहेत, असं म्हटलं पाहिजे; परंतु यास आणखी काही प्रमाण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळाल्यास मग याचा निर्णय न्यायाचं होणार आहे. इतकं आम्हास येथे लिहिण्याचं कारण असं आहे की, युधिष्ठिर शक १७२५ विरोधकृत संवत्सरी आषाढ शुद्ध ११ बुधवारी त्या जैन पंडिताने जी मूर्ती स्थापली, तिच्या आकृतीचं वर्णन असं केलेलं आढळतं–
नेमीनाथस्य या मूर्तिस्त्रिषु लोकेषु विश्रुता ।
द्वौ हस्तो कटिपर्याये स्थापयित्वा महात्मन: ॥१॥
मूर्तिस्तिष्ठति सा सम्यक जैनेंद्रेणच पूजिता ।
अहिंसा–परमं धर्म स्थापयामासा वै स च ॥२॥
युगैस्तु मनुजाक्षीणि विप्रभूमिश्च वामके ।
मेलने धर्मराजस्य शकस्यच गतावधी: ॥३॥
आषाढे शुक्लपक्षे तु एकादश्यां महातिथौ ।
बुधे च स्थापयामास विरोध कृतीवत्सरे ॥४॥ (जैनग्रंथ)
हे वर्णन हल्ली जी पंढरीस विठ्ठलमूर्ती आहे, तिच्या आकृतीशी जमतं. मात्र, काळाचा मेळ पडत नाही. कारण नामदेवांनी लिहिलेल्या आरतीत हा देव अठ्ठावीस युगांचा आहे, तर जैन सुमारे साडेबत्तीसशे वर्षाचा म्हणतात. म्हणून यास बलवत्तर दुसरं प्रमाणच मिळालं पाहिजे. त्याशिवाय याचा निर्णय होणं नाही. सारांश, पुंडरिक पंडित प्रल्हाद–नारद-पराशर–पुंडरिक या श्लोकात लिहिलेला तोच हा, असं तूर्त म्हणता येत नाही.
डॉ. ढेरे पुढे म्हणतात की, ‘गेल्या शतकाच्या अखेरीस आपला कोशग्रंथ सिद्ध करताना गोडबोले यांनी कोणत्याही जैन ग्रंथांच्या आधारे ही माहिती आणि हे श्लोक उद्ध़ृत केले ते सांगता येत नाही. आषाढी शुक्ल एकादशी, बुधवार, अहिंसा धर्म, कटीन्यस्तकर हे सर्व उल्लेख विठ्ठलोपासना आणि विठ्ठलमूर्ती यांच्याशी जुळणारे असे आहेत. अर्थातच ऐतिहासिकदृष्टया ते खरे–खोटे ठरवण्यात अर्थ नाही. जैन परंपरा विठ्ठलाला नेमीनाथ म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करीत होती, हे समजावून घेण्यासाठी या माहितीचं आणि या श्लोकांचं महत्व आहे, एवढंच आपण ध्यानी घ्यायला हवं.
प्रख्यात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी विठ्ठलावर हक्क सांगणाऱ्या जैन लोकांच्या समजुतीविषयी म्हटलं आहे की, ‘ पंढरपूरच्या मूर्तीविषयी आणखी एक प्रवाद आहे. या प्रवादाचा उल्लेख इंडीयन अँटिक्वेरीच्या दहाव्या भागात (पृ. १४९) आला आहे. हा लेख एका मिशनऱ्याने उपहासबुद्धीने लिहिला असून, हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते; आता हिंदूंचे झाले; सध्या येथे ७५ जैन असून ते विठोबाची मूर्ती आपली देवता आहे असे म्हणतात. इत्यादी अर्थ त्यात आहे. या लिहिण्यावरून त्याचा झोक ही मूर्ती जैनांची आहे, असं म्हणण्याचा दिसतो. तसंच तेथील जैनांना विठोबाच्या संस्थानातून काही मानमरातब चालू असल्याची माहिती लागते. एवढंच नव्हे, तर ती मूर्ती जैन नेमिनाथ तीर्थंकरांची आहे, असंही एका जैन ग्रंथात प्रतिपादन केल्याचं गोडबोलेंच्या कोशावरून समजतं.’
यावर डॉ. ढेरे म्हणतात, ‘ ग. ह. खरे हे प्रवाद आणि धारणा यातील अंतर ध्यानी न घेता लिहीत आहेत. देवतांच्या उन्नयनप्रक्रियेला, त्यांच्या प्रतिष्ठेच्या चढ-उताराला, त्याविषयीच्या लोकमानसातील श्रद्धेच्या उत्थान–पतनाला कारण होणाऱ्या धारणा अगदीच तथ्य नाही, अशा ठोकळ शेऱ्याने उडवून लावून चालणार नाही….. ते विठ्ठल हा आपलाच नेमीनाथ आहे, असं मानू लागतात/म्हणू लागतात, तेव्हा त्यांना विठ्ठल हा नेमिनाथाच्या रुपात उन्नत करून आत्मसात करायचा असतो.’
विठ्ठलाला सर्वांनी आपलंच मानलं आहे. तो आज विष्णूचं एक रूप म्हणून प्रचलित असला, तरी शैवांनीही त्यावर वारंवार हक्क सांगितला आहे. म्हणून प्रश्न पडतो की-
विठोबा शैवांचा की वैष्णवांचा
पंडित का शि. संकाये यांनी तर वारकरी पंथ शैवपंथ आहे असं सिद्ध करणारं त्याच शीर्षकाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘ विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. भस्म लावण्यासाठी कपाळ उंच आणि रुंद असून गळयात जानवे नाही. शिव मंदिरात एक शिवलिंगच असते, त्याप्रमाणे विठ्ठल मंदिरात एकटाच आहे. शिवाच्या दर्शनाला विश्वारंभापासून ते आतापर्यंत कोणालाही बंदी नाही. त्याप्रमाणेच विठ्ठलाच्या दर्शनाला कोणाला बंदी नाही….. पंढरपूर हे जुने शिवपीठ आहे. शिवक्षेत्र आहे. येथेही पंढरपूर निर्माण झाल्यापासून ते आजपर्यंत विठ्ठलासह अनेक शिवमंदिरे आहेत. आजही पंढरपूर शिवक्षेत्र, शिवपीठच आहे. विठ्ठल ही देवता वीरशैव आहे आणि त्याचे भक्त पुंडलिक, नामदेव, तुकाराम आदि संत व वारकरी समाज शैव आहे.’ या अवतरणात विठ्ठल ही देवता वीरशैव आहे असे संकाये यांनी म्हटले आहे. अलीकडे त्याऐवजी लिंगायत हा शब्द वापरला जातो.
