विदेशी पुस्तक, देशी मस्तक – ज्ञानेश महाराव

पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेडचा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच कलंकित करण्याचा डाव खेळला जातो, तरी त्याकडे थंडपणे दुर्लक्ष केलं जातं. पुतळ्याच्या दगडा इतकीही किंमत जिजाऊंच्या चारित्र्याला किंमत न देणे, हा थंडपणा नाही; तो सामाजिक आणि राजकीय षंढपणा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिरातील तीर्थकुंडात बडवा मुतताना पकडला गेला. तेव्हाही असाच थंडपणा दाखवला गेला. याउलट परदेशात कुठे चपलेवर, कमोडवर देव-देवतांची चित्रं रंगवली गेलीत, अशी ओरड होताच पेटवा-पेटवी करणारी लेखनकामाठी होते. त्याने भाविकही अस्वस्थ होतात. अशीच अस्वस्थ भावनांची प्रतिक्रिया जेम्स लेनच्या नीचपणामागच्या मस्तकांच्या विरोधात का नाही उठली? जेम्स लेनच्या कुचाळक्या आणि त्यामागच्या पेशवाई किड्यांना उघड करणारा लेख.

विदेशी पुस्तक देशी मस्तक..

छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य काळाला पुरून उरणारं आहे. आपल्या जीवन कार्याला ऐतिहासिक करण्यासाठी शिवरायांनी आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीजांशी आणि स्वजनांशी केलेल्या लढाया केवळ स्वराज्यासाठीच नव्हत्या. त्या सामान्य ठरवल्या गेलेल्या माणसात स्वाभिमान निर्माण करण्यासाठीही होत्या. त्यामुळेच शिवरायांच्या रणांगणावरील लढायांपेक्षा त्यांच्या समताधिष्ठीत सामाजिक प्रस्थापनेला अधिक महत्व आहे. शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार तर दहा वर्ष शत्रूंशी लढण्यात खर्च केली असतील. उर्वरित काळ त्यांनी चातुर्वर्ण्याच्या बढेजावाने हिंदू समाजात भिनलेली विषमता नष्ट करण्यासाठीच खर्च केली आहे. या प्रयत्नातच वाईच्या नागेवाडीचा नागनाथ महार गावचा पाटील झाला. स्वराज्य स्थापन करतानाच शिवरायांनी वर्णवर्चस्वाचाही अहंकार ठेचला आहे. त्याआधी त्यांनी शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना जीणं नकोसं करणारा सावकारी पाश तोडला. वतनदारी मोडली. श्रमांना-गुणांना प्रतिष्ठा दिली. न्याय अन्यायाची सीमा स्पष्ट केली. गोचीड वृत्तीच्या भटशाहीला नंगं केलं. त्याचा बदला भटशाहीने शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करून घेतला. या बदलामुळेच शिवराय “रयतेचा राजा” झाले. शिवरायांनी धर्मजागृती केली. पण ती मानवतेचा मर्म अबाधित ठेवून केली. यासंदर्भात इतिहासकार त्रि.शं.शेजवलकर लिहितात, ‘शिवाजीराजांचे कोणतेही युद्ध ‘धर्मयुद्ध’ असे म्हणता येणार नाही. त्याकाळी युरोपात सुद्धा धर्मयुद्धे सुरु होती. पण मागासलेल्या आशियात व विशेषतः हिंदुस्थानात  शिवाजीने हि गोष्ट तर्कास न पटणारी, कोणाच्याही हिताची न ठरणारी असून कालानुरूप नाही, हे स्वतःच्या ज्ञानाने एकट्यानेच ठरवले त्याप्रमाणे आजच्या लोकशाही मनुस शोभण्यासारखे वर्तन धर्माच्या बाबतीत ठेवले.’ धर्मभेद न करता साधू संताचा आशीर्वाद घेत. त्यांनी जसा संत रामदासांना परळीचा सज्जनगड मोकळा करून दिला; तसंच कोकणातील केळशीच्या संत हजरत पीर सय्यद याकुब बाबाला दर्ग्यासाठी ६५३ एकर जमीनही आज्ञापत्राने इनाम म्हणून दिली.

शिवरायांच्या धर्मभेद, जातीभेद, स्त्री-पुरुष भेद गाडणार्‍या राज्य व्यवहारात आजच्या भारतीय लोकशाहीची बीजं आहेत. त्यातून निर्माण झालेल्या समतावादी विचाराच्या फांद्या ज्यांना भाल्यासारख्या टोचतात; अशा भटशाहीच्या पिलावळीने शिवरायांची “समतावादी स्वराज्याची थोरवी” झाकली राहावी म्हणून, यासाठी शिवरायांच्या जीवनकार्यालाच बदनामीच्या भोवर्‍यात फिरत ठेवलंय.त्यासाठी शिवरायांच्या जन्मतिथी-तारीखवादाचा घोळ शंभर वर्ष घातला गेला. माणसातून उठवण्यासाठी शिवरायांवर देवत्व थापण्याचा प्रयत्न अधूनमधून होत असतो. त्यांच्या पुतळा-प्रतिमांच्या विदृपिकरणाचा वापर दलित-मुस्लीमविरोधातील तानावासाठी केला जातो. जाती वर्चस्वाचं असत्य थापण्यासाठी रामदासांना शिवरायांचे ‘गुरु’ बनवलं जातं. हा खोडसाळपणा शिवरायांच्या हयातीपासून सुरु आहे. ते करणारे, भटशाहीची आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या मुळावर घाव घालणार्‍या पेशवाईची लालेलाल करणारे निपजावे, हा योगायोग नाही. या रोगात विचारांचा संसर्ग आता विदेशी लेखनकामाठयांनाही झाला आहे. जून २००३ मध्ये ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ ने ‘शिवाजी- हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे जेम्स डब्ल्यू. लेन याने लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध केलं. जेम्स लेन हा अमेरिकेच्या मिनेसोटा विभागातील मेकॅलेस्टर कॉलेजच्या ‘धर्म आणि भारतीय संस्कृती’ विभागाचा प्रमुख आहे. या कामासाठी तो १९८६ पासून नियमितपणे भारतात येतो. १२७ पृष्ठांच हे पुस्तक लिहिण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते. संदर्भासाठी अनेक पुस्तकं वाचलीत. परंतु या मंथनातून नवनीत निघण्याऐवजी शिवरायांना बदनाम करणारी गटारघाण निघालीय.

या पुस्तकाच्या निवेदनात जेम्सने पुण्याच्या भांडारकर इतिहास संशोधन संस्थेचे आणि तेथील सिनियर लायब्रेरियन वा.ल.मंजुळ यांचे आभार मानलेत. तसेच मराठी भाषा-साहित्य आणि महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्यासाठी मदत करणार्‍या श्रीकांत बहुलकर, सुचेता परांजपे, वाय.बी.दामले, रेखा दामले, भास्कर व मीना चंदावरकर, दिलीप चित्रे, यांचेही आभार मानलेत. या आभार प्रदर्शनात ‘अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ इंडियन स्टडीज’ च्या माधव भांडारेंचा आणि मुस्लीम समाजसुधारक असगरअली इंजिनीयर यांचाही समावेश आहे. यातील असगरअली इंजिनीयर यांचा समावेश हि पुस्तकावर ‘हिंदू-मुस्लीम तेढीचा पीळ घट्ट करण्यासाठी केलेला खटाटोप’ असा शिक्का बसू नये, याची घेतलेली खबरदारी असावी.

तरीही बामणी पिसाच्या मंडळींचं बदकर्म छपून राहत नाही. ते पुस्तकात पानोपानी पेशवाई किडा बनून वळवळताना दिसतं. या सनातनी वळवळीमुळेच पृष्ठ ९३ वर शिवरायांच्या जन्मदात्याबद्दल संशय घेण्यापर्यंत मजल मारली आहे. बामणी विकृतीने भरलेला जेम्स लेन लिहितो- The repressed awareness that Shivaji had a absentee father is also revealed by the fact that Maharashtrians tell jokes naughtily suggesting that his guardian Dadaji Konddev was his biological father. In a sense, Shivaji’s father had little influence on his son, for many narrators it was important to supply him with father replacements, Dadaji and later Ramdas.

शिवरायांप्रमाणेच जिजाबाईंनाही दैवत मानणार्‍यांच्या काळजाला अट्टल कोब्रा नाग डसावा; अशी हि पिचकारी आहे. ती मराठीजनांना नालायक ठरविणारी आहे. आपल्या विषारी फुत्कारात जेम्स लेन म्हणतो, ‘महाराष्ट्रीयन खोडसाळ विनोदाने (एकूण अर्थ कुचेष्टेने) सुचवतात कि, शिवाजीचे पालक दादोजी कोंडदेव हे त्याचे खरे वडील (biological father) आहेत. बर्‍याचशा चरित्रकारांनी शिवाजीवर वडिलांचा (शहाजींचा) फारसा प्रभाव नव्हता, असं म्हटलं आहे. हि उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी शिवाजीच्या वडिलांची जागा प्रथम दादोजीला आणि नंतर रामदासाला दिली आहे,’

जेम्सचं हे म्हणणं पूर्णपणे असत्यावर आधारलेलं आहे. ते तर्कावरही टिकणारं नाही. शिवराय हे जन्मजात आदर्श माणूस होते; म्हणूनच शिवरायांच्या मृत्युनंतरही २६ वर्षं मावळे स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानाच्या जरीपटक्यासाठी प्राणपणाने लढले. मावळ्यांनी औरंगजेबाला मरेस्तोवर दख्खन राज्य ताब्यात घेऊ दिलं नाही.याउलट पेशवाईत पेशवा म्हणजे राजा हयात असताना १८१८ मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावरून दगाबाज बाळाजी-नातू पटवर्धन याने जरीपटका खाली खेचला आणि तिथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला. पण पेशवाईचा जीव वाचवण्यासाठी कुणी लढलं नाही कि, कुणी रडलंही नाही. कारण बाजीराव आणि माधवराव पेशव्यांचा सत्ताकाळ वगळता जनतेला ते कधी आपलं राज्य वाटलं नाही. उर्वरित कालखंडात रावबाजीच्या आणि रंगेलबाजीच्या अतिरेकामुळे पेशव्यांचं सत्ताकेंद्र असणारा शनिवारवाडा छिनालवाडा झाला होता. या इतिहासाचं पाप आपल्यावर उलटेल या भयानं बिथरलेले आजही शिवरायांच्या चारित्र्यकथन-लेखनाचा आव आणून त्यांचं चारित्र्य वादग्रस्त करण्याचा डाव खेळत असतात. त्यात पेशवाईपेक्षा शिवशाही वेगळी नव्हती, हे सांगण्याचा हलकटपणा असतो.

अशा डावात फसलेला जेम्स लेन पुढे लिहितो, ‘एकप्रकारे नवर्‍याने टाकलेल्या त्याच्या (शिवरायांच्या) आईने आपल्या अंतर्मनात खोलवर रुजलेल्या प्रेरणा शिवाजीच्या आदर्श पुरुष होण्याच्या कृतीला नियंत्रित करीत होत्या. खरं तर, शिवाजीचं शौर्य आपल्या आईला खुश ठेवण्याचाच प्रयत्न होता. कारण शिवाजीच्या आईला आपल्या यादव घराण्याच्या थोरवीची जाणीव होती. आपला नवरा (शहाजी) आपल्या घराण्यापेक्षा हलक्या कुळातला आहे, याचीही तिला जाणीव होती. म्हणूनच हिंदुराज्याचे पुनर्निर्मिती करण्याचे स्वप्न तिने आपल्या मुलावर बिंबवले.’ हे विश्लेषण शहाजी-जिजाबाई-शिवराय यांनाच नव्हे; तर जे स्वराज्यासाठी लढले, मेले त्यांच्याही समर्पणाला कलंकित करणारे आहे.

जदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते. शहाजी राजांच्या या स्वप्नाची पूर्ती व्हावी, याचसाठी जिजाबाईंनी बाल शिवाजीवर संस्कार केला. हा संस्कार करताना गुलामगिरीची सावलीही मुलावर पडू नये, यासाठी जिजाबाई निग्रहाने शहाजी राजांपासून दूर राहिल्या. त्यांच्या मनात जर शहाजीराजे हलक्या कुळातले असल्याचा साल असता, तर दोघांच लग्नही झालं नसतं आणि त्यांनी शहाजीचं स्वराज्याचं स्वप्न शिवरायांच्या मनात उतरवलं नसतं. त्याकाळी लग्नं बालवयात होत असे.

जिजाबाईंचा विवाह वडिलांनी आणि घरातल्या जाणत्यांनी ठरवला होता. त्यांनी त्यावेळच्या रीतीनुसार शहाजीराजांचं कुळ-मूळ तपासूनच त्यांच्याशी जिजाबाईंचा विवाह नक्की केला असणार. तथापि, ज्यांच्या डोक्यात कुळाचे खूळ आहे, अशा सनातनी किड्यांच्या वळवळीतूनच शहाजी आणि जिजाबाईंमधील नीच-उच्च कुलाची निपज झाली असणार आणि जेम्स लेनच्या डोक्यात ती भरली असणार. जिजाबाईंच चारशे वर्षांपूर्वी नवर्‍यापासून दूर राहणं. त्याचं स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याच पाहणं, हे बहुजन समाजातील स्त्री एकाकीपणे अशी काही कर्तबगारी दाखवू शकते, याकडे आजही प्रश्नार्थक नजरेने पाहणार्‍यांना छळू शकतं. हा दोष पाहणार्‍यांचा नसून वैचारिक सोवळ्याचा आहे. या सोवळ्यात जेम्स लेन फसलाय.

त्यामुळेच शिवरायांची कुचेष्टा नोंदवण्यासाठी त्यांनी जो महाराष्ट्रीयन असा उल्लेख केलाय ते महाराष्ट्रीय लोक म्हणजे पेशवाईतल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी शिवरायांच्या अस्सल मराठेशाहीला अफजुलखानी आवेशात डंख मारणारे अट्टल कोब्रा नाग आहेत, असं समजायला हरकत नाही. कारण या पुस्तकाच्या संदर्भसुचीत प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, डॉ.आंबेडकर, गोविंद पानसरे यांच्या शिवराय आणि शिवराज्य या संबधीची माहिती देणार्‍या पुस्तकांचा समावेश नाही. चार महिन्यापूर्वी जेम्स लेनच पुस्तक प्रसिद्ध झालं. ७ सप्टेंबर २००३ च्या दैनिक सामनाच्या रविवारच्या पुरवणीत या पुस्तकाचं कौतुक करणारं अनंत देशपांडे यांचं परीक्षण आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आणि शिवराय हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आहे. तसे शिवराय मराठीजनांच्या अस्मितेचा विषय आहेत. महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत. या दैवताची जेम्स लेन याने पेशवाई किड्यांच्या नादाला लागून काय धूळधाण उडविली, याची माहिती राज्यकर्त्यांना असणे शक्य नाही, हे समजू शकतो. पण या बदकर्माची कल्पना परीक्षण लिहिणार्‍यास नसावी, हे पटण्यासारखं नाही.

ह्यात संपादकाच्या मोकळेपणाचा फायदा उठवला गेला असेल तर कपटनीती यशस्वी झाली, असंच म्हणावं लागेल. दरम्यानच्या काळात या पुस्तकाच्या विरोधात कुजबुज सुरु झाली. त्या गेल्या आठवडयात वर्तमानपत्रातून वाचा फुटली. त्याचबरोबर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने ताबडतोब क्षमायाचना करून सदर पुस्तकाची आवृत्तीच रद्द करीत असल्याचं जाहीर केलं आणि वितरण थांबवलं. परंतु तोपर्यंत जगभर वितरीत झालेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. त्या पुढच्या काळात संदर्भासाठी वापरल्या जाणार, हे स्पष्ट आहे. अनंत देशपांडेनीही सामनातील परीक्षणात एक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो, असं म्हटलं आहे. शिवरायांच्या संबंधित एखादं प्रकरण निघालं कि, त्यावरून देणार्‍या संस्थेने अथवा त्याला मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींपैकी कुणीही शिवरायांना कलंकित करणार्‍या पुस्तकाचा जाहीर निषेध केलेला नाही. मूळ गुन्हेगार परदेशात असल्यामुळे त्याला जोडयाने बडवता येत नाही. त्यामुळे त्याला साथ देणार्‍यांना निगरगट्टपणे मजा अनुभवता येतेय.


ज्ञानेश महाराव,
(संपादक, चित्रलेखा)

स्त्रोत: गर्जे शिवरायांची तलवार

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.