हजारो वर्षांपूर्वी जगभर मानवसमूह टोळ्यांनी राहत असत. नागरीकरणाच्या वाटचालीत याच टोळ्या एकत्रित आल्या. त्यांचे गणराज्य झाले. त्यातून भाषा व संस्कृतीचा विकास झाला. विखुरलेल्या गणांना एकत्र ठेवण्यासाठी भाषा व संस्कृती हे अस्मितेचे प्रतीक ठरले. रक्ताच्या नात्यापेक्षा ‘भाषा व संस्कृती’ जवळचे ठरले. त्यामुळेच आज जगभर तसेच भारताच्या विविध भागांमध्ये अनेक भाषा व अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य व मणीपूर राज्य भारत देशात आहेत: परंतु दोन्ही राज्यांत भाषा व संस्कृती या अंगाने कोणतेही साम्य नाही. एवढेच नाही तर शरीररचनाही भिन्न आहेत. भूतकाळात अंतर्गत तसेच बाहेरील टोळ्यांशी संघर्ष होत असत. भारतातही परकीय आक्रमक वा घुसखोरांच्या वसाहती झालेल्या आहेत. जेत्या टोळ्या पराजित टोळ्यांवर आपली भाषा व संस्कृती स्वीकारण्याची सक्ती करत. पुढच्या काही पिढ्यांमध्ये मूळची गणसंस्कृती व गणभाषा भ्रष्ट होत होत परकीय भाषा व संस्कृतीमध्ये रूपांतरित होत जाते. भारत देशावरील प्रथम भाषिक व सांस्कृतिक आक्रमण आर्यांचे असल्याचे आता मान्य झाले आहे.
आर्य घुसखोर व आक्रमकांनी मूळची सिंधूजनांची सिंधू भाषा व सिंधू संस्कृती भ्रष्ट करून त्यांच्यावर संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती लादली होती. त्यानंतर भारतावर अनेक परकीय आक्रमणे शक, हूण कुशाण, अलेक्झांडर, मोगल, ग्रीक, पोर्तुगीज, हबशी, अरबी, इंग्रज सुरूच राहिले. आर्यवंशीय परकीय आक्रमक वगळता इतर वंशांचे आक्रमक एकतर भारतातच स्थिरावले व संपले. अथवा परत देशाबाहेर गेलेत. तरीही त्यांच्या संस्कृतीचा व भाषेचा प्रभाव टिकून आहे. भारतीय सिंधू संस्कृती व सिंधु भाषा आज भ्रष्ट वा अशुद्ध झाल्या आहेत. भारतीय प्रदेशावर सत्ता गाजविणारे प्रमुख आक्रमक म्हणजे आर्य, मोगल व इंग्रज. या परकीय आक्रमकांची राजसत्ता अनेक वर्षे भारत देशावर होती. त्यामुळे आर्यांची संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती, मोगलांची फारशी भाषा व इस्लाम संस्कृती नि इंग्रजांची इंग्रजी भाषा खिश्चन संस्कृती भारतीय समाजमनावर आजही बिंबलेली आहे. याशिवाय इस्लाम व ख्रिश्चन संस्कृतीला पोषक पोर्तुगीज, हबशी, अफगाणी, इराणी, इराकी, फ्रेंच, डच, स्पॅनिश आक्रमकांचाही काही प्रदेशावर प्रभाव असल्याचे दिसतेच.
भारतात आज कुणीही एखाद्या विशिष्ट शुद्ध वंशाचे वा संस्कृतीचे नाही. आर्य आक्रमक व घुसखोर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय सिंधू भूमीत घुसले. त्यानंतर सुमारे चार ते साडेतीन हजार वर्षांनी इस्लामिक आक्रमक आले. त्याच दरम्यान नंतर हजार ते सातशे वर्षांत ख्रिश्चन आक्रमक आले. म्हणजेच आर्य आक्रमकांची घुसखोरी पाच हजार वर्षे जुनी आहे. आर्य आक्रमण करून भारतीय सिंधूभूमित पूर्णपणे स्थिरावले आहेत. हजारो वर्षे त्यांनी भारतावर राजकीय व धार्मिक सत्ता गाजविलेली आहे. त्यातून आर्यभाषा ‘संस्कृत भाषा’ व आर्य संस्कृती ‘वैदिक संस्कृती’ सिंधू भूमीची व सिंधूजनांची अधिकृत भाषा ठरविण्यात आली. त्यामुळेच सिंधूजनांवर संस्कृत धर्मग्रंथ व वैदिक धर्म लादण्यात आले. सिंधू संस्कृतीचे व सिंधू भाषेचे विद्रुपीकरण व भ्रष्टीकरण प्रथम आर्यांनीच केले. तेच सुरू आहे. नंतरच्या काळात हीच परकीय संस्कृत भाषा मूळच्या शेकडो भारतीय भाषा भगिनींची जननी ठरविण्यात आली. यानंतर अरबी- फारशी- फ्रेंच- इंग्रजी भाषांचा स्थानिक भाषावर प्रभाव झाल्याचे दिसते; परंतु सिंधू भाषा, सिंधू संस्कृती व सिंधू भूमी खऱ्या अर्थाने पूर्णपणे व्यापलेली दिसते, ती केवळ आर्यवंशीय परकीय घुसखोरांनीच. त्यामुळेच आज आर्य आक्रमकांनी केवळ भारतीय सिंधू भूमीतच घुसखोरी केलेली नसून, सिंधू संस्कृती प्रधान ‘सिंधू धर्मातही’ (अपभ्रंशित हिंदू) घसखोरी केलेली आहे. त्यातूनच आर्य आक्रमक सिंध भूमीचे, सिंधू जनांचे, सिंधू संस्कृतीचे सिंधू धर्माचे एकमेव मालक झालेत.
या पृष्ठभूमीवर प्रत्येक गणसमूह आपापले सांस्कृतिक, भाषिक व ऐतिहासिक अस्मितेचे जतन करत आहेत. त्याचा शोध घेत आहेत. त्यावर बसलेली, साचलेली वा लादलेली पुटे खरडून बाहेर काढत आहेत. आज भारतावरील बाह्य आक्रमणे राजकीय स्वरूपाचीच आहेत; परंतु देशांतर्गत काश्मीर, अरुणाचल, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, नक्षलवाद, माओवाद हे संघर्ष सांस्कृतिक व आर्थिक आहेत. महाराष्ट्रात मराठी अस्मितेसाठी शिवसेना जन्म घेते. त्यातून सांस्कृतिक आक्रमण म्हणून ‘छटपूजेला’ विरोध होतो, तर ‘गरबा’ हे नृत्य मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जाते. फारशी, उर्दू, भोजपुरी, इंग्रजी या भाषांना विरोध होतो, तर संस्कृत भाषेला जनाधार नसतानाही राजमान्यता मिळते. मुसलमान आक्रमकांच्या वेशभूषेला, केशभूषेला, सनातनी परंपरेला प्रचंड विरोध होतो, तर आर्य व ख्रिश्चन वेशभूषा, केशभूषा, भाषा नि अनेक सनातनी परंपरांचा सन्मान होत आहे. मुसलमान व खिश्नच परकीय आक्रमकांचे धर्मतत्त्वे, धर्मतत्त्वज्ञान, कर्मकांडे, प्रार्थनास्थळे, धर्मपुरोहित इत्यादी नाकारले आहे. त्याविरोधात द्वेषमूलक भावना निर्माण होऊन देशात व समाजात निशिद्ध मानल्या जात आहे. तर आर्य आक्रमकांचे धर्मतत्वे, धर्मज्ञान, कर्मकांडे, धर्मग्रंथ, प्रार्थना, प्रार्थनास्थळे, धर्मपुरोहित इत्यादी पवित्र मानून जसेच्या तसे आचरणात आणल्या जात आहेत. वैदिक, इस्लाम व ख्रिश्चन हे तिन्ही धर्म परकीय आहेत; पण आज वैदिक धर्मानेच भारतीय सिंधू जनांचे जीवन पूर्णपणे व्यापलेले आहे. ते स्वदेशी मानल्या जात आहे.
