वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या या मंडळींनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे नियमबाह्य कृत्य केले? अशा अनेक प्रश्नांचे काहूर आज प्रत्येकाच्या मनात उठलेले दिसते. या प्रश्नाच्या तळाशी जाऊन ‘वाघ्या कुत्रा शिवचरित्रात कसा, कुणी व कशासाठी घुसवला, हे जाणून घेण्याकरिता हा शब्दप्रपंच!

वाघ्या कुत्र्याचा जन्म:
चि. ग. गोगटे या कथाकाराने इ.स. १९०५ साली ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकातुन दंतकथा रचित ‘वाघ्या’ कुत्र्याला जन्मास घातले. या पुस्तकातील पुढील उतारा वाचल्यावर हे लक्षात येईल –

“शिवाजी महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे पार्थिव पालखीत घालून दहन भूमीवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत शिवाजी महाराज नसून, ती रिकामी चालविली आहे, असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन महाराजांच्या चितेत उडी घातली व आपणास जाळून घेतले.”

राजसंन्यास नाटकातील वाघ्याः
इ.स. १९२२ साली संभाजी राजांची बदनामी करणारे राम गणेश गडकरी यांच्या मृत्यूपश्चात ‘राजसंन्यास’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आले. याच नाटकातील पुढील उतारा वाघ्या कुत्र्याच्या दगडी चबुतऱ्यावर बसविलेल्या संगमरवरी फलकावर कोरलेला आहे, तो असा-

“थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्थाघरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरत नसे. अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली…..!”

राजसंन्यास’ लिहिण्यामागचा गडकऱ्यांचा हेतू:
राम गणेश गडकरी या नाट्यलेखकाने १९२२ च्या कालावधीत शिवचरित्राची विकृती, संभाजी राजांची बदनामी व स्वजातीची काळजी वाहत अत्यंत द्वेषबुद्धीने, सुडाच्या भावनेने व महाराष्ट्राच्या तेजःपूंज छत्रपतींना अगदी खालच्या पातळीवर बदनाम करण्याकरिता ‘राजसंन्यास’ या नाटकाची निर्मिती केल्याचे दिसून येते. वाचकांसमोर इतिहासाची सद्सद्विवेकबुद्धीतून चिकित्सा व्हावी या हेतूने या नाटकातील काही वाक्य, संवाद येथे देत आहोत. शिवरायांचा अपमान करणारा हा संवाद-

“अरे, शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा, नाकी डोळी नीटस, काळ गेल्या रंगाचा, राकटलेल्या अंगाचा, हरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे-पुसणे बेतास बात, गुडघ्यात अंमळ अधू, असा एक इसम होऊन गेला! त्याची काय बरे मातब्बरी सांगतोस एवढी? म्हणे हिंदुपदपाच्छवाई उठवली! काय रे मोगलाई मोडली अन् मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते? शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे लागले, का शेळीने आपले पोर वाघाच्या नेट्याला दिली, का कणसातून माणसे उपसली? अरे केले काय शिवाजीने असे ? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती, ती मराठेशाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झाले इतकेच! त्यातून तुला खरे सांगू? अरे, खरा मोठेपणा अशा आरडाओरडीवर नसतो ! शिवाजीची खरी लायकी चारचौघात पुढे कळणार आहे. त्या माणसात काही जीव नाही रे!” (राजसंन्यास-पृष्ठ-२६)

वरील नाट्यसंवाद काळजीपूर्वक वाचवा. शिवछत्रपतींबद्दल राम गणेश गडकरींनी जी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली, त्याच गडकऱ्यांच्या नाटकातील ‘वाघ्या’ आम्हाला भूषण वाटावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? राजसंन्यासमधील आणखी एक उतारा-

अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला; पण खरी करणी त्या रामदासाची आहे ! त्याने आपला दासबोध ग्रंथ लिहिला नसता, तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना! आणि दासबोध ग्रंथ कशाने लिहिला सांग बघू? शिवाजीच्या भवानी तलवारीने? शिवाजीच्या भवानी तलवारीने? नाही, दासबोध लिहिणाऱ्या लेखणीने! हो, घेण्यासारखी गोष्ट काय की. नसत्या भवानी तलवारीच्या नावाने मराठेशाहीला रंग चढला नाही; तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते! आता तूच सांग बघू भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर?” (राजसंन्यास पृ.२६)

वरील उतारा रामदासाचे महत्त्व वाढवून शिवप्रभूला कमी लेखण्यासाठी गडक-यांनी रचलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. एवढ्यावरच त्यांचा मराठ्यांवरचा रोष थांबलेला नाही, तर संभाजीराजांवर याच गडकऱ्याने आपली कलुषित लेखणी किती नीच पातळीवर नेली, याचा प्रत्यय पुढील संवादातून वाचकांनी एकाग्रतेने समजावून घ्यावा. चारित्र्यसंपन्न शंभूराजांना गडकऱ्यांच्या साहित्याने व्यभिचारी ठरवून इतिहासाला कलंकित करण्यासोबत स्वजातीचे हित जोपासले. प्रत्येकाने हा संवाद अत्यंत काळजीपूर्वक वाचावा!

संभाजी : (प्रवेश करीत) कोण तुळशी, साजणे, स्वप्नात तू आलीस का या रणमर्दावर रुसलीस? (एकदम तिचा हात धरून, मंचकावर बसवितो व तुळशीचं चुंबन घेत) थांब, प्रेम वाचाळपणानं बडबडत नाही, तर ते डोळ्यात दिसतं. आणि गालाशी असं गुलाबी बोल बोलून हदयाला हृदय जोडीत मौन धरतं. समुद्रमंथनानंतर देव, अमृतपानासाठी तुम्हा स्त्रियांच्या ओठावरच्या, स्वर्गीय सुखात सदैव रमलेले दिसतात. वस्तीलाही तिथच असतात, अमृताच्या कुंडात बुडून मरण्यापेक्षा (वक्षःस्थळाकडे पहात) या दोन अमृत कुंभांना उराशी घट्ट धरून चुंबन घेणारे देव-दानवमानव नेहमीच अशा चुंबन विलासात मग्न होतात. (तो जवळ येऊ पाहतो. तुळशी आढेवेढे घेते.) सबूर, डोळ्यात प्राण एकवटले म्हणजेच तरुणांना अधरामृताची जरुरी लागते. (चुंबन घेतो.) (मग पुढे संभाजी म्हणतो)

संभाजी: “चुंबनाची मोहनिद्रा, ही शून्यातल्या संसाराचे सौंदर्य दाखविते. तुळशी, विशाल सौंदर्याचं आकलन करण्यासाठी, तितकंच विशाल हृदय असावं लागतं. नाहीपेक्षा, तुझ्या रसरसलेल्या उरोज-कुंभावर, महाराष्ट्र जरी पटक्याची काचोळी, या संभाजीनं हौसेनं चढविलीच नसती.” (राजसंन्यास पृ. १३६)

वरील सर्व पुराव्यावरून राम गणेश गडकरी हा लेखक कोण्या मनोवृत्तीने पछाडलेला होता, यावर आपण विचार केला पाहिजे. इतिहासाचे वाचन नसणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत बहुजन समाजाला अंधारात ठेवून आपली परंपरा राखली आहे.

राजसंन्यासकाराचा ‘कुत्रा’ रायगडावर विराजमान करण्यामागे कुठला उद्देश यांना साध्य करायचा असेल? ज्याने शंभूचरित्राला कलंकित केलंय. त्या गडकरीला वरदहस्त देणारे टिळक, राजवाडे हे खरे शिवप्रेमी असू शकतात काय? लैंगिकतेच्या गर्तेत अडकणाऱ्याने मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य करावं व त्याचं बिनबुडाचं नाट्य आम्ही इतिहास म्हणून स्वीकारावं आणि संभाजी महाराजांची इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करणाऱ्या कथानकास इतिहास मानन सईराणीबाईसाहेबांच्या समाधीवर ‘कुत्रा’ चढवावा, याचाच अर्थ आम्ही अजूनही मुर्दाड आहोत.

एकंदरीत रा. ग. गडकऱ्यांची पाठराखण करणाऱ्या ‘श्वानप्रेमींनी’ आमच्या हातून काय पाप घडताहेत, याचं निदान चिंतन तरी करावे.

वाघ्या कुत्रा’ व तत्कालीन संदर्भसाधने:
इ.स. १८६९ साली म. फुलेंनी शिवसमाधी शोधली. त्यानंतर रायगडावर भेट देण्यास आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी कुठेही ‘वाघ्या’ कुत्र्याचा उल्लेख केलेला आढळत नाही. ‘कुळवाडीभूषण’ हा शिवरायांवर म. फुलेंनी रचलेल्या प्रदीर्घ पोवाड्यात ‘वाघ्याचा’ उल्लेख नाही. इ.स. १८९३ साली कुलाबा गॅझेटिअरमध्ये रायगड किल्ल्याचा अर्वाचीन काळातील पहिला नकाशा तयार केल्या गेला. त्या नकाशात ‘वाघ्या’ कुत्र्याची समाधी असल्याचा उल्लेख आढळत नाही. वि. वा. जोशींनी १९२९ साली प्रकाशित केलेल्या ‘राजधानी रायगड’ या पुस्तकातदेखील वाघ्याचा वा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही.

शिवाजी स्मारक समिती:
शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराकरिता इ.स. १९२५ साली शिवाजी स्मारक समिती (पुणे) गठित करण्यात आली. २६ मार्च १९२६ पर्यंत शिवसमाधीचे काम पूर्णत्वास गेले व याच समितीने जुन्या समाधीवर नव्याने ‘वाघ्या कुत्रा’ चढविला. इथली मूळ समाधी संभाजी राजांच्या मातोश्री व शिवरायांच्या पत्नी महाराणी सईराणी बाईसाहेबांची! इ.स. १६७४ ते १६७६ दरम्यान सईराणी निवर्तल्या! त्या महाराजांच्या अत्यंत लाडक्या महाराणी होत्या म्हणूनच त्यांच्या स्मृती चिरकाल टिकन राहाव्यात व इतिहासाला नवी वाट दाखविण्याची प्रेरणा त्यातून येणाऱ्या पिढीला होत राहावी म्हणून खुद्द शिवरायांनी ही समाधी बांधली. पुढे २७ जून १६८० साली सोयराबाई सती गेल्या. या महाराजांच्या दुसऱ्या महाराणी होत. त्यांची समाधीसुद्धा सईबाईंच्या समाधीसमोर ‘सती शिळेच्या’ रूपाने विराजित आहे. खुद्द शिवरायांची समाधी सईबाईसाहेब व जगदीश्वर मंदिराच्या दरवाज्याच्या मध्यभागी आहे. एकंदरीत दोन्ही महाराण्यांसोबत शिवराय रायगडावर विराजमान आहेत. निस्सीम प्रेमाचं हे ज्वलंत उदाहरण शिवाजीस्मारक समिती मंडळाने सईबाईसाहेबांच्या समाधीवर ‘वाघ्या कुत्रा’ बसवून कलंकित व बदनाम केलं आहे, आता तरी आपण जागं व्हावं. निदान इतिहासावर चिंतन करावं जेणेकरून आपल्या महापुरुषांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचा ठेवा तथाकथित भटमान्य इतिहासकार आपल्यापासून हिरावून घेणार नाहीत. जर असं झालंच तर मात्र उद्या आपल्या येणाऱ्या विज्ञानवादी पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत.

टिळक पुरस्कृत शिवाजी समितीस प्रबोधनकार ठाकरेंचा दणकाः
टिळकांद्वारे निर्माण झालेल्या शिवाजी स्मारक समितीचा प्रबोधनकार ठाकरेंनी साताऱ्याला १९२२ साली खरपूस समाचार घेताना म्हटले, “शिवछत्रपतींच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायांचे गुणगान करण्यापेक्षा आमचे हिंदवी स्वराज्य का नष्ट झाले. त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साताऱ्यात पाडला, त्याचा आता जर आपण इतिहासाच्या सामोपचाराने विचार केला, तर सध्याच्या स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकता येतील. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणे सांगणारे टिळकानु टिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. आज स्वराज्य शब्दाचे मनमुराद पीक आले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडाच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने जपून वागले पाहिजे.”

वाघांची संख्या कमी झाली म्हणूनच कुत्रे माजलेत:
कुत्र्यांना महत्त्व देणाऱ्यांनी अगोदर इतिहास वाचावा. शिवरायांवर निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती इतका घोर अपमान सहन करू शकत नाही. बेगड्या शिवप्रेमींची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे. शिवरायांना राजकारणापुरते वापरणारे हे राजगुंडे जिजाऊ बदनामीप्रसंगी मौन का बाळगतात? शिवरायांच्या बदनामीप्रसंगी घराबाहेर का निघत नाहीत? शिवजयंतीचा वाद का उकरून काढतात? संभाजीराजांबद्दल आदर नसणारे हे धर्मद्वेष्टे टिळक. गडकऱ्यांची पाठराखण का करतात? यावर चिंतन करणे काळाची गरज आहे. एकंदरीत शिवप्रेमी वाघांची संख्या कमी पडते म्हणूनच ‘वाघ्याच्या’ नावाला बदनाम करणारे कुत्रे माजतात!


अमोल मिटकरी

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.