सांस्कृतिक दहशतवादाची वाढती पाळेमुळे

दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले. नंतर मात्र वाघ्याच्या पुतळ्याला मनुवादी शासनाने पुन्हा त्याच जागेवर बसविले. रायगडावरील हा पुतळा इसवी सन १९३६ साली उभारण्यात आल्याचा उल्लेख इतिहासात आहे. परंतू त्या कुत्र्यासंदर्भात शिवचरित्राशी संबंधित असलेला एकही ठोस पुरावा नाही. पुतळ्यासंदर्भातील दंतकथा हवी तर सर्वांचीच तोंडपाठ असावी, पण इतिहासाचे काय? येथेच मुळात सांस्कृतिक दहशतवाद घुसमटतोय व सरकार वारंवार बंधने आणून बाहेरुन दबाव गट निर्माण करुन आपला मनुवाद व शिवचरित्रावरील असणाऱ्या जगाचे समर्थन करण्याचा मंडळाचा डाव यशस्वी करतोय. सरकारने कुठल्याही प्रकारची सत्यता उजेडात न आणता संबंधित दबावतंत्राला बळी पडू न संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. इतिहासात अधिकृत नोंद नसतांनाही छत्रपतींसमोर त्या कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला. तो ही शिवरायांच्या पुतळ्या पेक्षाही उंच.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जगातील एकमेव असे योद्धे होते की,त्यांच्या पराक्रमांना व विचारांना जगात कोणीही आव्हान देवू शकत नव्हते. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जगात आजही बरेच लोक यशस्वी घोडदौड करीत आहेत. शिवचरित्रात हा कुत्रा आणून मनुवाद्यांना मात्र काय? सिद्ध करायचे आहे कोणास ठावूक. सांगायचे असे की, गणपती बाप्पाचे वाहन उंदीर आहे. म्हणून का आपण गणपतीपेक्षा उंदराला मोठे म्हणतो? बाप्पाची मुर्ती घेतांना गणपती लहान व उंदीर मोठा मागतो का? ऐतिहासिक, अधिकृत पुरावा नसतांनाही मग निरीक्षण व चिकित्सा आपल्याला एवढीच करायची आहे की शिवरायांपेक्षा वाघ्याचा पुतळा उंच कसा? बाबासाहेबांनी म्हटले होते की, शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शिवाय या कार्यकर्त्यांमद्धे सर्वच शिक्षित आहेत. शेवटी सांस्कृतिक दहशतवादाला तरुणाईलाच सामोरे जायचे आहे. व त्यादृष्टीने त्यांची पावले पडतांना दिसताहेत. संबंधित कार्यकर्त्यांचे आंदोलन जरी आक्रमक असले तरी पण त्यांची भूमिका व केलेले कार्य तर योग्यच आहे ना. आज त्यांच्यावर होणारे आरोप किती खरे आहेत हे पहायला हवे. भांडारकर प्रकरणातही ७२ कार्यकर्ते होते. त्यांच्या केसेसही अजून चालूच आहेत. परंतू त्यावेळच्या भांडारकर प्रकरणातली भूमिका आपणास योग्य वाटते. त्याप्रमाणे दादोजीच्या पुतळ्यासंदर्भातही यात सर्व गोष्टींना राजकीय पातळीवरचा विरोधही लक्षात घ्यायलाच हवा. प्रश्न एवढा आहे की, पुरावे असतांनाही शेवटी संबंधित कार्यकर्त्यांना बळी पडावेच लागते. राम गणेश गडकरींमुळे ‘आपला राजसंन्यास’ या नाटकातून, राजसंन्यासाचे प्रयोग जरी यशस्वी झाले असतील पण छत्रपती कुळाच्या बदनामीच्या भरपाईचे काय?

राजसंन्यासाच्या नावाखाली गडकरींनी त्या स्मारकासमोरील कुत्र्याचे नाव वाघ्या ठेवून अध्यायच निर्माण केला. कुठल्याही प्रकारची माहिती नसतांनाही गडकरींनी आपले नाटक यशस्वी केले. गडकरींची मांडणी व विचार सर्वत्र बाजूंनी एकेकाळी एका विशिष्ट वर्गाला बरोबर भासत होती. जर गडकरींचा राजसंन्यास खरा असेल तर आपल्याला छत्रपती गडकरींनीच एकदा पुन्हा पटवून द्यावे की, संभाजीराजे स्त्रीलंपट होते, व्यसनी होते, अमुक होते, ढमुक होते तसे तर त्यांच्या बदनामीचा विडाच बऱ्याच जणांनी उचला आहे. आपल्या मनात येईल, असे लिखाण करुन लोकांच्या मनावर ते अधोरेखित करणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद? व हाच दहशतवाद भारतातील शिक्षित व खरा इतिहास जपणाऱ्या तरुणाईला मान्य नाही. येणाऱ्या काळात आपल्यापुढील वंशजांना या दहशतवादापासून दूर ठेवणे हाच त्यांचा मुद्दा असावा. शिवाय खोटा इतिहास हा नाटकांमध्येच शोभून दिसतो तेही स्वत:ची ओळख निर्मितीसाठी. जर स्वत:च्या अस्तित्वासाठी आपल्या सांस्कृतिकतेला तडा जात असेल तर जनभावनांचा विचारही होणे गरजेचे आहे.

