आपल्या भारत देशात बहुजन उद्धारक महापुरुषांची विविध स्वरुपातील अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. त्याद्वारे त्यांची आठवण सतत जागृत राहते. त्यांच्या आचार व विचारांची ज्वलंत ज्योत मूळ उद्देशाने तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. किंबहुना त्यातच सर्वांचे अस्तित्व दडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील दोन घटना आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवून आहेत. शोषित समाजासाठी तर उद्धारक आहेत. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेबांनी उत्साही व आवेशपूर्ण मनस्थितीत ब्राह्मणी धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्वीकार करुन विश्वाच्या अमर्याद पोकळीत प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक केला आणि जगातील विषमतावादी, शोषित व हिंस्त्रपशुसारख्या निष्ठर मेंदूच्या धर्म व्यवस्थापकांना गर्भगळीत केले. या ऐतिहासिक प्रसंगातून आपण काय घ्यावे अन काय सोडावे? या प्रश्नाची उकल खऱ्या अर्थाने समाजातील विद्वानांनाही झाली नसावी असे धाडसाने म्हणावे वाटते. बुद्धिवंत व्यक्ती म्हणून गणल्या गेलेल्या आंबेडकरांचे तत्वज्ञान विस्ताराने विश्लेषण करुन प्रख्यात व्याख्याते म्हणून जनतेकडून स्तुती सुमने उधळून घेतात. त्यांच्या जीवनात जर जवळून पाहिले तर भयानक विरोधाभास दिसून येतो, यावर विस्ताराने लिहिण्यापेक्षा थोडक्यात असे की, बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे पावलोपावली उल्लंघन होत असते. समाजाच्या तोंडी शब्दसुमनांपेक्षा त्यांच्या अंत:करणातील शाबासकी मिळविणे आवश्यक असते. (बोले तैसा चाले) याशिवाय पाठ कोणी थोपटण्यालायक होत नसतो. आज तथागत बुद्ध जिवंत असते तर बाबासाहेबांना तोंड भरुन शाबासकी दिली असती. नेमका हाच फरक समाज धुरीनांच्या लक्षात येणे अगत्याचे आहे.
डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतर केले म्हणजे मंदिराऐवजी विहारात गेले, राम-कृष्णाच्या जागी बुद्धाची पूजा केली, श्री च्या ठिकाणी आयुष्यमान केले, धर्मपंडित ऐवजी भदंत महाथेरो उपाधी घेतली, आणि धर्माच्या ठिकाणी धम्म समजला. अशा बालिश बदलाच्या अर्थाने धर्मांतर केले नाही. त्या प्रसंगी ते म्हणाले होते की, “आज मी नव्याने जन्म घेतला असे वाटते.” ऐकायला एवढेसे वाक्य आहे मात्र यामध्ये माणसाच्या स्वाभिमानी व कल्याणकारी जीवन जगण्याची दैदिप्यमान प्रेरणा संबोधित होते. अशा महान उच्चतम उद्देशाने धम्म स्वीकारला. स्वत:वरील अन्याय व अपमानित प्रसंग त्यांनी एका फटक्यासरशी दर करुन सुखी झाले असते. परंतु समाजावरील क्लीष्ट बंधने लादणाऱ्यांच्या थोबाडीत बुटाची लाथ देण्यासाठी व्यवस्था लाथाडून स्वसमाज मुक्त करण्यासाठी धम्म अंगिकारला. त्यांच्या सोबतच लाखो बांधवांनी धम्माचा स्वीकार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समताधिष्ठित जीवन प्रणालीचा पुरेपूर लाभ आजचा बौद्ध बांधव घेत आहे. सद्यपरिस्थितीकडे पाहिले तर खंत अशी वाटते की, शरीराने अनुयायी झालेल्यांची संख्या अधिक आहे आणि विचाराने अनुयायी अल्पप्रमाणात आढळून येतात. शरीराने अनुयायी असणे गुलामी व बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असते. तर विचाराने अनुयायी होणे ज्ञानीयांचे प्रतीक होय, म्हणून प्रत्येक सुज्ञ बांधवांनी स्वत:चे परीक्षण या निकषाप्रमाणे करुन त्यात बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर बौद्धेतरांनी असेच वागणे अगत्याचे आहे. कारण डॉ.बाबासाहेबांनी राज्य घटनेद्वारे अनेक धर्म, जात व पंथाच्या माणसाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात स्वातंत्र्य, समता व न्याय स्थापित केला आहे. तेव्हा त्यांच्याप्रति उतराई होणे आमच्यावर बंधनकारक आहे.
बाबासाहेबांचे नाव घेऊन स्वार्थ साधणाऱ्यांची गर्दी झाली आहे. त्यांचा फोटो घरात लावला व लोकांना ‘जय भिम’ असे अभिवादन केले की, आंबेडकरप्रेमी, आंबेडकरवादी अशी विशेषणे लावली जात आहेत. मग त्यातील एखाद्या विदुषकासारखे वेष बदलणाऱ्या मवाली जातीयवाद्यास ‘दलित मित्र’ पुरस्कारासाठी बौद्ध बांधव त्याची शिफारस करतात. परंतु ते लोक ‘दलित मित्र’ छत्राखाली जातीयवादी रोपटे वाढवतात, हे आमच्या दलित बांधवांच्या लक्षात का येत नाही? नागपूर व मुंबईतील चैत्यभूमीवरील कार्यक्रमात बहुजनातील ‘बोके’ सरसावून पुढे असतात. बाबांनो, तुम्ही फक्त भिमरावांचे नाव ढोंगीपणाने घेतलात तर बरेच काही साध्य करता, जर त्यांच्या विचारांना मनोभावे आदराने खोपडीत ठेवाल तर पिढ्यान् पिढ्यांचे कल्याण होईल ना! एकंदरीत भारताची उज्वलता एकमेव बद्ध तत्वज्ञान प्रणीत राज्यघटनेवर आधारित आहे. त्यासाठी बौद्ध बांधवांकडून अपेक्षा करावी वाटते की, आपण धम्माच्या खऱ्या स्वरुपाचे जतन करणे हेच समाजकार्य, धम्मकार्य, राष्ट्रकार्य व डॉ. आंबेडकरांच्या विचाराने अनुयायी होणे होय. जर का यात थोडीही कसूर व भेसळ केली तर पुष्यमित्र शुंगाचा विपरित आणि मानव घातकी थैमान वाढल्याशिवाय राहणार नाही. धम्म वाचवा! देश वाचवा!!
सहा डिसेंबरला दरवर्षी चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी लाखोंच्या संख्येत जमा होताता, ते पवित्र स्थळ अवश्य आहे. मात्र तेथील पावित्र्याचे स्वरुप इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळापेक्षा निश्चितपणे वेगळे आहे. तो वेगळेपणा हाच सन्मार्गाचा मूलमंत्र आहे. येथे फक्त दर्शन घेण्यात साध्यता नाही, तर त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा आलेख समोर ठेवून आचरण करण्यात खरी सिद्धता आहे. ही खरी प्रेरणा तेथून घेऊन येणे खऱ्या अर्थाने आदरांजली ठरु शकते. परंतु अनेकजण फक्त दर्शन घेऊन येतात आणि प्रेरणा तेथेच सोडतात. चैत्यभूमी ही मंगलमय, स्वाभिमानी व विकसित जीवन जगण्याची प्रेरणा घेण्याचे स्थळ आहे. फक्त दर्शन घेऊन ‘मुढ’ होण्याचे तीर्थक्षेत्र नव्हे. असाच अज्ञानीपणाचा प्रघात पडत गेला तर नक्कीच भीती वाटते, चैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते की काय?’ म्हणून देशहितासाठी दर्शन स्थळापेक्षा प्रेरणा स्थळ कायम ठेवणे योग्य होईल.
–
शेख अकबर
लातूर
Source: 1