‘पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा’ या विठ्ठल आरतीतील चरणातून पंढरपुरास विठ्ठलाला आणण्याचं श्रेय पुंडलिकाचं आहे, असे स्पष्ट झालं आहे. भीमेच्या पात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊनच भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. यावरून वारकरी संप्रदायामध्ये त्याचं स्थान किती महत्वाचं आहे हे दिसून येतं. प्राचीन इतिहासाचे प्रख्यात संशोधक प्रा. श्री. म. माटे यांनी ‘पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रुपांतर’ या लेखात वास्तवावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, ‘ पुंडलिकाच्या देवळात पुंडलिकाची मूर्ती नाही. तेथे शिवाचं लिंग आहे आणि लिंगावर लोक पितळेचा मुखवटा घालतात. जर ती पुंडलिकाची समाधी आहे, तर पद्धतीप्रमाणे पादुका बसावावयास हव्या होत्या आणि त्या बसवलेल्या असत्या म्हणजे पुजाऱ्यांनी पितळेचा मुखवटा बसवला असता, असं वाटत नाही. तथापि, समाधीवर महादेवाचं लिंग बसवण्याची चालही आहे. आणि पुंडलिकाची समाधी ज्यांनी बांधली, त्यांनी या कल्पनेप्रमाणेच शिवलिंगाची स्थापना केली असेल. पण या ठिकाणी एक विकल्प मनात येतो. या पुंडलिकाच्या देवळातले पुजारी कोळी आहेत. अनेक ठिकाणी महादेवाची पूजा कोळयांच्याकडे असते. पूजेचा पहिला मान कोळयांकडे किंवा जंगमाकडे असून, त्यांच्यामागून ब्राह्मणांनी पूजा करावी, अशी चाल असते. पण ही चाल एखाद्या समाधीवर बसवलेल्या शिवलिंगाच्या बाबतीत नसावी; असं मला वाटतं. मग जर येथे केवळ पुंडलिकाची समाधी आहे आणि हे मूळचंच महादेवाचं स्थान नाही, तर येथली पूजा कोळयांच्याकडे कशी, या प्रश्नाचाही शोध करावा लागेल.
प्रा. माटे यांच्या या प्रश्नाच्या अनुरोधाने डॉ. ढेरे यांनी पुंडलिक मंदीर हे एक शिवमंदीर आहे, या गृहितकृत्याचा आधारे संशोधन केलं. भारतीय भक्तिसाहित्याच्या विदेशी (फ्रेंच) अभ्यासिका डॉ. शालोटे वोदविल यांनी पंढरपूर विषयक लेखात पंढरपूर हे विठ्ठलप्रभुत्वापूर्वी एक शैवस्थान होते, असं मत मांडलं आहे. त्यासाठी पंढरपुरातील अनेक नव्या–जुन्या शैव दैवतांच्या स्थानांचा पुरावा सादर केला आहे. या पुराव्यात त्यांनी पुंडलिकाचाही समावेश एक शैव स्थान म्हणूनच केला आहे.
याच दिशेने डॉ. रिसाइड व प्रा. धनपलवार यांनी संशोधन केलं. पण त्यापूर्वी डॉ. रा. गो. भांडारकर यांनी पंढरपूर हे प्रथम शैव क्षेत्र होतं, असं मत मांडलं होतं. पांडुरंग या शब्दाच्या अर्थावरून तसंच शिवरुपात पूजिला जाणाऱ्या पुंडलिकाला जो अग्रमान आहे, त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला. डॉ. पांडुरंगराव देसाई यांनी पांडुरंग म्हणजे शिव या लेखात (नवभारत,जून १९५७, पृ. १२-१४) शिलालेखातील नव्या संशोधनावरून या मताचा पुरस्कार केला होता. डॉ. ढेरे यांनी याकडे लक्ष वेधून म्हटले आहे की, ‘ धारवाड जिल्हयात हिरेकेरुरजवळ बाळंबीड नावाचं जे एक प्राचीन शिवस्थान आहे, तेथे असलेल्या कोरीव लेखात त्या स्थानाचं नाव पांडुरंगेश्वर असं आलं आहे. प्रा. धनपलवार यांनीही आंध्रातील नेल्लोर जिल्हयात पंडरंगम् हे स्थान आणि तेथील पंडरंगेश्वर याकडे लक्ष वेधलं आहे. (विठ्ठल म्हणजे शिव, माणिक घनपलवार, अनुबंध ५.२, अंक क्र. १८ जुलै ते सप्टेंबर १९८१, पृ २६-३४) वेंगीच्या चालुक्यांच्या सत्ताकाळात गाजत असलेलं हे शिवस्थान पंडरंग नामक एका सेनापतीशी संबंधित होतं. पांडुरंग आणि पुंडरिक ही दोन्ही नावं पंढरपूरच्या संदर्भात तरी पंडरंगे या ग्रामनामाचं संस्कृतीकरण करून साधलेली असल्यामुळे पांडुरंगाच्या आधारे पंढरपूरचा शैव महिमा सांगणारे संशोधक हे अप्रत्यक्षपणे पुंडरिकाकडे संकेत करणारे ठरतात, असं मला वाटतं.’ यावरून पांडुरंग हा शैवांचा होता हे स्पष्ट होतं. वैष्णवांच्या ताब्यात तो नंतर आला.
पांडुरंग म्हणजेच शिव – शंकर
पांडुरंग हा शब्द विठोबासाठी वापरण्यात येतो. पण ते पंढरपूरचं मूळ नाव आहे. पांडुरंग विठ्ठल या शब्दाचा विठ्ठल असा होतो. पंढरपूरला पांडुरंग क्षेत्र आणि पुंडरिक क्षेत्र/पौंडरी क्षेत्र या नावानेही प्राचीन ग्रंथांमध्ये संबोधलं आहे. पंढरपुरामध्ये सापडलेल्या शिलालेखांमध्येही तसंच पंढरपूरची माहिती देणाऱ्या कोरीव लेखांमध्ये पांडुरंगपूर, पौंडरीक क्षेत्र, पांडरी, पांडरीपूर असा पंढरपूरचा उल्लेख आढळतो. होयसळ वंशातील वीर सोमेश्वर यादवाच्या कोरीव लेखात कन्नड व संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये पंडरंगे या शब्दाचा वापर केलेला आहे. तो कानडी भाषेतील असून त्यातूनच पांडुरंग, पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरिक क्षेत्र, पुंडरिक इ. शब्द तयार झालेत.
पंडरंगेऐवजी पांडुरंग हा शब्द वापरात आला व त्याचा अर्थ पांढऱ्या रंगाचा म्हणजेच शुभ्र असा होतो. शिवाचं वर्णन कर्पूरगौर भोळा, असं आरतीमध्ये करण्यात आलं आहे. त्याचा अर्थ कापरासारखा गौरवर्णीय म्हणजे शुभ्र असा होतो. शिवाची प्रतिमा श्यामवर्णीय सर्वत्र दिसत असली, तरी प्राचीन ग्रंथांमध्ये तो गोरा होता, असे उल्लेख आहेत. प्राकृत भाषेचा प्राचीन व्याकरणावर हेमचंद्र याने आपल्या देशीनाममालेत पंडरंगो रुद्दम्मि या शब्दातून पांडुरंग व रुद्रशिव हे एकच होत, असं स्पष्ट केलं आहे. यावरून पांडुरंग म्हणजेच शिव-शंकर होय, हे सिद्ध होतं. त्याचं महात्म्य ज्या ठिकाणी आहे, त्याला पांडुरंगपूर असं नाव प्राप्त झालं व त्यातून पंढरपूर या शब्दाची सिद्धता झाली.
