स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतीज्ज्ञ, इंग्लिशतज्ज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते.
मालोजी भोसले व दीपाबाई (उमाबाई) फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या या दाम्पत्याच्या पोटी पराक्रमी शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ ला झाला. शहाजी व जिजाऊ हे बालकावस्थेत असताना रंगपंचमीच्या दिवशी परस्परांवर गुलाल उधळीत होते. ते पाहून ‘हा जोडा सुंदर दिसतो!’ असे जाधवराव कौतुकाने म्हणाले. त्यावेळी मालोजी चटकन उभे राहून सर्व उपस्थित मंडळींना म्हणाले. ‘आजपासून जाधवराव आमचे व्याही झाले’. मालोजीरावांनी व जाधवरावांनी आपल्या वक्तव्याप्रमाणे व निजामशहाच्या सहकार्य भावनेतून डिसेंबर १६०५ मध्ये मोठ्या थाटात हा लग्न सोहळा पार पडला. निजामशहाचे शहाजी व जिजाऊंच्या मंगल विवाह कार्यासाठी अमूल्य सहकार्य लाभले, त्यामुळेच महाराष्ट्राला शूर, कुळवाडीभूषण, प्रजाहितदक्ष, रयतेचा जाणता राजा शिवाजी मिळाला. नसता मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण झालेच नसते. एवढेच नव्हे, तर शिवाजी महाराजांचा सरसेनापती नूरखान बेग, अंगरक्षकापासून अनेक मुस्लीम सैनिक शिवरायांच्या सैन्यात होते. त्यात तोफखान्याचा प्रमुख दौलतखान, आरमाराचा प्रमुख दर्यासारंग, काझी हैदर हा मुसलमान वकील हे सर्व शहाजीराजांच्या तालमीत वाढलेले मुस्लीम सैनिक होते. शिवाजीराजानेही आपल्या राज्यशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात मुस्लिमांना प्राधान्य दिले होते कारण शिवाजी महाराजांचा विश्वास मुसलमानांवर होता, तर मुस्लिमांची निष्ठा शिवाजी महाराजांवर होती हे विशेष.
मराठ्यांच्या स्वराज्याचे संस्थापक शिवाजी असले तरी त्या स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे होते. त्यांनी अहमदनगरची बुडती निजामशाही वाचविण्यासाठी बलाढ्य मोगल सत्तेशी दिलेला धैर्यशाली लढा आणि अतुल पराक्रम इतिहासात अजरामर आहे. शिवाजीपूर्वी मोगल सत्तेला धैर्याने तोंड देणारा पहिला मराठी जहागीरदार म्हणजेच शहाजी होय. शहाजींची वीरता व मुसद्देगिरी महान होती. शहाजीच्या अनुभवाचा व सहकाऱ्यांचा फायदा शिवाजीला मिळाला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे कार्य शहाजीनेच सुरू केले होते. यातून शहाजीराजांचा दूरदर्शीपणा व राजनीतीज्ञपणा दिसून येतो.
शहाजीने फुकला । अनुभवांचा तंत्र। शिवाजीची श्रृंखला । स्वराजाचा तंत्र ।।
आताच्या भांडवलशाही देशांच्या हातचे बाहुले बनून देश कंगाल करू पाहणाऱ्या, स्वदेशाचा पैसा विदेशात ठेवणाऱ्या लोकांनी शहाजीनीतीतून स्वदेशप्रेमाचा रास्त धडा घ्यायलाच हवा. पुण्याला स्वतंत्र करणारे शहाजीच होते. शहाजीने अहमदनगरची निजामशाही सोडली व पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून १६३१ ला स्वतंत्र शासक बनले. तीनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालेला हा पहिला मराठी मुलूख होय; पण आदिलशहाचा निष्ठावान सेवक असलेल्या दादोजीने, मुरारी, पंडित जगदेवासोबत पुण्यावर स्वारी करून पुणे लुटून, जाळून त्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरविला. पुढे १६३९-४७ मध्ये शहाजीने पुण्याला झांबरे पाटलाकडून जागा घेऊन ‘लालमहाल’ नावाचा राजवाडा शिवाजीसाठी बांधला व शिवाजी जीजाबाईला लालमहालात पाठविले. तेव्हा शिवरायांच्या समवेत कित्येक हत्ती, घोडे आणि पायदळातील सैनिक, पिढीजात व विश्वासू अमात्य आणि प्रसिद्ध अध्यापकही दिले. बिरुदे आणि उंच उंच ध्वज व मोठा खजिनाही दिला. सामान्य लोकांनाही जमणार नाहीत, अशी असाधारण कर्मे करणारे इतर सेवकही दिले. पुण्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी बाल शिवबाच्या हाती राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीने सोन्याचा नांगर दिला. सोन्याचा नांगर धरून हलोत्सवाची सुरुवात करायची. ही प्रथा बुद्ध काळापासूनच चालत आलेली होती. ‘शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.’ हे कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखणारे शहाजीराजे होते ते यावरून लक्षात येते.
शहाजी-जिजाऊने । घडविला शिवबा | मराठी स्वराजाचा | मिळविण्या ताबा ।।
शहाजीने कर्नाटकातील बंगलूर हे आपले केंद्र बनवून विजापूरचा अंकित या नावाखाली कर्नाटकात मराठी राज्य स्थापन केले होते. पुढे बेदनूरच्या स्वारीहून विजयी होऊन परत येताना तुंगभद्रेच्या काठी बसवापट्टण जवळ होदिगेरे येथे छावणी देऊन राहिले. एके दिवशी शिकारीस गेले असता त्याचा घोडा भरवेगात असताना त्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकल्यामुळे कोलमडला व शहाजीराजे यांचे शौर्यशाली जीवन २३ जानेवारी १६६४ शनिवारला संपले. कर्नाटकात होदिगिरे येथे त्यांची समाधी आहे.
हा लेखप्रपंच समाप्त करताना असे म्हणावेसे वाटते, की शहाजीराजांचे धैर्यशाली जीवन मनात बिंबवून प्रत्येक भारतीयांनी
सुरज जैसा, दीप हूँ हरदम मै जलता रहूँगा।
प्रलय की आँधियों से अंत तक लढता रहूँगा।
प्राण भी जाए अगर इस देशहित के लिए
ना बुझाये मिटाये कोई
ऐसे कर्म मैं करता रहूँगा।
याप्रमाणे आचरण करायलाच हवे.
–
पुनाराम निकुरे
(जगद्गुरू तुकाराम साहित्य परिषद, नागभीड)
Source: 1