मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण.

विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले।

महात्मा जोतिबा फुले यांना वाटले होते, की बहुजनांच्या साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे अविद्या. त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन धार्मिक कर्मकांडाच्या रूपाने भटशाही त्याला लुबाडते, त्याच्या अक्षर शत्रुत्वाचा फायदा घेऊन सावकार त्याला फसवितो आणि सरकारी कचेरीतला भट कारकून त्याची अडवणूक करतो. बहुजन समाज शिकून ज्ञानी झाला, तर त्याची अधोगती थांबेल असा त्या महात्म्याचा अंदाज होता; परंतु दुर्दैवाने जोतिबांचा हा भाबडा आशावाद खोटा ठरला. बहुजन समाज शिकून विद्वान झाला, पण सत्यनारायणाची पोथी काही बंद झाली नाही, उलट कुंभमेळ्याच्या आयोजनावर सरकारी तिजोरीतले हजारो कोटी खर्च होऊ लागले, आणि सरकारी आशीर्वादाने मोठमोठ्या यज्ञविधींचे आयोजन होऊ लागले. बाबा महाराजांना मोठी राजकीय प्रतिष्ठा मिळू लागली. शेतकऱ्यांची पोर शिकून पदवीधर झालीत; पण सावकारांच्या मगरमिठीतून त्याची सुटका काही झाली नाही, उलट शेतकऱ्याला लुटणारा ‘जिल्हा सहकारी बँक’, नावाचा नवा महाठग तयार झाला. सरकारी कचेरीतील भट कारकूनाच्या जागी मराठा बाबू आला; पण शेतकऱ्याची अडवणूक काही थांबली नाही. कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे जात नव्हता तो आजही जात नाही. जस जसे बाबूंचे पगार वाढत गेले तस तसे कागदावरील वजनात वाढ होत गेली. भ्रष्टाचाराला चटावलेली नोकरशाही सख्ख्या भावालाही सोडत नाही, तेथे जात वाल्याचा मुलाहिजा कसला!

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, तरी शेतकऱ्याच्या हालअपेष्टा संपल्या नाहीत आणि महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता आली; परंतु शिवशाही काही अवतरली नाही.

चूल विझू देऊ नकाः नुकतेच डिसेंबर महिन्याच्या शेवटी अकोला येथे मराठा सेवा संघाचे रौप्य महोत्सवी महा अधिवेशन थाटात पार पडले. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे सावट या संपूर्ण अधिवेशनावर जाणवले. ‘बापहो आमची चूल विझू देऊ नका’ ही संकल्पना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. प्रत्येक वक्ताने आपल्या भाषणात वाढत्या शेतकरी आत्महत्यांबद्दल चिंता व्यक्त केली. या पृष्ठभूमीवर आपल्या उद्घाटनाच्या भाषणात भारत सरकार वजनदार मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपूत्र माननीय नीतीन गडकरी यांनी शेतकऱ्याला हिंमत देणारे दोन शब्द बोलणे मोठे संयुक्तीक ठरले असते; परंतु त्यांनी तसे काही केले नाही, उलट ‘बदलत्या काळात पीक पॅटर्न बदला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला अनुरूप शेती करा, असा सल्ला देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार भाव देणे शक्य नाही हे नीतीन गडकरी यांनी यवतमाळच्या समेत जाहीरच करून टाकले. या देशातील राजकारण्यांच्या ढोंगीपणाला खारेच तोड नाही. विरोधात असताना हमीभावाच्या गोष्टी करायच्या, कापसाला ६०००/-, सोयाबीनला ५०००/-, धानाला ३०००/- भेटलेच पाहिजे अशा भीम गर्जना करायच्या आणि सत्तेत आले, की ‘वीज देतो, पाणी देतो, सबसिडी देतो, फक्त हमीभावाचं, तेवढं सोडून बोला,’ हीच सगळ्या राजकीय पक्षांची रीत आहे.

आजकाल विरोधकांनाही शेतकयांच्या प्रेमाचे मोठे भरते आले आहे. कर्जमुक्ती साठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीत ज्यांनी काठ्या घातल्या, त्यांनीच कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण हिवाळी अधिवेशन उधळून लावले. शेतकऱ्यांच्या हिताबद्दल छान-छान बोलणे ही आता नेत्यांची फॅशन झाली आहे. काही दिवसांपूर्वी माननीय शरद पवार साहेबांच्या पंचाहत्तरी निमित्त ‘भव्य अमृत महोत्सवी सोहळा,’ पुण्याच्या रेसकोर्सवर थाटात साजरा झाला. पवार साहेबांनी मोठे भावनिक भाषण केले. “माझे ईमान काळ्या मातीशी आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत राहील…” वगैरे. शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहेत यात शंकाच नाही, परंतु स्वामीनाथन आयोग २००६ साली सरकारला सादर करण्यात आला, तसेच मुळात बाजारपेठेचे भारतीय कृषीवर होणारे परिणाम, यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या शरद जोशींच्या टास्कफोर्सचा अहवाल २००५ साली सरकारला सादर करण्यात आला. २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत असलेल्या यूपीए सरकारने हे दोन्ही अहवाल दहा वर्षे दाबून ठेवले. त्या सरकारमध्ये माननीय शरद पवार साहेब दहाही वर्षे एक वजनदार कृषिमंत्री होते; परंतु या दहा वर्षांत या दोन्ही अहवालाबाबत पवार साहेबांनी चकार शब्दही काढला नाही. याचा अर्थ काय?

आत्महत्या नाही हत्याः मराठा सेवा संघ ही एक शक्तीशाली सामाजिक संघटना आहे. दिल्लीच्या पातशाहीला हादरे देणाऱ्या मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास आहे. बहुजनांच्या हितासाठी दिल्लीला जागे करण्याची ताकत आज या संघटनेमध्ये आहे; परंतु ही ताकत कुठे आणि केव्हा वापरावी याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. सततच्या तोट्यामुळे गळ्याभोवती कायम कर्जाचा फास हे शेतकरी आत्महत्यांचे प्रमुख कारण आहे. त्या पृष्ठभूमीवर “आत्महत्या नको कर्जवसुलीसाठी छळणाऱ्यांची हत्या करायला शिका,” असे मोठे प्रक्षोभक आव्हान मराठा सेवा संघाचे संस्थापक माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी शेतक-यांना केले आणि शेतकयांना कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या सावकारांच्या आणि बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा आदेश त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिला. हा कार्यक्रम शेतकयांना तात्पुरती हिंमत देणारा असला, तरी प्रश्नाचे गांभीर्य बघता, हा तर बंदुकीने मच्छर मारण्याचा प्रकार झाला. वाघाला कुणी दगड मारला, तर वाघ दगडाचा चावा घेत नाही जिकडून दगड आला त्या दिशेचा वेध घेतो. शेतकयाच्या दुर्दशेचे कारण सरकारी धोरणात दडले आहे. औद्योगिक विकासासाठी शेतीमालाच्या किमती कमी ठेवणे, हे नेहरू प्रणीत समाजवादी नियोजन व्यवस्थेचे मुख्य सूत्र होते. आज त्या समाजवादी संकल्पनेला मध्यम वर्गीय, बिगर शेती, शहरी समाजाला खूष ठेवण्यासाठी कृषी उत्पादनांच्या किंमती वाढू न देणे, अशा लोक-लुभावण कार्यक्रमाचे स्वरूप आले आहे. या शेतकरी द्रोही धोरणावर प्रहार करणे हे कोणत्याही शेतकरी हितैशी व्यक्ती वा संघटनांच्या आंदोलनाचे मुख्य सूत्र असायला हवे.

स्वामीनाथन समितीचा आग्रहः शेतकऱ्यांच्या दुखण्यावर परिणामकारक उपाय सुचविणाऱ्या डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणारी मागणी जर या अधिवेशनात मराठा सेवा संघाच्या शक्तीशाली स्टेजवरून केल्या गेली असती, तर शेतकऱ्याचा आवाज दिल्लीत पोहोचला असता. मराठा सेवा संघाचे कार्य देशभर आहे. वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या प्रतिनिधींनी समाजाच्या उत्कर्षासाठी झटण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली. मराठा हा मूलनिवासी शेतकरी, त्याने शेती करण्यासाठी गावे वसविली, तो ७५% मराठा समाज आजही शेतीवरच जगतो आहे. शेतकऱ्याचे हीत हेच बहुजनसमाजाचे हीत आहे. माजी पंतप्रधान स्व.चरण सिंग म्हणायचे “भारत की समृद्धीका रास्ता खेत और खलियानोसे जाता है” हे राज्यकर्त्यांना कळते; पण वळत नाही आणि सर्वांना एका वळणावर आणण्याची ताकत मराठा सेवा संघामध्ये आहे हे या अधिवेशनात दिसून आले आहे.

माननीय स्व. काशीराम यांनी मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी ‘बामसेफ’ ही कर्मचारी संघटना स्थापन केली. आरक्षणाच्या दोराने सरकारी नोकरीचा भक्कम बुरूज सर करून, सुरक्षित जीवन जगत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या या संघटनेजवळ, गावातील पलाटावर व शहरातील झोपडपट्टीत दारिद्रयाचे जीवन जगणाऱ्या आपल्या बांधवांसाठी काहीही कार्यक्रम नाही. मराठा सेवा संघात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे तेव्हा मराठा सेवा संघाचा बामसेफ होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. शेतकयांचे हीत म्हणजेच समाजाचे हीत ही खूणगाठ बांधून मार्गक्रमण केले, तर समाज आणि देश तर पुढे जाईल. त्याच बरोबर समाजऋण फेडल्याचे खरे समाधानही संघाच्या प्रत्येक पाईकाला मिळेल.


विजय लोडम
(मूर्तिजापूर)

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.