भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी !

पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे त्यांच्यासाठी नवजीवनच. नांगरणी, वखरणी झाल्यावर पेरणीसाठी पुरेपूर पाऊस झाला की शेतकऱ्यांची लगबग चालू होते. त्यापेक्षा मोठं कोणतंही काम मग त्यांच्या दृष्टीनं नसतं.

जगदगुरु तुकोबाराय याविषयी म्हणतात –

” मढे झाकुनिया करिता पेरणी | कुणबियाचे वाणी लवलाहे ||१|| ”

आपल्या घरी कुणाचा मृत्यू झाला तर प्रसंगी मढे झाकून शेतकरी पेरणी करायला जातो. इतकं त्याच्या दृष्टीनं ते महत्वाचं काम असतं. त्यानंतरचा त्याचा आनंद तथाकथित स्वर्गसुखापेक्षाही अनुपम असतो. काळ्या आईच्या कुशीत विसावलेली बियाणं टरारून वर येतात तेव्हा तर तो अक्षरक्ष: आभाळाचे आभार मानतो. बहिणाबाई म्हणतात –

बीज टरारे भुईत | सर्व कोंब आहे वऱ्हे
गह्यरलं शेत जसं | आंगावरती शहारे |
ऊन वाऱ्याशी खेयता | एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं | जसे हात जोडीसन |

शेतातील अंकुरलेल्या बियाणांना पाहून सारं शेत गहिवरल्याची कल्पना नव निर्मितीक्षम कविमनच करू शकतं. अंगावरती शहारे आल्यासारख्या एका एका कोंबातून दोन पानं उगवल्यावर ते दोन हात जोडून आपल्या जन्माविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. निसर्गातील घडामोडीवर मानवी भावना आरोपित करून निसर्ग व मानव यांमधील एकरुपता व्यक्त करण्याची ही रीत आगळीच आहे. जेव्हापासून मानवप्राणी शेती करायला लागला, तेव्हापासून त्याला जमिनीतून वर येणाऱ्या अंकुराबद्दल कुतूहल वाटत राहिलं आहे. यामागे कोणती तरी अलौकिक शक्ती कार्यरत आहे, अशी भावना त्यामुळेच त्याच्यात दृढ झाली. त्यातून त्या शक्तीला वश करण्याची कल्पना त्याच्या मनात निर्माण झाली. एखाद्या व्यक्तीला आपण आपणास अनुकूल करू शकतो तसंच या नैसर्गिक शक्तींनाही करू शकतो असा विश्‍वास त्याच्यात निर्माण झाला. या विश्‍वासालाच समाजशास्त्रज्ञांनी ‘यातुकल्पना’ असे म्हटले. निसर्गशक्तींना वश करण्यासाठी मानवाने जी कृती केली, त्याला ‘यातुविधी’ असे म्हणतात.

शेतीसाठी यातुसाधना

शेतीच्या प्राथमिक अवस्थेत आदिमानवाने जे विधी केलेत, त्यावेळी सहजपणे पुटपुटण्यातून मंत्रांची निर्मिती झाली. याविषयी डॉ.स.रा.गाडगीळ म्हणतात, ” भूमीच्या सुफलीकरणाची प्रक्रिया मंत्रतंत्रांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते अशी दृढ श्रद्धा हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवाची होती. आजही वन्य समाजातील लोकांच्या जीवनामध्ये या श्रद्धेला धार्मिक महत्व आहे. मंत्रतंत्रात्मक विधीशिवाय शेतीचे एकही काम होऊ शकत नाही. अमेरिकेतून वसाहत करावयास आलेले युरोपियन लोक मंत्रतंत्राशिवाय शेती करतात आणि तरीही त्यांच्या शेतीत भरपूर पीक येते हे पाहून तेथील स्थानिक आदिवासी लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. भारतातही अद्यापी या श्रद्धा अस्तित्वात आहेत. हॉस, संताळ, भूऱ्या, कोळ, भिंड या सर्व जमातीतील लोक मंत्रतंत्रयुक्त विधी करूनच शेतीच्या कामाला प्रारंभ करतात. हे सर्व विधी पंचमकारकयुक्त वामाचारविधीच आहेत. या विधींचे स्वरूप नंतर पाहू. वैदिक आर्य हे मूळचे कृषिजीवी नसूनही भारतात येऊन स्थिर झाल्यावर त्यांनाही कृषिविषयक मंत्रातंत्राची आवश्यकता वाटली. मंत्राशिवाय पेरणी न करण्याविषयी सांगून कौटिल्याने पेरणीचा मंत्र आपल्या अर्थशास्त्रात सांगितला आहे. अथर्ववेद आणि तैत्तिरीय संहिता यामध्ये शेतीचे मंत्र दिले आहेत. सूत्रकालात शेतीच्या देवताच उदयाला आल्या. या सर्व देवता स्त्री-देवता आहेत हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे.” (प्राचीन व मध्ययुगीन धर्मकल्पना आणि मराठी संत, पृ. ६७)

स्त्रीप्रधान यातुविधी

प्रारंभीची शेती स्त्रियांनीच केली. तसेच निर्मितीक्षमताही स्त्रियांमध्येच असते. त्यामुळे शेतीविषयक कर्मकांडांमध्ये स्त्रियांना महत्त्वाचे स्थान होते. याविषयी डॉ. गाडगीळ म्हणतात-

”यापुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व कृषिविषयक मंत्र स्त्रीप्रधान आहेत. शेती हा स्त्रीचा शोध आहे हे अनेक शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. पुरुष शिकारीला गेल्यानंतर वसाहतीजवळच्या भूभागातून शाक, फळे, कंद खाद्यबीजे गोळा करण्याचे कार्य स्त्रीकडे आले. यातूनच तिला शेतीचा शोध लागला. नांगराचा शोध लागण्यापूर्वीची ही प्राथमिक शेती आहे. शिकार आणि पशुपालन हे पुरुषाचे व्यवसाय होते. पुढे जेव्हा बैल, घोडा, रेडा यांसारखे पशू माणसाळले, तेव्हा त्यांचा शेतीला उपयोग करून घेण्याला प्रारंभ झाला. नांगराच्या शोधानंतर शेती पुन्हा पुरुषांकडे आली आणि त्यानंतर स्त्रीप्रधान समाजव्यवस्था संपुष्टात आली. प्राथमिक कृषिसंस्कृती आणि स्त्रीप्रधान समाज यांचा हा आंतरिक संबंध मान्य होवो न होवो, कृषिविषयक मंत्रतंत्रविधींमध्ये स्त्रीला मध्यवर्ती स्थान असल्याचे निरपवादपणे दाखवून देता येते. धान्यनृत्य, पर्जन्यनृत्य, पेरणीचे मंत्रतंत्रात्मक विधी हे सर्व स्त्रियांचेच क्षेत्र. सेरा लोनेमध्ये रारुबा जमातीत स्त्रियाच शेतीच्या सुफलीकरणाची ‘औषधी’ (मंतरलेले रसायन) तयार करतात. सर्व देशात पर्जन्यविधी स्त्रियांकडेच असतो. कित्येक देशांत पर्जन्यविधीसाठी स्त्रीपुरोहित आहेत. हे सर्व विधी या मांत्रिक स्त्रीपुरोहितांनी नग्नावस्थेत करावयाचे असतात. स्त्रीने अंगाला लिंबाची वा अन्य वनस्पतीची पाने गुंडाळून डोक्यावर सच्छिद्र जलकुंभ घेऊन अर्धनग्नावस्थेत मिरवणूक काढण्याची प्रथा अगदी अलीकडेपर्यंतरूढ होती. स्त्री ही भूमी, जलकुंभातून गळणारे पाणी हा मेघातून होणारा जलवर्षाव आणि स्त्री देहावरील लतावृक्षांची पाने ही भूमीतून उगवलेली वनस्पतीसृष्टी; असे हे निर्मितीचे प्रतीकात्मक विकल्पन आहे. पाऊस पडावा म्हणून स्त्रियांनी विवस्त्रावस्थेत शेतात जाऊन नृत्य करण्याची अगर नांगर धरण्याची क्रिया करावयाची असते. १८७४ मधील गोरखपूर जिल्ह्यातील दुष्काळात सामुदायिकरीत्या या विधीचे आचरण केल्याची नोंद आहे. भूमीच्या सुफलीकरणाची ही श्रद्धा आणखी एका स्वरुपात दिसून येते. ज्याप्रमाणे भूमीच्या सुफलीकरणाकरिता सवत्स स्त्री सहाय्यक होते, त्याप्रमाणे निपुत्रिक स्त्रीच्या सुफलीकरणाला हरितश्यामल भूमी सहाय्यक होते, हे ही ‘कॉन्टेजियस मॅजिक’ चे उदाहरण आहे. या सर्व विधींमागे यात्वात्मक सामर्थ्याची कल्पना अभिप्रेत आहे. मध्ययुगात अस्तित्वात असलेल्या एका सुफलीकरण विधीचे बाणभट्टाने हर्षचरितात वर्णन केले आहे. राणी विलासवती पुत्रप्राप्तीसाठी अनेक प्रकारच्या तंत्रतंत्रात्मक साधना करते. यामध्ये कृष्णचतुर्दशीच्या रात्री सार्वजनिक चौकात यंत्रपूजा करुन ती नग्नस्नान करते असा एक विधी आहे. हा विधी राणीने अवलंबिलेल्या तंत्रसाधनेमधील एक भाग आहे हे स्पष्ट होते.” तंत्रसाधनेचे मूळ शेतीच्या सुफलीकरणाच्या विधीत आहे, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती या विधानांमध्ये आली आहे. पण तंत्र म्हणजे काय, त्याचा मंत्राशी संबंध कोणता, तसेच त्यात तंत्राचे स्थान कोणते हे समजून घेणे आवश्यक आहे.

