मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस! सुमारे ३२५ वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला! सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात, भीमाइंद्रायणीच्या संगमावर, स्मशानशांतता पसरली होती! ती वाट पाहत होती उद्याची! उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार होती, चैत्र शुद्ध प्रतिपदा! मराठी नववर्षदिन- गुढीपाडवा! ११ मार्च १६८९ हाच तो दिवस होता! मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी आज तंतोतंत झाली होती. याच दिवशी संभाजीराजांच्या देहाचे लचके तोडल्या गेले! रक्ताच्या रंगपंचमीने मनुवाद्यांनी शिमगा साजरा केला.

इंद्रायणी- भीमातिरी मृत्युचा सोहळाः
शंभुराजांच्या तेजःपुंज शरीरातील शौर्याचं रक्त आज इंद्रायणीत सांडलं! ही इंद्रायणी या वीरमरणाची एकमेव साक्षीदार! आज तिही पावन झाली होती, थरारली होती… कारण तिच्या काठावर भाल्याच्या टोकावार शंभुराजांचं मस्तक अडकवून ‘गुढी’ उभारल्या गेली होती. शरीराचा सापळा टांगून त्याभोवती कडुलिंबाची पानं बांधली होती व इथूनच ही परंपरा आजही आमच्या घराघरात घुसली. ती कायमची! षंढासारखी गुढी आजही आम्ही उभारतो व शंभुराजांच्या बलिदानाची टिंगल करतो.

गुढीपाडवा- समज व प्रचलित रूढींची समीक्षाः
गुढीपाडव्याच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत. राम विजयी होऊन आले म्हणून गुढ्या उभारल्या, असे काहींचे म्हणणे आहे. जर या विधानात तथ्य असेल, तर हा सण महाराष्ट्रापलीकडे कुण्या राज्यात का साजरा होत नाही? नेपाळ हे हिंदूराष्ट्र आहे, तर मग नेपाळमध्ये रामविजयाचं प्रतीक म्हणून पाडवा साजरा होतो का? दुसरे एक मत सांगितल्या जातं ते असं, की-

टाळी वाजवावी। गुढी उभारावी।
वाट ती चालावी । पंढरीची॥”

हा संत चोखोबा यांचा अभंग १२ व्या शतकातील, ज्यामध्ये ‘गुढी’ शब्द आला आहे. वारकरी धर्मामध्ये पंढरीच्या वाटेवर भगवी पताका खांद्यावर घेण्यालाच चोखोबा ‘गुढी’ संबोधतात! चोखोबांची गुढी ही उलटा गडवा नव्हे! तिसरे मत- आणखी असं सांगतात, की हा सण पूर्वापार चालत आलाय. संभाजीराजांच्या बलिदानाशी याचा संबंध नाही. पूर्वापार चालत आलेला सण म्हणून ग्राह्य धरू या; पण शिवरायांच्या, शहाजीराजांच्या काळात कधीही हा सण साजरा झाल्याची नोंद इतिहासात का नाही?

वरील मत-मतांतराचा स्पष्ट अर्थ आहे, की मानवतेच्या मारेकऱ्यांनी या दिवसाला उत्तेजन देण्यासाठीच चैत्र शु. प्रतिपदा निवडली. ४० दिवसांमध्ये महाराजांना ते कधीही ठार करू शकले असते. तत्कालिन बखरकार ‘भीमसेन सक्सेना’, ‘ईश्वरदास नागर’ यांनी शंभुराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केली आहे. त्यांच्या मते १ फेब्रुवारी १६८९ला महाराज संगमेश्वरी कैद झाले. तिथून त्यांची राजवस्त्र व जिरेटोप काढून ‘तख्ता कुलाह’ म्हणजे विदूषकी कापड व लाकडी टोपी चढविली गेली. कवी कलषासमवेत ६ दिवस त्यांची जाहीर धिंड काढल्या गेली. ७ फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर, लोखंडी साखळदंडामध्ये कैद करून वढू बु. तुळापूर येथील संगमेश्वरावर औरंगजेबासमोर हजर केले गेले. इतके दिवस त्यांच्या पोटात पाण्याचा एक थेंब वा अन्नाचा एकही कण नसताना निधड्या छातीने शंभूराजे औरंगजेबास भिडले. त्याच्यासमोर यत्किंचितही मान न झुकवता त्यास ताजीम न देता त्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अजिबात दाद दिली नव्हती. त्या प्रश्नांचे स्वरूप- १) माझ्या फितूर झालेल्या साथीदारांची नावे व २) खजिन्याच्या किल्ल्यांचा पत्ता. मात्र वजीर आसदखानास शंभुराजांनी मोठ्या हिमतीने झुकविले. हिंदुस्थानचा शहंशाह औरंगजेबही झुकल्याचे कलषा कवीने काव्यात रेखाटले ते असे-

“यावन रावण की सभा। संभू बंध्यो बजरंग।
लहु- लखत सिंदूर सम। खुब खेल्यो रणरंग।।
राजन तुम हो सांच खरे। क्या खुब लढे हो जंग।
तव- तूप तेज निहारी के। तखत त्यजत अवरंग।।”

१ फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातून तप्त सळ्यांनी अलग केल्या गेले. १२ फेब्रुवारीस लोखंडी सांडशीने जीभ उखडल्या गेली. १३ तारखेस कानामध्ये तापलेलं शिसं ओतल्या गेल. नंतर हातापायाची नखं काढल्या गेली. अंग तलवारीच्या टोकाने सोलल्या गेलं. त्यावर मिठाचं गरम पाणी टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोऱ्या काढून त्यांचे हातपाय तोडल्या गेले. अशा अवस्थेतही शंभुराजे जिवंतच होते. २० फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत धर्माचे ठेकेदार का थांबून होते? त्यांचा शिरच्छेद त्यांनी २० फेब्रुवारीलाच करायला हवा होता; मात्र ते मुद्दाम थांबले ११ मार्चच्या अमावस्येसाठीच! रक्ताचा पाडवा साजरा करायला.

शंभुहत्येतील मूळ आरोपी कोण? शिर्के, की रंगनाथ स्वामी??
गणोजी शिर्क्यांनी शंभुराजांना पकडून दिल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे; मात्र या मताला कवडीचाही आधार नाही. शिर्क्यांच्या कन्या येसूराणीबाईसाहेबांच्या हाती स्वराज्याची सुत्रे शंभुराजांनी दिलेली आहेत, हा विषय इथे सध्या बाजूला ठेवू या. प्रश्न हा येतो, की संगमेश्वराच्या कैदेप्रसंगी संभाजीराजांसोबत पुढील काही निवडक सहा माणसे होती. त्यांची नावे संगमेश्वराचे सेनापती म्हालोजी घोरपडे, दुसरे कवी कलष, तिसरे खंडो बल्लाळ, चौथे संताजी, पाचवे धनाजी व सहावा रंगनाथ स्वामी!

मुकर्रबखान संगमेश्वरावर चाल करून आल्याची वार्ता समजताच अत्यंत संयमाने सहाही जणांना एकत्र बोलावून महाराजांनी त्यांना युद्धास सज्ज राहून फळी फोडून आपापली सुटका करून पुढच्या मुक्कामाची दिशा ठरविली. ठरल्याप्रमाणे पहिल्या प्रहरी रात्रीस युद्धास सुरुवात झाली व वृद्ध म्हालोजी घोरपडे स्वराज्याच्या कामी आले. दुसऱ्या फळीत संताजी-धनाजी फळी फोडून बाहेर निसटले. तिसऱ्या फळीत कवी कलष तर दस्तरखुद्द संभाजीराजे चौथी फळी फोडून निघाले; पण रंगनाथ स्वामी कुठंच कसा नव्हता? तो नेमका बिकट क्षणी कुठं होता? संभाजी राजांच्या मरणसोहळ्यात तो औरंगजेबाच्या अखत्यारित कसा? कारण त्यानेच मुकर्रबखानास शरण येऊन, फळी फोडून निसटून गेलेले संभाजीराजे जुन्या मंदिरात लपून बसल्याची खबर दिली म्हणूनच मुकर्रबखानाचा वजीर आसदखान याने त्या पडक्या मंदिरास वेढा दिला व रौद्र शंभुराजे रंगनाथाकरवी पकडल्या गेलेत. पण इतिहासकारांनी गणोजी शिर्केना खलनायक दाखविले…

रंगनाथाचा शोध:
रामदास स्वामींच्या शिष्यसांप्रदायातील एक प्रमुख, म्हणजे रंगनाथ स्वामी. ११ मार्चच्या हत्येनंतर याचा उल्लेख कुठंच आला नव्हता, कारण शंभुराजांच्या क्रूर हत्येनंतर ६४ भटांच्या घरांची संताजी व ध’नाजी यांनी तुळापूरला राखरांगोळी केल्याची नोंद ‘रक्तरंजित तुळापूर’ या दुर्मिळ पुस्तकात आहे. या घरातील एक घर मुरार जगदेवाच्या वारसाचं व रंगनाथ स्वामीचं! हा रंगनाथ स्वामी पुढे पळून गेला व गोंडवन राजाच्या अखत्यारीत चंद्रपूर परिसरात आल्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात ‘वणी’ हे तालुक्याचं ठिकाण असून रंगनाथ स्वामीची समाधी याच ठिकाणी आढळते. ‘वणी’ येथे रंगनाथ स्वामीचं मंदिर असून त्या समाधीची बांधणी ही १७व्या शतकातील असावी. दरवर्षी रंगनाथ स्वामीची फाल्गुन शुद्ध एकादशीस वणी येथे यात्रा भरते. फाल्गुन शु. एकादशीस रंगनाथ स्वामी वणीत दिसला, म्हणजे त्याच तिथीवर प्रगटदिन साजरा होतो. संभाजीराजांची हत्या फाल्गुन वद्य अमावस्येची एकाच महिन्यात हे दोन प्रकार घडले आहेत. आता रंगनाथ स्वामीचा शोध घेणे गरजेचे असून शंभुराजांच्या कैदेप्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावणारा. त्याचा उत्सव जर होत असेल, तर संभाजीराजांच्या बलिदानाशी बेईमानी होतेय असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. रंगनाथावर आणखी पक्के संशोधन होणं गरजेचे असून ‘वणी’तील रंगनाथ स्वामीशी शंभुचरित्राचा संबंध असल्यास निश्चितच त्यावर मंथन व्हावे!

पाडवा तरुणांनी साजरा करावा का?
गुढीपाडवा हा सण असू शकतो का? परंपरेला बदलणे गरजेचे नाही का? आईची साडीचोळी घरावर टांगणे मानवधर्माला धरून आहे का? विरोध करणारे महाराजांशी इमान राखताहेत का? वढू व तुळापूरला गुढीपाडवा का साजरा होत नाही? शिवले-भांडारे व शिरसाट ही तुळापूरमधील बौद्ध व मातंग समाजात आडनावे का आढळतात ? शीख समाज गुरुगोविंदसिंगांच्या बलिदानातून प्रेरणा घेतो, तिथं सचखंड गुरुद्वारा उभारल्या जातो तसे आपण आपल्या शंभुराजांच्या बलिदानस्थळाचं पावित्र्य जपतो का?

तरुणांनो शंभुराजांच्या बलिदान दिनी आपण टोकाचा विरोध स्वीकारून गुढीची अपमानी परंपरा बदलवू या व सूर्योदयसमयी, येणाऱ्या पाडव्यास, अत्यंत साध्या पद्धतीने, गोडधोड न खाता स्टीलच्या रॉडवर एकपाती भगवा ध्वज, कलशामध्ये रोवून प्रत्येकाच्या, निदान आपल्यातरी घरावर स्वाभिमानाच्या, शौर्याच्या, बलिदानाच्या परंपरेला भावपूर्ण मानवंदना देऊन भगवा फडकवू या! तुम्हाला माझ्या शंभुराजाच्या बलिदानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ!

चला स्वराज्याच्या धाकल्या धन्याचे वीर वारस होऊ या, नाहीतर शंभुराजे आज म्हणतील… ”आबासाहेब! पाहिलीत आपली षंढ माणसं! अहो, स्वराज्याच्या बलिदानाचंही यांनी भांडवल केलं! यांना कुणीही सांगितलं तरी ते हेकेखोरपणे रुढीला चिटकून बसतील! धर्माची ओळख देतील! याच धर्मांधांनी आम्हाला ‘धर्मवीर’ म्हणून कायमचं संपवून टाकलं! आमचं बलिदान हे स्वराज्यासाठी झालं म्हणूनच शेवटच्या क्षणी मियाँखान हा आमच्याशी इमान राखून राहिला! शहजाद्या अकबरानं आमचे प्राण वाचविले ! आमच्या प्रेताचे संस्कार इथल्या मांगा-महारांनी केले!! मात्र ज्यांनी आमचा वारसा सांगितला ते आम्हाला समजू शकले नाहीत!! शेवटी या षंढांमध्ये काही बाणेदार निपजतील आबासाहेब!! तीच माणसं स्वराज्याची खरी वारसदार असतील! जगदंब जगदंब!!”


अमोल मिटकरी
अकोला

Source: 1

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.