Satyashodhak Default Featured Image

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय.
ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय.

पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे.
श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे.

आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे.
हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको;

यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

यांना अजून माहित नाही, बोलले तसे वागले पाहिजे.
किर्तनातल्या शब्दा-शब्दाला, प्रत्यक्षात जागले पाहिजे.

तुमच्या भागभांडवलावरच, जोरात यांचा धंदा आहे.
यांच्या दर्शनासाठीही, पायावरती चंदा आहे.

यांची ही बाबागिरी आणि बंडलबाजी, तुम्ही एकदा खोटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

उगीच कुणाचा कधी, उगीच तुकोबा होत नाही.
त्यासाठी मोह,माया,वासना, मूळापासून झडवाव्या लागतात.

वाटलेल्या कर्जाच्या खतावण्या, इंद्रायणीत बुडवाव्या लागतात.
वरून अंगाला नाही, मनाला राख फासावी लागते.

कुणाच्या शाही नजराण्याची, आसक्ती नसावी लागते.
आजकाल मात्र, जरा वेगळीच खोड आहे.

अध्यात्म आणि राजकारण, जणू दंवडीची जोड आहे?
जो राजाश्रयाला भुलला, तो काही साधु नाही.
कुणावरही आपले, गुरूत्व कधी लादू नाही.

राम-कृष्ण-हरीचा मंत्र,एकदा यांच्यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

अजूनही त्यांचा, पून्हा तोच दावा आहे.
वेदांचा खरा अर्थ, आम्हांलाच ठावा आहे.

ते सांगतात तोच धर्म, ते सांगतील तोच देव आहे.
जसे काय ज्ञान म्हणजे, त्यांच्या बापाचीच ठेव आहे.

पंढरीच्या वाळवंटी, आम्ही नाचतो आहोत.
नव-नवे अर्थ शोधत, गाथा पुन्हा वाचतो आहोत.

एक कौतुकाची थाप, आमच्याही पाठी हाणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

अध्यात्माच्या क्षेत्रात, आज ज्याचा त्याचा टापू आहे.
रोज नवा बाबा,नवा महाराज, रोज नवी मॉं,नवा बापू आहे.

मी मोठा की तु मोठा? याचे स्तोम तर फार आहे.
भक्तांच्या टोळ्या-टोळ्यात, आज जणू गॅंग-वॉर आहे?

जुना भक्त नवा गुरू, उगवत्याला वंदन असते.
ओव्हरडोस होईल असे, सत्संगाचे चंदन असते.

याला अध्यात्माचे राजकारण, नाही तर कुणी अध्यात्मिक खुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

कुणी आपल्या बडेजावात, भक्तांना चूर करतोय,
कुणी भोळ्या भक्तांचे, दु:ख इथे दूर करतोय.

कुणी लावतोय अंगारा, कुणी भक्तांचे कान फुंकतोय.
कुणी अफू-गांजाच्या नशेत, मठा-मठात छान झिंगतोय.

कुणी झाले मांत्रिक, कुणी झाले तांत्रिक.
कुणी पट्टीचा ऍक्टर आहे.
रोग्यांची संख्या वाढ्ताच, कुणी चक्क डॉक्टर आहे.

रोग कोणताही असो, त्यांच्याकडे उपचार हजर आहेत.
अडल्या-नडल्या भक्तांचे, त्यांच्याच नावाने गजर आहेत.

व्याकूळलेल्या भक्तांना, जो तो अध्यात्माची भूल देतोय.
एवढेच काय?,ज्यांना होत नाही, त्यांना चक्क मूल देतोय !

झोपलेल्या या भक्तांना, तुम्ही एकदा उठी उठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

गुरूंबरोबर भक्तांनाही, आज अध्यात्माची नशा आहे.
वरून वरून किर्तन, आतून मात्र तमाशा आहे.

बुवा तिथे बाया, बाया तिथे बुवा आहे.
एकांतात गुरूची सेवा,एकांतातच दूवा आहे.

किर्तनाची बिदागी तर, विचारू नका किती आहे.
अध्यात्मिक चंगळवादात, बिचारी श्रद्धा सती आहे.

घेणारांना गोड वाटते, देणारांनाही गोड वाटते.
जेव्हढी बिदागी जास्त, तेवढी किर्तनाची ओढ वाटते.

याला धंदा म्हणा, नाही तरी कुणी लुटा-लुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

आता पाप पाप म्हणून, कुणी उर बडवू शकत नाहीत.
कुणाच्याही गाथा, पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त.

“सदेह वैकुंठा” चा अर्थ, हळूहळू का होईना कळतो आहे.
तरीही एखादा मंबाजी, जमेल तसा छळतो आहे.

खोटा इतिहास पुन्हा, कुणी लिहू शकत नाही.
आणायचे म्हटले तरी,ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.

तुकोबा तुमचा वारसा, आमच्या ठायी ठायी आहे !
आजकाल आमच्या लेखणीत,तुमचा आशिर्वाद
अन वॉटरप्रुफ शाई आहे !!

वज्राहून कठीण, मेणाहून मऊ आहोत.
केला होता अट्टाहास यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मोबा.९९२३८४७२६९

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.