तंत्र-मंत्र-यंत्र

तंत्र या शब्दाचा रूढ अर्थ शास्त्र किंवा विज्ञान असा होतो. इंग्रजीतील ‘टेक्निक’ या शब्दाचा पर्याय म्हणूनही तो वापरात आहे. पण आपण ज्या तंत्र साधनेसंबंधी चर्चा करीत आहोत. त्याचे मूळ ‘तनुविस्तारे’ या विस्तारार्थक धातूमध्ये आहे. भारतीय संस्कृतीकोशामध्ये (खंड ३, पृ. ७९५) या विषयी म्हटले आहे की,
”ज्याच्याद्वारे अध्यात्मज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाचा विचार केला जातो, ते तंत्रशास्त्र होय. कामिकागमात तंत्राची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे –

तनोति विपुलानर्थान् तत्त्वमन्त्रसमन्वितान् |
त्राणं च कुरुते यस्मात् तन्त्रमित्यभिधीयते ||

अर्थ : तत्त्व आणि मंत्र यांनी युक्त अशा व्यापक अर्थाचा विस्तार करणारे आणि साधकांचे (साधनेच्याद्वारे) परिमाण करणारे जे शास्त्र, त्याला तंत्र असे नाव आहे.

देवतेच्या रुप-गुण-कर्माचे चिंतन, मनन, देवताविषयक मंत्राचा उपदेश, मंत्रांची यंत्रात संयोजना, तसेच पटल पद्धती, कवच, नामसहस्त्र व स्तोत्र ही पंचांग उपासना यांची माहिती ज्यात दिलेली असते, त्याला तंत्र म्हणतात. व्यापक अर्थाने सांगायचे तर शास्त्र, सिद्धांत, अनुष्ठान, विज्ञान इ. गोष्टी ज्यात प्रतिपादिलेल्या आहेत, ते तंत्र होय. तंत्राला आगम असे दुसरे नाव आहे.
आगम हा शब्द प्रामाणिक व यथार्थ वाणीचा प्रतीकरूप आहे. प्रारंभी तो वेदांसाठी प्रयुक्त केला जात होता. पण कालांतराने तंत्रसाधनेचा उदय झाल्यावर आणि तंत्रसाधनेने आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केल्यावर आगम शब्द हळूहळू तंत्रांना लावला जाऊ लागला. मग तंत्रे ही आगम ठरली आणि वेदांना निगम ही संज्ञा प्राप्त झाली.”

वेदपूर्वकाळापासून भारतात तंत्रमार्ग अस्तित्वात होता. पण वैदिकांनी त्याला उशिरा मान्यता दिली. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासात या मार्गाने मोलाचे योगदान दिले आहे. पण त्यातील पंच ‘म’ कार साधना विकृतीकडे वळल्यामुळे या मार्गाचा पुढे सुधारकांनी निषेध केला. मंत्रांमध्ये अलौकिक शक्ती आहे ही धारणा तंत्रमार्गानेच दृढ केली, तसेच यंत्रपूजा प्रतिष्ठित केली. तंत्रमार्गातील यंत्र हे योनीच्या आकाराचे असत. स्त्रियांची योनी ही तंत्रांनी आपल्या साधनेचे केन्द्र मानले होते. त्यामुळे यंत्रांना योनिचा आकार मिळाला. पुढे वैदिकांनीही आपल्या यज्ञकुंडाचा आकार योनीसारखा केला. तंत्रसाधनेत स्त्रियांना महत्त्वाचे स्थान हाते. स्त्रियांना ‘वामा’ या शब्दानेही संबोधतात म्हणून तंत्राला ‘वामाचार साधना’ असेही म्हणतात. तंत्रसाधना करणाऱ्या तांत्रिकाला वामाचारी म्हणून पुढे हिणविले गेले. तंत्रसाधनेत मद्य, मांस, मैथुन, मत्स्य व मुद्रा या पाच ‘म’ काराला महत्त्व होते. पुढे त्याचा अतिरेक झाल्यावर संतांनी त्याच्या विरोधात आघाडी उभारली. तरीही शेती भरभरून येण्याकरिता तंत्रसाधना कमी-अधिक प्रमाणात चालूच राहिल्या. त्यांचे स्वरूप कसे होते हे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले आहे. ते स्त्रियांशी संबंधित का होते ते पहा –

स्त्री व भूमी यांतील साधर्म्य

डॉ. गाडगीळ म्हणतात, ”कृषिविषयक मंत्र तंत्रात्मक विधी स्त्रीकडे येण्याचे कारण म्हणजे स्त्री आणि भूमी यांमधील साधर्म्य हे होय. दोन्हीही निर्मितीकेन्द्रेच आहेत. स्त्री मानवाला जन्म देते. विश्‍वाला जन्म देणाऱ्या आदिमातेचीच ही दोन्ही रुपे आहेत. संस्कृतीच्या सर्व थरांवर स्त्री आणि भूमी यांचे साम्य माणसाने कल्पिलेले आढळते. भूमीच्या सुफलीकरणासाठी स्त्रीची योजना केली जाते. तिच्या ठिकाणी पृथ्वीप्रमाणेच नवनिर्मितीचे काही विलक्षण यात्वात्मक सामर्थ्य असले पाहिजे ; हे सामर्थ्य मंत्रात्मक विधींनी वाढविता येते, एवढेच नव्हे तर या सामर्थ्याचा उपयोग करुन भूमीची प्रसवक्षमताही वाढविता येते. ज्या स्त्रीला विपुल संतती आहे, तिच्या हस्ते भूमीचा सुफलीकरणविधी करावा असा संकेत आहे. याउलट निपुत्रिक स्त्रीच्या हातून बीजारोपण अगर वृक्षारोपण करू नये अशीही समजूत आहे.” (उपरोक्त, पृ. ६९)

सुफलीकरणासाठी स्त्री-पुरुष समागम

आपल्या शेतीत भरघोस पीक येण्याकरिता म्हणजेच सुफलीकरणाकरिता शेतमालकाने सपत्निक शेतात जाऊन मैथुन करण्याची चाल अनेक देशांमध्ये अजूनही आहे. त्याविषयी डॉ. गाडगीळ म्हणतात, ”नागा लोकांच्यामध्ये सुगीच्या आणि पेरणीच्या दिवसांत मुक्त समागमाची आवश्यकता आहे असे मानतात. मद्यपान आणि मुक्त-स्वैर-मैथुन यांना या दिवसांत भर येतो. युरोपमध्ये वनस्पतींची चांगली वाढ व्हावी यासाठी पुरुष आणि स्त्री वृक्षदेवतांचे विवाह लावून देतात. आणि हे विवाह सफल व्हावेत म्हणून स्त्री-पुरुषांचा विधियुक्त संयोग घडवून आणतात. मध्य अमेरिकेत पेरणीच्या वेळी मैथुनविधी आवश्यक मानला जातो. पिकांच्या समृद्धीसाठी शेतकरी आपल्या स्त्रियांसह रात्री शेतावर जातो आणि धार्मिक श्रद्धेने मैथुनविधी आचरतो. पेरणी करणाऱ्या तरुण जोडप्यांनी शेतात जमिनीवर पडावे आणि पेरलेल्या बियाणांवरून लोळावे अशी चाल युक्रेनमध्ये आहे. जर्मनीतही अशी चाल आहे. मूळ मैथुनविधीचे हे अवशेष असावेत. पेरू या देशातील पुढील आचार तर शाक्तांच्या तंत्रोपासनेप्रमाणेच आहे.
ऑस्ट्रेलियातील वन्य जमातींची एक समजूत अशी आहे की, ” पृथ्वी (भूमाता) हे स्त्रीत्व आणि सूर्य हे पुरुष तत्व ; यांचा संयोग वर्षातून विशिष्ट दिवशी एकदाच घडतो. या संयोगानंतर भूमाता सुफलित होते. याप्रसंगी स्त्री-पुरुषांच्या सामूहिक मैथुन विधीला महत्त्व असते. वैश्‍विक काम भावनांशी सहभाव साधण्यासाठी मानवी कामसाधनेची आवश्यकता असते अशी ही श्रद्धा आहे. सूर्यदेव आणि भूमी यांच्या समागमप्रसंगी या स्त्री-पुरुषत्त्वांचे मानवी देहधारी प्रतिनिधी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी विधियुक्त समागम करावा असा हा संकेत आहे. ब्रिटीश उत्तर बोर्निओत हा विधी पंधरा मिनिटे सामूहिकरित्या चालतो. त्यानंतर पुन्हा सामाजिक-नैतिक बंधने कडकपणे पाळावी लागतात. म्हणजे सामूहिक समागम ही जणू सामूहिक प्रार्थनाच ! मलायामध्ये भाताच्या हंगामात स्त्रियांची अदलाबदल करून हा विधी साजरा केला जातो.”

