मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

२०१३ पासून वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे १९ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. हे मंडळ म्हणजे महाराजांनी बडोद्यात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचे एकत्रीकरण होते. विशेष म्हणजे यशवंतरावांनी या मंडळातर्फे १९६२ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाने करावे असा निर्णय घेतला. या निर्णयाची पार्श्वभूमी म्हणजे १९६३ हे सयाजीरावांचे जन्मशताब्दी वर्ष होते.

मराठी साहित्याच्या दृष्टीने विचार करता १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे प्रकाशन महाराज सयाजीरावांनी केले होते. विशेष म्हणजे ही सर्व पुस्तके इतिहास, धर्म, तत्वज्ञान, कला, संस्कृती, विज्ञान अशा माहिती आणि ज्ञानकेंद्री प्रकारातील होती. सयाजीरावांनी १३४ वर्षापूर्वी जेवढे विषय ग्रंथप्रकाशनासाठी हाताळले तेवढे आजअखेर मराठी प्रकाशनाच्या इतिहासात हाताळले गेले नाहीत. म्हणूनच मराठीतील एक महत्वाचे प्रकाशक बाबा भांड म्हणतात, “सयाजीराव महाराजांएवढा मोठा प्रकाशक गेल्या शतकात झाला नाही.” पाककला, लोकसाहित्य, व्यायाम, कृषी, भाषाशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, संशोधन, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, प्रवासलेखन, कोश वाड:मय, सहकार यासह अनेक विषयांवरील माहिती आणि ज्ञान केंद्रस्थानी ठेवून मराठीतील पहिला ग्रंथ निर्मितीचा मान ज्यांना जातो ते महाराज सयाजीराव गायकवाड मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे आजवरचे सर्वात मोठे पाठीराखे होते. महाराष्ट्राने विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे ते बडोदा या गुजरात भाषिक संस्थानचे राजे होते.

महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ७ साहित्य संमेलनांत अध्यक्ष म्हणून केलेली भाषणे त्यांची साहित्यविषयक समज, सर्वसमावेशक दृष्टी आणि वैश्विक भान याची साक्ष देतात. या ७ संमेलनांमध्ये ४ मराठी व गुजराती, संस्कृत आणि हिंदी अशा प्रत्येकी १ भाषिक संमेलनांचा समावेश होतो. १८७८ पासून मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवण्यास सुरुवात झाली. १९०९ पर्यंत या संमेलनांस ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’असे नाव होते. १९०९ मध्ये बडोद्यात झालेल्या संमेलनावेळी हे नाव बदलून ‘मराठी साहित्य संमेलन’ असे व्यापक नामाभिधान देण्यात आले. मुंबई येथील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक के.आर. किर्तीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे किर्तीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते. बसता-उठता पुरोगामित्वाचे ढोल वाजवणाऱ्या आणि ब्राह्मणेतर चळवळीची ‘पंढरी’ असणाऱ्या महाराष्ट्राला हा इतिहास ‘नवा’ आहे. म्हणूनच महाराष्ट्राने आपला पुरोगामित्वाचा ‘डी.एन.ए.’ बडोद्याच्या ‘सयाजी लॅबोरेटरी’मध्ये तातडीने तपासून घेणे आरोग्यदायी ठरेल.

मराठा जातीतील दामोदर सावळाराम यंदे हे मराठी भाषेतील पहिले सर्वात मोठे प्रकाशक होते. मराठीला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारे अत्यंत मौलिक ग्रंथ यंदे यांनी महाराजांच्या आश्रयाने बडोद्यातून प्रकाशित केले. त्यामुळे मराठी साहित्य,समाज आणि संस्कृतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ज्या प्रकाशकांचा मुख्य वाटा आहे त्यामध्ये यंदे हे सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रातील विद्वानांनाही ‘हे यंदे कोण?’ हा प्रश्न पडेल असे महाराष्ट्राचे आजचे ‘ज्ञानवास्तव’ आपल्या प्रबोधन परंपरेची पुनर्मांडणी करण्याची प्रेरणा देणारे ठरेल.

यंदेंमधील ‘प्रकाशक’ सयाजीभूमीत बहरण्यामागे मातृभाषा आणि मातृभूमीशी असणारे ‘जैविक’ नाते इमानदारीने जपणाऱ्या एका महान राजाची दूरदृष्टी होती. १९३४ च्या बडोदा येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनातील अधिवेशनाच्या प्रकाशन विभागाचे अध्यक्षस्थान भूषवताना यंदे म्हणतात, “माझ्या हातून जे अल्पस्वल्प प्रकाशनकार्य गेल्या ४० वर्षात झाले त्याचा उगम येथेच व आपल्या परमपूज्य महाराजांच्या कृपाछत्राखाली आणि सान्निध्यात झाला आहे.” सयाजीराव महाराजांनी संमेलनात प्रत्यक्ष भाग घेतानाच साहित्य प्रकाशनाच्या कार्याकरिता २ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी बाजूला काढून त्या रकमेच्या व्याजातून ग्रंथप्रकाशनाचे कार्य अव्याहत चालू ठेवले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७० कोटी रु. हून अधिक भरते. तेव्हापासून भाषांतरशाखा नियमितपणे काम करू लागली व तिच्यामार्फत ‘श्री सयाजी साहित्य माले’तून विविध विषयांवर पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली.

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व लक्षात घेवून सयाजीरावांनी कलाभवनात विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. परंतु सर्व अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करणे शक्य नसल्याने निरनिराळ्या शिक्षकांनी,अभ्यासकांनी व तज्ज्ञ गृहस्थांनी आपापल्या विषयावर सोपे आणि परिपूर्ण ग्रंथ लिहून परभाषेवरील अवलंबित्व दूर करण्याचे आवाहन सयाजीरावांनी केले. त्यानुसार प्रा.बा.प्र. मोडक यांनी १९३० च्या सुमारास ‘पदार्थविज्ञान’या मराठीत लिहिलेल्या पुस्तकात त्या काळापर्यंत पदार्थविज्ञान आणि संलग्न क्षेत्रात लागलेल्या शोधांची आणि झालेल्या प्रगतीची माहिती करून दिली. प्रा.मा.क.भाटवडेकर यांनी ‘वनस्पतीशास्त्र’ ग्रंथात वनस्पतीशास्त्रातील शोधांची सविस्तर माहिती दिली.

प्रा.मो.के. दामले यांनी ‘सृष्टीशास्त्र’ या पुस्तकामध्ये हवामान, ऋतू, वनस्पती, भाजीपाला यांचा मानवी जीवनाशी असणाऱ्या संबंधाची माहिती दिली. मा.धो.खांडेकर यांनी नीतिशतक, शृडगारशतक आणि वैराग्यशतक या तिन्ही संस्कृत रचनांचे मराठी भाषेत सार सांगणारा ‘नीतीकाव्यामृत’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. १९३३ मध्ये ‘नीतिशास्त्र प्रबोधन’ हा मूळ भारतीय नीतिमत्तेचे आणि भारतावर आक्रमण करीत असलेल्या पाश्चिमात्य नीतिमत्तेचे तुलनात्मक विवेचन करणारा ग्रंथ रचला. १९२० मध्ये बाळकृष्ण नाईक यांनी ‘बाळ धर्म’या ग्रंथात लहान मुला-मुलींना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचे आणि संस्काराचे महत्त्व सांगितले. गांधीवादाचा पुरस्कार करणार्‍या ‘यंत्रनी मर्यादाओ अने संहारक शक्ती’ या गुजराती ग्रंथाचे डॉ.ना.गो.जोशी यांनी मराठीत भाषांतर केले. यामध्ये ग्रामीण उद्योग आणि हस्तकला यांची माहिती दिली आहे.

१८८० मध्ये रियासतकार गो.स.सरदेसाई यांनी इंग्लंड, ग्रीस आणि हिंदुस्थान या तीन देशांच्या अर्वाचीन इतिहासावरील ग्रंथ लिहिले. तसेच ‘मराठी राजवट’या ग्रंथात पेशवेकालीन महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी राजवटींची चर्चा केली आहे. महाराजांबरोबर संपूर्ण भारत, इंग्लंड आणि युरोपातील देशांचा प्रवास घडला. यातूनच या देशांची परंपरा आणि इतिहास समजून घेण्याची अपूर्व संधी सरदेसाईंना मिळाली. त्याचबरोबर त्यांनी मॅक्यीव्हली यांचे ‘द प्रिन्स’आणि प्रो.खिली यांचे ‘एक्सपान्शन ऑफ इंग्लंड’ या पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर ‘सयाजी महाराज ग्रंथमाले’त प्रसिद्ध झाले. १९२० मध्ये जनरल नानासाहेब शिंदे यांनी भारताच्या इतिहासातील मोठ्या लढायांची रणनीती आणि शौर्याची माहिती ‘हिंदुस्तानचा लष्करी इतिहास आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा’ या पुस्तकात दिली आहे. हे मराठीतील पहिले व आजवरचे अशा प्रकारचे बहुधा एकमेव पुस्तक आहे.

जुम्मादादा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रो. माणिकराव यांनी व्यायाम मंदिर, शरीरशास्त्र, मालिश,संघव्यायाम ही महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली. १८०० शस्त्रांची सविस्तर माहिती देणारे ‘प्रतापशस्त्रागार’ हे त्यांचे पुस्तक खूपच महत्त्वपूर्ण आहे. बडोद्यातील दुसरे व्यायाम शास्त्रज्ञ आबासाहेब मुजुमदार यांनी ‘व्यायाम’ नावाचे सचित्र मराठी मासिक प्रकाशित केले. १९३६ ते१९४९ या कालावधीत आबासाहेब मुजुमदार यांनी ‘व्यायामकोश’हा अद्वितीय कोश दहा खंडात प्रसिद्ध केला. हा मराठीतील आणि बहुधा कोणत्याही भारतीय भाषेतील पहिला कोश आहे. महाराजांनी युरोप प्रवासानंतर पाकशास्त्र या विषयाच्या अभ्यासासाठी नामदेवराव रामचंद्रराव कदम यांना युरोपात पाठवले. परत येताच त्यांनी ‘भोजनदर्पण’ (१८९७) नावाचा पाकशास्त्रावरील समृद्ध ग्रंथ लिहिला.

सयाजीराव महाराजांनी मराठी साहित्याच्या आधुनिकीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले होते. अशा साहित्यमय झालेल्या बडोदा नगरीत अनेक साहित्यविषयक संस्था उदयास येत होत्या. याद्वारे अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य निर्माण होत होते. यातील एक मंडळ म्हणजे ‘महाराष्ट्र वाङ्मयमंडळ’ होय. या मंडळातील सभासद शोध, लेख,संवाद आणि ग्रंथप्रकाशन या मार्गांनी वाङ्मयसेवा करत होते. पदार्थशास्त्रातील विद्युत या विषयावरील शब्दकोश या मंडळातर्फे तयार करण्यात आला होता. श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोश तयार करत असल्याचे कळताच महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या २,००० रु. किमतीच्या प्रती सयाजीरावांनी विकत घेतल्या. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ५६ लाख ३४ हजार रु.हून अधिक भरते. तर आपल्या प्रजेची मातृभाषा गुजराती असल्यामुळे सयाजीरावांनी गुजराती ज्ञानकोशासाठी ५,००० रु.ची मदत केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी ३९ लाख रु.हून अधिक भरते. स्वतःची मातृभाषा आणि प्रजेची मातृभाषा यांना तेवढ्याच प्रेमाने जपणारा हा राजा खरोखरच महान होता.

सयाजीरावांनी ‘श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू’ हा आठ भाषेतील राज्यव्यवहारकोश तयार करून घेतला. रामजी संतूजी आवटे आणि यंदे यांनी १८८५ मध्ये ‘बडोदा वत्सल’ हे साप्ताहिक सुरू केले. पुढे १८९३ मध्ये दामोदर सावळाराम यंदे यांनी स्वतंत्रपणे ‘सयाजीविजय’ नावाचे मराठी साप्ताहिक सुरू केले. तर १९१६ मध्ये भगवंतराव पाळेकरांनी ‘जागृती’ हे मराठी वृत्तपत्र बडोद्यात सुरू केले. याबरोबरच बडोदा संस्थानात बडोदा गॅझेट, हिंदविजय, नवसारी प्रकाश, भारतमित्र इ. वर्तमानपत्रे विस्तारली होती. १८८५ पासून विविध कलाविस्तार, धनुष्य, विद्याकल्पतरू, रसिकविहार, कलाशिक्षण, धंदेशिक्षक या दैनिकांचा व मासिकांचा उदयास्त होत राहिला. बालांकुर, व्यायाम, सहविचार, ग्रामजीवन, शेती व सहकार इ. मान्यता पावलेली नियतकालिके बडोद्यात कार्यरत होती. गुजराती प्रांतात मराठी भाषेची इतकी विविधांगी सेवा महाराजांनी अखंडपणे केली.

भारतीय तसेच मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना सयाजीरावांनी कॅमेरा घेऊन दिला. दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीसंबंधीचे आवश्यक प्रशिक्षण बडोद्याच्या कलाभवनमध्येच घेतले. पुढे फाळकेंनी ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय बनावटीचा व मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित केला. न.चि. केळकर यांच्या सात नाटकांवरचा अभ्यासपूर्ण प्रबंध, प्रा.वि. पा. दांडेकर यांनी लिहिलेली ‘फेरफटका टेकडीवरून’, ‘काळ खेळतो आहे’, ‘एक पाऊल पुढे’ असे लघुनिबंध प्रकाशित झाले. कथा-कादंबरी, विनोदीकथा इ. प्रकारच्या लेखनाचे प्रयत्नही बडोद्यात झाले. विनोदीकथा लिहिणारे चि.वि.जोशी हे बडोद्याचे रहिवासी होते. ‘चिमणरावांचे चर्‍हाट’, ‘आणखी चिमणराव’, ‘एरंडाचे गुऱ्हाळ’हे त्यांचे प्रसिद्ध विनोदी कथासंग्रह आहेत. रा.भा.भांबुरकर यांनी ‘पंडितराव जगन्नाथ’ आणि ‘भामिनी’ ही दोन मराठी नाटके लिहिली.

१८९८ मध्ये सयाजीरावांनीआधुनिक काळातील फक्त मराठीतीलच नव्हे तर भारतीय भाषेतील केळूसकर लिखित पहिले बुद्ध चरित्र प्रसिद्ध केले. यानंतर महाराजांनी मॅक्स मुल्लरने भाषांतरीत केलेल्या ‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या मालेत प्रकाशित केलेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी केळूसकरांवर सोपवली. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेत्तर लेखक ठरतात. पुढे १९०६ मध्ये सयाजीरावांनी केळूसकरलिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्र ग्रंथास आर्थिक सहाय्य करतया ग्रंथाच्या २०० प्रती विकत घेतल्या.

श्रावणमास दक्षिणा निधीतून धर्मशास्त्रावरील उत्तम पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी वार्षिक १०,००० रुपये खर्च करण्याचा हुकूम दिला. याच रकमेतून दत्तकचंद्रिका, निर्णयसिंधु, विवादतांडव, संस्कारकौस्तुभ, दानचंद्रिका, आचारमयूरव यासारखे अनेक उत्कृष्ट ग्रंथ भाषांतरीत होऊन प्रकाशित झाले. श्री सयाजी साहित्यमाला,श्री सयाजी बालज्ञानमाला यासारख्या अनेक ग्रंथमाला महाराजांनी सुरू केल्या. श्री सयाजी मालेत ३७६ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. महाराजांनी श्रीसयाजीज्ञानमंजुषा, श्रीसयाजीलघुमंजुषा या शास्त्रीय विषयांवरील ग्रंथमाला सुरू केल्या. जुने खेळ नामशेष होऊ नयेत व पाश्चात्त्य खेळांची माहिती जनतेला मिळावी यासाठी क्रीडा ग्रंथमाला सुरू करण्यात आली. या ग्रंथमालेत कालेलकरलिखित ‘मराठी खेळांचे पुस्तक’ हा महत्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला. महाराजांनी कालेलकर यांना तुलनात्मक भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी पॅरिसला पाठवले. १९२८ मध्ये श्री सयाजी साहित्यमालेत ‘मुंबई इलाख्यातील जाती’ हे ‘TRIBES & CASTS OF BOMBAY’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर गोविंद मंगेश कालेलकर यांच्याकडून करून घेऊन प्रकाशित केले. १८९७ मध्ये सयाजीरावांनी विलियम मॉरीसन यांच्या ‘क्राइम अँड इट्स कॉझिस’ या इंग्रजी ग्रंथाचे ‘गुन्हा आणि त्याचीं कारणें’ हे रामचंद्र हरी गोखले यांनी केलेले मराठी भाषांतर आपल्या ‘महाराष्ट्रग्रंथमाले’त प्रकाशित केले.

महाराजांनी निरनिराळ्या भाषांची साहित्यसंमेलने आपल्या राजधानीत भरवून भाषा आणि साहित्य यांच्या उत्कर्षाला भरीव हातभार लावला. अनेक साहित्य संमेलने, वार्षिक समारंभ, सहविचारणी सभेचे समारंभ, सार्वजनिक व्याख्याने अशा अनेक प्रसंगात स्वतः भाग घेऊन महाराजांनी साहित्य क्षेत्राला उत्तेजन दिले. इतरांकडून चांगले वाङ्मय तयार करून घेत असतानाच महाराज स्वतःसुद्धा दर्जेदार लेखन करीत होते. एडवर्ड गिब्बनच्या ‘रोमन साम्राज्याचा उत्कर्ष व ऱ्हास’ या ग्रंथावरून त्यांनी स्वतः इंग्रजीत ‘From Caesar To Sultan’ या नावाने त्याचा सारांश ग्रंथबद्ध केला. त्याचे ‘कैसरकडून सुलतानाकडे’ हे भाषांतर राजाराम रामकृष्ण भागवत यांच्याकडून करून घेतले. ‘मराठी दृष्टीने जगाच्या इतिहासाची साधने’ व  ‘वाचणारात इशारत’ ही या ग्रंथाची सयाजीरावांची प्रस्तावना अत्यंत मौलिक आहे.

तुकारामाचे अभंग संगतवार लावून प्रसिद्ध केल्यास तो एक जागतिक महत्वाचा अपूर्व ग्रंथ होईल असे जेव्हा महाराज सांगतात तेव्हा तुकारामाच्या तत्वज्ञानाच्या वैश्विक मूल्याचे महाराजांचे भान किती प्रगल्भ होते याचा पुरावा मिळतो. संत तुकाराम ही महाराजांची प्रेरणा होती याचा उत्तम पुरावा म्हणजे १८९९ च्या बडोद्यातील दुष्काळ दौऱ्यादरम्यान महाराज सयाजीरावांसोबत असणारी तुकारामाची गाथा सोबत ठेवत.

१९१० मध्ये मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालय इमारतीचा पाया महाराजांनी घातला तर १९१२ मध्ये या इमारतीचे उद्घाटन केले. देशी भाषेतील ग्रंथालयांना उत्तेजन देण्यासाठी महाराजांनी १९१०-१९१२ या २ वर्षात ३०० हुन अधिक मोफत ग्रंथालयांची स्थापना केली. यात छोटेखानी अनेक ग्रंथालये होती. यामधील १लाख २० हजार पुस्तकांपैकी १ लाख १६ हजार पुस्तकांचा लाभ लोकांनी घेतल्याचे सांगताना सयाजीराव आपल्या भाषणात म्हणतात, “ही इमारत आज मराठी बोलणाऱ्या स्त्री-पुरुषांना, आजच्या बालकांना; पण पुढच्या स्त्री-पुरुषांना, उघडी करून देत आहो. येथला ग्रंथसंग्रह त्यांना प्राचीन मराठी लेखकांचे आचारविचार कथन करील आणि विद्यमान मराठी लेखकांचेही आचारविचार हा ग्रंथसंग्रह जतन करून ठेवून अतःपर जन्मणाऱ्या मराठी स्त्री-पुरुषांना ते सांगत राहील.”

१९३२ साली कोल्हापूर येथील साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या समारोपात मराठी लेखकांना महाराज ६ सूचना करतात. त्या पुढीलप्रमाणे – १) राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करा. २) जगातील सर्व ज्ञानशाखांतील महान लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित करा. ३) विद्यापीठात जाण्याचे भाग्य न लाभलेल्या लोकांना ज्ञानमार्गी करण्यासाठी सर्व ज्ञानशाखांतील इंग्रजी विश्वकोश मराठीत अनुवादित करा. ४) बहुजनांच्या लोकभाषेत लेखन करा. ५) जुने चांगले जतन करण्यासाठी नव्याबरोबर जुन्या उत्तम ग्रंथांच्या आवृत्त्या काढा. ६) ज्या पुस्तकाने विचारात क्रांती घडेल अशी जगभरातील पुस्तके स्वभाषेत भाषांतरित करा.इ.

या भाषणाचा शेवट करत असताना महाराजांनी दिलेला इशारा आजही तितकाच समकालीन आहे. महाराज म्हणतात, “लेखकवर्गाने समाजाच्या विस्तृत जीवनाशी एकरूप होवून लोकांत आपल्या कृतीविषयी आपलेपणा व ममत्व उत्पन्न केले पाहिजे. हे कसे साध्य करावयाचे याचीच चर्चा या संमेलनात करावयाची आहे. म्हणून तुकारामबुवांच्या प्रासादिक शब्दात या भाषणाचा शेवट करितो. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’.”  या भाषणात विविध प्रांतातील साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याची महाराजांनी सूचना केली. लोकांनी आपल्या साहित्याची इतर प्रांतातील साहित्याशी तुलना करून आपण आणि आपले साहित्य नेमके कुठे आहे हे समजून घ्यावे अशी भूमिका सयाजीरावांनी मांडली. स्वातंत्र्यानंतर १२ मार्च १९५४ रोजी भारतात स्थापन झालेल्या ‘भारतीय साहित्य अकादमी’ या महत्वाच्या आणि १७ भारतीय भाषेत साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्थेची बीजे या भाषणात सापडतात. यावरून भारतीय साहित्य अकादमी स्थापन होण्याआधी २२ वर्षे महाराजांनी केलेले चिंतन आणि मांडलेली भूमिका किती द्रष्टी होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मराठीतील एक महत्वाचे साहित्यिक आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना सयाजीरावांच्या एकूणच योगदानाचे मोल चांगले कळले होते. त्यामुळेच त्यांनी अत्यंत मार्मिकपणे मराठी साहित्य आणि सयाजीराव यांचे नाते अधोरेखित केले होते. त्यांच्या निष्कर्षानेच आपण शेवट करूया. नेमाडे म्हणतात, “आपली भाषा ज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर असावी, असे सर्वांनाच वाटते. परंतु, ह्यासाठी सत्तेवरच्या लोकांना आणि विद्याक्षेत्रातल्या लोकांना सतत कष्ट उपसावे लागतात. विद्याक्षेत्रातल्या सुखवस्तू होऊन आळशी बनलेल्या लोकांना ज्ञानग्रंथ निर्माण करण्याच्या मेहनती कामाला लावणे किती कठीण असते. सयाजीरावांनी हा सर्व प्रयोग यशस्वी करून शेकडो ग्रंथ मराठीत निर्माण केले. मातृभाषेचा एवढा जिव्हाळा त्यांच्यानंतर सत्तेवरच्या दुसऱ्या कोणी मराठी माणसाने दाखवलेला नाही.’

मराठी भाषेचे शिवाजी ही उपाधी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मोठ्या अभिमानाने लावली जाते. चिपळूणकरांनी संस्कृतप्रचुर मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यांचा हा आग्रह ब्राह्मणांचे वर्चस्व आणि बहुजनांचे दुय्यमत्व अधोरेखित करणारा होता. शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशकतेलासुद्धा तो उभा छेद देणारा होता. एकप्रकारे शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशकतेला कमीपणा आणणारा होता. म्हणूनच सयाजीरावांचे या क्षेत्रातील वरील कार्य विचारात घेता ही उपाधी चिपळूणकरांपेक्षा सयाजीरावांना लावणे जास्त प्रामाणिकपणाचे ठरेल.


निलोफर मुजावर, वारणानगर
(८९५६५८१६०९)

Source: Maharaja Sayajairao Gaekwad

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.