फुलेंनी रायगडावरील शिवसमाधीचा शोध लावाला. हवा तेवढा रात्रंदिवस ऐतिहासिक अभ्यास करून शिवप्रेमींपर्यंत तो पोहोचवला. शिवछत्रपतींवरती पहिला व सर्वात मोठा पोवाडा लिहिण्याचे काम त्यांनी केले. शिवजयंतीही १९ फेब्रुवारी तारखेप्रमाणे त्यांनीच सुरू केली. हे अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. फूलेंनी एवढा मोठा पोवाडा लिहिला त्यात वाघ्या नामक कुत्र्याचा साधा उल्लेखही नसावा का? शिवाय गडकरीअगोदर व वाघ्याचे समर्थन करण्याच्या अगोदर महात्मा फुलेंच गेले होते ना? मग आपणास शिवनिती, शिवविचार ज्यांनी शिकवले आपण त्यांच्यावरच विश्वास न ठेवता वेगळ्याच मार्गाने भरकटतोय याची जाणीव आपल्याला कधी होईल? विषय एवढाच आहे की इतिहासाचे नवीन पध्दतीनुसार रिमिक्स करणे केव्हा थांबेल. ज्यांनी इतिहास घडविला आपल्या स्वकर्तृत्वावर मात्र त्यांचीच बदनामीची लाट सर्वच बाजूंनी वाढते आहे. महात्मा फुलेनंतर तेथे बरेचसे इतिहासकार आले,गेले. पण त्यांच्याही लेखणीत कधी वाघ्या सापडत नाही. मग वाघ्या शिवरायांसमोर आलाच कसा?

१९८१-८२ साली एका इंग्रज वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आलेल्या जेम्स डग्लज या ब्रिटीश इतिहासकाराने रायगडावरती पुस्तक लिहिले. तेथेही वाघ्याचे काहीच वर्णन नाही. त्या अगोदर १९२९ साली वा.वी. जोशींनीही आपल्या महत्वपूर्ण व कारणामीमांसक पुस्तकात एक साधी ओळही टाकू नये का? तेथेही वाघ्याच्या संदर्भातली एक ओळ नाही. म्हणजेच समर्थनवादी संघटनांनी काहीतरी उलटसुलट इतिहास लादावा व येथील भोळ्याभाबड्यांनी तो सहन करावा हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का? विचारांच्या गच्छंतीबद्दल सतत टाळाटाळ करून आपलाच इतिहास खरा असा मुद्दा रेटत जनमानसांवर एक प्रकारचा विजयच अगोदरच्या काळापासून आजतागायत सुरू आहे. सांस्कृतिक दहशतवादाची मुख्य मुळे शोधून योग्य ती उपाययोजना व्हायलाच हवी. असो, संभाजी ब्रिगेडने केलेले कार्य तेवढ्यापुरते जरी विरोधाभासातले असले अभ्यासपूर्वक नाही, दांडगाईचे आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून उमटत असल्या तरीही इतिहासाचा अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे. नुसती प्रतिक्रिया देऊन मोकळे होणे व खरे ते समाजासमोरून वदवून ठेवत नको तो विरोध करणे हे काहींचे लक्षणे आहेत. जेव्हा वाघ्यासंदर्भातली खरी हकीकत सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल तेव्हा या कार्यकर्त्यांच्या कौतुक करण्यापलिकडे दुसरा पर्यायच असणार नाही. ऐतिहासिक गोष्टी तेवत व प्रज्वलित ठेवण्यासाठी प्रचार व प्रसार माध्यम महत्वाचेच आहे. सांस्कृतिक दहशतवादाची पोळेमुळे खोलवर व मनात रूजणार नाहीत याची काळजी घेणे सर्वांचेच परमकर्तव्य आहे. नेतेमंडळी विशिष्ट व अनाठायी दबावाखाली ही गोष्ट लपवू पाहत आहेत. सत्य कधीही दबणार नाही ते उजेडात येईलच.

प्रदीप गोविंदराव देसले

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.