दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

२००४ साली जेम्स लेन या लेखकाने आपल्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे लेखन करून जगभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण केला होता. या जेम्स लेनच्या लेखनामुळे इथल्या शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला प्रक्षोभ अजून म्हणावा तितका शांत झालेला नाही. या लेनच्या लिखाणामुळे महाराष्ट्रात शिवकालापूर्वीपासून अधूनमधून उचल खाणाऱ्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर या तथाकथित नावाने ओळखल्या जाणाऱ्या वादाने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. पण शिवकाळात शिवराज्याभिषेक प्रसंगावेळी, त्यानंतर शिवपत्र संभाजी महाराज यांच्या राज्यारोहणावेळी, त्यानंतर इ.स. १७६० मध्ये करवीर संस्थानच्या महाराणी जिजाबाईंच्या काळात इ. स. १८२० च्या दरम्यान सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात महातमा ज्योतिबा फुले यांच्या काळात, राजर्षी शाहू छत्रपतींच्या काळात आणि अगदी अलीकडे म्हणजे इ. स. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर वेगवेगळ्या प्रसंगाने हा वाद महाराष्ट्राच्या भूमीत धुमसत आहे. या वादाचे मूळ स्पष्ट सांगायचे झाल्यास ते इथल्या ब्राह्मणीगंडात आहे. आपल्या जातीच्या वर्चस्वाचा गंड शमविण्यासाठी बहुजनांच्या इतिहासामध्ये ब्राह्मणव्यक्तींना त्यांच्या कर्तृत्त्वापेक्षा जास्त महत्त्व देऊन त्यांना बहजनपुरुषांच्या महान कर्तृत्त्वाचे श्रेय देऊन हा गंड जोपासला गेला आहे.

यातून छत्रपती शिवरायांचा इतिहासही सुटलेला नाही. यातूनच शिवचरित्रामध्ये शिवरायांचे गुरू म्हणून दादोजी कोंडदेव कुळकर्णी या व्यक्तिमत्त्वास शिवरायांचे गुरू म्हणून पुढे आणले गेले आहे. त्यामुळेच आज शिवरायांच्या इतिहासामध्ये या व्यक्तीला खरोखरच त्यांच्या गुरू पदावर आरूढ होण्याइतके स्थान होते का, ते पाहाणे गरजेचे झाले आहे. दादोजी कोंडदेव कुळकर्णी यांच्याबद्दल इतिहासपुरुष काय माहिती देतात, ते पाहूया.

दादोजी कोंडदेव कुळकर्णीचा सर्वात प्रथम संदर्भ सापडतो तो इ. स. १६३३ मध्ये जाऊ बिन हर पाटील याने लिहिलेल्या पत्रात म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी. पण या अगोदर दादोजी काय करत होते. याविषयी अजूनपर्यंत तरी इतिहास आपणास काहीच माहिती पुरवत नाही. इ. स. १६३३ मध्ये ज्याअर्थी दादोजी कोंडदेव कुळकर्णी सुभेदार दिवान या पदापर्यंत पोहोचला होता, त्याअर्थी या अगोदर दादोजी पहिल्यांदा निजामशाही आणि ती क्षीण झाल्यावर पुणे प्रांत आदिलशाहीच्या ताब्यात गेल्यावर किंवा त्या अगोदरही दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीतील एक इनामदार चाकर असावा, असा तर्क करता येता; पण कुठल्याही अस्सल साधनात तरी दादोजी हा पुणे प्रांतातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, असे सांगणारा एकही उल्लेख मिळून येत नाही.

शहाजी महाराजांनी निजामशाहीतून आदिलशाहीत प्रवेश केल्यानंतर आदिलशहाने पुणे परागणा शहाजी महाराजांना बहाल केला. त्यावेळी शहाजी महाराजांचा आणि दादोजीचा संबंध आला असावा. पुढे शहाजी महाराजांना दर कर्नाटकातील जहागीर मिळाल्यामुळे त्यांनी आपला मुक्काम पहिल्यांदा कंपली आणि नंतर बंगळुरास हलवला. यावेळी त्यांनी पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी आपला मुतालिक म्हणून दादोजी कोंडदेवाची नेमणूक केली होती.

इ.स. १९३३, ३९, ४४, ४५ व ४६ मध्ये लिहिलेल्या मोजक्याच समकालीन पत्रातून दादोजीचा उल्लेख येतो; पण यापैकी एकाही पत्रात त्यांनी शिवरायांना कोणत्याही गोष्टीचे शिक्षण दिल्याचे किंवा त्यांना स्वराज्य उभारीची प्रेरणा दिल्याचा उल्लेख नाही. या पत्रांमध्ये भोसले घराण्यातील शहाजी महाराज, जिजाबाईसाहेब आणि खुद्द शिवरायांचीही पत्रे आहेत. या सर्व पत्रांमध्ये वरीलपैकी कोणीही दादोजी कोंडदेवाचा उल्लेख करताना गुरूला संबोधताना- लिहिताना शिवकाळात पत्र लेखणामध्ये वापरले जाणारे चरणरज, गुरुवर्य, तिर्थस्वरूप असे शब्द वापरलेले नाहीत. उलट त्याकाळी सामान्य असणारे राजश्री, पंत अशाच शब्दांचा उपयोग दादोजीसाठी वरील व्यक्तींनी केलेला आहे. काही महजरा (न्याय निवाडा झाल्यावर लिहिलेली हकिकत यावर त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व वतनदारांच्या सह्या व निशाण्या असतात.) मध्येतर दादोजीचा उल्लेख दादो कोंडदेव असा एकेरी आला आहे. जर दादोजींनी शिवरायांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण किंवा प्रेरणा दिली असती तर अशा गुरूस्थानी असणाऱ्या व्यक्तीचा सामान्य चाकरासारखा उल्लेख शिवरायांनी किंवा त्यांच्या माता-पित्यांनी निश्चितच केला नसता. एवढेच नाहीतर त्यांच्या वंशजांना गुरूच्या वंशजांना दिला जातो तसा मान किंवा इनामही शिवरायांनी का दिले नाही? हा प्रश्नही शिल्लक राहतोय.

असो वरील पत्रांतून व काही उत्तरकालीन महाराजांवरून दादोजी कोंडदेव हा शहाजी महाराजांना जहागीर म्हणून मिळालेल्या पुणे जहागिरीचा मुतालिक (धन्याच्या अनुपस्थितीत त्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहणारा चाकर) म्हणून काम पाहात असल्याचे आपणास समजून येते. असा हा शहाजी महाराजांच्या अनेक सामान्य चाकरांपैकी एक असणारा दादोजी कोंडदेव कुळकर्णी शककर्ते शिवरायांच्या गुरूपदापर्यंत कसा पोहोचला? या शिवकाळातील सामान्य व्यक्तिमत्त्वाला सत्य इतिहासाच्या मर्यादा ओलांडून शिवरायांसारखा महान युगपुरुषाचे गुरूपद कसे व का दिले गेले याचा मागोवा घेणे आवश्यक आहे. अस्सल साधनांच्याद्वारे दादोजी कोंडदेवाचा इतिहास लिहायचा झाला तर एका लहान गावचा सामान्य कुळकर्णीपद सांभाळणारा एक ब्राह्मण शहाजी महाराजांसारख्या एका महान पराक्रम पुरुषाच्या जहागिरीचा मुतालिक होता; एवढाच इतिहास लिहिता येईल.

पण निजामशाही, आदिलशाहीमध्ये साबाजी अनंत, मुरार जगदेवासारखे अनेक ब्राह्मण याच काळात या शाह्यांचे वजीर पद भूषविण्यापर्यंत कर्तत्त्वशाली झाले होते. इतकाही आवाका दादोजी कोंडदेव या व्यक्तिमत्त्वाचा नाही. अफजलखानाच्या वाई जहागिरीचा कारभार पाहणारा तिमाजी पंडित किंवा इ. स. १६५९ मध्ये खानाची वकिली करणारा कृष्णाजी कुळकर्णी या व्यक्तीसारख्या सामान्य कुवत असणारा हा दादोजी कुळकणी शिवरायांसारख्या महान व्यक्तीच्या गुरू पदावर पोहोचला कारण महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजात असणारा जाती अभिमानाचा गंड. प्रस्तुत लेखात अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे या ब्रह्मगंडामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेकवेळा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेला होता. हा वादच दादोजी कुळकर्णीसारख्या सामान्य ब्राह्मणाला गेली अनेक वर्षे शिवरायांच्या गुरूपदावर आरूढ करू शकला. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकावेळीपासून उठलेल्या या वादाचे वादळ आजपर्यंत कधी जोराने तर कधी क्षीणपणे सातत्याने घोंगावतच आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर थोडा काळ थांबलेल्या या वादाने इ.स.१७५० मध्ये सातारकर शाहू महाराजांच्या निधनानंतर पुन्हा उचल खाल्ली. याचवेळी पेशव्यांनी सातारकर छत्रपतींचे अधिकार संकुचित करून त्याना आपल्या हातातील बाहुले बनविले. त्याच दरम्यान पेशवाईमुळे मिळालेल्या अनिबंध सत्तेमुळे ब्राह्मण जातीचा स्वाभिमान व जोर कधी नव्हे एवढा वाढलेला होता. भारताच्या इतिहासात खऱ्या अर्थाने ते पहिल्यांदाच भूदेव झाले होते. कर्तृत्वाशिवाय बेकीने मिळालेले मोठेपण सांभाळणे या जमातीस जमले नाही. त्यांनी स्वत:चे मालक असणाऱ्या छत्रपतींविरुद्धच लढण्याचे, त्यांना वेगवेगळ्या मार्गाने नामोहरम करण्याचे सत्रच सुरू केले आणि पुन्हा एकदा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद महाराष्ट्राच्या भूमीत धगधगू लागला. याचवेळी कोल्हापूरकर छत्रपतींचा कारभार शिवरायांची नात सून जिजाबाई या सांभाळत होत्या. करवीरकर जिजाबाईंनी यावेळी ब्राह्मणेतरांचे नेतृत्त्व केले व करवीर संस्थानात तरी ब्रह्मवृंदाची कारस्थाने हाणून पाडली.

पेशवाईच्या उत्तर काळात म्हणजे इ.स. १८०० च्या आसपास (याचवेळी पेशव्यांच्या गादीवर इतिहासात चैनखोर व पळपुटा म्हणून प्रसिद्ध असणारा बाजीराव दुसरा हा स्थानापन्न झालेला होता.) स्वराज्य स्थापण्याचे श्रेय स्वत:च्या जातीकडे घेण्यासाठी दादोजी कोंडदेव कुलकर्णीला शिवरायांच्या गुरुपदावर आरूढ करण्याचे कार्य सुरू झाले. याच काळात ब्राह्मण जातीचा तत्कालीन ब्रह्मवृंदानी व त्यांना साथ देणाऱ्यांनी दादोजी कोंडदेव हा शककर्ते शिवरायांचा गुरू आहे अशा पद्धतीचा इतिहास बखरीच्या रूपाने पुढे आणण्यास सुरुवात केली. याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय, चिटणीस बखर, शेडगावकर भोसल्यांची बखर यासारख्या बखरींमधून दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरू असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. दादोजीची प्रामाणिकता व महानता दृढ करणाऱ्या भाकड कथाही याचवेळी रचण्यात आल्या. असत्य ठासून व वारंवार सांगितले की ते सत्य भासू लागते या तत्वाने दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरू होता. त्याने शिवरायांना घडविले. स्वराज्य उभारण्यामागे त्यांची प्रेरणा होती. त्यांनी शिवरायांना शस्त्रास्त्रे चालविण्यास शिकविले. दादोजींनी मावळ्यांच्या सैन्याची उभारणी केली. दादाजींनी शिवरायांच्या आंब्याच्या बागेतील एक आंबा चोरला नंतर पश्चाताप होऊन त्यांनी आपल्या हातीची एक बाही लांडी करून पुढे आयुष्यभर तशा एक बाहीचा अंगरखा वापरला. अशा अनेक अनऐतिहासिक कथांचा सुळसुळाट शिवचरित्रात झाला.

असा खोटा इतिहास शिवचरित्रात घुसडला जात आहे. हे पहिल्यांदा महात्मा जोतिबा फुलेंच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी ज्यावेळी शिवरायांच्या गुरुपदाचा विषय लिहिण्याची वेळ आली त्यावेळी ‘मासा पाणी खेळे गुरू कोण’ असे त्याचा असे चपखल रूपक शिवरायांच्या गुरुसाठी त्यांच्या पोवाड्यात वापरले. पुढे शिवरायांचे वंशज महान शिवभक्त राजर्षी शाहू महाराज यांनीही दादोजी कोंडदेवाला शिवरायांच्या गुरुपदावर बसविण्याचा हा खटाटोप हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. याविषयी १९२० मध्ये दिलेल्या एका सनदेत राजर्षी लिहितात, रामदास किंवा दादोजी कोंडदेव हे श्री शिवाजी महाराज यांचे गुरू होते ही क्लृप्ती ब्राह्मणांचीच आहे. ही क्लृप्ती यशस्वी होऊ नये, यासाठी त्यांनी सत्य इतिहासावर आधारलेले शिवचरित्र लिहावे असा आग्रह तत्कालिन इतिहास संशोधक रावबहाद्दूर डी. बी. पारसनीस यांना केला होता. एवढेच नव्हे तर यासाठी त्यावेळच्या मानाने घसघशीत अशी सहा हजार रुपयांची रोख रक्कमही त्यांना या कार्यासाठी दिली. पण दुर्देवाने पारसनीसांच्याकडून शिवचरित्र लिहून झाले नाही. राजर्षी शाहूंनी विठ्ठल रामजी शिंदेंनाही शिवचरित्र लिहिण्याचा आग्रह केला होता. पण त्यांच्याकडूनही हे कार्य होऊ शकले नाही. शेवटी कृष्णाजी अर्जुन केळूसकरांनी त्यावेळी उपलब्ध संदर्भ साधनांचा अभ्यास करून शिवचरित्र लिहून पूर्ण केले व मराठीतील पहिला शिवरायांचा इतिहास सर्वसामान्यांच्यापर्यंत आला. केळूसकरांनी पहिल्यांदा अस्सल संदर्भ साधनांच्या आधारे हे दाखवून दिले की दादाजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते. यानंतरही बहुजनांच्या वृत्तपत्रातून, पुस्तकातून दादोजी हे शिवरायांचे गुरू नाहीत असे लिहिले, हे सांगितले गेले. पण तेवढ्या काळापुरते हा विषय जागृत राहिला व परत बहुसंख्य बहुजनांच्या विस्मरणात गेला.

पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळी इतिहासाचे पुस्तक लिहायची वेळ आली त्यावेळी पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या समितीवर असणाऱ्या ब्रह्मवृंदाने फिरून परत एकदा दादोजी कोंडदेवांना शिवरायांच्या गुरुपदावर आरूढ केले आणि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचे पिताजी शहाजी महाराजांपेक्षा दादोजी कोंडदेवाचा उल्लेख जास्तवेळा करून या देशातील नऊ दहा वर्षांच्या संस्कारक्षम वयामध्ये असणाऱ्या पिढीमध्ये शिवरायांना दादोजी कोंडदेवाने शस्त्रास्त्रे चालविण्याचे, राज्यकारभाराचे शिक्षण दिले व दादोजीच स्वराज्य उभारणीचे प्रेरणास्थान होते हे बिंबविण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी करताना आपण शिवचरित्राची मोडतोड करत आहोत खोटा इतिहास भावी पुढे समोर ठेवत आहोत याकडे पुस्तक लिहिणाऱ्या, छापणाऱ्या व या वेळेपर्यंत सत्तेवर असणाऱ्या राज्यकर्त्यांनीही दुर्लक्ष केले. अशा रीतीने पुन्हा एकदा दादोजी कोंडदेव शिवरायांच्या गुरुपदावर आरूढ झाला. गमतीची गोष्ट अशी की पाठ्यपुस्तकातील इतिहास दादोजींचा उल्लेख दादोजी कोंडदेव कुळकर्णी असा किंवा मराठ्यांच्या इतिहासात इतर व्यक्तींचा नामोल्लेख बाजी पासलकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर असा नाव व आडनाव अशा रीतीने न करता दादोजी कोंडदेव असा नाव व वडिलांचे नाव असा अर्धवट केला आहे व तो आजही केला जातो. कारण त्यांचे कुळकर्णी हे नाव दिले तर हेतू ठेवून इतिहास लिहिणाऱ्याचा कावा लक्षात येऊ शकतो.

आज पुन्हा एकदा हा शिवरायांच्या गुरुपदाचा वाद ऐरणीवर आलेला असून शिवचरित्रातून दादोजी कोंडदेव कुळकर्णी शिवरायांचे गुरू होते हा खोटा इतिहास हटविण्याची मागणी बहुजन संघटनांनी केली आहे. पुण्यातील काही ब्रह्मवृंद इतिहास संशोधक व त्यांचे पाठीराखे दादाजीपंतांची बाजू घेऊन या लढाईत उतरले असून त्यांनी अस्सल पुरावे म्हणून चौथीच्याच पाठ्यपुस्तकातील आधुनिक चित्रे व उत्तरकालीन बखरीतील उतारे दाखवून पुन्हा एकदा असत्य हे सत्य म्हणून सांगण्याचा सपाटा चालू केला आहे. असो, या वादातील इतिहास संशोधकांचे दावे प्रतिदावे हा एक स्वतंत्र लेखाचा विषय असल्या कारणाने हा लेख इथेच थांबवितो. पण काहीही असले तरी या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्यातून दिल्या जाणाऱ्या व्याख्यानातून सर्वात जास्त नुकसान होत आहे ते प्रेरणादायी अशा शिवछत्रपतींच्या इतिहासाचे. हा वाद कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला त्या ब्रह्मवृंदाने पुढाकार घेऊन आपल्या जातीचा गंड सोडला पाहिजे. जपानमध्ये उच्च असणाऱ्या समुराई जमातीने आपला गंड सोडला त्यामुळे समाजात एकी निर्माण होऊन त्या राष्ट्राने प्रचंड प्रगती केली. अमेरिकेसारख्या देशातील श्वेत वर्णियांनी आपला गंड सोडला. त्यामुळे आज ओबामांसारखा अश्वेत व्यक्ती त्यांचा राष्ट्राध्यक्ष झाला तसेच इथल्या ब्राह्मण जातीने आपले असत्य इतिहास कथन करणे, लिहिणे थांबविले तर निश्चितच किमान महाराष्ट्रात तरी अशा गोष्टींना मिळणाऱ्या तशाच अर्धसत्य प्रतिक्रिया बंद होतील. यातून प्रेरणादायी अशा शिवचरित्राचे अनेक अप्रकाशित पैलू उजेडात येतील आणि आजच्या घडीला अत्यंत आवश्यक असा शिवरायांचा शौर्यशील इतिहास आपण इथल्या युवकांच्या पुढे ठेवू शकू. नाही तर आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बहुसंख्य बहुजन समाज, शिक्षित व जागृत झाला असल्या कारणाने अस्सल ऐतिहासिक सत्याचाच विजय या वादात होणार हे निश्चित आहे.

॥ जय शिवराय॥


इंद्रजित सावंत
(इतिहास संशोधक)

Source: 1 and 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.