आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती!
नुकताच आपण महाराष्ट्राचा स्वर्णमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला; पण त्यामध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सर्वांनाच पडलेला विसर. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० साली बहे (बोरगाव) तालुका वाळवा जि. सांगली या त्यांच्या आजोळी झाला होता. त्यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र हे होय. शालेय जीवनातच त्यांच्यावर सत्यशोधक विचारांचा प्रभाव पडला व ते सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते बनले. त्यांनी सत्यशोधक कार्याची सुरुवात स्वत:च्या घरापासून केली, ती आपल्या पत्नी आकुबाई यांना लिहिण्यावाचण्याला शिकवण्यापासून. त्यामुळे क्रांतिसिंहांची सदर कृती बोले तैसा चाले । त्यांची वंदावी पाऊले ।। या जगद्गुरू तुकोबारायांच्या अंभगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
सत्यशोधक चळवळीचे कार्य करत असतानाच १९२० साली त्यांनी तलाठी म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश केला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांनी मन-मान-मनका-मनगट सशक्त बनलेल्या या नरसिंहाला इंग्रजांची चाकरी मानवणारी नव्हती. याच दरम्यान राष्ट्रीय चळवळीचे वारे जोरात होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या राष्ट्रीय चळवळीत सक्रिय प्रवेश केला तो १९२७ साली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध आंदोलनामध्ये भाग घेतल्याबद्दल १९३२ ते १९४२ या दहा वर्षांत आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९४२ नंतर जोपर्यंत क्रांतिसिंहांनी स्वत:हून अटक करवून घेतली नव्हती तोपर्यंत इंग्रज सरकार त्यांना पकडू शकले नव्हते.पण याच काळात क्रांतिसिंह नाना पाटील जाहीर सभा घेत होते आणि गोरगरीब रयतेची गा-हाणी सोडवत होते. इंग्रज अधिकाऱ्यांवरही त्यांचा दरारा होता आणि लोकांचेही त्यांना भक्कम पाठबळ होते त्यामुळे इंग्रज आधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ते जाहीर सभा घेत असायचे. अनेक वेळा ते इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जात. क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत असताना सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी आसरा दिला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे सहकारी भूमिगत अवस्थेतून प्रकट झाले. गावोगावी क्रांतिसिंहांचे विक्रमी गर्दीचे सत्कार झाले. क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे सहकारी महात्मा गांधींना भेटण्यास गेले त्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात जे कार्य केले ते तुमच्या सत्य-अहिंसेच्या तत्त्वात कुठे बसते हे मला माहीत नाही…..तुम्ही ऑगस्ट ४२ मध्ये करेंगे या मरेंगे’ हा जो आदेश दिला त्याला अनुसरून आमच्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे चळवळ केली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने आम्ही इंग्रजांशी लढलो असल्याचे सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले, नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही ४२ ची स्वातंत्र्यचळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय. महात्मा गांधीजींचे सदर उद्गार क्रांतिसिंहांनी केलेल्या चळवळी स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व विशद करणारे आहे.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर सातारा जिल्ह्यात सर्वत्र जाळपोळ सुरू झाली होती. राज्यात ब्राह्मणांच्या घरादारांच्या जाळपोळीचा डोंब उसळला होता. यावेळी प्रत्येक गावात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जाऊन ब्राह्मणांच्या लोकांनी लुटून नेलेल्या चीजवस्तू परत मिळवून देण्याचा सपाटा लावला होता. यादरम्यान तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी नाना पाटील यांना भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्यांना जाण्यास वेळ लागला. ज्या वेळेस ते गेले तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांना पाहताच मोरारजीभाई उसळून म्हणाले, पाटील, तुम्ही हे काय चालविले आहे? ब्राह्मणांची घरेदारे जाळायला लागला आहात काय? मोरारजीभाईंच्या या प्रश्नावर क्रांतिसिंहानी अत्यंत शांतपणे उत्तर दिले,आपण गृहमंत्री आहात, तुमचे पोलिस रिपोर्ट काय सांगतात? नाना पाटलाने ब्राह्मणांची घरे जाळली की जळणारी वाचवली हे तपासून पहा?
आज जो काही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपणाला दिसत आहे. त्या संयुक्त महाराष्ट्राचे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते क्रांतिसिंह नाना पाटील हेच. मुंबई, बेळगाव, कारवारसह महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठीसुद्धा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वक्तृत्वाची तोफ अखंडपणे महाराष्ट्रभर धडाडली होती. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सर्वात अवघड अशी कारवारची आघाडीसुद्धा क्रांतिसिंह नाना पाटील यांनीच लढवली. आज महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतानाही बेळगाव,कारवारचा प्रश्न तसाच आहे. खऱ्या अर्थाने आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर क्रांतिसिंहावर अनेक पक्ष बदलण्याची वेळ आली.त्याबाबत कोणी छेडले तर क्रांतिसिंह म्हणत, पण माझ्या हृदयात गांधीजी आहेत. शेठ सावकारांची, भांडवलदारांची मक्तेदारी जावी, जातिभेद नष्ट व्हावेत, विषमता नष्ट व्हावी. सर्व थरांत शैक्षणिक, आर्थिक समता यावी, यासाठी मी समता-क्रांतीचे तिकीट घेऊन जीवनकार्याच्या प्रवासाला निघालो आहे. मी गाड्या बदलल्या; पण तिकीट बदललं नाही तिकीट तेच हाय!
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात क्रांतिसिंहांचे वास्तव्य पंढरपुरातील रामबागेत होते. त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून शेतकरी भेटण्यास येत असत. सत्कारात मिळालेल्या शाली, घोंगडी ते आलेल्या शेतकऱ्यांना देत व ही श्रीरामांची भेट समजून राहू द्या, म्हणून सांगत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सदर विचार क्रांतिकारकांतील संतत्व दर्शवणारे आहेत. क्रांतिसिंहाचे जीवन ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती’ ह्या तत्त्वापेक्षा वेगळे थोडेच आहे.
आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाबद्दल क्रांतिसिंहांनी कधीही खेद व्यक्त केला नाही. ते म्हणत देशाकरिता थोडं कार्य करण्याची नियतीनं मला संधी दिली यातच मी कृतार्थ आहे कृतज्ञ आहे, तृप्त आहे. सगळे मला विसरले-पण अर्धनग्न शेतकरी-माझा बळीराजा मला विसरला नाही. कारण आपल्या मातीचा गुणच तसा आहे आणि म्हणून मी तृप्त आहे… मी तिकडे मेलो तर वाळव्याला हुतात्मा किसन आहिरच्या पुतळ्यासमोर क्रांतीचा एक शिपाई म्हणून जाळा. आणि पंढरपुरात मेलो तर वाळवंटात वारकरी म्हणून जाळा. मी मेल्यावर माझ्या प्रेतावर फक्त एक फूल वाहा व म्हणा, नाना पाटील – देशभक्त रयतसेवक.
–
अमरजित रा. पाटील
Source: 1
❤️❤️❤️❤️