दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११).
छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती. शिवरायांनी निवडक सैन्य घेतले. लग्नाच्या वरातीमधुन पुण्यात शिरले. निवडक घोडेस्वार भांबुर्डी (आताचे शिवाजीनगर गांवठाण) येथे ठेवले. शिवरायांनी मोठ्या विचाराने, धैर्याने आणि शौर्याने ५ एप्रिल १६६३ च्या पहाटे लाल महालाभोवती असणारी पाऊण लाखाची फौज भेदून शिवनीतिने शायिस्तेखानावर हल्ला केला. त्या हल्ल्यात त्याची तीन बोटे कापली. शिवरायांनी शायिस्तेखानाला धडा शिकविला.
शिवरायांनी ज्याप्रमाणे लालमहालातील शायिस्तेखानावर कारवाई करून त्याची बोटे कापली, त्याप्रमाणेच पुणे महानगरपालिकेतील शिवरायांच्या शिलेदारांनी समूह शिल्पातील आदिलशहाचा नोकर दादू कुलकर्णीचे २७ डिसेंबर २०१०च्या पहाटे पाय कापले. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कारण शायिस्तेखानाला धडा शिकविण्यासाठी शिवाजी महाराज जिवंत होते; पण समूह शिल्पातील अनधिकृत दादोजी कुलकर्णी काढण्यासाठी शिवाजी महाराज जिवंत नव्हते. त्यामुळे हे काम अत्यंत जोखमीचे होते. दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरू, मार्गदर्शक किंवा शिक्षक नव्हता. तो आदिलशहाचा प्रामाणिक नोकर होता. शिवचरित्राच्या अत्यंत महत्त्वाच्या अणि समकालीन अशा जेधे शकावली, शिवभारत, राधामाधवविलासचंपू, पर्णालपर्वतग्रहणाख्यान, बुधभूषण इत्यादी ग्रंथांत दादोजी कोंडदेव आणि रामदास यांचा साधा उल्लेख देखील नाही; पण शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय घेऊन ब्राम्हणांचे महत्त्व वाढविण्यासाठी ब्राम्हणांनी विशेषतः बखरकार, कथाकार, नाटककार, चित्रपटवाले, शाहीर, पाठ्यपुस्तकवाले यांनी दादोजी कोंडदेव आणि रामदास शिवचरित्रात घुसडले. गुरू म्हणून सांगत- सांगत, बाप म्हणून कुजबूज करण्यापर्यंत ब्राम्हणांची मजल गेली. दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते, हे महात्मा फुले यांनी १८६९ साली, त्यांनी लिहिलेल्या पोवाड्यात स्पष्ट केले, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० साली दादोजी कोंडदेव आणि रामदास हे गुरू नव्हते, हे जाहीरनाम्यात सांगितले.
ब, मो, पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांनी दादोजी-रामदासाचे इतके उदात्तीकरण केले, की दादोजीला थेट जिजामाता आणि बाल शिवबा यांचे शेजारी नेऊन उभे केले. १९९४ साली निनाद बेडेकरांनी लाल महालात समूह शिल्प उभारण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस रत्नाकर कुलकर्णी आयुक्त तर सुहास कुलकर्णी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बहुजन समाजाच्या चांगुलपणाचा आणि इतिहासविषयक अज्ञानपणाचा फायदा घेऊन २००० साली सदर समूह शिल्प बसविले. यासाठी बामणांनी कोल्हापूरचे विद्यमान शाहू महाराज आणि सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांनादेखील वापरले. २००० साली समूह शिल्प बसविले, २००३ साली जेम्स लेनचे पुस्तक आले. दादोजी कोंडदेवच्या पुतळ्यासाठी आग्रह धरणारे आणि जेम्स लेनला मदत करणारे, जेम्स लेन प्रकरणी गप्प बसणारे जातभाई एकच आहेत. हा योगायोग नसून शिवरायांच्या बदनामीचा मोठा कट आहे.
आई, वडील आणि मुलगा वाटावा असे समूह शिल्प असून त्या शिल्पातून दादोजी कोंडदेवचा पुतळा काढून त्या जागी शहाजीराजांचा पुतळा बसवावा, ही मागणी संभाजी ब्रिगेडसह ८५ बहुजनांच्या शिवप्रेमी संघटनांनी २००४ सालापासून सुरू केली. शिवाजी महाराजांचे साताऱ्याचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी १२ ऑगस्ट २००६ रोजी पुणे महानगरपालिकेला पत्र दिले, तर कोल्हापूरचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी पुतळा काढण्याबाबतचे पत्र पुणे म.न.पा. ला २२ ऑगस्ट २०१० रोजी दिले. दादोजीचा पुतळा हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी.बी. सावंत आणि उच्च न्यायालयाचे माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी २५ ऑगस्ट २०१० रोजी पुणे म.न.पा.वर आग्री, कोळी, मच्छिमार, आदीवासींचा दहा हजार शिवप्रेमींचा मोर्चा काढला. मुकुंद काकडे, जगजीवन काळे, माऊली दारवटकर यांनी सदर विषय सातत्याने लावून धरला. भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड यांनी पुतळा हटविण्यासाठी २४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यात एक लाखाचा मेळा आयोजित केला. डॉ. बाबा आढाव, प्रतिमा परदेशी, अॅड. अनंत दारवटकर इत्यादी अभ्यासकांनी प्रबोधनातून जनजागृती केली.
पुणे म.न.पा.ने याबाबत महाराष्ट्र सरकारकडे पुतळ्याबाबत अभिप्राय मागितला, तेव्हा शासनाने दादोजीबाबत पुरावा नाही असे ९ मे २००६ रोजी कळविले. ना. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांच्या अध्यादेशाने महाराष्ट्र शासनाने २ जुलै २००८ रोजी ‘दादोजी कोंडदेवबाबत’ समिती नेमली व याबाबत जनतेची मते मागवली. महाराष्ट्रातील आलेल्या २४८० पत्रांवरून आणि इतिहासतज्ज्ञांच्या अहवालावरून महाराष्ट्र शासनाने १५ डिसेंबर २००८ रोजी दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरू, मार्गदर्शक, शिक्षक नसल्यामुळे या नावाने दिला जाणारा ‘क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ रद्द केला.
पुणे महानगर पालिकेने याबाबत सारासार विचार करून आणि शिवरायांची बदनामी दूर करण्यासाठी दादोजीचा पुतळा काढण्याचा ठराव २३ डिसेंबर २०१० रोजी सर्वसाधारण सभेत मांडला. तो ५४ विरूद्ध २४ मतांनी मंजूर झाला. हा सत्याचा विजय होता. सत्य लपविता येते; पण संपविता येत नाही, हेच या ठरावाने सिद्ध झाले. महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यास पुणे न.पा.चे तत्कालिन नगराध्यक्ष आपटे यांनी विरोध केला होता. महात्मा फुले यांचा पुतळा न बसविण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. त्याचा बदला काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी घेतला आणि दादोजीचा पुतळा काढण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. या प्रसंगी भाजप, शिवसेना आणि मनसे यांनी दादोजी कोंडदेवचा पुतळा काढू नये अशी भूमिका घेतली. २५ डिसेंबर २०१० रोजी ब्राम्हणांनी पांडुरंग बलकवडेमार्फत पूणे न्यायालयात पुतळा काढू नये म्हणून याचिका दाखल केली. जनमताचा रेटा आणि कायदेशीर बाबी पूर्ण करूनच पुणे म.न.पा. ने २६ डिसेंबरच्या रात्री म्हणजे २७ डिसेंबर २०१० च्या पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी दादोजीचा पुतळा काढण्यासाठी लालमहालात प्रवेश केला.
याप्रसंगी पुतळा कादू नये म्हणून नगरसेवक श्याम देशपांडे, नंदू एकबोटे, मिलींद एकबोटे आणि डॉ. निलीम गोऱ्हे हे ब्राम्हण नेते मंडळी रात्रभर डोळ्यात तेल घालून लाल महालाबाहेर बसले होते. पाचशे पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी लाल महालाला वेढा टाकला. ब्राम्हण नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी शेलारमामांनी आदिलशहाचा नोकर दादोजी कुलकर्णीचे पाय कापले, ज्याप्रमाणे शेलारमामांनी ४ फेब्रुवारी १६७० रोजी उदयभानूचे शीर छाटले, त्याप्रमाणे शेलारमामांनी दादोजीचे पाय कापून शिवरायांच्या बदनामीचा बदला घेतला, ज्याप्रमाणे शिवरायांनी पहाटे लाल महालात शिरून शायिस्तेखानाची बोटे कापली, त्याप्रमाणे पुणे म.न.पा.ने दादोजीचे पाय कापले. शिवरायांच्या चरित्र रक्षणासाठी पुणे म.न.पा.च्या हिंमतवान नगरसेवकांनी हे शिवरायांसारखे कार्य केले. त्यांच्या शिवप्रेमाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन!
२७ डिसेंबर २०१० रोजी भाजप-शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी पुणे म.न.पा.वर दादोजीचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. या मोर्चाला फक्त दोनशे कार्यकर्ते होते, मोर्चा अयशस्वी झाल्याच्या न्यूनगंडातून भाजप-शिवसेना-मनसेच्या नगरसेवकांनी पुणे म.न.पा.तील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ सभागृहावर हल्ला केला. शिवाजी सभागृहाची मोडतोड केली. दादोजीसाठी शिवाजी सभागृह फोडणारे शिवभक्त की दादोजी भक्त? शिवाजी सभागृहाची मोडतोड करून ब्राम्हण नगरसेवकांचा मोर्चा महापौरांच्या दालनाकडे वळला तेव्हा मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांना शिवरायांच्या पद्धतीने प्रतिकार केला,
शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमध्ये दादोजीचा पुतळा उभा करण्याची घोषणा केलेली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी पुतळा काढण्याचा निषेध करून पुतळा बसविण्याचा निर्धार केलेला आहे. शिवसेना नेत्यांनी थोडे प्रबोधनकार ठाकरेंना समजून घ्यावे. हेडगेवारच्या मार्गाने जायचे, की प्रबोधनकारांच्या मार्गाने जायचे, हे आता ठरवावेच लागेल, अन्यथा महाराष्ट्रातील सच्चे शिवप्रेमी आपणास माफ करणार नाहीत. ओठात शिवाजी आणि पोटात दादोजी ठेवणाऱ्या लुच्च्यांना धडा शिकवून शिवरायांचा तेजस्वी इतिहास लाखो वर्षे तळपत राहील.
–
श्रीमंत कोकाटे
Source: 1