समस्त बहुजनांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वंदन!
वारकऱ्यांची माउली, दीनदुबळ्यांची सावली; दया क्षमा शांतीचा, प्रज्ञा, शील करुणेचा संगम म्हणजे तुकोबाराय; पण वेळप्रसंगी अधमाशी अधम असणारे अग्निपुरुष विद्रोही तुकारामही! मुखाने ब्रह्मज्ञान सांगून, अज्ञानी जनलोकांना खोट्या देवांच्या कथा सांगून जनसामान्यांची मान कापणाऱ्या लुटारू-लबाडांचा ढोंगीपणा उघड करणारेही तुकोबारायच!
सर्व बहुजन संतांचे आंदोलन समतेसाठी, ममतेसाठी होते. त्यांचे हजारो वर्षांपासून ब्राह्मणी धर्माच्या पाशात, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जनांचे मुक्ती आंदोलन, भटमुक्ती आंदोलन होते. शिवप्रभूना तुकोबारायांच्या मुक्तीचा अर्थ कळाला. रयतेचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. शिवरायांचे मावळे याच स्वराज्यासाठी लढत लढत समरभूमीवरील हौतात्म्य पत्करण्यात जीवनाचे सार्थक मानू लागले. आजचा माझा वारकरी बांधव ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे’. संपले! हातात समशेर घेऊन स्वराज्यद्रोह्यांच्या नरडीचा घोट घेणारे वारकरी आज घोटभर पाण्यासाठी, कोरभर अन्नासाठी मोताद झाला. वारकरी तत्त्वज्ञानास झिडकारून एकनाथाच्या भारूडाला स्वीकारून डोईवर पदर अन् फुगड्या खेळण्यातच दंग झाले. जगद्गुरू तुकोबारायांचा छळ करणारे, गाथा बुडविणारे, तुकोबांकडे वेश्या पाठवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे आणि तुकोबारायास वैकुंठाच्या विमानात सदेह पाठविणाऱ्यांच्या तालावर वारकरी नाचू लागले. (अपवाद आहेत) वारकरी हे यज्ञयाग, मंत्रतंत्र, विधीमुहूर्त, शुभ-अशुभ कर्मकांड यांच्या परत आहारी गेले आणि वारकऱ्यांनीच वारकऱ्यांच्या तत्त्वज्ञानाला मोठा धक्का दिला. भटशाही भोळ्या बहुजन वारकऱ्यांना धर्माच्या नावाने भ्रमात अन् अंधश्रद्धेत गुरफटून ठेवण्यात माहीर आहे. वारकऱ्यांनी जागेच राहावे.
आता तरी होई जागा । तुका म्हणे पूढे दगा।।
आळंदीवरून निघणाऱ्या ज्ञानदेवांच्या पालखीत तुकोबारायांची आरती म्हणायची नाही ही ब्रह्मवृंदांची दादागिरी! आरतीस बंदी, वारकरी जागला. महाराष्ट्रात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, जिजाऊ ब्रिगेड आणि विद्रोही चळवळीच्या रेट्याने तीन वर्षांपूर्वी तुकोबारायांची आरती सुरू झाली. आरतीचा प्रश्न वारकऱ्यांना सर्व बहुजनवादींना महत्त्वाचा वाटला अन तो सुटलाही; पण इथेही ब्रह्मवृंद जिंकले आणि आम्ही हरलो! तुकारामांचा खुनी रामेश्वर भटाने लिहिलेली आरती अन् ‘गाथा कोरड्या तरंगल्या’ या अंधश्रद्धेला नकळत आम्ही स्वीकारले.भटांचा जिथे शिरकाव झाला त्या धर्माचा, राष्ट्राचा, चळवळीचा, समाजाचा नि घरांचा सत्यानाश झाला, हे निर्विवाद सत्य आहे. “तुकाराम ब्राह्मणी धर्म बुडवितो” म्हणून आदिलशाहीवर संकट कोसळेल अशा बोंबा मारणारे हेच ते धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही भिक्षुक, बहुजन समाज जसजसा मराठा सेवा संघ, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सत्यशोधक समाज नि विद्रोही चळवळ यांच्या माध्यमातून जागा झाला, तसतशी त्याला स्वतःच्या अस्मितेची जाणीव व्हावयास लागली.
महाराष्ट्रातील भटी पत्रकारितेच्या विरोधात (अपवाद आहेत) पुण्याच्या मुजोर पेशवाईच्या आराखड्यात मूलनिवासी नायक आणि मराठा मार्ग यांच्या भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडने दंड थोपटले. महाराष्ट्रात वैचारिक क्रांतीला फार मोठी अभूतपूर्व अशी सुरुवात झाली. भटांची पळापळ झाली. जेम्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून जशी पुणेरी चौदा भटांच्या चौकडीने विकृती फैलविली तद्वतच आनंद यादवांच्या मागे उभे राहून संतसूर्याची बदनामी केली; पण आता हे फार काळ चालणार नाही. कालचे विखुरलेले एकाच रक्तमासाचे मराठा, माळी, मुस्लीम, मातंग, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर बहुजन समाजबांधव एकत्र येण्यास मूलनिवासी नायकांच्या माध्यमातून मोठाच वेग आला आणि पुण्याच्या भटांना थरथरी सुटली, भटशाहीचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता हे वैचारिक आंदोलन थांबणे कदापिही शक्य नाही. महाराष्ट्रातील संतसाहित्याचे सखोल अभ्यासक जेष्ठ विचारवंत बाळासाहेब मिसाळ यांचा नुकताच प्रकाशित झालेला बहुमोल ग्रंथ ‘तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या’ वाचण्यात आला. बाळासाहेबांनी लिहिलेल्या या महत्त्वाच्या ग्रंथवाचनाने, चिंतन, मननाने प्रस्तुत लेखकाला विचाराची एक नवी ऊर्जा अन् उर्मी मिळाली.
तुकोबारायांची हत्या करणारा रामेश्वर भट तुकारामांचीच आरती का लिहितो, याचे उत्तर महात्मा गांधींचा खून करणाऱ्या गोडसेपंथीयांना गांधी आता प्रातःस्मरणीय का वाटतात, यात मिळते. आकाशाएवढ्या उंचीच्या तुकोबारायांची आरती रामेश्वराने केवळ दोनच चरणात आटोपली. ज्ञानेश्वरांच्या पालखीत तुकोबारायांच्या आरतीचा प्रकार हा भोळ्या-भाबड्या वारकऱ्यांचा बुद्धिभेद करणारा आहे, हे बाळासाहेबांनी स्पष्ट निदर्शनास आणून दिले. ‘मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट’, ‘मूलनिवासी नायक’ या क्रांतिकारी दैनिकांच्या माध्यमातून जनजागृतीचे अलौकिक असे कार्य करीत आहे, बाळासाहेबांचा बहुमोल ग्रंथ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित करून खऱ्या अर्थाने तुकोबारायांना न्याय दिला त्याबद्दल समस्त मराठा बहुजनसमाज त्यांचा सदैव ऋणी राहील. आता राहिला प्रश्न रामेश्वरलिखित आरती नाकारायची तर मग कोणती स्वीकारायची? भारताचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लिहिलेली आरती आपणास स्वीकारता येईल.
–
मार्तंडराव माळी
मराठा सेवा संघ, अकोला
Source: 1