रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणाऱ्या चौथऱ्यावरील कुत्रा काढण्यासाठी, शिवप्रेमींचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, तसेच कुत्र्याचे समर्थन करणारेदेखील काही लोक आहेत. कुत्रा हा शिवचरित्राचे उदात्तीकरण करणारी बाब आहे, की अवमान करणारी बाब आहे. हे आपण तटस्थपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातील इतिहास हा अत्यंत पक्षपातीपणे आणि विकृतपणे लिहिला गेला आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, काव्य, नाटके, मालिका या कलाकृतीलाच इतिहास समजणारे अनेक उच्चशिक्षित लोकदेखील आपल्या देशात आहेत. इतिहास हा केवळ डोळ्यांनी वाचायचा नसतो, तर तो डोक्यानेदेखील समजून घ्यायचा असतो. भाबडेपणा आणि आंधळेपणाने आपल्या मनाचा ताबा घेतला, की अस्मितांची पायमल्ली व्हायला उशीर लागत नाही. शिवचरित्रातील अनेक प्रसंग अनैतिहासिक असतानादेखील, त्यांना विकृतपणे विविध कलांच्या माध्यमातून, विशेषतः कादंबऱ्या, नाटके, कविता, चित्रपट आणि शिल्पाद्वारे सादर करण्यात आलेले आहे; परंतु एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून शिकलेला आणि विशेषतः प्रबोधित झालेला वर्ग आपल्या इतिहासाकडे डोळसपणाने पाहू लागला आहे. सत्य ज्ञान ही मोठी शक्ती असते.

कुत्र्याबाबतदेखील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध लेखन केल्यानंतर, त्याबाबतच्या आक्षेपाचा जोर वाढला. मुळात शिवचरित्राच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि समकालीन अशा जेधे शकावली, शिवभारत, राधामाधव विलासचंपू, पर्णालपर्वतग्रहणाख्यान, बुद्धभूषण इत्यादी ग्रंथात कुत्र्याचा उल्लेख नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कुत्र्याने महाराजांच्या चितेवर उडी घेऊन स्वामिनिष्ठा दाखवली ही दंतकथा आहे, ती अनैतिहासिक आहे.

कालौघात पेशवाईत रायगडाकडे दुर्लक्ष झाले. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ साली रायगडावर जाऊन शिवसमाधीचा शोध घेतला. घाणेरी-वेलीमध्ये अडकलेली समाधी शोधून काढून म. फुले यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेस देखील कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख येत नाही. जेम्स डग्लस यांनी १८८१ साली, रायगडावरील वास्तुंचा, तसेच शिवसमाधीचा नकाशा समाविष्ट केलेले ‘बुक्स ऑफ बॉम्बे’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले, त्यामध्येदेखील कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही. कॉफर्ड नावाच्या ब्रिटिश लेखकाने १८८५ साली रायगडावर आधारित ‘आऊटर ट्रबल इन पुणे अॅण्ड डेक्कन’ या नावाचे पुस्तक लिहिले. त्यामध्येदेखील कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही.

कुत्र्याचा पहिला उल्लेख चि. ग. गोगटे यांनी १९०५ साली लिहिलेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकात आढळतो. त्यानंतर राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘राजसंन्यास’ या नाटकात कुत्र्याचा उल्लेख आला. गडकरींचे ‘राजसंन्यास’ नाटक हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची यथेच्छ बदनामी करणारे नाटक आहे. गडकरी यांनी केलेली संभाजीराजांची बदनामी इतक्या खालच्या स्तरावरील आहे. की ते लिहिण्याचीदेखील इच्छा नाही.

कलकत्ता येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) या संस्थेच्या प्रयोगशाळेत १९२५ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरील उत्खनीत हाडांचे परीक्षण झाले. त्यामध्ये कुत्र्याची हाडं असल्याचा उल्लेख नाही. प्रयोगशाळेने तसे १२ जानेवारी १९२६ रोजी कळविले. त्यामुळे कुत्र्याची चितेतील उडी ही दंतकथादेखील खोटी ठरते.

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी १९२६ साली रायगडावर बांधली. त्यासाठी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. यापूर्वीदेखील तुकोजीराव होळकर यांनी पुण्यातील शिवस्मारक उभे करण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत दिलेली होती. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेले शिवचरित्र इंग्रजीत यावे यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली, तसेच ते शिवचरित्र जगभर पाठवून दिले. इंदूरमध्ये शिवजयंती उत्सवाला तुकोजीराव होळकरांनी सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराज आणि तुकोजी होळकर हे अत्यंत जिवलग मित्र होते. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांची सख्खी चुलत बहीण चंद्रभागा यांचा विवाह तुकोजीराव होळकरांचे सुपुत्र यशवंतराव होळकर यांच्याबरोबर जमवला. पुढे तो विवाह धुमधडाक्यात पार पडला. मराठा-धनगर हे एकमेकांचे शत्रू नसून, ज्ञातिबांधव आहेत, हे राजर्षी शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर यांनी दाखवून दिले.

तुकोजीराव होळकर यांनी रायगडावरील शिवस्मारकसमाधीसाठी दिलेल्या मदतीच्या पैशातून न. चि. केळकर, खेर, दीक्षित इत्यादी मंडळींनी शिवरायांच्या समाधीशेजारील चौथऱ्यावर कुत्र्याचा पुतळा १९३६ साली बसविला. त्यासाठी संदर्भ म्हणून जो शिलाफलक लावण्यात आलेला आहे, त्यावर ‘राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकातून’ असा उल्लेख केलेला आहे. शिवरायांच्या इतिहासाची बदनामी करणारे ‘राजसंन्यास’ हे नाटक इतिहासाचा पुरावा होऊ शकते काय ? ‘राजसंन्यास’ हे नाटक आहे, ते विकृत आहे, ते शिवकालीन नाही, ऐतिहासिक नाही. त्यामुळे रायगडावरील कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक आहे, हे सिद्ध होते.

तुकोजीराव होळकरांनी शिवस्मारकाला मदत केलेली आहे, कुत्र्याच्या पुतळ्याला नाही; पण ब्राह्मणांच्या विकृतीला संरक्षण मिळावे यासाठी तुकोजीराव होळकरांसारख्या शिवभक्त महापुरुषाला वेठीस धरण्यात आलेले आहे, याचा आपण शांतपणे विचार करावा. ब्राह्मणांनी होळकरांचीदेखील बदनामी केली. शिवरायांसाठी हजारो मावळ्यांनी जीवदान दिले. त्यांची नावे इतिहासाला ज्ञात नाहीत; पण कुत्र्याला वाघ्या हे नाव कोठून आले? हे विकृत ब्राह्मणी डोक्यातून आलेले आहे.

शिवरायांचा पुतळा मेघडंबरीत बसवावा म्हणून शिवप्रेमींना, त्यांच्या वंशजांना संघर्ष करावा लागतो. तसा कुत्र्याचा पुतळा बसवावा म्हणून कोणी संघर्ष न करता, १९३६ साली शिवसमाधीशेजारील चौथऱ्यावर कुत्र्याचा पुतळा बसविलाच कसा?

न. चि. केळकर यांनी १९३६ साली कुत्र्याचा पुतळा बसविला. हे तेच न. चि. केळकर, जे राजर्षी शाहू महाराजाना ‘स्वराज्यद्रोही छत्रपती’ म्हणत असत! ब्राह्मणेतर, म्हणजेच बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीराजांना बदनाम करण्यासाठी, ब्राम्हणांनी संघटित आणि नियोजित पद्धतीने रायगडावर शिवसमाथीच्या शेजारील चौथऱ्यावर शिवरायांच्या समाधीपेक्षा जास्त उंचीवर सदर पुतळा बसविलेला आहे. ही बाब शिवचरित्राला कलंकित करणारी आहे. त्यामुळेच शिवप्रेमींनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्या कुत्रा काढला, तर त्यांच्यावर पोलिस कारवाई झाली. लगेचच ब्राह्मणांनी प्रशासनाला हाताशी थरून २ ऑगस्टला कुत्र्याचा पुतळा तेथे पुन्हा बसविला. कुत्रा काढण्याचा अधिकार शिवप्रेमींना नसेल, तर तत्काळ बसविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? त्यामळे रायगडचे जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, तहसीलदार, पुरातत्वचे अधिकारी यांच्यावरदेखील पोलिस कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभाग यांनी पुढाकार घेऊन, इतिहासतज्ज्ञांची समिती नेमावी. समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने कुत्र्याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा हा प्रश्न चिघळत राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

जय जिजाऊ । जय शिवराय ।।


श्रीमंत कोकाटे
(प्रसिद्ध इतिहासतज्ञ)

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.