‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा अधिकृत अंमल बंद झाला. अधिकृत म्हणण्याचे कारण हेच, की हजारो वर्षे समाज ज्या रूढी, परंपरा, कायद्यांचे पालन करत असतो, ते एकाएकी बदलत नसतात. याशिवाय राज्यघटनेतील कलम- २५ नुसार प्रत्येक नागरिकास धर्मस्वातंत्र्य आहे. या कलमाचा सोयीचा अर्थ काढून मूलतत्त्ववाद्यांकडून नव्या मनुस्मृतीची लागण होत असते.
मानवी जीवन सतत विकसित होत असते. त्यात काहीच अंतिम नसते. नवे ज्ञान व त्यावर आधारित नवे तंत्रज्ञान नवनवे बदल घडवत असतात. ही एक अखंड प्रक्रिया आहे. अशा नव्या बदलाचे लाभधारक सर्वच नसतात. तसेच सर्वच लाभधारक समन्यायी, समतावादी वा मानवतावादी नसतात. जगभर हीच प्रक्रिया सुरू आहे. अज्ञान, गरिबी वा तत्सम कारणांमुळे समाजातील मोठा समूह अशा नव्या अनेक लामांपासून वंचित राहातो यासाठी काही नैसर्गिक कारणे आहेत. तसेच लाभधारक समुहातील एखादा गट जाणीवपूर्वक असे लाभ इतरांपर्यंत पोहचू देत नाही. यातून समाजात सर्वच क्षेत्रांत विषमतावादी व शोषणवादी वातावरण निर्माण होते. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, तांत्रिक, राजकीय, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील विषमता टिकवून ठेवण्यासाठी असे शोषणवादी घटक सत्ताकेंद्रे आपल्याच ताब्यात ठेवण्यात यशस्वी होत असतात. एवढेच नाही, तर सर्वच क्षेत्रातील शोषणवादी गट सातत्याने एकमेकास पूरक कामेच करीत असतात. या शोषणवादास कायद्याने धार्मिकरित्या स्थापित ठेवण्याचे काम भारतात मनुस्मृतीने केलेले आहे. आपला शोषणाचा व विषमता चिरंजीव ठेवण्याचा जन्मजात अधिकार अबाधित आहे. तो त्रिकालाबाधित आहे. सनातन आहे. ही विषमतावादी व शोषणवादी समाजव्यवस्था धर्मसंसदेने ईश्वरमान्य असल्याचे अधिकृत करण्यासाठी सनातन धर्म आला.
शोषकांचे तत्त्वज्ञान अत्यंत क्रूर असते. अत्याधुनिक बदलत्या सर्वच नवतंत्रांचे सर्वच लाभ आम्ही घेऊन बदलत राहू; परंतु शोषितांना ते लाभ सर्वार्थाने मिळूच देणार नाही. हे शोषकांचे तत्त्वज्ञान आहे. शोषक सत्ताधीश, श्रीमंत तसेच एकसंघ असतात. त्यांच्याकडे सर्वच क्षेत्रांतील संसाधने व नेटवर्कस् असतात. कालमानानुसार शोषक डावपेच वा थोरण बदलतात, पण उद्देश बदलत नाहीत. त्यामुळे जगातील आजच्या सर्वश्रेष्ठ पाच सत्ता शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता व मीडिया सत्ता शोषक वर्गाच्याच ताब्यात आहेत. शोषक वर्गात सातत्याने वाढ होत असते. कारण शोषित वर्गातील काही जणांना स्वबळावर वा शोषकांच्या सहकार्याने सत्ताधीश होण्याची संधी मिळते. दुर्दैवाने यापैकी अनेकजण शोषक बनतात. परिणामी शोषकांची साखळी मजबूतच होत राहते. शोषकांमधील काही शोषक ‘व्यावहारिक मानवतावादाचा बुरखा पांघरून’ शोषित समुहात शिरकाव करतात. यामुळे शोषित समुहाला आपले शोषण व गुलामी तिरस्करणीय न वाटता भूषणावह वाटते. या शोषक समुहालाच ‘शेटजी-भटजी-लाटजी’ असे संबोधतात. आज प्राचीन मनुस्मृती अस्तित्वात नसली, तरी अत्यंत बेमालूमपणे वर्तमानातील नव्या मनुस्मृतीची लागण होत असते. हे समजण्यासाठी ही दीर्घ प्रस्तावना.
मनुस्मृतीने शोषणवाद व विषमता टिकविण्यासाठी शोषित समुहावर अनेक बंधने आणली होती. त्यात शिक्षणबंदी, अर्थबंदी, शस्त्रबंदी, ज्ञानबंदी, सिंधूबंदी, स्पर्शबंदी अशा अनेक बंदी होत्या. राज्यघटनेने सर्व बंधने संपविलीत व सर्वच संधी उपलब्ध करून दिल्यात. दरम्यान चार्वाक, जैन, बुद्ध, बसवेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, गुरू नानक, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर इत्यादींनी समतेसाठी लढे उभारलेत. त्याचा परिणाम म्हणून त्या- त्या कालखंडात या शोषणवादी साखळ्या थोड्याफार सैल झाल्या. त्याचा फायदा घेऊन शोषित जागृत व संघटित न होता, शोषकच अधिक सतर्क व मजबूत होत एकसंघ होत राहिला. स्वतंत्र भारतातही हीच प्रक्रिया सुरू आहे. डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘बहुजन समाजातील शिक्षित समाज जास्त बेजबाबदार व शोषकांचा हस्तक झाला.’ यातही बदल न होता सतत वाढच होत आहे. परिणामी शोषितांमधून शोषकांच्या साखळीत गेलेला बहुजन- ‘लाटजी’- हा जास्त कर्मठ व बहुजनविरोधक होत आहे. याच लाटजीचा सातत्याने शस्त्र म्हणून गैरवापर होत आहे व असतो. राजर्षी शाहू महाराजांनी दि. २१ सप्टेंबर १९१७ रोजी बहुजन समाजासाठी शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यातून अनेक लाभधारक व समाजसुधारक निर्माण झाले. इंग्रजांनीही शिक्षणाचा प्रसार केला. इंग्रज गेल्यावर शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणही झाले.
वाडी-वाडा-पाडा-तांडा-गाव-नगर सगळीकडे शिक्षण पोचले. बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दाढीचे नव्हे, तर अंगावरील केसांची संख्या ओलांडून पदव्या प्राप्त केल्या. याचा लाभ होऊन बहुजन समाज आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत चमकू लागला. महात्मा फुलेंनी विद्या मानवास मती, नीती, गती नि वित्त देते, असे समीकरण मांडलेले आहे. बहुजन समाजाने शिक्षणातून फुले-शाहू-आंबेडकर-पंजाबराव यांना अपेक्षित ‘सांस्कृतिक’ बदल झाला आहे काय? याचे मूल्यांकन आमच्या पुरोगामी म्हणविणाऱ्या संस्था वा शासनाने करणे अपेक्षित होते. तसे झाले नाही.शेवटी २१ सप्टेंबर १९९५ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. प्रिन्सिपल मनोहर जोशी सर यांनी ‘गणपती दूध पितो’ हे सिद्ध केले. त्यांचे तत्कालीन सहकारी व उपमुख्यमंत्री दिवंगत मा. गोपीनाथजी मुंडे वगळता सर्वचजण जोशी सरांच्या या परीक्षेत नापास झाले. बहुजन समाजातील ज्ञानवंत, धनवंत, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, राजकारणी अशा सर्वांनीच जोशी सरांना पाठिंबा देऊन आमच्यावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा काहीच प्रभाव नसल्याचे दाखवून एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘नवी मनुस्मृती’ कशी जिवंत आहे, ते प्रत्यक्ष आचरणातून प्रदर्शित केलेले आहे. असे प्रसंग नव्या मनुस्मृतीची लागण व लक्षणे आहेत. त्याची काही जिवंत उदाहरणे पाहू:
१) धार्मिकताः धर्मातील कर्मकांडांचे आचरण साधारणपणे धार्मिकता यात मोडते. त्या वैयक्तिक बाबी आहेत. त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन धर्माधतेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. सर्वच प्रसारमाध्यमांचा भडिमार करून ‘धर्माचरण’ अत्यंत पवित्र व सज्जनतेचे सर्वश्रेष्ठ मापदंड ठरविल्या गेले. तसे मानण्यात येते. ‘वैदिक संस्कार वा वैदिक विधी’ नावाने बहुजन प्रतिष्ठेच्या हव्यासापायी तिकडे आकर्षित झाले. कोणतेही एखादे ले-आऊट मंजूर झाल्यास ग्रामीण ते महानगरापर्यंत त्या ले आऊटमधील ओपन स्पेसवर रातोरात मंदिरे उभे राहत आहेत. त्यासाठी एकेकाळचे दरिद्री बहुजन लाखांनी दानधर्म करतात. देव, देऊळ, देवस्की, देश, धर्म, पूजा, मंत्रोपचार, सत्यनारायण यांस अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, शांतता, रोजगार, सुरक्षितता यांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. गावातील आपलीच मुले शिकत असलेल्या शाळेला दुरुस्तीसाठी वा अद्यावतपणासाठी थोडीही आर्थिक मदत न देणारे गावकरी अनेक लाख रुपये खावून मोठमोठी मंदिरे बांधत आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी मोठमोठे धर्मपुरोहित आणून सामाजिक विषमता जिवंत ठेवत आहेत. सार्वजनिक वापरासाठी याचा थोडाफार वापर होत आहे. त्याचप्रमाणे राजकारण वा तत्सम कारणास्तव जैन, बौद्ध, शीखा बांधवही अशा कार्यक्रमात सहभाग देत आहेत. प्रचंड प्रसिद्धीच्या आकर्षणामुळे उच्चशिक्षित, नवश्रीमंत, गर्भश्रीमंत अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. छठपूजा, कडवा चौथ, वाढता गणेशोत्सव, वाढती दुर्गाशारदा महोत्सवांची संख्या, श्रावणासह वर्षभर सत्यनारायण, इत्यादी प्रकार नव्या मनुस्मृतीस पोषक आहेत. धर्मांधता वाढवत आहेत.
२) मुलावरील चुकीचे संस्कारः वरीलप्रमाणे घडलेले मायबाप आपल्या मुलावरही चुकीचे संस्कार करीत आहेत. स्वच्छेने मुलांवर काही अनिष्ट बाबी लादत आहेत. नुकतेच ५ सप्टेंबर २०१४ रोजी देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण करून संवाद साधला. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांनी खेळणे, उड्या मारणे, शारीरिक उपक्रमांवर भर देणे, घाम निघणे यांवर भर दिला. मानसिक व बौद्धिक सबलतेसाठी शारीरिक सबलताही गरजेची असल्याचे बिंबवले. दुर्दैवाने अधिकांशाने मायबाप आपल्या पाल्यांना शारीरिक शिक्षणापासून दूर ठेवत आहेत. सातत्याने मुलांना ‘शिवाजी’ होण्याचे स्वप्न दाखविणारे मायबाप मुले शिवाजींसारखी मावळ्यांची फौज तयार करायला लागल्यास त्याला फालतू ठरवत आहेत. लहान वयातच मुलांना विविध क्षेत्रांतील भीती दाखवून नाऊमेद करतात. हीच भीती त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. वा संपतो. यासाठी मायबापांनी स्वीकारलेले सज्जनतेचे चुकीचे थोरण कारणीभूत असते. यापूर्वी मी एका पुस्तकात लिहिले आहे-
माय म्हणते, बाळ शिवाजी व्हायचे असते!
पण बाळ सहलीला जाताना-
हळूच त्याच्या कानात सांगते
गाडीच्या मधोमध बसायचे असते.
गाडी मागून ठोकली काय?
गाडी पुढून ठोकली काय?
आपण तेवढे वाचायचे असते–
नि माय म्हणते;
बाळ शिवाजी व्हायचे असते!
असे अनेक प्रसंग चर्चेला घेतल्यानंतर
शेवटी बाळ म्हणते,
होय माय बाळाला शिवाजीच व्हायचे असते,
पण त्यासाठी मायने जिजाऊ
तर बापाने शहाजी व्हायचे असते.
तेव्हा बाळ शिवाजी होत असते.
