पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे.
शाहीर- प्रबोधनकार ठाकरे
(चाल:– उद्धवा, शांतवन.)
शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला !
झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला-
“वीर हो! असा निकराचा । येई न समय बहू वेळां,
पातली सुदैवें संधी । जनिं तुह्यां अमर होण्याला !
निज शौर्य शत्रुला दावा,
रग पुरी तयाची जिरवा,
नृपभक्तजनीं या मिरवा,
क्षणभंगुर या देहाचीं । आपणांस परवा कसची!” ।। १ ।।
“ जावोत आपुले प्राण । राहोत सुखी शिवचरण,
हा हेतु मनीं दृढ धरुन । शत्रुची करा धुळधाण,
विजयांती कीर्ति वराल । ना तरी अमरिं सुख पूर्ण ।
अंबिका-नाम गर्जून
शिवचरण मनीं आणून
समशेर चालवा कसुन”
आवेशायुक्त या बोलें । रणमदें वीर फुरफरले ! ।। २ ।।
मा-यांच्या रोखुनि जागा । जागजागिं मोर्च दिधले !
कमटेकरि, बरकंदाज, । एक्कांडे गोफणवाले,
चहुंफेर धूम चालाया । गिरिदरीं वीर बसविलये,
छातीचे निधडे बहुत
झंजार वीर समवेत
धरुनिया दबा खिंडीत
जणु व्याघ्रचि बाजी बसला । सावजांस झडपायाला ! ।। ३ ।।
तांतडिने धावत येतां । त्या स्थलास अरिची सेना
घेउनी उडी लवलाही । मावळे उडविती दैना !
सर्वांच्या पुढती बाजी । ‘ असि’ धरुनि करावि थैमान !
अनिवार बघुनि तो मार
जोहार मानसीं चूर
परि फाजल खवळे फार
देउनी धाक निज चमुला । उद्युक्त करी समराला ! ।। ४ ।।
१ ) १. असि-तलवार, २. सिद्दी-जोहर, ३. फाजल-महमद
दों दळे भिडुनि शौर्याने । भडिमार सारखा करिती !
चहुंकडुनि बाण सणसणती । गोफणगुंडे फणफणती,
खणखणाति जवें तरवारी । रणवाद्ये नाना झडती !
गर्जती वीर बहुसाळ,
खेंखाळति हय तेजाळ,
जाहला समरकल्होळ,
प्रतिशब्द तयाचे उठले । दरि, खोरीं, गिरी दुमदुमले ! ।। ५ ।।
येउनी उपलिं आदळती । भंगतात जलधीवीची !
निर्दळी वीर तो पथकें । मा-यामधिं येतां अरिची !
भिडतसे धावुनी वेगें । मारुनी धडक जोराची !
गति चक्राकृति घेऊन,
रवंदळी देइ उडवून,
रक्ताने भूमि न्हाणून,
चालवी शत्रुसंहार । गजयूथिं सिंहसा वीर ! ।। ६ ।।
बेफाम रणमदें झाला / दृष्टि लाल धुंदी चढून !
तनु सर्व रक्तबंबाळ । अरिरुधिरामधिं न्हाऊन !
छाती न होत काळाची । ते बघण्या भीषण वदन !
आवेशें स्फुरती गात्रे
करकरां चावि रदनांतें
गर्जुनि ‘ जय हर ! हर! ’ शब्दें
पाडीत ढीग शत्रूचे । रणभैरव जैसा नाचे ! ।। ७ ।।
अरिरुधिरि होउनी स्नात । न्हाणि तेविं भूदेवीला !
तद्दिव्य भव्यशा भाळीं । जयकुंकुम-मळवट भरिला !
विच्छिन्न करुनि शत्रुंच्या । तनु, लेववि भूषणमाला !
पूजी शिरकमलें अमित !
तत्प्राण निवेद्यीं देत !
पाजळुनि यशाचा पोत !
पथ दरिचा उल्लंघाया । ‘बेहद्द’ यत्न अरि करिती !
हतवीर्य प्रतिक्षणिं बनुनी । किति जीव देति, किति पळती,
डोंगरी मार्ग अडचणिचा । घसरुनी बहुत आदळती !
तैशांत मावळे वरुन
पथिं दगड देति लोटून,
बंदुका, गोफणी, बाण –
वरि झडतां कुणिहि न परते । अरि, वृत्त कळविण्या चमुतें ।। ९ ।।
झगडला जवें बहु काळ । शौर्याची शर्थ करुन !
परतवी शत्रुला कितिंदा । विक्रमें बहुत चिरडून
परि अमित तयाची सेना । लोटती वीर उसळून
बाजिशीं अल्प चमु उरली
तनु फारचिं जखमी झाली
रक्ताने न्हाउनि गेली !
तसुभरहि हटेना मागे । तो सिंह जसा खवळून
लढतसे बहुत निकराने । निज हतबल तनु सावरुन !
पद पुढति न पडति न पडु दे अरिचा । जागींच ठेवि डांबून !
सैन्यास वदे, “ हो वीर !
शिवपदिं व्हा न बेकदर !
द्या शत्रुस बेदम मार !
हाणूनि पिटाळा जलदी । मजकडे बघु नका अगदीं” ! ।। ११ ।।
रणधुमाळींत या घाव । बाजीच्या वर्णी बसला ।
रणशैय्येवरि मग पडला । अभिमन्यु दुजा तो गमला !
शिवचरणिं लागले चित्त । कंठात प्राण घुटमळला !
सरबत्ती परिसुनि कानीं
जावोत प्राण मज त्यजुनी !
हा निश्चय मनिं दृढ धरुनी
निज चमूस देई धीर । घनघोर चालवी समर ! ।। १२ ।।
रणचमत्कार हा बघत । रवि आला माध्यान्हीला !
क्षण निश्चल होऊनि पाहे । नरवीर स्वमिभक्ताला !
करजाल समोरच पसरी । ह्रदयींच त्यास घेण्याला !
झडतांच गडावरि तोफा । संकेत नृपतिचा पटला !
‘कृतकृत्य जाहलो’ वदलो!
शिवराजयशीं रंगेला !
मनिं अणी प्रभुपदकमला !
नि: श्वास अंतिंचा त्यजुनी । रवितेजीं मिळुनी ।। १३ ।।