असे असतानाही गेल्या काही वर्षांत भारतातील जनजीवन, जनभाषा, जनसंस्कृती शुद्ध करण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसतात. यामध्ये काही काम अभ्यासपूर्ण पातळीवर होत आहे, तर काही काम केवळ राजकीय लाभासाठी भावनिक पातळीवर होताना दिसते. स्थानिक जनभाषेचा आदर म्हणून गेल्या काही वर्षांत मद्रासचे चेन्नई, बेंगलोरचे बेंगळुरू, कलकत्ताचे कोलकाता, तर बंबईचे मुंबई असे नामकरण झाल्याचे दिसते. मद्रास राज्याचे तामिळनाडू, ओरिसाचे ओडिशा, म्हैसूर राज्याचे कर्नाटक असेही नामकरण झाले आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी गेले सतरा वर्षे न्यायालयात आहे. या मागे मुळातच भावनिक राजकारण आहे. औरंगाबाद शहराचा व औरंगजेब बादशहा या मोगलाचा संबंध नाही. तसाच छत्रपती संभाजी महाराजांचाही संबंध नाही. सांस्कृतिकदृष्ट्या विचार केल्यास औरंगाबाद शहर म्हणजे मूळचे ‘खडकेश्वर’ गाव होते. निजामांचा सरदार मलिक अंबर याने या गावास ‘खडकी’ नाव देऊन तेथे निजामांची दुसरी राजधानीच वसविली होती. सन १६०० ते १६२१ या काळात खडकीचे सर्व वैभव मलिक अंबरनेच वाढविले. मलिक अंबर हा मुसलमान होता; परंतु मुळातच तो एका हबशी गुलामाचा मुलगा होता. हबशी हा अॅबेसेनिया या देशाचा अपभ्रंश आहे. गुलाम असल्यामुळे तो धाडशी, हुशार, पराक्रमी असूनही बादशहा होऊ शकत नव्हता.
औरंगाबाद शहराचे नामांतर सांस्कृतिक अंगाने करायचे झाल्यास ‘खडकेश्वर’ करावे तर राष्ट्रीय व राजकीय अंगाने करायचे झाल्यास ‘मलिकंबराबाद’ करावे. आक्रमक बाबराने श्रीराम मंदीर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली. याच अपप्रचारातून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हापासून भारतीय मुसलमान अस्वस्थ व भयभीत झाला आहे. त्यातूनच बाहेरून दहशतवादी मुस्लीम संघटना त्यांना जवळ करत आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून भारतीय मुसलमान गेल्या वीस वर्षांत कर्मठ मुसलमान बनत आहेत. सामान्य हिंदू जनतेला प्रत्येक मुसलमान दहशतवादी वाटत आहे. हिंदू व मुसलमान ‘भाईभाई’ न होता अनेकदा शत्रू म्हणूनच जगताना दिसतात. यातून ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ धार्मिक व सामाजिक तणाव वाढतच आहे. परिणामी भारतातील राष्ट्रीय भावनाही धोक्यात आलेली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर ‘मलिकंबराबाद’ केल्यास भारतीय मुसलमानांना स्वतंत्र भारतात सन्मान व सुरक्षितता असल्याचे सिद्ध होईल. बाबरी मशीदबाबत झालेली चूक दुरुस्त करता येईल. यासाठी सर्वच राजकीय व सामाजिक नेत्यांनी एकमताने चर्चा करून निर्णय घ्यावा. तो एक राष्ट्रीय विचार व राष्ट्रीय निर्णय राहील. भारत देशाचे निधर्मी धोरण प्रत्यक्षात आणून तसेच ‘संभाजी नगर’ ही राजकीय मागणी सोडून न देता महाराष्ट्राची मान व सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहराचे नामांतर ‘संभाजी नगर’ करावे. पुणे शहर व पुणे शहरातील लाल महाल हे स्वराज्याचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे थोर साहित्यिक तसेच संस्कृत पंडित होते. त्या कारणाने पुणे शहराचे नामांतर ‘संभाजी नगर’ केल्यास ते संयुक्तिक राहील. तसेच मलिकअंबर यास मुसलमानांचा प्रतिनिधी न मानता त्याला ‘गुलाम’ मानल्यास सामाजिक न्यायाच्या माध्यमातून मानवता जतन केल्याचे स्पष्ट होईल. अर्थात त्यासाठी तज्ज्ञांकडून राजकीय इतिहास समजून घ्यावा. त्यानंतर योग्य निर्णय घ्यावा.
