मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे, हे साऱ्यांनीच मान्य केले आहे असे दिसून येते.
विवाहकार्यात गणपतीला किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपणास माहित आहेच. गणपतीच्या लग्नकार्यातील महत्त्वाची जाणीव आपल्या मनात इतकी घट्ट आहे की, खुद्द गणरायांच्या मात्या-पित्यांच्या, शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगीही पहिल्यांदा गणपतीचे पूजन केले गेले असावे, असे वाटायला लागते. यात गंमतीचा भाग वाटत असला तरी आठव्या शतकात तयार झालेल्या वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवपार्वती विवाहाचे शिल्प ज्यांनी पाहिले असेल, त्यांना शिवपार्वतीच्या मधोमध वरच्या भागाला गणपतीची मूर्ती दिसेल. याठिकाणी गणपती शिव-पार्वतीचा पुत्र, मग तो आपल्या माता-पित्यांच्या विवाहप्रसंगी कसा उपसिथत राहील ? असा प्रश्न शिल्पकाराच्या मनात आलाही नसेल. गणपतीचा अग्रपूजेचा मान व मंगलकार्यारंभी त्याची उपस्थिती आवश्यक असलीच पाहिजे ही धारणा जनमानसात घट्टपणे रूजल्यामुळे शिल्पकारांनीही तसे केले असावे. असा हा लोकांचा लाडका गणपती केव्हा अस्तित्वात आला असावा हा प्रश्न विद्वानांच्या मनात वर्षानुवर्षे रुंजी घालत आहे.
गणपतीचा उगम केव्हा झाला?
एखाद्या नदीच्या उगमाचा शोध लावता येतो ; पण एखाद्या देवतेचाही उगम केव्हा झाला हे सांगता येईल काय ? विशेष करून सर्वांनाच अग्रभागी पूज्यस्थानी असलेल्या गणरायाची – गजाननाची निर्मिती कोणत्या काळात झाली असावी ? गजाननाच्या भाविक भक्तांच्या मनात असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्यांना तर तो सृष्टीनिर्माता, जगत्पालक व कर्ताधर्ता वाटतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ पाहू नये म्हणतात ना, तसे आपल्या आराध्य देवतेचे मूळही पाहू नये असेच ते म्हणतील. पण आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे प्राप्त झालेल्या चिकीत्सकवृत्तीच्या माणसाला मात्र गणपती या देवतेचे मूळ कशात आहे,असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. रोज जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे, कोणकोणते नवे शोध लागत आहेत ; याविषयीची माहिती दूरदर्शन, इंटरनेट, सायबरस्पेस या संगणककेंद्रित प्रसार माध्यमांबरोबरच भ्रमणध्वनी, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादी माध्यमांच्याद्वारा आपणास मिळत आहे. म्हणूनच आजच्या युगाला ‘माहितीचा स्फोट’ असलेले युग म्हटले जाते. अल्वीन टॉफलर या जगविख्यात लेखकाने आपल्या ‘फ्युचर शॉक’ या शोधग्रंथात लिहिले आहेच की, आपली इच्छा असा वा नसो, इलेक्टॉनिक माध्यमांच्याद्वारे तुमच्या डोक्यात माहिती आढळून पडेल. अशा माहितीमुळे आपल्या जुन्या धारणांना हादरे बसतील. अशा धक्क्यांनीच पुढील पिढी अधिक सुजाण बनणार आहे. मारिया मॉन्तेस्सोरी या बालशिक्षण तज्ञ महिलेने तर आपण गर्भाबाहेर पडल्याबरोबर अनेक धक्क्यांना सामोरे जात असतो व शिकत असतो असे म्हटलेले आहे. विसाव्या शतकाने अखिल मानवजातीला दिलेली नवनव्या माहितीची देणगी एकविसाव्या शतकाचा वारसा म्हणून मिळणार व म्हणूनच तिच्यानुसार आपली मानसिकताही बदलावी अशी अपेक्षा केली जाईल. या पार्श्वभूमीवर गणपती या देवतेचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या पारंपरिक धारणांना धक्के बसल्यास आपण भांबावून जाता कामा नये. अशीच एक माहिती म्हणजे,गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेल्या गणपती देवतेचा उगम केव्हा, म्हणजे कोणत्या काळात झाला असावा ही आहे.
गजाननाचा उगम गुप्तकाळात!
भारत व भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात व त्यांची मोठया भक्तिभावाने पूजा केली जाते,त्या गजमुख गणपती मूर्तीचा पहिल्यांदा आढळ होतो तो गुप्त काळात. गणेशोत्सवात तसेच दैनंदिन पूजा-पाठात ज्या गणेशाची आपण सर्व मोठया भक्तिभावाने पूजा-अर्चा व आरती करीत असतो, तो गणराज गजानन केवळ दीड हजार वर्षापेक्षा जुना नाही असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधकांनी शोधलेली ही धक्कादायक माहिती खरोखरच खरी आहे. विशेष म्हणजे ऐतिहसिक पुराव्यांच्या आधारे हे सत्य जनतेपुढे पहिल्यांदा मांडले ते, दिवं.रामकृष्ण भांडारकरांनी. नंतर त्यावर विद्वानांमध्ये खूप वादविवाद झालेत. या साऱ्या वादांचा परामर्श घेत डॉ.वा.वि. मिराशी यांनी ‘संशोधन मुक्तावली : सर पाचवा या विदर्भ संशोधन मंडाळाच्या वार्षिकात आपले मत ठामपणे मांडले. ‘ या शतकाच्या पूर्वार्धात (१९१३मध्ये) डॉ.भांडारकरांचा ‘ वैष्णव व शैव पंथ आणि इतर गौण धर्मसंप्रदाय ‘ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी ख्रिस्तोत्तर’ पाचव्या शतकाची अखेर व आठव्या शतकाची अखेर या दोन मर्यादांमधील काळात गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी असा निष्कर्ष नोंदविला आहे.
गुप्तकालातील एकाही कोरीच लेखात गणपतीचा उल्लेख नाही किंवा त्याला दिलेल्या दानाचा उल्लेख नाही. यावरून त्यांनी आपले वरील मत मांडले आहे. त्याचबरोबर ‘कालिदासाच्या एकाही ग्रंथामध्ये गणपतीचा उल्लेख नाही’,असे ते म्हणतात. कालिदासाच्या काळात गणपतीपूजन प्रचलित नव्हते असे संशोधकांचे मत आहे. कालिदास हा द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयास होता हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे डॉ.मिराशी यांनी आपल्या ‘कालिदास’ या शोधग्रंथात सिद्ध केले आहे. ‘चंद्रगुप्त सुमारे इ.स.३८०ते ४१३ या काळात होऊन गेला. साधारणपणे इ.स.४००च्या सुमारास कलिदास झाला. गजाननाची उपासना इ.स.४५० ते ५००च्या काळात प्रचलित झाली असावी. त्यामुळे कालिदासाने आपल्या ग्रंथात गजाननाचा साधा उल्लेखही न करणे स्वाभाविक आहे,” असे डॉ.मिराशी म्हणतात. नोव्हेंबर १९६३ व फेब्रुवारी १९६४ या वाई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकाच्या अंकांमध्ये अ. ज. करंदीकर व द. धों. वझे यांनी ‘गुप्तकाळात गजाननाची उपासना प्रचलीत होती काय? या विषयावर विचारमंथन करणारे लेख लिहिलेत. त्यांचा मुद्देसूद समाचार घेताना डॉ. मिराशी यांनी आपली रोखठोक मते मांडली आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये व कोरीव लेखात गजाननाचा उल्लेख नाही. पण गुप्तकाळातील एका गुहेत गजनानाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे गजाननाची उपासना गुप्तकाळापासून सुरू झाली असावी व त्यामुळेच सध्या प्रचलित असलेल्या गजमुख गणपतीचा उगम गुप्तकाळात झाला असावा हे सिद्ध होते.
पहिली गजानन मूर्ती:
मध्यप्रदेशातील विदिशा जिल्हयातील उदयगिरी (प्राचीन नीचैगिरी) टेकडीतील सहा नंबरच्या गुहेत गजाननाची पहिली–वहिली मूर्ती कोरलेली आहे. विदिशेच्या वायव्येस चार कि. मी. अंतरावर असलेल्या उदयगिरी येथे सुमारे वीस मानवनिर्मित गुहा आहेत. या इ. स. पाचव्या शतकातील असाव्यात असे संशोधकांचे मत आहे. यापैकी गुहा क्र. ६ मध्ये द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळातील इ.स. ४०१चा कोरीव लेख आहे, पण या लेखात गजाननाचा उल्लेख नाही. याचा अर्थ तोपर्यंत गजाननाची उपासना प्रचलित नव्हती. अर्थात गुप्तकाळाच्या उत्तरार्धात ती सुरू झाली असावी असेही ते म्हणतात. गुप्तकालाच्या पूर्वार्धात शैव संप्रदायामध्ये गणपतीचा अंतर्भाव झाला नसावा, या आपल्या मताच्या पुष्टयर्थ त्यांनी काही पुरावे दिले आहेत. तें म्हणतात, “ प्राचीन काळच्या गुहात व देवळात सात किंवा आठ मातृकांच्या मूर्ती आढळतात. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐंन्द्री, वाराही, नारसिंही आणि चामुंडा अशी त्या आठींची नावे आहेत. या मातृकांजवळ आरंभीच्या शिल्पपट्टात कार्तिकेयाची मूर्ती आढळते. पुढे गणतीची उपासना प्रचारात आल्यावर कार्तिकेय किंवा वीरभद्र यांच्याबरोबर गणपतीचीही मूर्ती कोरण्याचा प्रघात पडला.
गुप्तकालीन कोरीव लेखात मातृकांबरोबर स्कन्द कार्तिकेयाचाच उल्लेख आढळतो, पण गणपतीचा आढळत नाही. गणपतीची पूजा पार्वतीचा पुत्र म्हणून गुप्तकालात प्रचारात आली असती, तर मात्र कोरीव लेखात त्याचाही उल्लेख झाला असता. बसाढ (प्राचीन वैशाली) येथे गुप्तकालीन अनेक मुद्रा सापडल्या आहेत, पण त्यापैकी एकीवरही गजाननाचे चित्र किंवा आकृती नाही. पण गुप्तकालाच्या अखेरीस गणपतीची उपासना प्रचारात आली असावी. याचबरोबर गजाननाच्या रेखीव मूर्ती तयार करणे सुरू झाले असावे. गुप्तकालीन प्राचीन देवालय भूमरा येथे अशी एक मूर्ती सापडली आहे. नागोद संस्थानातील उचहरा किंवा उन्चरा नगराच्या पश्चिमेस हे गाव आहे.
सन १९२० मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी या ठिकाणी उत्खनन करून या मूर्तीचा शोध लावला. या गजानन मूर्तीला छोटे अधोवस्त्र असून ती जाडजूड आसनावर बसलेली असल्याचे दिसते. उंदीर हे गजाननाचे मात्र या मूर्तीत नाही. याचा अर्थ या काळापर्यंत तरी उंदीर गजाननाचे वाहन आहे ही धारणा प्रचलित नसावी. गजाननाने पायात पैंजण, बाहूत अंगद आणि हातात कंकण धारण केले आहे. त्यांच्या गळयात कंठी आणि पोटावर उदरबंध आहे. शिवाय त्याने निष्काचा हारही यज्ञोपवितासारखा घातला आहे. डोक्यावर रत्नजडित मुकूट आणि मस्तकामागे प्रभावलय आहे. त्याचा एक दात दाखविला आहे. दोन्ही हात भंग झाल्यामुळे त्या त्या हातांमध्ये काय धारण केले होते हे कळायला मार्ग नाही.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या वराहमिहिर या ज्योतिर्विदाने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी हे सांगितले आहे ते असे –
प्रमथाधिपो गजमुख: प्रलम्बजठर: कुठारधारी स्यात् ।
एकविषाणो बिभ्रन्मूलककन्दं सुनीलदलकन्दम् ॥
(बृ.सं.अ. 58)
गणपती हा प्रमथांचा अधिपती, गजमुख, लम्बोदर, कुठार धारण करणारा, एकदन्त, मूलककन्द व सुनीलदलकन्द धारण करणारा असावा. सध्याच्या गणपती या वर्णनाबरहुकूम आहे असे दिसते. भूमरा येथील मूर्तीही सध्याच्या गजानन मूर्तीशी साधर्म्य साधणारी आहे. यानंतर गजवदन गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती तयार झाल्यात व गणपती उपासक व्यापाऱ्यांनी व परदेशी गेलेल्या प्रवाशांनी त्या देशोदेशी पोहचविल्या. त्यामुळेच भारताबाहेरही गणपतीच्या मूर्ती सापडतात. गुप्तकाळामध्ये तिबेट, चीन, जपान, कोरिया इत्यादि पूर्व आशिया खंडात गणपतीची पूजा सुरू झाली.
गणपतीचे प्राचीनत्व(?)
इतिहास संशोधकांनी जरी अनेक पुराव्यांच्या आधारे गुप्तकाळाचा उत्तरार्ध हा गजवदन गणपतीचा काळ ठरविला असला तरी गणपतिविषयक लिखाण करणारे बहुतांश लेखक ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. वेळोवेळी गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमध्ये गणपतीची उपासना वेदकाळापासून सुरू होती,असा आवर्जून उल्लेख ते करतात. श्रद्धेने ओथंबलेल्या अशा लिखाणांमध्ये सृष्टीच्या प्रारंभापासून गणपतीचे अस्तित्व असल्याचेही ठोकून दिले जाते. प्रणवरूप ॐकार हाच परमेश्वराचा हुंकार आहे व तेच गणपतीचे निराकार रूप होय असे सांगून अनेक काव्यात्मक प्रतिकेही उदाहरणादाखल वापरली जातात. याचबरोबर गणपती ही अनार्याची नव्हे, तर आर्यांचीच देवता आहे,कारण ऋग्वेदापासून तो पुराणापर्यंतच्या आर्यग्रंथांमध्ये तिचे उल्लेख आढळतात असे युक्तिवाद केले जातात. या साऱ्या युक्तिवादांचे आधार व त्या आधारावर जोपासलेले भ्रम किती तकलादू आहेत, हे वस्तुनिष्ठ चिकित्सेनंतर स्पष्ट होते. गणपती या शब्दाचा उगम व गजवदन गणपतीचा त्याच्याशी असलेला संबंध या विषयाची जाण असलेला कुणीही अभ्यासक असे भ्रम जोपासणार नाही हे ही तितकेच खरे. म्हणून पहिल्यांदा वैदिक वाङ्मयातील गणपतीचे उल्लेख कोणत्या संदर्भात आलेले आहेत ते पाहूया.
वैदिक वाङ्मयातील गणपती
ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन सुसंबद्ध ग्रंथ मानला जातो. ऋग्वेदांच्या दुसऱ्या मंडलामध्ये गणपतीला आवाहन करणारी ऋचा आली आहे, ती अशी –
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्न्तिभिं: सीद सादनम् ।
( हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस. कविंचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस. यज्ञस्थळी येऊन आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो.)
वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थातच गणपती असे संबोधले आहे. या ऋचेचा आधार घेऊनच अनेकांनी गणपती हा ऋग्वेदकालीही पूजनीय होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ मानला जातो. अशा ऋग्वेदाच्या आरंभीच्या ऋचांमध्ये गणपतीचे आवाहन आल्यामुळे गणपतीच्या प्राचीनत्वाला अधिकच दुजोरा मिळाला आहे,असे प्रथमदर्शनी वाटते. पण येथे गणपती म्हणून ज्या देवतेला संबोधले आहे, ती देवता आहे ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती हे बृहस्पतीचेच एक नाव आहे. बृहस्पती गणसंस्थेचा पुरस्कर्ता व प्रख्यात लोकायत दर्शनाचा कर्ता होय. म्हणूनच चार्वाक अर्थात लोकायत दर्शनाला ‘ बार्हस्पत्य मत ’ असेही म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांच्या हिताचा विचार प्रामुख्याने करणारा समूह. असे समूह आपले निर्णय परस्पर सामंजस्याने घेत व एकोप्याने राहत. अशा समूहांना गण ही संज्ञा होती. गणसंस्था ही अतिलोकशाहीवादी व्यवस्था होती हे जगातील बहुतांश समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. ‘लोकायत’ या संशोधन ग्रंथांचे कर्ते देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी ‘सर्वदर्शन संग्रह’ या माधवाचार्यांच्या ग्रंथाच्या आधारे हे सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथावर आधारित ‘लोकायत’ या आपल्या ग्रंथामध्येही डॉ.स.रा.गाडगीळ यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आहे. ‘गणपती देवता’ या लेखामध्ये लो.बा.अणे यांनी गणसंस्थेवर विस्तृतपणे लिहिले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनीही त्यांच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती संवर्धन: ऐतिहासिक रूपरेषा’ या ग्रंथात गणसंस्थेला ‘प्राथमिक साम्यवादी समाज’ म्हणून संबोधले आहे. अशा गणांनाच व्रात, संघ, पूग इत्यादी संज्ञा होत्या. वैदिकांचे यज्ञयागादि कर्मकांड नाकारून व्रते करणारे ते व्रात्य व त्यांचा समुदाय म्हणजे व्रात होत असे एक मत आहे. परंतु व्रात्य हा शब्द कष्ट करणारे या अर्थाचा आहे,हे मनुस्मृतीतील उल्लेखावरून कळते. अशा समाजाला वैदिकांनी संस्कारच्युत, सावित्रीपतित या शब्दांनी संबोधले आहे. वैदिक आर्यांमधील संस्कारहीनांनाही ‘व्रात्य’ म्हणून प्राचीन काळी हिणविले जायचे. त्यांना स्वीकारायचे असेल तर,‘व्रात्यस्तोम’ या विधीने व्रात्यांना आर्यसंघात प्रवेश दिला जाई. अशारितीने आर्यसंघात प्रवेश घेणारा ‘गृत्समद’ हा पहिला अनार्य विद्वान. हा गृत्समद ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता आहे. अशारितीने ऋग्वेदाचा पहिला रचयिता गृत्समद गणसंस्थेचा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याने आपल्या जमातीच्या प्रमुखाला म्हणजेच गणाच्या अधिपतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने ‘गणपती’ हा शब्द वापरला. असा या शब्दाचा खरा इतिहास आहे.
गणपती स्तुती व निंदा:
गणसमाजातील बरेच विद्वान व प्रतिष्ठित लोक तडजोडी करून आर्य समाजातील सदस्यत्व मिळवीत असत. त्यांच्यापैकी अनेकांनी वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीतही सहभाग घेतला आहे. ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडलातील ऋचांमध्ये (ऋ. ६-५६-५,५-४४-१२) गणांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. अथर्ववेदात व वाजसनेयी संहितेत, गण, व्रात, संघ, पूग या संज्ञांचे सन्मानाने उल्लेख आलेले आढळतात. वैदिक आर्यांना गणसंस्थेबद्दल फारसा आदर नसला तरी त्यांच्या प्रभावाची जाण होती. त्यामुळे गण व गणपतीचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. पण हा गौरव वैदिक समाजात समाविष्ट झालेल्या गणसमाजातील अनार्य ऋषींनी केलेला आहे, हे अधिक तपशिलात गेल्यावर दिसून येते. या गौरवामागे गण-व्रातांचे वाढते वैभवही कारणीभूत असावे. पुढे हे वैभव लुप्त झाल्यावर मात्र ब्राह्मण स्मृतीकारांनी गण व गणपतीची निंदा सुरू केली आहे. गणसंस्थेच्या विघटनानंतर राज्यसंस्था उदयास आली. लोकशाही व्यवस्थेविरूद्ध राजेशाही प्रस्थापित झाली. ही वर्गीय व्यवस्था ब्राह्मण स्मृतीकारांना प्रतिष्ठा देणारी होती. त्यामुळे तिचे गोडवे गाणे व गणसंस्थेची निंदा करणे त्यांना सोयीचे वाटू लागले. पण पुढे गणसंस्थेचा जनमानसात प्रभाव असल्याचे ध्यानात आल्यावर पुराणिकांनी गण व गणपतीची स्तुती करणे सुरू केले. पुराणनिर्मितीत शूद्रांमधील सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव इत्यादी जमातींचा बराच मोठा वाटा आहे. त्यामुळेच कदाचित पूर्वकालीन वैदिक अनार्यांप्रमाणे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणे स्वाभाविक आहे.
वेदांच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांमध्ये ‘गणपती’चा स्वतंत्र देवता म्हणून कुठेही उल्लेख नाही. गुप्तकाळामध्ये निर्माण झालेल्या ‘गणपती अथर्वशीर्ष’ या उपनिषदात गणपतीचे स्तवन आहे. वायुपुराणात शिवाला ‘लंबोदर’ गजेंन्र्दकर्ण अशा विशसेषणांनी संबोधले आहे. गणपतीचा शिवपुत्र म्हणून पुढे जो उल्लेख येतो, त्याचे मूळ या ठिकाणी सापडते. मराठी विश्वकोश , खंड 4 मध्ये हा संदर्भ देऊन म्हटले आहे की, “ रूद्र-शिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतीच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच, आर्यांनी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत ; हेही इ. स. पूर्व काळात गजानन हा देव आर्यपरंपरेत समाविष्ट झाला नव्हता याचेच सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानानप्रमाणेच ग्रामदेवता असावी.”
मूषकवाहन गणपतीचा अर्थ:
गणपतीच्या पायाशी उंदराची प्रतिमा आवर्जून आढळते. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे स्पष्ट म्हटले जाते, जुन्या मूर्त्यांमध्येही उंदरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मूर्त्या आढळतात. ग्रंथांमध्ये मूषकध्वज उंदरावर बसून चालत असलेल्या गणपतीची वर्णने आढळतात. ती वाचून किंवा तशा मूर्त्या पाहून विचार करणाऱ्या सामान्य माणसालाही प्रश्न पडतो की, आपल्या पायापेक्षाही छोटया आकारमानाच्या उंदरावर गणपती बसलाच कसा असेल ? पुराणाचे श्रोते सामान्य माणसेच होती. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला साजेशी उत्तरे पुराणकारांनी दिली आहेत. आजही जेव्हा समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत,तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो. अशावेळी प्रतिकात्मक उंदराची काव्यात्मक उत्तरे देऊन तथाकथित विद्वान त्याला अधिकच संभ्रमात टाकतात. त्या साऱ्या उत्तरांचा येथे उल्लेख करीत नाही. पण संशोधनाने प्राप्त झालेली माहितीच पुढे वाचकांपुढे मांडत आहे.
गणसंस्था ही आदिम समाजरचना होती. आदिमांच्या समाजात टोळयांची विशिष्ट चिन्हे असतात. त्याला कुलचिन्ह (Totern) म्हणतात. ‘टॉटेम ॲनड टॅब्युज ’ या आपल्या शोधग्रंथात सिमंड फ्राईडने या कुलचिन्हांच्या निर्मितीमागील मानसशास्त्रीय कारणे दिलेली आहेत. जगभरातल्या आदिम समाजात अशी चिन्हे होती. ती पशुपक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. आजही राजकीय पक्ष आपले चिन्ह मोठया दिमाखाने मिरवतात. तशी या आदिम जमातींमध्ये आपले चिन्ह समारंभप्रसंगी मिरवण्याची रीत होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्हे होती. यापैकी “ गजानुयायी लोक हत्तीचे रूपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशारितीने आपले गजानुयायित्व लोकसमोर प्रगट करीत असे मला वाटले ” हे लो. अणे यांनी आपल्या ‘गणपतिदेवता’ या शोधनिबंधात नमूद केले आहे. डॉ.स.रा.गाडगीळांनी याविषयी विस्ताराने माहिती देऊन मातंग वंशाची सत्ता बुद्धकालात उत्तर भारतावर होती असे म्हटले आहे. मातंग म्हणजेच हत्ती व आपल्या हत्ती या कुलचिन्हाने हा गण ओळखला जायचा. ते याबद्दल लिहितात-
“ खारवेलच्या राणीने स्वत:चे वर्णन हस्तिसह अथवा हस्तिसिंह यांची कन्या असे केले आहे. हस्तिगुंफा लेण्यातील शिलालेख अद्यापि पूर्णपणे वाचता आलेला नाही. पण डॉ.जयस्वाल यांनी या लेखातील एक ओळ लाविली आहे. तिचा आशय असा- “ खारवेलच्या राजाने मूषिकांचा पराभव करून मूषिकांच्या राजधानीचा नाश केला ”. हस्तिगुंफा लेणे, हस्तिवंशातील राजा आणि मूषकांचा पराभव या घटना एकत्र घेतल्यास आजच्या गणपतीचे वाहन जो ‘मूषक’ त्याचेही रहस्य उलगडते. दुसऱ्या एका गणाचे टॉटेम ‘मूषक’ हे होते. या गणाचा हत्ती या गणाने पराभव केला व राज्यसत्ता स्थापन केली. साहजिकच जित लोकांचे टॉटेम जेत्यांच्या टॉटेमचे वाहन बनले. ही केवळ कल्पना नव्हे. महाभारतात मूषक लोकांचे वर्णन आहे. ॲलेक्झांडरबरोबर आलेल्या ग्रीक लेखकांनी ज्यांचे वर्णन केले आहे ते लोक जर मूषक असतील तर त्यांच्या सामूहिक गण जीवनाचे उद्बोधक वर्णन आपणास वाचावयास मिळते. विंध्यप्रवर्ताच्या प्रदेशात मूषक लोक असल्याचा उल्लेख पुराणांतररी आढळतो. तेव्हा गुप्तकालीन गणपतींनी मूषकगणाला पराभूत करून राज्यसत्ता प्रस्थापित केल्याचा निश्चित पुरावा आज जरी उपलब्ध नसला, तरी हस्तिगण, मूषकगण एकेवेळी भारतात होते, कोणीतरी हस्तीगणाने मूषकगणाचा पराभव केला; इतकी माहिती शिलालेखाच्या आधारे निश्चितच मिळते. हस्तिमुखाच्या गणपतीने मूषक हे आपले वाहन बनवावे या घटनेमागे वरील हस्ति-मूषक संघर्षच असावा आणि त्या संघर्षात हस्तिगण विजयी झाला असावा एवढे अनुमान काढावयास हरकत नाही.” डॉ. गाडगीळांचा हा निष्कर्ष पाहता गजाननाच्या मूषकवाहनाचा अर्थ स्पष्ट होतो.
सरते शेवटी:
गेल्या दीड हजार वर्षापूर्वी दैवतरूपात पूजनीय ठरलेल्या गजमुख गणपतीचे महात्म्य वर्णन करणारी गणेश पुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी रचली आहेत, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार विघ्नहरण करणाऱ्या गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इ.स.पाचवे ते नववे शतक या दरम्यान ‘ गाणपत्य संप्रदाय ’ उदयास आला व प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनीही गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते असे उल्लेख प्राचीन वाङ्मयात सापडतात. वामा म्हणजे स्त्री. वामाचारी म्हण्जे स्त्रीसंबंधाला व विशेषत: स्वैरसंबंधाला प्राधान्य देणारे. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथुन इत्यादी आचारांना पूजेचे अंग मानले आहे. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोचलेल्या काही ब्राह्मण जहागिरदार व सरदारांमध्ये वाममार्गी ‘गणेशतंत्र’ चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसते. पेशव्यांचे दैवत गणपती होते,त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची अष्टविनायकांमध्ये गणना झाली.
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव अधिक प्रमाणात प्रसारित केल्यामुळे गणपती अधिक मोठया जनसमुदायापर्यंत पोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्यावेळी झाला. आज गणांचा अधिपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधी-कधी गंमतीचा विषयही बनविले जाते. अशीच एक गंमत २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्धरितीने पार पाडला गेला. एस.टी.डी. पी.सी.ओ. टेलिफोन केंद्राचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही याकामी सर्रासपणे वापरली गेलीत. गेली दीड हजार वर्षे ज्या गणपतीला दुर्वा व मोदकांवर समाधान मानावे लागले, त्या बिचाऱ्याला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थांची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या तथाकथित दैवी चमत्कारामागे आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली.
गणपती देवतेच्या उगमापासून तो तिच्या विकासाची अशी ही चिकीत्सा. खरे तर हा एखाद्या शोधप्रबंधाचाच विषय ठरावा. पण लेखाच्या आवाक्याबाहेरचा तपशील याठिकाणी टाकता येणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे अधिक विश्लेषणालाही फार वाव नव्हता. हे लक्षात घेऊन वाचकांनी आपल्या शंका निरसनासाठी सारे सदंर्भ मुळातूनच पहावेत हे येथे सुचवावेसे वाटते.
-डॉ.अशोक राणा, यवतमाळ.
संदर्भ :
१) ऋग्वेदाचे मराठी भाषांतर -म. म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव.
२) गणपतिदेवता, “अक्षरमाधव’ मधील लेख – लो. बापूजी अणे.
३) लोकायत – डॉ. स. रा. गाडगीळ,लोकवाङ्मगृह,मुंबई
४) लोकदैवतांचे विश्व – डॉ. रा. चिं. ढेरे
खूप महात्वाची माहिती आहे. अनेक शंकाची उतरे मिळाली