नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा! मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव.

गरीब आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी नक्षलवादी लढतात. तसा नक्षलवाद्यांचा दावा आहे. आपण हा दावा कितपत मानायचा हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या दाव्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही असे वाटते. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी हिंसेचा वापर केला. पण हिंसेमुळे आजपर्यंत देशात किंवा जगात कोणताच प्रश्न सुटला नाही. हिंसेमुळे फक्त रक्तपात झाला. कोणत्याही समस्येचा विधायक असा परिणाम आजपर्यंत तरी दिसला नाही. नक्षलवादाने जन्म घेवून आज ४ दशके पार केली पण हिंसेमुळे वंचित, आदिवासी आणि गरिबांना न्याय मिळाला का? या देशात आजपर्यंत होत आलेला अन्याय संपला का? जर हिंसेने सर्व शक्य झालं असतं तर आज नक्षलवाद राहिलाच नसता. आपली सरकारी यंत्रणा जर पूर्वीपासूनच व्यवस्थित राबविल्या गेली असती तर महाराष्ट्रात नक्षलवादासारख्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केलेच नसते. सरकार काय समजते? नक्षलवाद इतका फोफावला त्याला सरकारी यंत्रणा पर्यायाने पोलिस यंत्रणा मुळीच जबाबदार नाही? खरे तर पोलिसी त्रासामुळेच अनेक आदिवासी तरुण नक्षलवादी झालेत. भविष्यात आपण एक नक्षलवादी व्हावं असं कोणत्या तरी तरुणाचं स्वप्न असतं का? नक्षलवाद्यांनी पोलिसांना मारले म्हणून आपण दुखवटा व्यक्त करून अश्रू ढाळत असतो, तर दुसरीकडे पोलिसांनीच संशयाच्या आधारे नक्षल भागातली गावेच्या गावे उचलून पोलिस ठाण्यात डांबली आणि अत्याचार केलेत याचा पाढा जर नक्षलवाद्यांनी वाचला तर त्याकडे आपण जाणीपूर्वक दुर्लक्ष करतो. सर्वसाधारण माणसाने नक्षल्यांच्या हिंसेचे समर्थन तर करता कामा नयेच पण पोलिसांच्या गैरकृत्याचेही समर्थन करता कामा नये.

नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात दहेगांव मानकापूर येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. तेथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केले होते. नक्षलवादाचं सावट त्या गावावर काहीच नव्हतं. मात्र त्याच तालुक्यात २८ कि.मी. अंतरावर नक्षली, कारवाया धडाक्यात चालू असतात हे तिथल्या लोकांशी चर्चा करताना कळलं. पोलिसांबद्दलची मते जाणून घेतली तेव्हा नक्षलवादास पोलिसच जबाबदार असल्याचा सूर निघाला. नक्षली चळवळ ही भरकटत चालली असेही अनेकांचे मत पडले. पोलिसांनी त्या गावच्या लोकांना काहीच त्रास दिला नाही परंतु २८ कि.मी.अंतरावरच्या त्यांच्या भावंडाचे हाल त्यांना पहावत नाहीत मूल तालुक्यातले सर्पमित्र ज्यांनी तालुक्यातील शेकडो शेतकयांचे जीव वाचविले ते उमेशभाऊ झिरे यांनी आदिवासींच्या व्यथा सांगितल्या. तालुक्याच्या शेवटच्या भागात नक्षलवाद आहे. सीमावर्ती भागातले आदिवासी रात्रंदिवस झोपत नाहीत. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती तर दुसरीकडे पोलिसांची भीती अशा दुहेरी वातावरणात भीतभीत दिवस घालवावे लागतात. जंगलातल्या आदिवासी आश्रमशाळा भयग्रस्त वातावरणात आहेत. तर तरुण मुलींना संशयाच्या आधारे पोलिस उचलून नेऊन एनकाउंटर करतात. पोलिसांनी बलात्कार केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