पांडुरंग या नावाप्रमाणेच विठ्ठल हे नावही शिवाचंच होय, असं प्रा. धनपलवार यांनी ‘विठ्ठल म्हणजे शिव’ या लेखात दाखवून दिलं आहे. त्यांच्या मते, भट्टीप्रोलू (जि. गुंटुर, आंध्र प्रदेश) येथील विठ्ठल मंदिर सर्वात प्राचीन असून येथील विठ्ठल दैवत प्रारंभापासून शिवदैवत होतं. अनेक ठिकाणी वीरभद्र या शिवाच्या रुपातही विठ्ठलाची पूजा केली जाते. आंध्रप्रदेशातील लेपाक्षी (जि. अनंतपूर) येथील मंदिरातील शके १९५९ च्या शिलालेखात वीरभद्राला विठ्ठलेश्वर म्हणून संबोधलं आहे. विठ्ठलाची प्राचीन मंदिरं ही शिवमंदिर असून विठ्ठल हा शब्द पांडुरंगशिव या अर्थानेच आंध्रप्रदेशातील प्राचीन शिलालेखांमध्ये वापरलेला आहे. तिरुवारूर आणि चिदंबरम् या दोन शिवक्षेत्रांचं पर्यायी नाव पुंडरिकपूर असं आहे व त्याच्याजवळच दिंडीरवन आहे. यावरुन पंढरपूर हे मूळचं शिवक्षेत्र असून विठ्ठल हा त्या क्षेत्रातील अधिष्ठाता देव शिव–शंकरच आहे, हे स्पष्ट होतं. म्हणून येथील दिंडीरवन व तेथील लखुबाईविषयी माहिती पाहणे आवश्यक आहे.
दिंडीरवनातील लखुमाई
पंढरपूरमध्ये दिंडीरवन या नावाने ओळखला जाणारा एक भाग आहे. हैदराबाद येथील प्रा. माणिक धनपलवार यांनी दक्षिणेतील तिरुवारूर या पौंडरिक क्षेत्रामध्ये (जे शिवक्षेत्र आहे) दिंडीरवन नावाचा प्रदेश असल्याचं आपल्या ‘विठ्ठल म्हणजे शिव’ या लेखात म्हटलं आहे. दींडीवन या ग्रामनामाने त्याचा उल्लेख होतो. त्याला तमिळमध्ये तिंडीवनम् असं म्हणतात. मद्रास-तंजावर लोहमार्गावर असलेलं हे गाव अजूनही शिवक्षेत्र आहे. पण पंढरपूरच्या दैवताचं शिवरुपात्व जाऊन त्याजागी वैष्णव मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, अशी खंत प्रा. धनपलवार व्यक्त करतात. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मात्र त्याच्या या विधानाविषयी असहमती दर्शविली आहे. ‘दिंडीरवनाचे रहस्य’ लेखात ते म्हणतात (पृ. ६६) की, ‘पंढरपुरात विठ्ठल हाच पूर्वी शिव होता आणि नंतर विष्णू–कृष्ण बनला, असा पुरावा मात्र उपलब्ध नाही.’ पण प्रा. धनपलवार यांचे आभार त्यांनी यासाठी मानले की, त्यांच्यामुळे दिंडीवन या गावाची तसंच त्याला तमिळमध्ये तिंडीवन या नावाने ओळखलं जात असल्याची माहिती मिळाली.
तिंडीवनम् हा तिंत्रिणीवनम् या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असून त्याचा अर्थ चिंचबन असा होतो, असं ठाकुरदास जौहरी यांनी त्यांच्या ‘श्रीभारतवर्षीय दिगम्बर जैन यात्रार्पण’ या ग्रंथात म्हटलं आहे. त्यांचा संदर्भ घेऊन डॉ. ढेरे म्हणतात की, ‘चिंचेचे झाड संस्कृतात तिंतिड, तिंतिल, तित्तिडी, तिंतिला, तिंतिणी, तिंत्रिणी या नावानी ओळखलं जात. चिंचावृक्ष असाही संस्कृत शब्द वापरत आहे.’ यापासूनच तिंडीरवन, दिंडी आणि दिंडीरवन हे शब्द बनले आहेत. त्याचा अर्थ चिंचेच्या झाडांचं बन असा आहे, असं सांगून पुढे डॉ. ढेरे म्हणतात, ‘पंढरपूर येथे गावाबाहेर लक्ष्मीतीर्थाजवळ नदीकाठी दिंडीरवन या नावाचं एक स्थान आहे. यात भागात लखुबाईचे मंदिर आहे. या मंदिरातील लखुबाई नावाच्या या देवीचं मूळ रूप अनघड शेंदरी तांदळयाचं आहे आणि या तांदळ्यामागील उंच पीठावर स्थापन केलेलं तिचं मूर्तिरूप गजलक्ष्मीचं आहे. ही लखुबाई म्हणजेच कृष्णावर रूसून दिंडीरवनात येऊन राहिलेली रुक्मिणी होय, असं मानलं जातं. हिच्या अवतीभवती अजूनही पूर्वास्पृश्यांची वसती आहे, तरीही हिच्या पूजाआदींचा अधिकार उत्पात मंडळीकडेच आहे.
कोळ्यांच्या म्हसादेवीचं मंदिरही या लखुबाईच्या मंदिराजवळच आहे. ही रुसलेली रुक्मिणी (अर्थात लखुबाई) आजही ज्या दिंडीरवन नामक बनात नांदते आहे, हे बन चिंचेचं आहे, हे कोणाही यात्रिकाला स्वत:च्या डोळयांनी पाहता येईल. या बनात काल–परवापर्यंत चिंचेची सात मोठी झाडं होती. त्यांना श्रद्धेने सप्तर्षी मानलं जात असे. यापैकी एका झाडाचं खोड तर इतकं मोठ होतं की, ते कोरलं तर त्याच्या बोगद्यातून बैलगाडी पलीकडे जाऊ शकेल, अशा अतिशयोक्तीने त्याच्या प्रचंडतेचं वर्णन केलं जात असे. परंतु आता या प्रचंड झाडासकट चार चिंचेंची झाडं पंढरपूर नगरपालिकेने नगरविकास योजना राबवताना तोडून टाकली आहेत आणि फक्त तीन चिंचेची झाडं दिंडीरवनाचं नामरहस्य उलगडून सांगण्यासाठी साक्षी म्हणून जिवंत राहिली आहेत.’ हा लेख तयार करण्याच्या निमित्ताने मी स्वत: दिंडीरवन व तेथील झाडं पाहिलीत.
दिंडीरवन हा शब्द चिंचेच्या झाडांच्या समूहाला उद्देशून वापरला गेला, हे वरील माहितीवरून स्पष्ट होतं. पण ही माहिती उजेडात येण्यापूर्वी या वनात दिंडीरव नावाचा राक्षस राहात होता. त्यामुळे त्याला दिंडीरवन असं म्हणतात, अशी लोकांची समजूत होती. त्यामुळे त्याला दिंडीरवन असं म्हणतात, अशी लोकांची समजूत होती. पद्मपुराणांतर्गत मानल्या जाणाऱ्या पांडुरंग महात्म्यात तशी कथा आहे. या दिंडीरव राक्षसाला मारण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण केलं आणि लोहदंडाचा आघात करून त्याला मारलं, असं या स्पष्टीकरण कथेत म्हटलं आहे. पंढरपुरातील दिंडीरवन व लोहदंडक्षेत्र या स्थानांचं कृत्रिम संस्कृतीकरण करून ही स्पष्टीकरणकथा कल्पक भिक्षुकाने तयार केली असावी.
दिंडीरवनाशी संबंधित कथा तिरुपतीच्या बालाजीविषयीही प्रचलित आहे. विठ्ठलाची पत्नी राधेच्या रागावर रुसून दिंडीरवनात आली, तर वेकटेंश बालाजीची पत्नी भृगूने केलेला अपमान न साहवून चिडून प्रथम करवीरात, नंतर तिरुचानूरमध्ये राहिली. वेंकटेशाची पत्नी पद्मावती तर विठ्ठलाची प्रेयसी पद्मा. तीच पंढरपुरातील पदूबाई होय. तीच रुक्मिणी होऊन प्रकटली, असं पदुबाईचे धनगर भक्त मानतात. वेंकटेश चिंचेच्या झाडाखालच्या एका वारुळातून प्रकट झाल्याची कथा भविष्योत्तरपुराणांतर्गत वेंकटेश महात्म्यात आहे. चिंचेच्या झाडाचं महत्त्व येथेही आहेच. विठ्ठलवीरप्पाच्या कथेतही त्याचं महत्त्व आहे. या सर्व कथांचा परामर्श घेऊन डॉ. ढेरे यांनी दिंडीरवनातील लखुबाई ही विठ्ठल पंढरपुरात येण्यापूर्वीपासून येथे प्रतिष्ठित होती, असं म्हटलं आहे. (पृ. १८३) तिच्या गजलक्ष्मीच्या रुपातील मूर्तीचा रुक्मिणीशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. तरीही ओढूनताणून लावला जातो.
लखुबाईचं पंढरपुरातील मंदीर पाहिल्यावर तिचा विठोबाशी काही संबंध असेल, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण शेंदराने माखलेल्या तांदळ्याच्या अर्थात, दगडी अनघड (न कोरलेली) मूर्तीच्या स्वरुपात लखुबाई येथे पूजली जाते. तिच्यामागे उंच ओट्यावर काळ्या पाषाणात गजलक्ष्मीची कोरलेली मूर्ती बसवलेली आहे. त्यावरून तर स्पष्ट होतं की, ती रुक्मिणी नाही. पण तिच्या मागील भिंतीवर आपल्या उजव्या बाजूला रुक्मिणीला न्यायला कृष्ण आलेला आहे व तो रथात बसवून तिला घेऊन् जात आहे, असं उत्थित शिल्प (Relief Sculpture) बसवलेलं आहे. त्यालाही भरपूर शेंदूर लावलेला असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही. पण तेथील पुजारी ते शिल्प कृष्ण रुक्मिणीला रथात घेऊन जात असल्याचं आहे, असं सांगत असतो. हे पुजारी बडवे परिवारातील आहेत. त्यामुळे हे सांगण्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे स्पष्ट होतं. पण जेवढी गर्दी विठोबांच्या मंदिरात होते, तेवढी इथे होत नाही. कारण मुळातच लखुबाई ही धनगरांची समृद्धीची देवता आहे. शेळ्या, मेंढ्या, गुरे, ढोरे यांच्या संपत्तीचं प्रतीक अशी लक्ष्मीच लोकभाषेत लखुबाई म्हणून प्रचलित झाली आहे. तिच्या अवतीभवती मागासवर्गीयांची वस्ती आहे. लखुबाईच्या मंदिरासमोर नागाचं देऊळ आहे. यावरून नागपूजकांच्या संप्रदायाचा व त्यांच्या लोकमातेचा निर्देश होतो. नागपूजकांचा संप्रदाय हा शिव वा पार्वती पूजकांच्या संप्रदायात विलीन झाला. त्यामुळे शिव वा पार्वतीच्या मंदिरासमोर नागमंदीर असतं. पांडुरंग किंवा पुंडलिक ही देवता म्हणजे शिव होय. हीच पंढरपूरची मूळ ग्रामदैवत होय. तीच स्थिती लखुबाईचीही आहे. मुळातला विठ्ठल शिव आहे, हे अनेक विद्वानांनी सिद्ध केलं आहे. वैष्णवभक्तांच्या ताब्यात ही दैवतं आल्यानंतर त्याचं वैष्णवीकरण करण्यात आलं. याविषयी डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, ‘ पंढरपुरात श्रीविठ्ठल या वैष्णव देवतांचं आगमन होण्यापूर्वी, म्हणजे श्रीविठ्ठल या वैष्णवी दैवताचा महिमा पंढपुरात वाढण्यापूर्वी तिथे ज्या प्रतिष्ठित व लोकप्रिय देवता नांदत होत्या, त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट करण्यासाठी आणि शक्यतो त्यांचंही वैष्णवीकरण साधण्यासाठी ज्या कथा रचल्या गेल्या , त्यांचा समावेश स्थलपुराणात झालेला दिसतो. या वैष्णवीकरणाच्या व्यापक प्रयत्नातूनही मल्लिकार्जुन आणि पद्मावती ही दोन दैवत आपलं मूळचं स्वतंत्र रूप पूर्णत: राखून राहिली; परंतु दिंडीरवनातील लखुबाई आणि भीमेच्या पात्रातील पुंडलिक ही दोन दैवत मात्र दर्शनदृष्टया आपल्या स्वतंत्र, मूळच्या रुपात टिकली असली, तरी चरित्रदृष्टया मात्र ती पूर्णत: वैष्णव बनली आहेत- लखुबाई ही रुसलेल्या रुक्मिणीचं चरित्र स्वीकारुन नांदते आहे; तर पुंडलिक हा वैष्णव भक्तोत्तम म्हणून गाजातो आहे.’ (पृ. १८४)
भक्त पुंडलिकाची कथा
उत्तम भक्तांच्या यादीत पुंडलिकाचं स्थान वरचं मानलं जातं. संत नामदेवाच्याही नंतर स्कंदपुराणांतर्गत मानले गेलेलं पांडुरंग महात्म्य रचलं गेलं. त्याचा रचनाकाल चौदावं ते पंधरावं शतक या दरम्यान असावा, असं डॉ. ढेरे म्हणतात. यामध्ये पुंडलिकाची कथा पहिल्यांदा आली आहे. त्यानंतर ‘पद्मपुराणांतर्गत पांडुरंगमहात्म्य’ हे पंढरपुरातील स्थानिक दैवताचं वैष्णवीकरण करणारं एक साधन आहे. दिंडीरवनात रुसून आलेल्या रुक्मिणीची कथा पहिल्यांदा या ग्रंथात आली असून त्याची रचना सोळाव्या शतकात झाली असावी, असा निष्कर्ष डॉ. ढेरे यांनी काढला आहे. यावरून पंधराव्या शतकात पुंडलिकाचा, तसंच सोळाव्या शतकात लखुबाईचा संबंध विठ्ठलाशी जोडून त्यांचं वैष्णवीकरण करण्यात आलं, हे स्पष्ट होतं. हा संबंध कसा आला ? हे भाविकांना पटावं म्हणून स्पष्टीकरणकथा रचण्यात आल्या व त्याच आज प्रचलित आहेत. त्यापैकी पुंडलिकाची कथा अशी–
पंढरपुरात आई-वडिलांची सेवा करणारा पुंडलिक नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची किर्ती ऐकून प्रत्यक्ष विष्णू त्याला भेटायला आला. तेव्हा आपल्या पडक्या घराची एक वीट त्याच्याकडे भिरकावून तीवर विष्णूला त्यानं उभं रहायला सांगितलं. मी लवकरच चंद्रभागेतून स्नान करून येतो, असं त्याने विष्णूला सांगितलं. चंद्रभागेत स्नान करीत असता आपल्या गावात आलेला देव पुंडलिकाची भेट झाली, तर निघून जाईल म्हणून चंद्रभागेने पुंडलिकाला पाण्याबाहेर निघू दिलं नाही. अर्थात, तो पाण्यात बुडून मरण पावला. तिकडे त्याची वाट पाहात विष्णू विटेवरच उभा राहिला. विटेवर उभा राहिला म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. चंद्रभागेत बुडाला म्हणून पुंडलिकाचं मंदिर भीमेच्या पात्रात चंद्रभागेच्या आहे, अशी वारकऱ्याची दृढ समजूत आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी विठोबा आला म्हणून पहिल्यांदा त्याचं दर्शन घेतात.
या कथेच्या मुळाशी पुराणांमधील पुंडलिकविषयक कथा आहेत. पद्मपुराणाच्या सहाव्या खंडात ऐंशीव्या अध्यायात तसंच नृसिंहपुराणात पुंडरिक या विष्णूभक्ताची कथा आहे. स्कंदपुराणात पुंडरिक व अम्बरीष या मित्राची कथा आहे. ते दोघेही दुष्कर्मी व वेश्यागामी आहेत. कान्होत्रिमलदासाच्या पुंडलिक चरित्रात पुंडलिकाच्या पित्याचं नाव कुंडलिक आहे. पद्मपुराणात सुकर्मा यांच्या कुंडल नावाच्या ब्राह्मणाच्या पुत्राची कथा आहे. या सर्व पुंडलिकाचा पंढरपुराशी काहीही संबंध नाही. पण त्यावरून प्रस्तुत पुंडलिक चरित्र तयार करण्यात मात्र कथाकारांना यश आलं आहे. या कथेचा प्रभाव वारकरी संप्रदायावर इतका आहे की, कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध न होणारं पुंडलिकाचं अस्तित्व त्यांच्या भावविश्वात अविभाज्य अंग झालेलं आहे. त्याविषयी डॉ. ढेरे म्हणतात, ‘या कथेतील नितांतरम्य भावसत्याने विठ्ठलोपासनेची सर्व पुढची वैभवशाली पंरपरा परिपुष्ट केलेली आहे. भावसत्यं ही ऐतिहासिक सत्यांपेक्षा अधिक प्रभावी असतात. ती मानवी मनावर एवढा प्रभाव गाजवतात की, एखाद्या ऐतिहासिक युगपुरुषाच्या कार्याहूनही अधिक प्रभावी कार्य ती इतिहास घडवण्याच्या बाबतीत करू शकतात. भावसत्यं मानवी मनात रुजवणाऱ्या कथांचं हे सामर्थ्य ध्यानी न घेतल्यामुळे अनेक मान्यवर संशोधक–अभ्यासक पुंडलिकाचा–श्रीविठ्ठलाला पंढरपुरातील आणि भक्त–भाविकांच्या अंतरंगातील भक्तिभीमातीरावर समचरण कटिस्थितकर अवस्थेत उभा करणाऱ्या पुंडलिकाचा शोध इतिहासात घेत राहिले. इतिहासात तो न सापडल्यामुळेच त्याच्याविषयीच्या ऐतिहासिक कल्पना करीत राहिले आणि तरीही असा ऐतिहासिक दृष्टीने शोध घेताना तो न सापडल्यामुळेच खंतावत राहिले.‘ पुंडलिकाच्या कथेसारखीच लखुबाईची कथा सांगोवांगीने रूढ झाली आणि तिनेही एक इतिहास घडवला आहे.
लखुबाईची रखुमाई व तिचा रुसवा
उच्चारसाधर्म्यामुळे लखुबाईचा रखुमाई हा उच्चार सुलभतेने झाला. पंढरपुरातील विठोबाच्या मंदीरात विठोबा एकटाच आहे. त्याला विष्णूचा अवतार बनविल्यावर त्याच्या सोबतीला रुक्मिणीला आणण्याची गरज निर्माण झाली. कारण विठोबाच्या मूर्तीमध्ये गोपाळाचे गुणधर्म होते. मग त्याला कृष्ण मानलं गेलं. आधीच अस्तित्वात असलेल्या लखुबाईच्या नंतर विठोबा येथे आला. तो येथे येण्याचं कारण काय ? तर रुक्मिणीचा रुसवा अशी कल्पकता कुणीतरी लढवली. त्यातून कथानक तयार केलं गेलं.
कृष्णाने द्वारकेत राधेला जवळ केलं, त्यामुळे रुक्मिणी त्यावर रुसून पंढरपुरातील दिंडीरवनात आली. तिची समजूत काढण्याकरिता कृष्ण पंढरपुरात आला व तो गोपाळपूर येथे राहिला. तेथून गोपवेषाने रुक्मिणीला भेटायला गेला. पंढरपुरातील गोपाळपूर हे गोपाळ या गुराढोरांच्या पालनातून उपजीविका करणाऱ्या जातीचं मूळ स्थान आहे, अशी त्यांची समजूत आहे. त्यांना गवळी असं म्हणतात. कृष्ण हाही गवळी होता. म्हणून तो आपल्या लोकांच्या वस्तीत पहिल्यांदा आला, अशी तार्किक संगती लागते. नंतर तो कोळ्यांची वस्ती असलेल्या दिंडीरवनात लखुबाईला म्हणजेच रुक्मिणीला भेटायला गेला. अशी कथा रचली गेली. कृष्णाला विठ्ठलरुपाने पंढरपुरात येण्याकरिता जी काही कारणं सांगितली जातात, त्यापैकी एक हे आहे.
पुंडलिकांच्या भेटीकरिता विष्णू विठ्ठलरुपाने आला, हेही एक कारण सांगितलं जातं. दिंडीरवनात माजलेल्या दिंडीरव राक्षसाला मारण्याकरिता विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण केलं. आणि लोहदंडाने त्याचा वध केला. या कथेत पंढरपुरातील मल्लिकार्जुन् या दैवताला विष्णूरूप करून टाकलं. आणखी एक कारण सांगितलं जातं, ते पदूबाईचं, पदूबाई ही धनगरांची देवता आहे.
तिच्याबद्दल कथा अशी आहे – पद्मा नावाची एक सुंदर युवती आपल्याला योग्य नवरा मिळावा म्हणून तपश्चर्या करते. तेव्हा तिच्याहूनही सुंदर रूप धारण करून देव तिच्यापुढे प्रकट होतो. देवाचं सुंदर रुप पाहून ती मोहित होते. त्यामुळे तिची वस्त्रे गळतात व केस मोकळे होतात. तिच्या या अवस्थेतून देवाच्या वरप्रदानामुळे मुक्तकेशी हे तीर्थ निर्माण झालं, अशी धारणा दृढ झाली.
भक्तांसाठी काही प्रश्न
या सर्व कथांमधून विठ्ठलाच्या पंढरपुरातील आगमनाची स्पष्टीकरणं देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सर्वच कथा भाविकांना भावतात व सर्वच देवतांपुढे तो भक्तिभावाने नतमस्तक होतो. पण त्याने आपली तर्कबुद्धी थोडी चाळवली, तर त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, राधेच्या प्रेमात डुंबलेल्या कृष्णावर रुसून रुक्मिणी जर पंढरपुरातील दिंडीरवनात आली असेल, तर तिथे रुक्मिणीचं मंदीर का नाही ? रुक्मिणीच्या रुसव्याचं कारण राधा असेल तर, तिच्या मंदिराशेजारी राहीच्या रुपात ती का आहे ? संपूर्ण महाराष्ट्रात जी विठ्ठल–रुक्मिणी मंदिरं आहेत, त्यात विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी असते. अगदी देवघरातील मूर्तीतही ती असते. मग विठ्ठलाचं मूळ ठिकाण असलेल्या पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी का नाही ? पुंडलिकाच्या भेटीसाठी जर विठ्ठल आलेला असेल, त्याच्या समाधीस्थळी विठ्ठलाच्या मूर्तीऐवजी शिवलिंग व मंदिराबाहेर नंदी का आहे ? विष्णूचा अवतार असलेला कृष्ण ज्या ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये मूर्ती रुपात आहे, त्याच्या हाती बासरी, मुकुटावर मोरपीस व पायात आढी आहे, ती येथे का नाही ?
याशिवाय विष्णूचा तथाकथित अवतार मानलेला विठ्ठल विष्णूसहस्रनामात का नाही ? तसंच विष्णूच्या चोवीस अवतारांमध्ये त्याचा समावेश का नाही ? या प्रश्नांनीही वारकऱ्यांच्या डोक्यात झिणझिण्या येऊ शकतात. पण हे सारे प्रश्न त्यांना पडत नाहीत व पडू दिले जात नाहीत. एक तर वारकरी संतांनी त्याची स्पष्टीकरणं आपापल्या सोयीने दिली आहेत व बाकीची पंढरपुरातील बडवे-उत्पात मंडळी देत असतात.
विठोबा मूळचा पंढरपूरचा की माढ्याचा ?
पंढरपुरातील विठ्ठलमूर्तीच्या लक्षणांविषयी वारकरी संतांनी आपल्या अभंगामधून जी माहिती दिली आहे, ती लक्षणे आज तिच्यात नाहीत. पण ती आहेत, असं ठसवण्याचा प्रयत्न बडवे करीत असतात. म्हणून एक महत्वाचा प्रश्न या बडव्यांसाठी आहे तो म्हणजे, विठ्ठल मंदिरातील सध्याची विठ्ठलमूर्ती संतांनी वर्णन केलेल्या लक्षणांनी युक्त नाही. याउलट सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील माढा या गावात ती आहे…..मग खरा विठोबा पंढरपुरचा की माढ्याचा ? तो जर मूळचा असेल, तर सध्याचा विठोबा केव्हा व कोठून आणला ? खरं तर इतिहासकारांपुढेही हे एक प्रश्नचिन्ह आहे.
विठ्ठलमूर्तीच्या रूपलक्षणाविषयी वारकरी संतांनी आपल्या अभंगामधून जी माहिती दिली आहे. तशी ‘पांडुरंगमाहात्म्य’ या नावाच्या दोन संस्कृत ग्रंथांमधूनही ती आलेली आहे. स्कंदपुराणांतर्गत आलेले स्कांद व पद्मपुराणांतर्गत ते ‘पाद्म’ अशी ही दोन पांडुरंगमाहात्म्य आहेत. त्यापैकी पाद्मपांडुरंगामाहात्म्यामध्ये विठ्ठलाच्या छातीवर मुक्तामाळेप्रमाणे शोभणाऱ्या षडक्षरी मंत्रावळीचा उल्लेख आहे. (‘श्रीवस्त’ धारयन वक्षे मुक्तामालां षडक्षराम ! ३.४२) यात विठ्ठलाची प्रिया पद्मा हिला वैशंपायन ऋषी या मंत्राचं वर्णन करताना म्हणतात-
छंदोऽनुष्टुब् ऋषिर्व्यासो देवतास्य श्रिय: पति ।
वैष्णवोऽयं मनु: षडि्भर्वणैर्नादसिद्धीद: ॥ – २७.१०
ज्यांचा छंद अनुष्टुभ् आहे, ऋषी व्यास आहे, देवता विष्णू आहे, असा हा नारदाला सिद्धीप्रद ठरलेला षडक्षरी वैष्णव मंत्र वैशंपायनांनी पुढच्याच दोन श्लोकांत कूटतेने व्यकत केला आहे. स्कांद पांडुरंगमाहात्म्यसुद्धा श्रीविठ्ठल महामंत्रयुत (७.६२) असल्याचं सांगतं. हा मंत्र देवाच्या हृदयावर पाहायला मिळतो, (मंत्राक्षराणि देवर्षे हश्यन्ते तस्य वक्षसि), असं नारदाला वैशंपायनाने म्हटलं आहे. (११.६७) हा मंत्र कसा आहे ? तर –
स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं पृष्टषष्टं सदीर्घकम् ।
षणं षष्टानित्यंतं समारं तं विदुर्बुधा: ।। – स्कांद पां. मा. ११.७३
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी स्कांद पांडुरंगमहात्म्याचा शके १६८८ मध्ये म्हणजे इ. स. १७६६ मध्ये नकललेल्या प्रतीत हा पाठ असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे श्रीधरस्वामी नाझरेकर हे पंढरपूर परिसरातील होते व त्यांनी प्रत्यक्ष मूर्ती पाहून आपल्या दशाध्यायी पांडुरंगमाहात्म्यातही अनेक वेळा विठ्ठलाच्या हृदयावरील षडक्षरी मंत्राचा उल्लेख केला आहे. हा मंत्र पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या वक्षस्थळावर नाही, पण माढा येथील विठ्ठल मूर्तीच्या वक्षस्थळावर आहे व तो कूटभाषेत रचलेला आहे.
मंत्राच्या कूट भाषेचा उलगडा
माढा येथील विठोबाच्या मूर्तीवर कोरलेला कूटश्लोक असा आहे-
श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यंषणषटू सदीर्घकं ॥
षटषटू दिनंत्यंतं ससारं तं विदुर्बु धा: ॥ श्रीवत्स
माढा हे माहादजी निंबाळकरांचं जहागिरीचं गाव होतं. त्यांनी हे मंदिर बांधल्याचाही उल्लेख मंदिराच्या उंबरठ्यावर (पायरीवर) आहे. येथील कूटश्लोक स्कांद पांडुरंगमाहात्म्यातील श्लोकाशी जुळणारा आहे. त्याचा उलगडा प्राचार्य वि. प्र. लिमये यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या विनंतीवरून केला. त्यानुसार ‘ससारं तं विदुर्बुधा:’ या शेवटच्या चरणाचा अर्थ ‘तो मंत्र रहस्यासह ज्ञानी जन जाणतात,’ असा होतो. या मंत्राची पहिली ओळ श्री. मंगलार्थक एकाक्षरी शब्दाने सुरु होते. ‘स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं’ या नंतरच्या दोन शब्दांमधील स्पर्शाद्यं म्हणजे स्पर्श वर्णापैकी पहिला वर्ण (‘क’ पासून ‘म्’ पर्यंतचे वर्ण स्पर्शवर्ण) म्हणजे क् हा वर्ण होय. दुसऱ्या सत्यनामाद्यं या शब्दाचा अर्थ सत्याचं नाम असलेल्या ऋत या शब्दातील ऋ या पहिल्या वर्णाला मिळून कृ हा वर्ण तयार होतो. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या चरणात षण्, षट् असे शब्द आहेत व ते शब्द सदीर्घक म्हणजे दीर्घ होऊन झालेले ष्णा हे अक्षर जोडले (तर कृष्णा हा शब्द तयार होतो.) या शब्दाला नत्यंतं म्हणजे ज्या मंत्राच्या शेवटी नति आहे, तो, नति म्हणजे नमन व नमनाचा भाव असलेला नम: हा शब्द. अशा रीतीने विठ्ठलाच्या हृदयावर कोरलेल्या कूटश्लोकातून श्रीकृष्णाय नम: हा मंत्र व्यक्त होतो. विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाल्यानंतर हा मंत्र त्याच्या वक्षस्थळावर कोरला गेला असवा. पण हा मंत्र पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्यामध्ये आढळत नाही. माढा येथील मूर्तीवर तो आढळतो. या मागील कारण काय ?
इतिहासाचार्य राजवाडे यांनी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती अफझलखानच्या स्वारीच्या वेळी शके १५८१ (इ. स. १६५९) माढे येथे हलवली होती, असं (ग्रंथमाला, १२.१, एप्रिल १९०५) म्हटलं होतं. माढयात विठोबाचं एक स्वतंत्र देऊळ तयार करून तेथे मूर्ती माढ्याला आणली होती, हे स्पष्ट होतं. नंतर संकट टळल्यावर ती येथून नेली असेल. पण ती काही काळ येथे होती, तिची आठवण म्हणून तशीच दुसरी मूर्ती घडवली असण्याची शक्यता आहे. सध्या माढ्याला जे विठ्ठल मंदीर आहे, त्यात विठ्ठलाच्या मूर्तीखाली मोठं शिवलिंग आहे. अर्थात, शिवलिंगावरच विठ्ठलमूर्ती (लिंगाऐवजी) बसवलेली आहे. विठ्ठलाला शिव मानूनच त्याची प्राणप्रतिष्ठा शाळुंकेवर (पिंडीवर) केलेली आहे. त्यामुळे हे शिवमंदीर आहे, असं काही अभ्यासकांचं मत आहे. या मंदिराची रचना एखाद्या मशिदीसारखी आहे. यावरून मोगली आक्रमणापासून बचाव करण्याकरिता तसं केलं असावं, हे स्पष्ट होतं. माढ्याच्या विठ्ठलमूर्तीच्या शिल्पशैलीवरून ते शिवकालीन शिल्प असावं, याचा अंदाज येतो. याच शैलीत पंढपुरातील रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी व राहीच्या मूर्ती घडवल्या आहेत. त्यांची उंची विठ्ठलमूर्तीपेक्षा कमी आहे. त्यावरून त्या उत्तरकालीन असाव्यात, हे दिसून येतं. पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती वालुकाश्माची (Sand Stone) तर रुक्मिणी व राही तसंच माढ्याची मूर्ती काळया पाषाणाची (Black Besolt) आहे. म्हणून त्या समकालीन असाव्यात, असा निष्कर्ष निघतो. माढा येथील प्राचीन मूर्तिशिल्पं व पुरातत्वीय अवशेष मी पाहिले आहेत. तिथे विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका वळणावर उघडयावर गजलक्ष्मीची मूर्ती मला दिसली. तिच्याविषयी स्थानिक लोकांना विचारलं असता, ती सटबाईची मूर्ती आहे, असं लोकांनी सांगितलं. एखादी बाळंतीण अडली की, या मूर्तीला उपडी करतात. मग बाळंतिणीची सुटका होते. अशी समजूत येथील लोकांची आहे. माढ्याच्या मूर्तीतील लक्षणं पंढरपूरच्या मूर्तीत नाहीत, हे एक वास्तव आहे. म्हणून पुन्हा एक प्रश्न भेडसावत राहतो की,
मूळ मुर्ती कुठे आहे ?
पंढरपुरापासून अवघ्या पस्तीस कि. मी. अंतरावर अरण-भेंड हे सावता माळी या यादवकालीन वारकरी संतांचं गाव आहे. त्यांनी एका अभंगात विठोबाचं वर्णन केलं आहे ते असं –
विठ्ठलाचे रुप अतर्क्य विशाळ । हृदयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवरी हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्द ब्रह्म साचे ॥ नाम विठ्ठलाचे कलियुगी ।
संत सावता महाराजांनी वर्णन केलेला विठोबा हा बाळरूप आहे. त्याच्या दिगंबर स्वरुपाचा वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात आणि मनगटात तोडे-वाळे आहेत. त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. त्या हातामंध्ये पद्म व शंख ही वैष्णव लांछने आहेत. पद्म म्हणजे कमळ हे कळीच्या रुपात आहे. तिचा देठ त्याने उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीत धरलेला आहे. त्याच्या हृदयरुपी कमळावर मंत्र असल्याचाही उल्लेख संत सावतामहाराजांनी केलेला आहे.
विठ्ठल मूर्तीच्या संतसाहित्यातील वर्णनानुसार माढा येथील मूर्ती दिगंबर रुपात आहे. तिच्या मस्तकावर गवळी टोपीसारखा कंगोरेदार मुकुट आहे. दोन्ही खांद्यावर टेकणारी शंखाकार कुंडलं आहेत. गळ्याशी व हृदयाशी लोंबणाऱ्या दोन माळा गळ्यात आहेत. दुसऱ्या माळेत कौस्तुभमणी आहे. दोन्ही माळांनी तयार झालेल्या त्रिकोणात वक्षस्थळावर गूढ नाममंत्र आहे. या मंत्रामध्ये शेवटी श्रीवत्स या शब्दांतून श्री वत्सलांछन हे विठोबाचं लक्षण सूचित केलेले आहे. डाव्या हातात शंख तर उजव्या हातात काठीवर तळवा टेकून बोटात कमळकळी घेतली आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवलेले असून हातातील काठी स्पष्ट दिसते आहे. तिच्या मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोऱ्या कपाळावरून मागे गेलेल्या आहेत. घोंगडे पांघरलेली ही मूर्ती गोपवेषधारी आहे. तिच्या कपाळावर आडवा तृतीयनेत्र आहे. ही सारी लक्षणं स्कांद पांडुरंग महात्म्यातील मूर्तीनुसार आहेत. मूळच्या पंढरपूरातील मूर्तीमध्ये ती होती हे यावरून स्पष्ट होतं, पण आजच्या मूर्तीत ती नाहीत. आज आपण माढा येथील मूर्तीला पाहून मूळ मूर्ती कशी असेल यांचा अंदाज व्यक्त करू शकतो.
पंढरपुरातील आजची मूर्ती सोळाव्या शतकापूर्वीची वाटत नाही, असं मत प्रख्यात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी व्यक्त केलं होतं. पंढरपुरातील एक विद्वान, धर्मशास्त्राचे तज्ज्ञ बाबा पाध्ये यांनी तीन संस्कृत विठ्ठलस्तोत्रं लिहिली होती. त्यापैकी ‘विठ्ठलध्यानमानसपूजा’ या स्तोत्रात वर्णन केलेली पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती माढ्यातील मूर्तीसारखी होती. विठ्ठल मूर्तीच्या नित्यसहवासातील व्यक्तीने लिहिलेलं हे स्तोत्र इ. स. १८०५ च्या दरम्यानचं असावं. याचा अर्थ तोपर्यंत तशा वर्णनाची मूर्ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होती. माढ्यावरून ती सुरक्षितपणे पंढरपुरात स्थापित केली होती. १८७३ मध्ये एका माथेफिरुने दगड हाणून विठ्ठलमूर्तीचा पाय तोडला होता. एकदा तर बडव्यानेच आपल्या आर्थिक स्वार्थापोटी विठ्ठलमूर्ती पळवून नेली होती. यावरून मूर्ती भंगल्यानंतर ती तेथून हलवली असावी व त्याठिकाणी दुसरी मूर्ती बसवली असावी. इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात त्यानुसार, सध्याची मूर्ती सोळाव्या शतकातील असावी. तरीही प्रश्न शिल्लक राहतो की, मूळ विठ्ठलमूर्ती आता कोठे आहे ? पंढरपुरातील बडवे–उत्पात मंडळी कितीही उरबडवेपणा करून हीच ती मूर्ती आहे, असं सांगत असतील, तरी त्यावर विश्वास कितपत ठेवावा ?
कानडा विठ्ठलु, कर्नाटकु !
विठोबाविषयी जे अनेक प्रश्न विद्वानांना पडले, त्यातील एक असाच महत्वाचा प्रश्न आहे व तो म्हणजे विठोबा महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकाचा ? या प्रश्नाचं उत्तर खरं तर संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वीच देऊन ठेवलं आहे ते असं –
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । येणे मज लाविले वेधी ॥७॥
संत एकनाथांनीही विठ्ठल कानडी लोकांचं दैवत होतं, हे स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात–
नाठवेचि दुजे कानड्यावाचुनी । कानडा तो मनी ध्यानी वसे ॥(६३२)
तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरिये ।
विठ्ठल कानडे, भक्त हे कानडे । पुंडलिके उघडे उभे केले ॥(६३३)
एकनाथांनाही विठ्ठलासोबत पंढरपूर हे तीर्थक्षेत्रही कानडी तसंच भक्तही कानडे वाटतात. संत नामदेवांनीही त्यापूर्वी तसंच मत व्यक्त केलं होतं, ते असं –
कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी ।
भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी ।। (१०३१)
विठ्ठल कानडे बोलू जाणे ।
त्याची भाषा पुंडलिक नेणे ।। (१०८७)
नामदेवांनी तर विठ्ठलाची भाषाही कानडी असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पण कानडा हा प्रादेशिक वा भाषिक उल्लेख नसून त्यातून न कळणारे म्हणजेच अनाकलनीय (वेदां मौन पडे । श्रुतीसी कानडे ॥ – संत नामदेव महाराज १०२७) असा अर्थ निघतो. त्याचप्रमाणे कर्नाटकु या शब्दाचा अर्थ देवाच्या लीला असा होतो, असा युक्तिवाद काही विद्वानांनी केला आहे. सोलापूर जिल्हयाचा कर्नाटकाला लागून असलेला भाग पहिला, तर आपण महाराष्ट्रात आहोत की कर्नाटकात हा प्रश्न पडतो. सोलापूर शहराचं स्वरूपही कानडीच आहे. पंढरपूर तर सीमेवरचंच गाव आहे. कर्नाटकातील लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचं प्रारंभीचं कार्य पंढरपुराजवळील मंगळवेढे येथूनच सुरू झालं. त्याचप्रमाणे पंढरपूरचं प्राचीन नाव पंडरगे हे तर स्पष्टपणे कर्नाटकी आहे. मग विठ्ठल कर्नाटकाचा आहे म्हटलं, तर बिघडलं कुठे ? विशेष म्हणजे, विठ्ठलाच्या प्राचीन मूर्ती सर्वाधिक कर्नाटकातच आहेत. .
उत्तर कर्नाटकातील बदामीच्या द्वितीय पुलकेशीच्या धाकट्या भावाचं जन्मनाव बिट्ट किंवा बिट्टरस असं होतं. याच नावाचे राजे होयसळ वंशातही झाले आहेत. विठ्ठल नावाचेही राजे दक्षिणेत झाले आहेत. कानडी भाषेत विष्णू या शब्दाचं रूप विट्टी असं तयार होतं, हे डॉ. रा. गो. भांडारकर यांनी दाखवून दिलं आहे. बिट्टीवरूनच विठ्ठल हा शब्द बनला, असं ‘शब्दमणीदर्पणा’च्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सुत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी दाखवलं आहे. तेव्हा विठ्ठल कानडी आहे, हे मान्य करायला हरकत नसावी.
विठोबा कुणाचा ?
आतापर्यंत केलेल्या उहापोहातून विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न कुणी व कसा केला, याचा अंदाज आपणास आला असेलच. तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच की, विठोबा मुळातील कुणाचा आहे ? शैव, वैष्णव, बौद्ध, जैन या पंथ-संप्रदायानी त्यांच्यावर आपला हक्क सांगितला होता. आता तर तो वैष्णव मानला जातो. पण वैदिकांनीही तो आपलाच आहे, असा हेका चालवला आहे. वारकरी संप्रदायातील एक विद्वान–सोनोपंत दांडेकर यांनी ‘हा पंथ पूर्ण वैदिक आहे, किंबहुना सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे, असं म्हटलं तरी चालेल. या पंथास भागवत धर्म ही म्हणतात. कारण यांचं उपास्य दैवत हे श्रीकृष्णाचं बाळस्वरूप समजलं जातं’, असं म्हटलं आहे. दांडेकरांचं हे म्हणणं ऐतिहासिकदृष्टया खरं नाही. कारण विठोबाचा उल्लेख वैदिक साहित्यात कुठेही सापडत नाही. तसंच कृष्ण हा वैदिकांच्या विरोधात होता, हे स्पष्ट आहे…… महानुभाव संप्रदायाच्या लीळाचरित्रात ‘विठ्ठलवीरु कथन’ या लीळेत विठ्ठल हा मूळचा चोर होता व गोरक्षकांकडून मारला गेला. त्याच्या मुलांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ भडखंबा म्हणजे स्मारकशिळा उभारली, अशी कथा आहे. गावातील गुराढोरांच्या रक्षकांच्या अशा स्मारकांना कर्नाटकात ‘वीरगळ’ असं म्हणतात. महानुभावांनी गोरक्षकाला चोर ठरवण्यामागे त्यांची द्वेषबुद्धी होती. होयसळ राजा विष्णूवर्धन विट्टीदेव किंवा बिट्टीदेव याने बाराव्या शतकात पंढरपूरचं देऊळ बांधलं असावं, असं ग. ह. खरे यांनी म्हटलं व विठ्ठल हे नाव त्याच्या नावावरून पडलं असावं, असंही ते म्हणतात.
विठ्ठल हा गवळी – धनगरांपैकी कुणीतरी गोरक्षणासाठी मृत्यू पावलेला वीर होता व त्याला पुढे विष्णूरुप प्राप्त् झालं, असं डॉ. जी. ए. दलरी, डॉ. ग्युंथर सोनथायमर, डॉ. शं. गो. तुळमुळे, डॉ. माणिकराव धनपलवार या विठ्ठलाभ्यासकांचं मत आहे.
डॉ. दुर्गा भागवत यांनी १९५६ मध्ये ‘लोकसाहित्याची रुपरेषा’ या ग्रंथात विठ्ठल गोपजनांचा म्हणजे गवळ्यांचा देव होय, हे मत पहिल्यांदा मांडलं. त्याच दिशेने दलरी, सोनथायमर तसंच डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधन कार्य केलं. पण या मताला छेद देणारा निष्कर्ष नीरज साळुंखे यांनी काढला आहे. आपल्या ‘दैत्यबळी व कुंतलदेश महाराष्ट्र’ या शोधग्रंथात (पृ. १५७) ते म्हणतात ‘इ. १३११ च्या पंढरपूर शिलालेखात, श्री विठ्ठलदेव रवलदेवमूर्ती….. परिवंडे सेवकु विठ्ठल देवा क्षेत्रपति असा उल्लेख आहे’ यावरून क्षत्रिय हे त्यांचे सेवक होते, असं दिसतं. जातीधर्माच्या भिंती ओलांडून विठोबाने साऱ्यांना कवेत घेतलं आहे. असा हा देव साऱ्यांचाच आहे, असंच आता म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे शैव व वैष्णव हा सांप्रादायिक संघर्ष संपवल्याचं ते एक प्रतीक आहे. म्हणूनच त्याला एक महासमन्वय म्हणून समजायला हरकत नाही.
( डॉ.अशोक राणा,यवतमाळ यांच्या ‘दैवतांची गोष्ट’ या आगामी पुस्तकामधून )