जगभरातील सर्वच समाजात आपापले शिवाजी आदर्श आहेत. आता शिवाजी हे नाव न राहता जगातील सर्वश्रेष्ठ अशा क्षेत्रांचे मापदंड वा विशेषण झाले आहे. मायबाप मुलावर अनेक बंधने लादून त्यांच्यावर स्वच्छेने मनुस्मृतीच लादत असतात. नवीन मुलांची मोठी संख्या खेळणे, पोहणे, उनाडक्या करणे, गडकोट किल्ले चढणे, पर्यटन, मस्ती यांपासून दूर आहेत. परिणामी अनेक मुले भेकड, दुर्बल, चिडचिडी, एकलकोंडी, अस्वस्थ, घाबरट निघतात. जगभरातील समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ ही नवीन पिढी सशक्त कशी करता येतील या विवंचनेत आहेत. त्यांना शौर्य, थैय, वीरता यांबाबत आकर्षण वाटावे व त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठीच जगभर नवनवे खेळ- अवघड राईडस् आलेले आहेत. मायबापांनीच स्वतः भोवती एक चुकीची सुरक्षित चौकट तयार करून मुलांनाही त्याच चौकटीत बसविणे, हा नव्या मनुस्मृतीचा प्रकार आहे. मायबापाची झेरॉक्स कॉपी!
३) स्त्रियावरील नवीन बंधने: भारतीय स्त्रीजीवनाचा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे सुरू असलेला प्रवास अखंडित ठेवण्याचे महान षडयंत्र आपल्याकडे अहोरात्र सुरूच असते. स्वातंत्र्यासाठी प्राचीन काळापासून ते आजही स्त्रियांचा संघर्ष सुरूच आहे. त्याचा परिणाम म्हणून वेळोवेळी काही स्त्रियांनी गेल्या हजारो वर्षांत भारतीय समाज जीवनावर आपला समतेचा, ममतेचा, समन्यायाचा, मानवतेचा ठसा उमटविलेला आहे. यातूनच अनेकदा विषमतावादी मनुस्मृतीलाही छेद गेलेले आहेत. अलीकडच्या ५०-६० वर्षांच्या कालखंडात भारतीय स्त्रियांनी ‘स्टोनएज’ (पाषाणयुग) संपवून ‘स्पेसएज’ (अंतराळ) झेप घेतलेली आहे. हा सनातनी धर्मव्यवस्थेला प्रचंड मोठा हादरा आहे. त्यातच सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आपले वर्चस्व व गुणवत्ता सिद्ध करत आहेत. त्यासाठी स्त्रियांनी निर्भयपणे व आत्मविश्वासाने आत्मनिर्भर होऊन घराचे उंबरठे ओलांडलेले आहेत. स्त्रियांनी जरी अत्यंत थाडसाने त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, बलात्कार, बंधने इत्यादीस मूठमाती दिलेली असली, तरी विकृत पुरुषांची विकृती ठेचण्यात व संपवण्यात मायभगीनींसह सुसंस्कृत समाज अपयशी ठरलेला आहे. याचा दुष्परिणाम म्हणून असे विकृत समूह आपल्या विकृतीचे प्रदर्शन व रक्षण करण्याची संधी सोडत नसतात. यातून दिल्लीतील निर्भया वा मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड अशी प्रकरणे घडतात. अशा दुर्घटना घडूच नयेत, याबाबत कुणाचेच दुमत नाही, परंतु त्यात अपयश येत आहे. त्यातून सतत आरोप, प्रत्यारोप, विविध चर्चा, विविध मते सुरू असतात. त्यास सर्वच मीडियातून प्रचंड प्रसिद्धी दिल्या जाते. मीडियाची या प्रसिद्धीमागची भूमिका संशयास्पद वाटावी एवढी अनेकदा प्रचंड किळसवाणी राहिलेली आहे. अन्याय, अत्याचार, बलात्कार, शोषण, बळजबरी, गुलामी अशा कोणत्याही विकृतीचे समर्थन कोणीच करणार नाही, पण या विकृती समाजात अस्तित्वात आहेत, हेही नाकारता येत नाही. आज सर्वच स्त्रिया सर्वच क्षेत्रांत अत्यंत निर्भीडपणे,संयमाने व आत्मविश्वासाने वावरत असताना, निर्भया प्रकरणासारख्या दुर्घटनांचा सतत उदोउदो करून सर्वच मीडियाने स्त्रियांच्या मनात तसेच तरुण मुलींच्या पालकांच्या मनात अत्यंत चिंताजनक