भंडारा जिल्ह्यातल्या मंगेझरी येथील १४ लोकांना २० वर्षापूर्वी संशयित नक्षलवादी म्हणून पोलिसांनी पकडून नेले. त्यांचा आजपर्यंत पत्ता नाही. जी १४ माणसे पोलिसांनी सर्व गावासमोर उचलून नेली ती माणसे पोलिसांनी कुठे नेऊन ठेवली हे पोलिसही सांगायला तयार नाही. कोणत्याही दलममध्ये त्यांचे नाव नाही किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याच कारागृहात ते आढळून आले नाहीत. ती माणसे गेली कोठे? दंतेवाड्यात ७४ पोलिसांना मारले म्हणून आपण अश्रू ढाळतो आहोत. पण याला नक्षलवाद्यांइतकेच सरकार जबाबदार नाही का? सरकार पर्यायाने पोलिस यंत्रणा कोठे कुचकामी पडते याचा विचार करणार आहे की नाही? नक्षलवाद्यांच्या नृशंस कृत्याचे समर्थन करणे अयोग्य आहे. पोलिस आपले एक नंबरचे शत्रू समजून नक्षल्यांनी असे मारणे म्हणजे आदिवासींवर केलेल्या अन्यायाचा बदला आपण घेतला असे जर नक्षलवादी समजत असतील तर जे पोलिस या हल्यात मृत्यूमुखी पडले त्यांनी आदिवासींचे आणि नक्षलवाद्यांचे काय बिघडवले होते? असा प्रश्न आपणास पडतो. पण दुसरीकडे सरकारी आदेशानुसार हे पोलिस घनदाट जंगलात धुसले ते नक्षल्यांचा खातमा करायला असा तर्क सरकारने लावला तर पुन्हा नक्षलवादी विचारतील आमचा खातमा करायचा म्हणजे काय? आम्हाला मारायला आले होते आणि आम्हीच मारुन टाकले. पण मारल्या गेलेली माणसे ही तुमच्या आमच्या सारखी होती म्हणून आपला जीव हळहळतो. आपण त्यांना रक्षक म्हणून संबोधतो म्हणून आपला जीव हळहळतो. खरे तर नक्षलवादी हे सरकारी धोरणामुळे वर्षानुवर्षे पिसल्या गेलेल्या आदिवासींचा आक्रोश आहेत. मा.प्रकाशभाऊ पोहरे यांच्या परखड मुलाखतीतून आणि रविवार पुरवणीच्या प्रहार स्तंभातून हेच पुढे आले. आदिवासींच्या बायका जणू आपल्याच मालकीच्या समजून अनन्वित अत्याचार करणारे सरकारी धेंडे आणि ठेकेदार तसेच आदिवासींना जनावर समजून कोठडीत डांबून मारणारे सैतानी वृत्तीचे पोलिस यांच्या अत्याचाराचा पाढा वाचून नक्षलवादी अशी हिंसक कामे करतात हे समजून कोण घेणार? खरे तर नक्षलवाद्यांपेक्षा आदिवासींची तरुण मुलेच या कार्यात जास्त प्रमाणात सहभागी असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. त्यांना कदाचित मरणाची भीती नसेल पण सरकार आणि पोलिसी वृत्तीचा त्यांच्या मनात ठासून भरलेला रागच अशी कृत्ये करायला त्यांना भाग पाडत असेल. खायला अन्न नाही. घालायला व्यवस्थित कापडं नाही. हाताला काम नाही. योग्य कामाला दाम नाही. असे असूनही विनाकारण पोलिसी अत्याचार होत असती तर त्यावर उपाय काय? अशा वेळी सरकार काय करते?

भंडारा जिल्ह्यातल्या धानोरा पंचायत समितीच्या सलामे नामक सभापतीस पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार केले आणि मीडियाच्या सहाय्याने नक्षलवादी ठरविले. आज त्याच सलामेंची मुलगी नक्षलवादी झाली पोलिसांची अशी कृत्ये नक्षलवाद्यांपेक्षा काही कमी आहेत का? नक्षलवाद्यांनी आपल्या काही सभ्य पोलिसांना मारुन टाकले अशावेळी आपण सहानुभूतीपूर्वक अश्रू ढाळतो हे ठीक आहे. पण हा कशाचा परिपाक आहे? सैतानी वृत्तीच्या पोलिसांचे कुकर्म आज चांगल्या पोलिसांना भोगावे लागत आहे. अशा हजारो पोलिसांचे आजपर्यंत विनाकारण बळी गेले आहेत. आमचे अश्रू चांगल्या पोलिसांसाठी जरुर पडले पण सैतानी पोलिसांच्या मढयासाठी आमच्या अश्रूना वाट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात येवून सामाजिक जीवन जगावे अशी सर्वांची इच्छा आहे. पण सर्वप्रथम इथली नोकरशाही सुधरायला हवी. इथली पोलिस यंत्रणा तेवढी सक्षम आणि चांगली असायला हवी. म्हणून अगोदर इथलं सरकार सुधारणं महत्त्वांच आहे. जर हे सरकारच सुधरायला तयार नसेल तर नक्षलवाद संपणे कठीण आहे. कदाचित नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद मात्र तसाच जिवंत राहील हेही तेवढेच खरे!


मारोती उईके

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.