महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून दिले. मराठा क्रांती मोर्चाची केवळ संख्यात्मक सहभागाची चर्चा करून विराट मोर्चा, दहा लाख मराठा समाज एकवटला. अशा प्रचारी स्वरूपाच्या शब्दांनी शब्दांकित करणे म्हणजे मराठा क्रांती मुकमोर्चाचा अप्रत्यक्ष उपहास करण्यासारखेच होईल.
भारतीय इतिहासास ब्रिटिशविरोधी महात्मा गांधींनी काढलेले अहिंसावादी मोर्चे माहीत आहेत. तसेच स्वतंत्र भारतासही गिरणी वा रेल्वे कामगारांचे-संघटित कामगारांचे लाखोंचे मोर्चे माहीत आहेत. संघटित कामगारांच्या मोर्चास अनेकदा हिंसक वळणही मिळालेले आहेच, शिवाय या मोर्चामुळे – संपामुळे सर्वच नागरिकांना वेठीस धरले जाते. याशिवाय अशा संघटित कामगार मोर्चासाठी प्रचंड आर्थिक बळ, राजकीय बळ, संघटनशक्ती असे चेहरे उपलब्ध असतात. याशिवाय अनेक ताकदवान समाजाच्या समाजनेत्यांनी हक्क-अधिकार-न्याय मिळावा यासाठी काढलेले मोर्चेही ज्ञात आहेत. या पृष्ठभूमीवर मराठा समाजाचे निघत असलेले मूकमोर्चे अतिभव्य आहेत, पूर्णपणे मूकमोर्चेच आहेत, समाजाचेच सामूहिक नेतृत्व आहे, समाजातील तरुणीच सामूहिक नेतृत्व करतात, प्रचंड शिस्तबद्ध आयोजन, स्त्रियांचा मोठा सहभाग, सर्व परिसराची स्वच्छता करणे, इतर नागरिकांना कोणताही त्रास होऊ न देणे, जिजाऊ वंदनेने सुरुवात, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हस्तांतरण, कोपर्डी दुर्घटनेतील मुलीस श्रद्धांजली, शेवटी सामूहिक राष्ट्रगीत व मुक्यानेच जिल्हा मुख्यालय वा गाव सोडून शांतपणे परत फिरणे… इत्यादी. गेल्या सत्तर वर्षांत अनेक बोलघेवड्यांनी मराठा समाजाची द्वेषमूलक भावनेतून जमेल तशी निंदानालस्ती केली. अशा सर्वच अपमानांना मूकमोर्चा हे उत्तर आहे.
जाहीरपणे चेहरे मिरविणाऱ्यांना चेहरे झाकायला लावणाऱ्या या अगाध मराठा शक्तीस माझा त्रिवार मुजरा!
बिनाचेहऱ्याच्या, बिनाप्रसिद्धीच्या, बिनाबोलाच्या या एकवटलेल्या मराठाशक्तीने सर्वच क्षेत्रीय अभ्यासक अचंबित झालेले आहेत. जे प्रामाणिक विश्लेषक आहेत, ते आपापल्या परीने विश्लेषण करत आहेत. त्याचवेळी अनेक टवाळखोर मराठाद्वेष्टे स्वनामधन्य व्यक्ती वा समूह आपली विषारी विकृती प्रदर्शित करत आपल्या मूर्खपणावरच अडून बसलेला आहे. मोर्चेकरी बिना चेहऱ्याचे मुके असतानाही त्यांचे लेखी निवेदन बाजूला सारून वा विचारात न घेताच बिना चेहेऱ्यांच्या मोर्चेकऱ्यांच्या नावाने कोणाला तरी बोलते करून मोर्चेकऱ्यांचा अपमान करत आहेत. याशिवाय मोर्चेकऱ्यांनी अनेकदा लेखी निवेदनाद्वारे जाहीर केलेले आहे की, मराठा क्रांती मोर्चा हा कोणा विरोधात नाही तर या माध्यमातून मराठा समाजाने आत्मचिंतनातून आत्मसंरक्षण व सार्वजनिक विकास यावर भर द्यावा हाच आहे. असे असतानाही काही चॅनेलवाले दीडशहाणे सोयीचे अनर्थ काढून समाजा-समाजात गैरसमज, द्वेष, वैर निर्माण होईल व पसरेल अशा प्रकारचा मराठा द्वेष जिवंत ठेवतच असतात. अशा प्रचारकी दीडशहाण्यांना पूरक काम करणारे अनेक स्वनामधन्य समाजनेतेही मराठा समाजाविरोधात द्वेष पसरवतच असतात. एवढेच नाही तर अनेकांनी ‘क्रांती’ हा शब्द वापरण्यासही हरकत घेतली आहे. समाजविज्ञानाच्या भाषेमध्ये क्रांती म्हणजे जुन्या कालबाह्य, सनातनी, शोषणवादी इत्यादी स्वरूपाच्या व्यवस्थेला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. क्रांतीची सुरुवात सुधारणांनी होते, तर शेवट कृतिशील परिवर्तनाने होतो.