व भीतीयुक्त वातावरण निर्माण केलेले आहे. याचा दुष्परिणाम म्हणून काही स्त्रिया भीतीमुळे, असुरक्षिततेमुळे या पालकांच्या बंधनामुळे पुन्हा चार भीतींच्या आड कोंडून घेत आहेत. महत्प्रयासाने अत्यंत संघर्षाने मिळविलेले अनेक स्त्री स्वातंत्र्याचे अधिकार असे २१ व्या शतकात हिरावल्या जात आहेत. खानदानीपणा, संस्कृती, भीती अशा अनेक कारणांनी या दुर्घटनांचा दुष्परिणाम म्हणून स्त्रियांवर व मुलींवर नवनवी बंधने लादल्या जात आहेत. यात बहुजन समाज आघाडीवर आहे. दुर्घटनांना विरोध करत, सुरक्षिततेची काळजी घेत, आत्मविश्वास जपत व वाढवत प्रत्येक स्त्रीने स्वातंत्र्याचे लाभ घेतलेच पाहिजे. अन्यथा सनातनी विळखा तुमच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यास तयार आहेच. त्याचवेळी प्रत्येक पुरुषाने आपल्या आई, बायको, मुलगी, सून, नातेवाईक स्त्रिया यांना धीर देण्यात पुढाकार घ्यावा. सनातनी सैतानी परंपरांचा सर्वच रोष स्त्रियांवर आहे. त्यांना वाटेल त्या किंमतीत स्त्रिया गुलामच असायला पाहिजेत. कारण स्त्री गुलाम झाली, की मुले गुलाम होतात. मुले गुलाम झाली, की कुटुंब गुलाम होते, कुटुंब गुलाम झाले, की समाज गुलाम होतो, समाज गुलाम झाला, की राष्ट्र गुलाम होते. त्यातून गुलामांच्या राष्ट्रावर राज्य करणे सोपे होते. कारण आर्थिक, शारीरिक गुलामी संपुष्टात आणता येते, पण मानसिक व बौद्धिक गुलामी संपुष्टात येणे अत्यंत अवघड असते. म्हणून स्त्रियांनी न घाबरता संकटांना सामोरे जात नवी मनुस्मृती नाकारावी.
४) नवज्ञान बंदी: मानवी जीवन सुखी, समृद्ध, शांततामय व सुरक्षित बनविण्यामध्ये नवज्ञान व नवतंत्रज्ञानाचा सर्वात मोठा सहभाग आहे. नव युगासाठी ‘अद्ययावत विचार व अद्ययावत आचार;’ अत्यावश्यक आहेत. साक्षरता म्हणजे अक्षर ओळख न राहता संगणक (कॉम्प्यूटर) ज्ञान अशी झालेली आहे. मुळातच आम्ही शिक्षणही नीट समजून घेतलेले नाही. शिक्षणाचे टप्पे असे आहेतः अशिक्षिताने शिक्षित होणे, शिक्षिताने सुशिक्षित होणे, सुशिक्षिताने सुसंस्कृत होणे, सुसंस्कृताने सर्जनशील होणे. आज ज्ञान ही सर्वोच्च सत्ता झालेली आहे. कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी आमचा श्वास होणे गरजेचे आहे. मुलावर गर्भापासून संस्कार होतात. पर्सनल कॉम्प्यूटर, लॅपटॉप, पाम टॉप, इंटरनेट, ब्रॉडबॅंड, मल्टी मीडिया, व्हाटस् अॅप, फेसबुक, सोशल मीडिया, नेटवर्क असे अनेक ज्ञानाचे प्रकार आमच्या मुला-मुलींचे खेळण्यासारखे नैसर्गिक जीवन झालेच पाहिजेत. इंटरनेट- टीव्ही वा अशा माध्यमातून मुले ‘पोर्नोग्राफी’सारखे अश्लील प्रकार पाहतात व बिघडतात, अशी भीती आमच्यापर्यंत पोचविण्यात विरोधक शोषक यशस्वी झाले आहेत. यातून बहुजन समाजातील अनेक शहरी भागांतील श्रीमंत साक्षर पालकांनी आपल्या घरात टीव्ही घेतले नाहीत. मुलांना मोबाईल, लॅटटॉप, इंटरनेट दिलेले नाहीत. त्याचवेळी आपल्याच शेजारी अनेक कुटुंबांत मुलांना वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून या सर्व सुविधा मिळत आहेत. आमच्या पिढीत पाठयपुस्तक घेणे श्रीमंती मानल्या जायची. मुलांच्या नशिबाने त्यांचे पालक श्रीमंत आहेत. साक्षर आहेत, मोठ्या शहरात राहतात. तेथे सर्व अद्ययावत सोयी आहेत, परंतु शिकलेल्या अडाणी मायबापामुळे मुलांना अद्ययावत ज्ञानापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या अद्ययावत ज्ञानापासून त्यांचेच मायबाप चुकीच्या व आत्मघातकी भीतीपोटी दूर ठेवत आहेत. मुला-मुलींचे वय असते. त्या त्या वयात काही चुका- आकर्षण असणे नैसर्गिक आहे. श्लील वा अश्लील काही नसते. उलट नवीन पिढीतील मुले दबल्या गेलेली आहेत. जुनी पिढी जास्त अवलिया होती. मुले बिघडतील अशी भीती मायबापांनी कृपया बाळग नये. महत्प्रयासाने हजारो वर्षांनंतर तुमच्या मुला-मुलींना मुक्त शिक्षण घेता येत आहे. नवज्ञानातील तंत्रज्ञानाने सनातनी अंगठा कापणारी गुरू परंपरा संपविलेली असताना, सूज्ञ पालकांनी अज्ञान वा भीती पोटी आपल्याच मुलांचे अंगठे कापू नयेत! यामुळे मुलांच्या मनात अत्यंत भयगंड व न्यूनगंड निर्माण होत आहेत. सर्वसुविधायुक्त शहरी भागात जन्म घेऊनही अशा घरांतील मुले-मुली ‘पाषाण युगातच वावरत असतात. त्यांना आकाश व अवकाशात झेप घेण्यासाठी पालकांनी वातावरण तयार करून द्यावे. न करता आल्यास किमान मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. ते उभे राहतील. तसेच स्वतःसह मुलांचे छंद जोपासावेत. त्यासाठी सर्वच प्रोत्साहन द्यावे. असे न करणारे पालक नव्या मनुस्मृतीचेच जनक मानावेत.
जगत्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात
उणे अंगी त्याच्या बसे टाळक्यात।
तेणे ठिणगी बहू गाळितसे।।
तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी।
ढंका खवंदासी लागतसे।।
अर्थः आम्ही शरीरात झालेले खांडक, म्हणजे अत्यंत वेदना देणारे ‘पू’ झालेले फोड, योग्यवेळी फोडून साफ केले पाहिजेत. तसे अनेकजण करत असतात. त्यामुळे शरीरात होणारे रक्त अशुद्धीचे प्रमाण पूर्ण थांबतेच,पण वेदनाही कमी अथवा सुसह्य होतात. तसे न करणारे अनेकजण असतात. त्यांना तो फोड झांकता झांकता व जपता-जपता नाकी नऊ येतात. सांगताही येत नाही व सोसताही येत नाही. याशिवाय खूप वेळा नेमका तेथेच कुणाचातरी अचानक धक्का लागतो. ठणठणाट व वेदना वाढतात. त्याचप्रमाणे मनात व जीवनात ठासून भरलेला खोटारडेपणा दूर करावा, म्हणजे जीवन सुखी व आनंदी होते. त्यासाठी एकदा ही दांभिकपणा व असत्याची खांडके दूर करा; म्हणजे कुणाचा धक्का लागून बोंबलण्याची भिती वा गरज राहत नाही.
शांताबाई शेळकेंची एक कथा आहे. एकदा दरवाजाच्या फटीत अडकून एका मांजराचे शेपूट पिचकते. काही दिवसांनी पिचकलेल्या भागापासून शेवटचा शेपटाचा शेंडा निर्जिव होतो. मांजर चालताना तो निर्जिव भाग जमिनीवर घासत असतो. एके दिवशी ते मांजर निवांत बसून तो शेपटाचा निर्जिव भागाचा शेंडा तोंडात पकडते व तोडून फेकून देते आणि अत्यंत आनंदाने उरलेल्या शेपटाला ताठ ठेवत उड्या मारत निघून जाते.
शेवटी मला सर्वच जाणत्या- नेणत्या समाज बांधव- भगिनीस विनंती करायची आहे, की कृपया ‘अज्ञान वा भीतीची’ खांडके जपू नका. फोडून नष्ट करा. अनेकदा ते स्वतः करता येत नाही. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडे जा. मांजरला निर्जिव व निकामी शेपूट तोडता येते. ज्यांना ज्यांना आपल्या जीवनात व मनात अशी काही जळमटे असल्याचे जाणवेल, त्यांनी निदान ती दूर करावीत. स्वतः, कुटुंब, समाज, राष्ट्र सुखी, समृद्ध, आनंदी व ज्ञानी बनवावे.
–
पुरुषोत्तम खेडेकर
(संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ)