पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो.

ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी महाराजांसाठी नव्हे तर “भवानी-भारतीसाठी” समर्पित आहे. भारतीय इतिहासासाठी ते वास्तूसंग्रहालय उभारत आहेत. “पुरातन काळापासून भारतीयांनी देश हा स्त्रीशक्तीला समर्पित केल्याचे कौतुक वाटते” असे ही ते लेखाच्या मध्यात लिहितात. लेखाच्या शेवटी त्यांनी भारताला पर्यायी शब्द म्हणून “भवानी-भारती, इंडिया” असे शब्द सुचवले आहेत. गोतीयेंच्या वरील तिन्ही मुद्यांवरून असे जाणवते की त्यांना “भवानी-भारती” या पुरातन स्त्री देवतांना केंद्रस्थानी ठेऊन वस्तुसंग्रहालय बनवायचे आहे. तसेच श्री गोतीये हे पुरातन काळातील “भवानी-भारती” या देवतांचा धागा शाक्तधर्मीय शिवरायांपर्यंत आणून ठेवतात. आई भवानी बद्दल सर्व महाराष्ट्रीय तसेच भारतीय जनतेला आपुलकी आणि आदर आहे. भवानी मातेचे महत्व असाधारण आहे. पण गोतीये भवानी मातेचे नाव घेत भारती या वैदिक देवतेचे महत्व वाढवू पाहत आहेत असे दिसते. तसेच भवानी या देवतेचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसताना भवानीचे वैदिकीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे जाऊन ते असंबंधपणे आर्य आक्रमक हे परकीय की भारतीय या मुद्याला हात घालतात. ख्रिश्चन मिशनरी आणि मार्क्सवादी इतिहासकारांना दोष देत जाणीवपूर्वक विषयांतर करतात. हे जाणीवपुर्वकचे विषयांतर त्यांच्या प्रेरणा कोण हे दर्शवत आहे. गोतीये “आम्हाला शिवाजी महाराजांना आधुनिक भारताचे राष्ट्रीय हिरो करायचे आहे” असे म्हणत विविध सात भाषा जाणणार्‍या शिवाजी महाराजांना मराठी-अमराठी प्रादेशिक मुद्यामध्ये अडकवू इच्छितात. त्यासाठी अमराठी मिर्झा राजेंना शिवरायांचा शत्रू म्हणून सांगायला विसरत नाहीत. स्वतः फ्रेंच असूनही मराठीचा अभिमान असल्याचे सांगतात. संग्रहालयाची भाषाही मराठी आहे असे लिहितात. अमेरिकेसारखे बलाढय देश आज शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राचा वापर आणि अभ्यास त्यांच्या लष्करात करत आहेत. अशा जागतिक हिरोला गोतीये मराठी आणि हिंदू धर्म या संकुचित मुद्यांमध्ये अडकवत आहेत. वरून त्यांना राष्ट्रीय हिरो करण्याचा खोटा दिखावा करत आहेत.

पुढे गोतीये “शिवराय हे निधर्मी होते तरीही ते समर्पित हिंदू होते” असे हास्यास्पद विधान करतात. जर शिवराय निधर्मी म्हणजे धर्माला न मानणारे असे होते तर पुन्हा ते कोणा एका धर्माचे समर्पित अनुयायी कसे होतील? गोतीये शिवाजी महाराजांना “देव नव्हे तर देवाचे एक साधन” मानतात त्यासाठी ते विभूती हा शब्द वापरतात. त्यासाठी अरबिंदो बोस यांनी नेपोलियनला विभूती म्हटल्याचा असंबंध दाखलाही देतात. नेपोलीयनला कोणी विभूती, देव अथवा भूत जरी म्हणाले तरी त्याचा शिवरायांना विभूती ठरवण्याशी काय संबंध? अमावस्येच्या अंधार्‍या रात्रीचा आधार घेत मुहूर्त न पाहता लढाया जिंकणारे शिवराय हे अंधश्रद्धेला भिक घालणारे नव्हते. कोणालाही विभूती मानने ही एक अंधश्रद्धा आहे. तसेच ते त्या व्यक्तीचे कर्तृत्व नाकारणारे आहे. त्यांना विभूती म्हणणे त्यांच्या क्रांतीकारक विचारांचा अवमान करणे आहे.

सर्वात गंभीर, संवेदनशील आणि संतापजनक मुद्दा म्हणजे गोतीये लिहितात कि “मी फ्रेंच असून… शिवाजी कोणत्या जातीचे होते? त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे वडील कोण होते? हे मुद्दे माझ्यासाठी गौण आहेत..” या गोतीये महाशयांना शिवराय मराठी असल्याचा अभिमान आहे. ते निधर्मी असूनही यांना ते समर्पित हिंदू वाटतात. शिवरायांचे मराठीपण आणि हिंदू असणे यांना गौण वाटत नाही. पण त्यांची जात कोणती? त्यांचे गुरु कोण? व वडील कोण? हे गौण वाटते! एक वेळ जात आणि गुरूचा मुद्दा सोडूनही द्या पण वडील कोण? हा प्रश्न निर्माण करायची गोतीयेची हिंमत तरी कशी होते? हा प्रश्न होऊच कसा शकतो? शिवरायांच्या जयंती पासून मृत्यूपर्यंत अनेक मुद्दे संवेदनशील झाले असताना. कसलीही वैचारिकता नसणार्‍या, असंबंध, विस्कळीत,गोंधळलेले लिखाण करणार्‍या, शिवचरित्राबाबत काडीचेही गांभीर्य नसणार्‍या गोतीयेला वस्तुसंग्रहालय उभारू देऊ नये.

गोतीयेलाच काय पण भारतात कोठेही शिवरायांबाबत अथवा कोणाही महामानवांबाबत काहीही लोकाभिमुख (प्रचारक) कलाकृती, साहित्य निर्माण होत असेल तर त्यात जाणकारांचा सहभाग असला पाहिजे नाहीतर लोक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यातून संघर्ष आणि अशांतता निर्माण होऊ शकते. मुळात एक सामान्य पत्रकार असणार्‍या गोतीयेकडे १०० कोटी आलेच कोठून? त्यांच्या पाठीशी कोण कोण आहेत? याची चौकशी व्हावी. जेम्स लेनमुळे शिवप्रेमींच्या मनावर झालेली जखम अजून खपली धरत नसताना हा नवा लेन महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होऊ नये याची महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल घ्यावी.

-अविनाश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.