याच सूत्रानुसार शुद्धीकरणाची व्याप्ती वाढवावी. हिंदूचे ‘सिंधू’ करावे. भारतचे ‘सिंधू देश’ करावे. देहली-दिल्ली म्हणजे पाय ठेवण्याएवढी जागा. त्यामुळे दिल्लीचे हस्तिनापूर करावे. इंद्रप्रस्थ नावही आर्यसंस्कृतीचे आहे. याच धोरणानुसार राष्ट्रीय पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत अनेक शासकीय संस्थांचे ‘ब्रिदवाक्य’ संस्कृत भाषेत आहेत. ते राष्ट्रभाषेत वा राज्यभाषेत करावेत. त्यामुळे राष्ट्रीय अस्मिता व राज्य अस्मितेचे जतन होऊन, त्या ब्रिदवाक्याचा अर्थही समजू शकेल. तसेच भारतीय सिंधू संस्कृतीनुसार सिंधू देवतांच्या पूजा व प्रार्थनेसाठी, विधीसाठी गुरव अथवा जोशी असत. त्याप्रमाणे देशभरातील सर्वच सिंधूधर्मीय प्रार्थना स्थळांचे हस्तांतरण बलुतेदाराकडे व्हावे. संस्कृत धर्मग्रंथ, संस्कृत मंत्र, संस्कृत विधी, संस्कृत प्रार्थना बंद कराव्यात. त्यांचे जतन पुरातत्व विभागात करावे. सर्वच स्त्रियांना सर्वच मंदिरे सरसकट उघडी असावीत. राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत याबाबत एकमत नाही. त्यामुळे नव्याने राष्ट्रभावनेतून सर्वसमावेशक प्रेरणादायी गीत लिहून घ्यावे. वाराणसी शहराचे नाव काशी-बनारस आहे. ते मूळचे ‘साकेत’ करावे. पाटणाचे पाटलीपुत्र करावे. हरियानाचे हरयाना करावे.
नामांतराची गरज सांस्कृतिक की राजकीय, हे प्रज्ञावंतांनी स्पष्ट करावे. भारत वा महाराष्ट्रामध्ये नामांतराचा इतिहास आनंददायी वा प्रेरणादायी नाही. याची कारणे जनतेच्या रोषात नसून, राजकीय नेत्यांच्या राजकारणी खेळीत आहेत. जनतेचे अज्ञान तर राजकारण्यांचे कारस्थान अशी ही दुष्ट युती होते. नामांतर म्हटले, की मूळच्या नावाशी निगडित एखाद्या समूहाच्याही अस्मितेचा प्रश्न उभा राहतो. तेही भारताचे नागरिक आहेत. राष्ट्रीय अस्मिता म्हणून अनेक जुनी स्मारके जतन केलेली आहेत. तसेच नवीन स्मारके बांधली आहेत. ही नवीन स्मारके परकीय आर्य आक्रमक वंशजांचीच आहेत. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा? भारतीय राज्यघटनेने निधर्मी लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करण्याची व आचरणात आणण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. सिंधू (हिंदू), वैदिक, जैन, बौद्ध, लिंगायत, ख्रिश्चन, इस्लाम, शीख, पारसी, यहुदी अशा सर्वच धर्मांच्या लोकांनी आपसात गुण्यागोविंदाने नांदावे. हीच शिवधर्म संकल्पना आहे. सांस्कृतिक संघर्षाला मर्यादा नसतात. त्यात कोण चुकले, कोण बरोबर याचा अंतिम निकाल कधीच लागत नसतो. या संघर्षात सामान्य जनता भरडल्या जाते. हा संघर्ष कोणालाच नको असतो; पण काही विकृतींना स्वस्थ बसवत नसते. अशावेळी अति झाल्यावर अशा विकृतींना आळा घालण्यासाठी कुणीतरी समोर येत असते. विकृतांनी केलेली ‘घाण’ ही घाण आहे, हे मान्य करण्याची मानसिकताच हरवलेली असते. म्हणून आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही सन १९५० पूर्वीचे जे जे त्याज्य त्यावर बहिष्कार टाकू. तसे आचरण करू. एक देश, एक राष्ट्र, एक राष्ट्रधर्म याचा स्वीकार करू. वैयक्तिक धर्म म्हणून प्रत्येकाचा आदर करू. यातच सर्वांचे हित आहे. उत्तम विचार, उत्तम आचार स्वीकारू. मानवतावाद हाच राष्ट्रधर्म मानू.
–
पुरुषोत्तम खेडेकर
(संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ)