“कळी” चे “राज” कारण…

चारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रॉनिक ) एका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल, उद्धवची एन्जिओग्राफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून मातोश्रीवर …

पूर्ण दिवसभर आणि रात्री उशिरा पर्यंत हेच दळण तमाम मराठी ( आणि काही हिंदी सुद्धा ) न्यूज चॅनल वर अखंडपणे चालू होतं.

Uddhao Vs Raj Thakare

—————————————————————–
टी.आर.पी. मंगता है भाय!
—————————————————————–

अख्खा महाराष्ट्र आज दुष्काळाच्या टकमक टोकावर उभा आहे, विदर्भातीलच नव्हे तर मराठवाडा-कोकण इतकेच काय कृषीसधन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यावर देखील या वर्षी आत्महत्या करण्याची पाळी येण्यासारखी स्थिती आहे. जुलै महिना संपत आला तरी राज्यातील तमाम धरणे कोरडी आहेत. पुढील वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्याच बरोबर महागाईचा टी.आर.पी. गगनाला भिडला आहे. विविध घोटाळ्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधी एकमेकाशी संगनमत असल्यासारखे वागत आहेत. या सर्व बाबतीत आमचा मिडिया चिडीचुप आहे. कारण त्यात टी.आर.पी. नाही. राज-उद्धव कहाणीत मात्र टी.आर.पी. ला लागणारा सर्व मालमसाला आहे. अॅक्शन, इमोशन, मेलोड्रामा सर्वकाही म्हणूनच त्यांच्या किरकोळ कळीचे दिवसभर दळण. टी.आर.पी. मंगता है भाय!

——————————————————————–
स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले, स्टोरीबोर्ड ,
डायलॉग एकदम झकास
——————————————————————–

त्या दिवशीची दो-भाई की कहाणी बॉलीवूड मधील मी मी म्हणणार्‍या मसाला फिल्म मेकर्सनी तोंडात बोटे घालावी अशीच होती. मिडीयाने देखील या आगामी “बीछडे मिले” कहाणीचा प्रोमो अगदी प्रामाणिक पणे दाखवला. सकाळी १० वाजता दवाखान्यात दाखल झालेला एक भाऊ दुपारी चार वाजता जणू काही झालेच नाही अशा थाटात ( एन्जिओग्राफ़ि?) करून बाहेर पडतो तेंव्हा तो अगदी मेकअप वगैरे केल्या सारखा फ्रेश दिसतो. आणि काही महिन्यापूर्वी एकमेकाची खाल्लेले घास मोजेपर्यंत खाली गेलेली आरोपांची पातळी विसरून दुसरा भाऊ त्याचा ड्रायव्हर होऊन त्याला घरापर्यंत सोडतो. दुसर्‍या भावाची बायको तर अगदी चाळीत राहणार्‍या सर्वसामान्य गृहिणी सारखी अक्षरश: सैरावैरा पळत दवाखान्यात येताना एका सीन मध्ये दिसते. इतका मेलोड्रामा मनमोहन देसाईना तरी सुचला असता का ?

——————————————————————————–
एक्स्ट्रा कलावंतांची कमाल
——————————————————————————–

या कहाणीत मनोहरपंत, रावते, राउत, गोरेबाई , नांदगावकर आदी एक्स्ट्रा कलावंतांची कामे देखील उत्तम वठली. त्यांना दिलेली वेळ आणि संवाद त्यांनी अतिशय जीव ओतून सादर केले. त्यातील खोटेपणा त्यांच्या देहबोलीतून जाणवत असला तरी मुळात कहाणीत दम असल्याने या किरकोळ त्रुटी झाकल्या गेल्या. त्यातही कहाणी पुढे काय वळण घेणार या बाबतीत या एक्स्ट्रा कलावंताना काहीही कल्पना नसल्याने पुढे मागे आपला रोल कापला जाऊ नये याची भीती त्या सर्वांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. ( यात फक्त मनोहर पंत जरा गालातल्या गालात हसल्या सारखे वाटत होते )

————————————————————————
बाळासाहेब आजारी होते तेंव्हा कुठे होता राज ?
————————————————————————

कुणी असेही म्हणेल की मी वड्याचे तेल वांग्यावर नेत आहे किंवा राईचा पर्वत करून कल्पनेचे बंगले बांधत आहे. एक भाऊ आजारी पडला दुसरा भाऊ त्याला भेटायला गेला यात कसले आहे राजकारण? परंतु एक लक्षात घ्या जे राज ठाकरे बाळासाहेबांना आपले दैवत मानतात, ते दैवत गेल्या सात वर्षात अनेकवेळा लीलावतीत दाखल झाले तेंव्हा राज ठाकरे त्यांना भेटायला गेले नाही. ते उद्धवच्या बाबतीत अचानक एवढे हळवे का झाले ?

—————————————————————————–
पिक्चर अभी बाकी है
—————————————————————————–

अर्थात हा फक्त प्रोमो आहे. या प्रोमोच्या समाजात-कार्यकर्त्यात काय प्रतिक्रिया उमटतात हे आता पाहिले जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर एक होण्याचा निर्णय घेता येणार नाही अशा परिस्थितीत तिकीट वाटपाचे अनेक पेच निर्माण होतील. बंडखोरी माजेल. नियोजन करता येणार नाही. पुढील निवडणुकीत हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे कुचकामी ठरतील अशा स्थितीत बाळासाहेबांना “विधान सभेवर भगवा फडकलेला दाखवून त्यांचा शेवटचा दिन गोड” करण्याची जबाबदारी दोन्ही भावांनी मजबुरीने म्हणा की अपरिहार्यता म्हणून म्हणा स्वीकारली आहे. अर्थात यातील अनेक उपकथानके अजून घडायची आहेत. ती जेव्हा उलगडतील तेंव्हा खरे कथानक समोर येयील. पिक्चर अभी बाकी है..

– रवींद्र तहकीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.