क्रिकेट: राष्ट्रविघातक खेळ

भारतासारखे क्रिकेटवेड मी युरोप-अमेरिकेत प्रवास करतानाही पाहिले नाही. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लंडन शहरातही ‘गल्ली-बोळात’ कुठेही क्रिकेट दिसले नाही. साधारणपणे १६ व्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरवात झाली. इ.स. १७८७ साली मेरिलीबोन क्रिकेट क्लबची (एम.सी.सी.ची) स्थापना झाली. जगात जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन झाल्यात, तिथे तिथे ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी क्रिकेट खेळू लागले. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या इंग्रजांनी १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून तिथे क्रिकेटची सुरुवात केली. त्याच काळात न्युझिलंडमध्येही क्रिकेट खेळला जाऊ लागला. सुरवातीचे क्रिकेट सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांत होत असत. असा पहिला सामना १८७७ साली ऑस्ट्रेलियात झाला.

१८ व्या शतकाच्या प्रारंभी इंग्रजांबरोबर क्रिकेटही भारतात आला. भारताचा पहिला कसोटी सामना १९३२ साली भारत विरुद्ध इंग्लंड असा लंडन येथे झाला. यावेळी भारत इंग्रजांचा गुलाम देश होता. काळानुरुप क्रिकेटचे स्वरुपही बदलत गेले. एकदिवसीय जागतिक क्रिकेट सामने १९७५ साली सुरु झाले. यावेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, वेस्ट इंडिज, पूर्व आफ्रिका, भारत, पाकिस्तान व श्रीलंका ह्या आठ देशांच्या संघांनी भाग घेतला. अमेरिका (यू.एस.ए.) हा इंग्रजांची गुलामगिरी झुगारुन देणारा पहिला देश होय. अमेरिकेत क्रिकेट नाही. वास्तविक अमेरिकेत इंग्लंडमधून आलेल्यांचे वंशज बहुसंख्येने आहेत, तरीही तिथे क्रिकेट नाही.

क्रिकेट खेळणारे देश आणि त्यांची लोकसंख्या

(१) भारत – ११८ कोटी ४६ लक्ष
(२) पाकिस्तान – १७ कोटी २लक्ष
(३) बांगलादेश – १६ कोटी ४४ लक्ष
(४) यू.के. (इंग्लंड) – ६ कोटी २० लक्ष
(५) दक्षिण आफ्रिका – ५ कोटी
(६) ऑस्ट्रेलिया – २ कोटी २४ लक्ष
(७) श्रीलंका – २ कोटी ४ लक्ष
(८) झिम्बाब्वे – १ कोटी २६ लक्ष
(९) डॉमिनिकन रिपब्लिक (वेस्ट इंडिज) – १ कोटी २ लक्ष
(१०) न्युझिलंड – ४३ लक्ष.

एकूण १७० कोटी ३१ लक्ष क्रिकेट लोकसंख्येतून भारताची लोकसंख्या वजा केल्यास बाकीच्या सर्व देशांची मिळून ५१ कोटी ८३ लक्ष लोकसंख्या राहते. (म्हणून भारताच्या अर्ध्या लोकसंख्येपेक्षाही कमी). त्यातही पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे एके काळी भारताचेच भाग असलेल्या देशांची ३५ कोटी ५० लक्षा लोकसंख्या अलग केल्यास, फक्त १६ कोटी ३३ लक्ष उरतात(म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या दीडपट). न्युझिलंडची लोकसंख्या तर मुंबईच्याही अर्धी नाही.

विश्वविजेता, विश्वविक्रम म्हणणे अज्ञानप्रदर्शन

विश्वात पृथ्वी एखाद्या अंड्याएवढी आहे. अशा पृथ्वीवरील २२३ देशांपैकी फक्त १०-१२ देशांत क्रिकेट खेळतात. पृथ्वीवरील ६०० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी भारत, पाक, बांगला देश आणि सिलोन वगळल्यास फक्त १६ कोटी ३३ लक्ष लोकसंख्या क्रिकेटवाल्या देशांची आहे. जगातील २२३ देशांपैकी २१० देशात क्रिकेटला स्थान नाही. भारतातही ७० टक्के लोकांना क्रिकेट कळत नाही. बघतही नाहीत. मग अशा चिमूटभर भागात मिळालेल्या विजयाला विश्वविजय, विश्वविक्रम असे संबोधून त्यांचा उदोउदो करणे हे ‘शुद्ध’ (किंवा ‘बेशुद्ध’) अज्ञानप्रदर्शन नव्हे काय?

भारतातही आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळाडूंची निवड मुंबईसारख्या मोठ्या शहरातूनच होते. त्यांची गुणवत्ता म्हणजे भारतीयांची गुणवत्ता ठरु नये. कारण, एकतर हा खेळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे आणि सर्वसामान्यांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसते. शिवाय सामान्य गुणवंत योजनाबद्धरित्या डावलण्यात येतात. दिल्लीला चालू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धेत कविता राऊत सारख्या गरीब आणि मागासलेल्या वर्गातील मुलीने१० हजार मीटर दौडीत मिळविलेले कास्यपदक ग्रामीण गरीबातही कसदार आणि काटक क्रीडा गुणवत्ता असते हे यावरुन सिद्ध होते. अशांचा शोध घेऊन त्यांना संधी दिल्यास क्रिकेटमधील अनेकांची मक्तेदारी आणि तथाकथित विश्वविक्रम मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत.

क्रिकेटला ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये स्थान नाही. हॉकीला आहे. पूर्वी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला एकुलते एक सुवर्णपदक मिळत असे ते फक्त हॉकीत. भारताला मिळाले नाही, तर पाकिस्तानला मिळायचे. पण जेव्हा इतर देशांनीही हॉकीतील कौशल्य अवगत केले तेव्हा आता भारत किंवा पाकला पात्र फेरीसुद्धा गाठणे कठीण जाते. इतर देश खेळले तर क्रिकेटचीही हिच अवस्था होईल. आज मात्र ‘वासरांत लंगड्या गाई शहाण्या’ (विश्वविजेत्या) ठरत आहेत. पण जगातील प्रगत देश क्रिकेट खेळणार नाहीत. कारण, कामधाम सोडून तासन्तास बसून क्रिकेट बघणारा प्रेक्षक फक्त भारतातच आहे. इंग्लंड व इतर देशांतील क्रिकेट सामन्यांतही तेथील भारतीयांचीच अधिक गर्दी असते. क्रिकेट हा मानवी तास वाया घालविणारा राष्ट्रविघातक खेळ आहे. हे जगातील प्रगत राष्ट्रांनी ओळखले आहे. म्हणून ते क्रिकेटपासून अलग आहेत. क्रिकेट बघणाऱ्या भारतीयांचा दरवर्षी क्रिकेट बघण्यात जो वेळ वाया जातो, तो त्यांनी काम करण्यात खर्च केल्यास हजारो कोटींची राष्ट्रीय संपत्ती निर्माण होऊ शकेल.

जगातील प्रगत देश स्वत: क्रिकेट खेळत नाहीत, पण त्यांच्या कंपन्या मात्र भारतासारख्या देशांना क्रिकेट खेळवतात. आमचा देश मॅच जिंकला की, आम्ही फटाके फोडतो. आमचा राष्ट्राभिमान उतू जातो. खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होतो. पण ते खेळाडू पेप्सी, कोकाकोला वगैरे विदेशी कंपन्यांच्या विषारी मालांची जाहिरात करुन राष्ट्रद्रोह करतात. ‘लगान’ नावाचा सिनेमा बघून क्रिकेटवेड खेडोपाडी पोहचत आहे. तो लगानचा ‘राष्ट्रभक्त’ हिरो मात्र ‘थंडा मतलब’ सांगून आपली ओळख देत आहे. सारांश, भारतातील सर्वसामान्यांतील कर्तबगार, बुद्धिमान आणि हुशार तरुणांना बिघडविणारा, त्यांच्या जीवनाचे वाटोळे करणारा हा खेळ आहे. लॉटरीसारखे ते क्रिकेटच्या मागे धावत आहेत. लॉटरीमुळे एखादाच करोडपती बनतो, पण करोडो मात्र लॉटरीत पैसा लावून बुडतात. म्हणून भारतासारख्या गरीब देशात क्रिकेटला प्रोत्साहन आणि आश्रय देणे हा राष्ट्रविघातक राष्ट्रद्रोह होय.


प्रा. मा.म.देशमुख
नागपूर

Source: 1

Add a Comment

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.