या सर्व उदाहरणावरून जमिनीच्या सुफलीकरणाकरिता करावयाचे विधी जगभर कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत हे दिसून येते. तंत्रसाधना साऱ्या धर्मांच्या प्राथमिक अवस्थेत प्रचलित होती, या वास्तवाचाही शोध यातून लागतो. भारतात शिव वा शक्तीला तसेच गणपतीला मानणाऱ्या अनुयायांनी जी मंदिरे निर्माण केलीत त्यावर जी मैथुनशिल्पे आढळतात, त्यामागे या तंत्रसाधनांची प्रेरणा आहे. पुढे वैष्णव, जैन, बौद्ध इ. संप्रदायांच्या अनुयायांनीही या तंत्र साधनांचा स्वीकार केला. उत्तरपेशवाईत जे ‘गणयाग’ चालत त्यातील ‘घटकंचुकींचा’ खेळ या साधनांचा अलिकडील पुरावा होय. या तंत्रसाधना दक्षिणेत अधिक बहरल्या. श्रीशैल हे शाक्त संप्रदायाचे मोठे केन्द्र या साधनांसाठी प्रसिद्ध होते.

सुफलीकरणाच्यासाठी आवश्यक वाटणाऱ्या या तंत्रसाधनांचे रुपांतर पुढे लैंगिक विकृतीत झाले. त्यातील बिभत्सपणा सामाजिक संतुलन घालविण्यास कारणीभूत ठरला. म्हणून त्यांच्या विरोधात महानुभाव व वारकरी संप्रदाय जन्माला आला. लीळाचरित्र, नामदेवाचे अभंग तसेच तुकोबांची गाथा यातून तंत्रसाधनांचा निषेध स्पष्टपणे उमटला आहे. एकनाथांनीही त्यावर ताशेरे ओढले आहेत. हे सारे मात्र भूमातेच्या आराधनेतून होत होते हे आज कुणालाही खरे वाटणार नाही.

भूमातेची विश्‍वरुपे

‘भूमी आणि स्त्री-एक मिथक’ (मिथक आणि मराठी साहित्य,आमची श्रीवाणी,धुळे,पृ. ५४) या लेखामध्ये डॉ. शैला लोहिया यांनी भूमातेच्या विश्‍वभरातील रुपांची माहिती दिली आहे. त्या म्हणतात –

” जगातील सामान्यपणे सर्व समाजात ‘भूमी’ ही देवता महामातेच्या-जगन्मातेच्या रुपात अवतरताना दिसते. इंग्लंडमधील पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतही एकेकाळी दैवत विकल्पनात महामातेला महत्त्व होते. गॅलिक लोक सर्वच देवता ‘दानु’ नामक भूमातेपासून निर्माण झाल्या असे मानतात. तिचाच दुसरा अवतार ब्रिटीशांची महान भूमाता ‘डॉन’ ही होय. एस्टोनियन धर्मानुसार भूमाता ही जन्म आणि मृत्यूवर सत्ता चालवते. चीनमध्ये भूमातेचा संप्रदाय वृक्षदेवतांशी संबंधित आहे. ‘ सी वॅग मो ‘ ही त्यांची प्राचीन काळातील भूमाता. टाओ संप्रदायातील ‘येन’ हे स्त्रीतत्व भूमी रूप मानले गेले होते. फिनिश दैवतकथांत अक्का (Akka) ही भूमाता मानली आहे तर पेरूत ‘ममा’ व ‘पाचा’ या भूदेवता मानल्या गेल्या.

भारतात देवीच्या नवरात्र महोत्सवात करावयाच्या धान्याच्या पुनर्निर्मितीचा विधी जगभर आढळतो. नवरात्रात मातीच्या भांड्यात पेरलेल्या धान्याला फ्रेजर ‘गार्डन ऑफ ऍ़डोनिस’ असे म्हणतो. ते धान्य हेच चैतन्य… सौंदर्य, तरुणाई आणि त्यांना जन्म देणारी माती ही भूदेवता. भूमी आणि स्त्री या जागतिक मिथकाच्या संदर्भात ‘लज्जागौरी’ या आदिमातेच्या स्वरुपावर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथात डॉ.रा.चिं.ढेरे नोंदवितात. ”स्त्री आणि पृथ्वी यांच्या सर्जनशीलतेच्या समानधर्मित्वामुळे त्यांच्यातील एक अभिन्नतेचा, नव्हे एकतेचा विलक्षण गूढ आणि दैवी भावबंध प्राचीन मानवाच्या मन:सृष्टीत दृढावलेला होता. स्त्री हे मातृत्वाचे व्यष्टिरूप आहे, तर पृथ्वी हे त्याचे विराट समष्टिरूप आहे.” या सर्जनशीलतेच्या आदिबंधातून भारतीय परंपरेने भूमीला महामाता मानले. मातृत्वाचा अधिकार असणाऱ्या स्त्रीतील ‘मातृत्व’ सर्वश्रेष्ठ मानले. स्त्री आणि भूमी … भूमी आणि स्त्री हे मिथक भारतीय मानसात दृढ झाले.”

स्त्रीला शेती व पुरुष शुक्राणूंना बीज मानून ‘बीज क्षेत्र न्याय’ ही संकल्पना पूर्वी प्रचलित होती. तीनुसार बीज कुणाचेही असो, शेती म्हणजे स्त्री महत्त्वाची. म्हणून कुटुंबाची प्रमुख स्त्रीच असे. मातृसत्ताक समाज यातूनच निर्माण झाला.

भूमाता निर्रुती

जगातील साऱ्या संस्कृतींनी भूमातेचा मुक्त कंठाने गौरव केला असला, तरी भारतात इराणमधून आलेल्या आर्यांच्या वैदिक संस्कृतीने मात्र भूमाता निर्रुतीला मृत्यूची-विनाशाची देवता म्हणून संबोधले होते. कॉ.शरद पाटील यांनी (दासशूद्रांची गुलामगिरी, भाग १, पृ. १००) ‘भूमाता’ या लेखात यामागील कारणांवर विशेष प्रकाश टाकला आहे. ऋग्वेदीय मंत्र ७.१०४.९, १०.१०.११, १०.१८.१०, १०.५९१-४, १०.९५.१४ व अथर्ववेदीय मंत्र ६.८४, १४.२.१९ निर्रुतीचे स्तवन दुरिताची वा मृत्यूची देवता म्हणून करतात, असे सांगून त्यांनी तैत्तिरीय संहितेच्या ४.२.५ या मंत्रातील निर्रुती स्तवन दिले आहे, ते असे –

” विश्‍वरुपे निर्रुते, तुला प्रणाम असो,
हे लोहमय पाश मोकळ कर;
यम व यमीसह तू
या सर्वोच्च स्वर्गावर आरोहण कर.
देवी निर्रुते, तू ज्या पाशांनी
न सोडण्यासाठी याचा गळा बांधलास,
ते मी जणू काय आयुष्याच्या मध्यान्हीपासून मोकळे करीत आहे;
मग बंधमुक्त होऊन जग, व अन्नग्रहण कर
जिच्या क्रूर मुखात मी
पाशनिर्माचनार्थ होम करतो
ज्या तुला ‘भूमि’ म्हणून जन जाणतात,
त्या तुला ‘निर्रुती’ म्हणून मी सर्वतोपरी ओळखतो.”

