संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे संभाजी ब्रिगेडचे कृत्य एका रात्रीतील नव्हे, तर तीन-चार वर्षापासून ती संघटना महाराष्ट्र शासनाकडे तो अनैतिहासिक पुतळा काढण्याबाबत पाठपुरावा करीत होती; पण शासनातील मनुवाद्यांमुळे त्यांच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षताच आल्या. पुतळयाचा इतिहास शोधण्यासाठी शासनाने ना तज्ज्ञांची समिती नेमली. ना त्या दृष्टीने काही प्रयत्न करण्यात आले.
शिवरायांच्या समाधीसमोर शिवसमाधीच्या उंचीपेक्षा जास्त उंच अशा चौथऱ्यावर कुत्र्याची समाधी बांधणे, हे शिवरायांचा अपमान करण्यासाठी मनुवाद्यांनी जाणूनबुजून केलेले कृत्य आहे. शिव स्वराज्य शिवरायांच्या इमानदार, बहाद्दर सवंगड्यांच्या भरवशावर उभे झाले. मग कुत्राच तेवढा इमानदार व बाकी बेईमान होते काय? हा शिवरायांच्या एकनिष्ठ सवंगड्याचा अपमान नाही काय? बरे कुत्रा इमानदार होता, तर त्याची समाधी शिव समाधीच्या पायाजवळ असायला हवी होती. ती शिवसमाधीच्या तुल्यबळ उभी करणे, यात शिवरायांना हीन लेखण्याचे षडयंत्र नाही काय?
वास्तविक भारतीय परंपरेनुसार पती निधनानंतर जर पत्नी लगेच मृत्यू पावली असेल, तर तिचीही समाधी पतीच्या समाधीशेजारीच बांधल्या जाते. शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराणी पुतळाबाई सात दिवसांच्या आत अग्नीकाष्ठे भक्षुन सती गेल्या. जर वाघ्या पुतळ्याच्या ठिकाणी खरेच कुणाची समाधी असायला हवी, तर ती महाराणी पुतळाबाईसाहेबांचीच असणे जास्त संयुक्तिक आहे. त्यांच्या अस्थींवर वाघ्या कुत्र्याची समाधी उभी करणे, हा समस्त बहुजन शिवप्रेमीचाच उपमर्द आहे.
शिवकालीन दस्तावेजांमध्ये वाघ्या कुत्र्याबाबत, त्याने शिवरायांच्या चितेवर उडी घेऊन मरण पत्करल्याबाबत, कुठलाच पुरावा उपलब्ध नाही. तसा उपलब्ध असल्याचा आजपर्यंत कोणाही इतिहास संशोधकाने दावा केलेला नाही. महात्मा जोतिबा फुले दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा रायगडावर शिवसमाधी शोधण्यास गेले, तेव्हा महत्प्रयासाने त्यांना ती रायगडावर झाडाझुडपात झाकोळलेली दिसली. त्यांनी आजूबाजूची झाडेझुडपे उखडून फेकून, समाधी धुऊन, स्वच्छ करून तेथीलच रानफुलांनी तिची पूजा केली. तेव्हा गडावरील ब्राम्हण पुजाऱ्यांनी शिवसमाधीची पूजा केल्याबद्दल त्यांना शिवीगाळ केली आणि समाधीवरील फुले लाथेने उधळून लावली. हा इतिहास दस्तूरखुद्द महात्मा फुल्यांनी लिहून ठेवलेला आहे. मनवादी ब्राम्हण इतक्या कालावधीनंतरही शिवरायांचा किती द्वेष करतात व शिवरायांचा उपमर्द करायची कोणतीही संधी कशी सोडत नाहीत. हेच यावरून दिसून येते. त्या प्रसंगाच्या इतिहासातही म. फुल्यांनी शिवसमाधीच्या जवळपास इतर काही समाध्या आढळल्याचे नमूद केलेले नाही.
महात्मा फुल्यांनी रायगडावर शिवसमाधी शोधल्यानंतर, ५०-६० वर्षांनी समाधी परिसराच्या विकासासाठी श्रीमंत राजे तुकोजीराव होळकरांनी ५,००० रुपये देणगी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या हवाली केली होती. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासाठी सदर देणगी देण्यात आल्याचा होळकर दप्तराच्या कुठल्याही दस्तावेजात उल्लेख नाही, किंवा अद्यापपर्यंत तसा अस्सल दस्तावेज समोर आलेला नाही. कालांतराने भारत इतिहास संशोधक मंडळाने सदरचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभारला. मग ज्या पुतळ्यासाठी देणगी दिली नाही, तो पुतळा हटविल्याने राजे तुकोजीराव होळकरांचा अपमान होतोच कसा? बहुजन समाजाला आपसात लढविण्यासाठी मनुवाद्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासाठी राजे होळकर यांनी देणगी दिली होती, अशी शुद्ध थाप मारली आहे.
