गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

मोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच. आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे. तसे नसते तर १५ नोव्हेंबरला गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे स्मरण जागवताना पुन्हा एकदा गरळ ओकले गेले नसते. ‘नथुरामच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानची होणारी संभाव्य हानी टळली’ अशा शब्दांत हिंदू महासभेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई तसेच पुण्यातही नथुरामच्या आरत्या ओवाळल्या. असेच विषारी एसएमएसही सध्या फिरत आहेत. नथुरामचे ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेम’ म्हणजे काय? गांधीजींची हत्याच ना?

बारामतीत जन्मलेल्या आणि पुण्यात वृत्तपत्र चालवणार्‍या नथुरामचा जन्म होऊन यंदा शंभर वर्षे झाली. त्याचे निमित्त करून त्याच्या नावाचा आणि ‘कर्तृत्वाचा’ उदो उदो करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. ही विषवल्ली अजूनही मुळे धरून का आहे, याचाही गंभीर विचार करायला हवा. कपाळावर राष्ट्रप्रेमाचे शिक्के उठवून फिरणार्‍या या नादानांना अनुल्लेखाने मारावे, असे अनेकांना वाटते. पण कोणीच टोकले नाही तर धादान्त असत्य आणि विषारी द्वेष यांचे थैमान वाढते.

या लबाडीचे एक उदाहरण म्हणजे, गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले, हे असत्य परवा पुन्हा उच्चारले गेले. मुळात फाळणीत मालमत्तेच्या ज्या वाटण्या झाल्या त्यातली ही उरलेली रक्कम होती. तिच्याशी गांधींचा काहीच संबंध नव्हता. माऊंटबॅटनच्या अखत्यारीतला हा निर्णय. झालेला करार पाळा, एवढाच गांधींचा आग्रह होता. तो त्यांच्या ‘नैतिक भूमिके’शी सुसंगतच होता. संपत्तीची वाटणी कशी झाली आणि त्यात कोण गुंतले होते, याचा तपशील ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर्स’च्या खंडांमध्ये आहे. यात गांधी कुठेही नाहीत.

पॅकेजे देऊन काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे लाड चालल्याचा आरोप हिंदू महासभेने केला. या आरोपाचे बोटही गांधींच्या वारशाकडे आहे. फाळणीला सर्वाधिक जबाबदार असणार्‍या महंमद अली जिना यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचीही हिंमत नसलेले षंढ मारेकरी गांधींना मारून घरच्या म्हातारीचे काळ झाले. तीच रीत आज चालली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरात हल्लेखोर घुसले तेव्हा प्रार्थनासभेत गांधींना विचारण्यात आले की, आता काय करायचे? तेव्हा गांधी म्हणाले, भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे. सीमांचे संरक्षण करायलाच हवे. या घुसखोरांना भारतीय सैन्याने हुसकावून लावावे. (संदर्भ : दिल्ली डायरी) गांधींची अहिंसा आंधळी नव्हती, याचे हे उदाहरण आहे.

आज आँग सान सू ची पासून बराक ओबामांपर्यंत आणि नेल्सन मंडेलांपासून दलाई लामांपर्यंत सर्वांना सर्वाधिक कालसुसंगत वाटणारा विचार गांधींचा आहे. पण आपल्याकडे कडवे हिंदुत्ववादी, ढोंगी काँग्रेसवाले, कट्टर आंबेडकरवादी आणि ढापणे लावलेले मार्क्सवादी अशा चौफेर शत्रूंनी गांधींना घेरले आहे. तरी उद्या जगाला ‘एम.जी.रोड’वरूनच जायला लागणार आहे. दुसरा रस्ताच नाही. असे असताना ज्यांची हेडली आणि लादेन यांची हिंदू प्रतिबिंबे बनण्याचीच महत्त्वाकांक्षा आहे, त्यांच्या असत्य प्रचाराची विषवल्ली पुराव्यानिशी मुळातच खुडली पाहिजे.

– सारंग दर्शने
महाराष्ट्र टाईम्स २२ नोव्हेंबर २०१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.