अमर जाहले शंभूराजे!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांना न सुटलेले कोडं आहे.

शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजाचे चरित्र लोकांसमोर मांडले. तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात विकृत चरित्र शंभुराजांच्या विषयी उणीपुरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पीक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतु कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य दृष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ. जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ. कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे शंभुराजांचे चरित्र जनमानसासमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्कृतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्षे पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राज्यकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले. एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, शृंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमल्या गेले.

शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोगली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे वृत्त आणि राजारामाला गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. सोयराबाईंनी व रायगडावरील कट करणाऱ्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो त्यांनी हाणून पाडला व स्वतः रायगडावर दाखल झाले. इथे मात्र कट करणाऱ्यांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला. हा प्रकार समजताच सोयराबाई वगळता इतरांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसाचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभुराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभुराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले; पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूद करण्याच्या प्रचंड महत्त्वाकांक्षेने सात लाखांच्या अफाट फौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरम करून सोडणं ही काही सामान्य बाब नव्हती.

या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणून की काय आमच्यातलेही विरोधक तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी मांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ साक्ष देऊन जाते. उण्यापुऱ्या नऊ वर्षांच्या अखंड संघर्षात सुमारे सव्वाशे यशस्वी लढाया जिंकणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या ध्येयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे. येऱ्यागबाळ्याचे ते काम नव्हे. वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घकाळ यमयातना सुरू होत्या. रोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपूर्ण अंगाची साल सोलून काढण्यात आली. डोळे फोडून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडोळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेद्यच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशाच्याच काय; पण जगाच्या इतिहासात तोड नाही.
कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो हाच इतिहास शंभुराजांनी घडवला. मारणारे हरलेत आणि शंभुराजे मृत्यूला कवटाळून अमर जाहले!

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलडाणा, मो. नं. ९८५०३४५३६८

Source: 1

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.