वाघ्या कुत्र्याबाबत आणि त्याचा इमानीपणा व चितेत उडी घेण्याबाबत जो काही लिखित उल्लेख प्रथम आलेला आहे, तो राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात! कथानकात रम्यता निर्माण करण्यासाठी त्यांनी चितारलेला तो कपोलकल्पित प्रसंग इतिहास समजायचा काय?
शासनाने वादग्रस्त समाधीस्थळाचे उत्खनन करून, तिथे कुत्र्याच्या अस्थी आहेत, की मानवी आहेत, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. जर मानवी अस्थी असतील, तर त्यावर कुत्र्याची समाधी बांधणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य ठरेल.
बहुजन समाजाला शिक्षणबंदी असल्याने लिहिणे, वाचणे ही कला शक्यच नव्हती. त्यांना फक्त कर्तृत्व, पराक्रम करणे माहीत होते; परंतु शिक्षण पारंगत जमात बहुजनांचा पराक्रम, त्यांच्या कर्तृत्वाची वासलात अशाप्रकारे लावत आली आहे आणि अजूनही लावत आहे. दुर्दैवाने बहुजन याबाबत अनभिज्ञ आहेत. आमच्या पूर्वजांच्या लिहिण्यात आलेल्या विकृत इतिहासाची आम्हास लाज न वाटता, अभिमान वाटावा यापरते दुर्दैव नाही.
महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या ज्या तसबिरी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामध्ये त्या शिव पिंड कवटाळून असलेल्याच दिसतात. वास्तविक महिलांची फलटण उभी करणारी ती भारतातील पहिली राज्यकर्ती आहे. त्याच फलटणीच्या भरवशावर राघोबादादा पेशव्यांना त्यांनी धूळ चारली होती; परंतु घोड्यावर बसून हातात तलवार घेतलेल्या रणचंडीच्या स्वरूपातील त्यांचे कोणतेही चित्र आजपर्यंत रेखाटण्यात आलेले नाही. भारतीय इतिहासातील उत्कृष्ट प्रशासक असताना व जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना कार्यान्वित करूनही, त्यांना केवळ देवभोळी, भक्तिपरायण, याच रुपात दाखविण्यात येते आणि ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीत गढ सोडून पळून जाणारीला मात्र ‘रणरागिनी’ म्हणून दाखविण्यात येते.
जेम्स लेनच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना व्यभिचारी ठरविण्यापर्यंत मजल जेव्हा मनुवाद्यांकडून गाठल्या जाते, तेव्हा आमची अस्मिता का गोठल्या जाते? चौर्यकर्माबद्दल आदिलशहाने हात कलम केलेल्या व आत्महत्या केलेल्या डरपोक दादो कोंडदेव याला जेव्हा शिवगुरू म्हणून मनोनीत केल्या जाते. तेव्हा आमची अस्मिता का दुखावत नाही? सेनापती मल्लारराव होळकरांनी पानिपतच्या युद्धप्रसंगी शिंद्यांना उद्देशून, एक तरी वैरी जिवंत ठेवा, नाही तर हे पेशवे आपल्याला त्यांची धोतरे धुवायला लावतील, असे निराशाजनक उद्गार का काढले, याचा इतिहास आतापर्यंत का शोधण्यात आला नाही? आणखी किती विकृत इतिहास आम्ही सहन करायचा?
संभाजी ब्रिगेड ही संघटना म्हणजे शिवरायांचे नाव घेऊन राजकीय स्वार्थ साधणारा राजकीय पक्ष नव्हे. संभाजी ब्रिगेडचे आराध्य दैवतच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर व तत्सम बहुजन महापुरुष आहेत. शिवरायांचा किंवा होळकर शिंदे व इतर बहुजन महापुरुषांचा उपमर्द होणारी कोणतीही कृती त्यांच्याकडून घडणेच शक्य नाही. तेव्हा शासनाने व अठरापगड जातींच्या बहुजन समाजाने संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृत्याचा निषेध न करता त्याचे स्वागत करणेच योग्य होईल.
–
प्रा. मयूराताई देशमुख
(अध्यक्षा, जागृत नागरिक विचारमंच)
Source: 1
आम्ही तयार आहोत पुन्हा वाघ्याला पाडायला jay shivray