इथे मराठा मोर्चा ही साखळी अनेक अंगांनी क्रांतिकारीच आहे. जगातील मोर्चाचा इतिहास हा फारसा अभिमानास्पद नाही. तोडफोड, जाळपोळ, लुटालूट, नागरिकांची गैरसोय, घाण, अशांतता, नारेबाजी, स्त्रिया व मुलांची आबाळ, खंडणी, सार्वजनिक मालमत्तेची हानी इत्यादी वैशिष्ट्यांशिवाय आर्थिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक ताणतणाव हीच मोर्चाची सनातनी परंपरा राहिलेली आहे. या पृष्ठभूमीवर मराठा मोर्चानी स्वयंशिस्तीचे प्रदर्शन, शांततेचे प्रदर्शन, मुकेपणाचे पालन, स्वच्छतेचे पालन असे अनेक नवीन पायंडे पाडून भविष्यात निघणाऱ्या मोर्चासाठी एक पथदर्शक प्रेरणा व आदर्श दिलेले आहेत, म्हणून या मोर्चाना क्रांती म्हणणेच योग्य आहे. तसे हे परिवर्तनही आहे, कारण लाखो मराठा स्त्रिया स्वयंस्फूर्तपणे मोर्चात सहभागी होतात. तेव्हा सतत मराठा समाजाबद्दल तोंड वाकडेच व वेगळेच ठेवणाऱ्यांनी स्वतःसाठीच सरळ व्हावे, तसेच मराठा क्रांती मोर्चे बिनाचेहऱ्याचे व सार्वजनिक नेतृत्वाचे आहेत. असे असतानाही अनेक दीडशहाणे स्वतःच्या अर्धवट अकलेचे तारे तोडून शब्दच्छल करत आहेत. प्रत्येक ठिकाणी लेखी निवेदन दिलेले आहेत. लेखी निवेदन ही मोर्चाची अधिकृत भूमिका.
९ ऑगस्ट हा क्रांतिदिन. ९ ऑगस्ट २०१६ रोजी मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादवरून झाली. जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी मराठा जातिद्वेषातून या क्रांतीकडे दुर्लक्षच केले होते. या मोर्चात सामील होण्यासाठी आलेल्या विविध परिसरातील समाजबांधवांनी वेगवेगळ्या मागण्यांचे, निषेधाचे फलक आणलेले होते. हे फलक बनविताना त्यामागची भूमिका भावनिक जास्त असू शकते. त्यामुळे निवेदनाकडे पूर्ण कानाडोळा करून काही प्रसारमाध्यमांनी व मराठाद्वेषी मराठेतर नेत्यांनी फलकावरूनच विष पेरण्याचा गोरखधंदाही केला. आपापल्या भाषाप्रमुखत्वाची ओळख करण्यात धन्यता मानली. एवढेच नाही तर अनेकांची अकलेची दिवाळखोरी मराठा समाजालाच आरोपी ठरवून त्यास बाहुबली, सहकारबली, अर्थबली, शिक्षणबली, राजाबली असे विविध ‘बळी तो कानपिळी’ या अंगानेच रंगविण्यापर्यंत गेली. वास्तविक प्रत्येकच जातीत वा समाजात असे मूठभर धनदांडगे, जातदांडगे, धर्मदांडगे, बाहुदांडगे, समाजदांडगे, भुजबळ असतातच. ते कधीही जनसामान्यांचे, बिनाचेहरेवाल्या बहुसंख्याकांचे प्रतिनिधी नसतात. त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजातील अशा भुजबळांना शून्याएवढेही महत्त्व दिलेलेनाही. समाजाचे म्हणूनही जे आलेले होते त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली!
गावकुसाबाहेरचं जीवन जगणाऱ्या दलित, पीडित, वंचित, खजील, शोषित मराठा तरुणी-तरुणांनी ही जागतिक अशी सामाजिक क्रांती केलेली आहे. त्याकडे पूर्ण कानाडोळा करून अनेक प्रसारमाध्यमे शरद पवार, नारायण राणे, डॉ. शालिनीताई पाटील, पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सर, कुलपती डॉ. पतंगराव कदम सर इत्यादी राजकारणी-समाजकारणी मराठा नेत्यांना नागडे करण्यात धन्यता मानत आहेत. आपल्याला प्राप्त झालेले सर्वंकष सर्वाधिकार केवळ व केवळ स्वतःसाठीच व स्वतःच्याच जातीसाठी वापरणे व इतरांना वंचित ठेवून ब्राह्मणवादी व्यवस्था बळकट करण्याचे महापाप या मराठा नेत्यांना कदाचित पूर्णपणे जमलेही नसेल, त्या अर्थाने ते समाजद्रोही वा नालायकही ठरविता येतील; पण त्यांची हीच नालायकी महाराष्ट्राचे एकूण सार्वजनिक जीवन समतावादी, मानवतावादी ठेवण्यास उपयुक्त ठरले.
याच महाराष्ट्रातील अनेक नामवंतांना अखिल जागतिक, अखिल भारतीय बिरुदे चिटकलेली आहेत; परंतु त्यांचे आचरण पाहिल्यास प्रचंड कूपमंडूक असते. आपल्या घरात दिवा लावल्यास त्याचा उजेड शेजारच्यांच्या अंगणात पडून तिकडचा अंधार कमी होऊ नये, यासाठी स्वतःच्या घराच्या खिडक्या बंद करून त्यावर पडदे चढविणाऱ्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ वा ‘भारतरत्ना’ने गौरविले जाते. या पृष्ठभूमीवर मराठा राजकारण्यांनी जिजाऊ, शहाजी, शिवाजी, तुकाराम यांच्या विचारांना आचरणात आणले. रंजल्या गांजल्यांना आपले म्हटले. स्वतःच्या घरातील उपाशांना उपाशीच ठेवून शेजारच्या उपाशांना दोन घास जेऊ घातले. हा आमचा शेजारधर्म. समाजधर्म. मराठाधर्म. शिवधर्म. मराठा समाजाच्या दानावर अनेक गैरमराठा समाज गब्बर झालेत. त्याचा आम्हाला अभिमानच आहे; पण आता आम्ही मरण स्वीकारून इतरांना जगविण्याचा अव्यवहारी मार्ग सोडणार आहोत. मराठा समाज हाच महाराष्ट्राचा व भारताचा कणा असल्याची अनेक बहुजन समाजाची भावना आहे. ‘मराठा जगला, तर कोण मरेल? व मराठा मेला, तर कोण जगेल?’ ही भावना असणारे अनेक समाजघटक आहेत.
मराठा क्रांती मोर्चाची मानसिकता, ‘सर सलामत, तो पगड़ी पचास!’ ही आहे. मराठा सेवा संघासमवेत झालेल्या बैठकीत सन १९९६ साली तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी सर, मराठा ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले होते की, ‘आजपर्यंत केवळ देणेच माहीत असलेल्या मराठा समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब नाही. परंतु मराठा समाज सर्वार्थाने सशक्त होण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील.’ त्याचवेळी त्यांनी मराठा नेत्यांनी मराठा समाजाकडे जास्त लक्ष देण्याची गरज होती, असेही मत मांडले. असे असले तरी पुढच्या वीस वर्षांतील मराठा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-मराठा नेते- शरद पवार, नारायणराव राणे, दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत आर आर आबा पाटील, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार इत्यादींनी राजकीय व्यवहारात समाजाची दुर्दशाच केली हे सत्य आहे. आज सत्ताहीन व सत्त्वहीन झालेल्या या नेत्यांची अवस्था महाभारतातील द्रौपदी वस्त्राहरणावेळी अगतिक झालेल्या भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्यासारखी झाल्याचे मराठा युवकांना भान आहे. त्यांचेच हे भान मराठा क्रांती मोर्चातून मूकमार्गाने प्रदर्शित होत आहे. अभिनंदन व सदिच्छा!
–
पुरुषोत्तम खेडेकर
(संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ)