दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.
जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा समावेश होतो. ‘मराठा तितुका मेळवावा’ या उक्तीनुसार मराठा सेवा संघाची स्थापना करुन गेल्या २५ वर्षांत त्यांनी खूप मोठी अशी सामाजिक ताकद उभी केली आहे. मराठा सेवा संघाचा रौप्य महोत्सव गेल्याच महिन्यात पार पडला व आता याच सेवा संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेला जिजाऊ जन्मोत्सव सोहळाही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व त्यातूनच प्रकट झालेला शिवधर्म अशा या वाटचालीत खेडेकरांनी प्रत्येक १२ जानेवारीला धर्म आणि राजसत्तेला खुलेआम आव्हान दिले. या वर्षीची जिजाऊ जन्मोत्सवाची वारीही त्याला अपवाद नव्हती.
राष्ट्रीय स्वयंसेवक व ब्राह्मणी मानसिकतेविरोधात सतत उघडपणे भूमिका घेणाऱ्या खेडेकरांनी गेल्या वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही संघ स्वयंसेवकांना आमंत्रित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला गेला; मात्र खेडकरांनी तो आपल्या शैलीने खोडून काढत आपली भूमिका ठाम असल्याचे प्रत्यंतर दिल्याने यावर्षीची गर्दी ही नवा उच्चांक गाठणारी ठरली. ‘मराठा’केंद्रित ठेवून सुरु झालेली सेवा संघाची चळवळ शिवधर्म प्रकटनानंतर बहुजनवादाकडे झुकल्यामुळे सर्वच स्तरांतून फार मोठी ताकद या चळवळीच्या पाठीशी उभी राहिली.
त्यामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊभक्त सिंदखेडराजा येथे दाखल होतात. यामध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळेच यावर्षी शेतकरी आत्महत्यांचा विषय लावून धरताना खेडेकरांनी शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन करीत, ‘हवे तर हत्या करा, पण आत्महत्या नको. मी तुमचे वकीलपत्र घेईल’, असे खळबळजनक विधान करुन एकप्रकारे राजसत्तेला आव्हान दिले. खेडेकरांनी अतिशय उद्विग्न होत, ‘हवे तर हत्या करा’, असे विधान करण्यामागे राजकीय धोरणांचे अपयशही अधोरेखित होते. गेल्या दहा वर्षांत शेती व शेतकरी यासंदर्भात सातत्याने चर्चा होत आहेत, विविध उपाययोजना सुचविल्या जातात – केल्या जातात, पॅकेज घोषित होते अन् त्यामधील लिकेजही बाहेर येते; मात्र शेतकरी आत्महत्यांच्या आकडा कमी झालेला नाही.
अशा स्थितीत हे चित्र आणखी गंभीर होण्यापेक्षा शेती परवडत नसेल तर करु नका, डोक्याच्या मॉलिशपासून तर बुटांच्या पॉलिशपर्यंत मिळेल ते काम करा अन् तेही जमत नसेल तर वसुलीला येणाऱ्या सावकाराची हत्या करा, पण आत्महत्या करु नका, असा सल्ला देणे चुकीचे नाही. मंचावर राज्याचे मंत्री, आमदार, खासदारांसह प्रशासनातील अधिकारीही उपस्थित असताना, खेडेकरांनी दाखविलेली हिंमत ही या सर्वांना आव्हान देणारी होती; मात्र या सर्वांच्या समोर गुपचूप ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. काँग्रेसचे शासन जाऊन आता वर्षही उलटले. कधी नव्हे ती मोठी ताकद जनतेने भाजपासेनेला दिली. शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय या दोन्ही पक्षांचे पानही हलत नाही; मात्र या महायुतीच्या महाशिवशाहीतही शेतकऱ्यांसमोर आशादायी चित्र उभे राहिलेले नाही. त्यामुळे अशा स्थितीत जिजाऊंच्या भूमीतून शेतकऱ्यांसाठी अशी आक्रमक भूमिका घ्यावी लागत असेल, तर चुकले कठे? तसेही खेडेकर कणाला घाबरणारे नाहीत.
त्यामुळे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘अच्छे दिन’ सुरु असल्याने, संघाचे नेहमीचे ‘शिवशक्ती संगम’ हे शिबिर भव्यदिव्य झाले. खरे तर संघाचा हा ठरावीक कालावधीनंतरचा नियमित कार्यक्रम आहे, पण यावर्षी सत्तेत असल्याचा रंग या शिबिराला होता. त्यामुळेच शिवधर्म पीठावरून खेडेकरांनी या शक्तिप्रदर्शनाची दखल घेत बहुजन समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मक्तेदारी मोडून काढण्याचे आवाहन करतानाच ‘हिंदू धर्मातील वाईट चालीरीती, प्रथा-परंपरा बाजूला करणे म्हणजे शिवधर्म’ अशी व्याख्या सांगत शिवधर्माची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प बोलून दाखविला. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवधर्माच्या माध्यमातून धर्मसत्तेलाही आव्हान देण्याचे काम या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व त्यांचे विविध ३२ कक्ष हे वर्षभर कार्यरत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रबोधनाचा विचार पेरत असतो. त्यामुळे येणाऱ्या वर्षात ‘गाव तेथे शाखा अन् घर तेथे कार्यकर्ता’ असा कार्यक्रम हाती घेतला गेला असल्याने धर्म व राज्यसत्तेला दिलेले आव्हान आणखी तीव्र होईल. त्याचा बिगुल शिवधर्म पीठावरून फुकला गेला. आता या आवाजाचे पडसाद कसे उमटतात, हे काळच ठरवेल.
–
राजेश शेगोकार,
बुलडाणा
Source: 1