या स्तवनात पुढे हवन व यज्ञ न करणाऱ्याला ते शोध, असे म्हटले आहे. यावरून यज्ञविरोधी आर्यपूर्व मूलनिवासी लोकांची ती महामाता होती हे स्पष्ट होते. वैदिकांनी जरी ‘निर्रुती’ला हीन लेखले असले तरी अवैदिक जैनांनी मात्र तिला सन्मान दिला आहे. कल्पसूत्रामध्ये महावीराचे निर्वाण ‘निर्रुती’ नावाच्या सर्वात शुभ अमावास्येला झाले, असा उल्लेख आढळतो.

‘निर्रुती’ चा अर्थ

‘निर्रुती’ या शब्दाचा वैदिकांनी आपत्ती, किनारा, मृत्यू या अर्थाने उल्लेख केला असला, तरी तो त्याचा खरा अर्थ नव्हे. कॉ.पाटील म्हणतात, ” निघण्टु (१.१२.६८) ऋति वा ऋतचा अर्थ पाणी (उदक) असा देतो. ही व्युत्पत्ती दाखवते की, ‘निर्रुती’ ही मुळात अप्सरा,जल,वा नदी-देवता होती. ऋतचा अर्थ जगच्चालक नियम असाही होतो. ज्यातून ‘निर्रुती’ जगन्माता, अब्राह्मण सांख्य तत्वज्ञानाची प्रकृति होते.

‘निर्रुती’चा सांख्य तत्त्वज्ञानाशी असलेला संबंध जोडून पुढे कॉ. पाटील एका पुरातत्वीय पुराव्याविषयी म्हणतात, ‘ पुराणवस्तुसंशोधकांनी या विश्‍वासाचा ठोस पुरावा हराप्पाला उत्खनन करून काढला आहे.

मार्शल वर्णन करतो –

‘… हराप्पाची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दीर्घचौकोनाकार मुद्रा ज्यावर पाय फाकाटलेली व योनीतून वनस्पती उगवलेली नग्न स्त्रीची आकृती काढलेली आहे.’ देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथातील (पान २२.१२) संदर्भ देऊन पुढे कॉ. पाटील म्हणतात –

वासुदेव शरण अग्रवालनी आपल्या ‘इंडिया ऍ़ज नोन टू पाणिनि’ या ग्रंथात भूमातेच्या प्राचीन उत्थित मृत्तिकामूर्तीचे (relief) छायाचित्र दिले आहे. तिचे हात सर्पांनी वेढलेले आहेत आणि तिच्या डोक्यावर वनस्पती उगवलेल्या आहेत. ती तैत्तिरीय संहितेची (१.५.४.१, ७.३.१.३) ऐतरेय ब्राह्मणाची सर्पराज्ञी आहे.
म्हणून असे संयुक्तिकपणे म्हटले जाऊ शकते की, ही आकृती एकशे सात घरे असलेल्या वनस्पतिविश्‍वाला जन्म देणाऱ्या ‘निर्रुती’ या आर्यपूर्व जगन्मातेवाचून दुसऱ्या कोणाचीही असू शकत नाही.” (पृ. १०६)
कॉ. पाटील यांनी पुरातत्वीय पुराव्यांचा दाखला देऊन ‘निर्रुती’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुरातत्व या विषयातील विश्‍वविख्यात संशोधक डॉ. ह.धि.सांकलिया यांनी मात्र ‘निर्रुती’ विषयी वेगळीच माहिती दिली आहे. ‘भारतीय पुरातत्व – एक समालोचन’ या पुस्तकात (पृ. ४५) ‘निर्रुती’विषयी ते म्हणतात, ” नंतरच्या संहितांमध्ये एक दुष्ट देवता किंवा दुष्टांचा देव म्हणा, या देवतेच्या रुपाने ‘निर्रुती’ अस्तित्वात आला. नंतर त्याला राक्षसांचा राजा म्हणून मान्यता मिळाली. मंदिरात त्याची मूर्ती शिल्परुपाने आढळते. याला मध्ययुगातील देवतामंडळात स्थान असून नैऋत्य दिशेचा अधिपती म्हणून, अष्टदिक्‌पालातील एक या रुपाने चित्रण आढळते. परंतु आंध्रप्रदेशात नलगोण्डापासून उत्तरपूर्वेला पानुमल येथे पच्चल सोमेरश्‍वराच्या देवळात अशी मूर्ती आढळते. ती खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण सोंखच्या उत्खननात ‘निर्रुती’ची मूर्ती मिळाली आहे. ‘निर्रुती’ची ही जुन्यात जुनी मूर्ती आहे.” या माहितीमध्ये ‘निर्रुती’ हा पुल्लिंगी शब्द वापरलेला आहे. १९८९ साली महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले. सध्या पुरातत्व विषयात पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याला अधिकृतता आली आहे. पुढील संशोधक ‘निर्रुती’ला एक राक्षस मानतील यात शंका नाही. पण नव्या पिढीतील संशोधक प्रा. नीरज साळुंखे यांनी आपल्या ‘दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र’ या शोधग्रंथात ”निर्रुती’’ विषयी नवी माहिती पुढे आणली आहे.

सुखदेवता ‘निर्रुती’

प्रा. साळुंखे म्हणतात, ” निर्रुती’ हा शब्द हरप्पा भाषेत असणाऱ्या मूळ शब्दाचे संस्कृतीकरण केलेला शब्द आहे, हे निश्चित. मूळ हरप्पा शब्द कोणता असावा याचा शोध घेताना कन्नडमधील ‘नेरते’ या शब्दाकडे लक्ष जाते. त्याचा अर्थ परिपूर्णता, भोग, फल, उन्नती, प्रगती, जवळीक असा आहे व ‘निर्रुती’ ही असुरांची परिपूर्णतेची सुखदेवताच होती ! ‘नेरे’ या कन्नड धातूचा अर्थ अधिक, पुष्कळ म्हणजेच सुबत्ता असा होतो. ‘निर्रुती’च्या मूळ स्वरुपाचे हा शब्द निश्चितच प्रतिनिधित्व करतो !” (पृ. १२)

दुर्गा सप्तशती (७.११) मधील श्लोकातही ‘निर्रुती’ हा समलिंगी शब्द आला आहे. त्यात राक्षसांची लक्ष्मी ‘निर्रुती’, ती तूच आहेस असे म्हटले आहे.

कल्याणै प्रणतां वृदध्यै सिद्‌ध्यै कुर्मो नमो नम: |
नैऋर्त्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्ये ते नमो नम: ||

दैत्य, असूर, राक्षसांच्या दृष्टीने ती लक्ष्मी म्हणजे सुखदेवता होती. दैत्य हे दितीचे पुत्र म्हणजे मातृसत्ताक समाजातील होते. त्यांच्या ठिकाणी ‘असु’ म्हणजे प्राणरक्षक शक्ती होती, म्हणून तसेच ते रक्षस् म्हणजे रक्षण करणारे म्हणून असुर व राक्षस होते. त्यांच्या गणाची महामाता ‘निर्रुती’ होती, म्हणून असुर-राक्षसांचा उल्लेख नैऋत असा प्राचीन साहित्यात केला जातो. त्यांच्या गणराज्याला नैऋत्य म्हटले गेले. पुढे मातृसत्ताक गणसंस्था जाऊन पितृसत्ताक राज्यसंस्था आली. आर्य ब्राह्मणांच्या प्रभावाखालील या संस्थेने मातृसत्ताक समाजाचा बिमोड केला. त्यामुळे त्यांच्या गणमातांना हीन लेखले गेले. ‘निर्रुती’ ही विनाशाची देवता त्यामुळेच गणली गेली. नैऋत्य दिशाही त्यामुळे अशुभ ठरली. आज वास्तुशास्त्र म्हणून जे नवे थोतांड नवशिक्षित व मध्यमवर्गीय नोकरदारांमध्ये, व्यापारी व राजकारणी लोकांमध्ये बोकाळले आहे, त्यात नैऋत्य दिशा वर्ज्य मानली गेली.

शेतकऱ्यांची ही भूमाता त्यांच्या कष्टावर उभारलेल्या कृतघ्न समाजाने बहिष्कृत ठरविली असली तरी तिची आराधना भारतीय शेतकरी दगड-धोड्यांच्या रुपात करीत असतो. शतपथ ब्राह्मणात जलकुंभात दगड ठेवून तो नैऋत्य दिशेस फेकण्याच्या विधीचा उल्लेख आहे. ती सुफलतेची, शेतीची देवता होती हे यातून सूचित होते. लेखन, वाचन, संशोधन, प्रसारमाध्यम यांवर आजही वैदिक ब्राह्मणी संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे भारतातील मूलनिवासी संस्कृतीविषयी चुकीची व टोकाची नकारात्मक माहिती पसरत राहते. म्हणून या असत्यामागील सत्य शोधणे अतिशय आवश्यक आहे.

( ‘दैवतांची गोष्ट ‘ या आगामी ग्रंथामधून)

One thought on “भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.