चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे मार्गदर्शक, नेते, चळवळींचे प्रवक्ते, चळवळींचे पदाधिकारी, चळवळींचे वक्ते यांच्यात मतभेद निर्माण केल्या जातात. नेतेमंडळी एकविचाराने वा एकमुखाने बोलत नाहीत. चळवळीमधील प्रमुख मार्गदर्शक जेव्हा प्रतिचळवळीची भाषा बोलू लागतात, ब्राह्मणशाहीचे समर्थन करतात, तेव्हा चळवळीत फूट पाडण्यात ब्राह्मण यशस्वी झाल्याचे समजावे. हे सगळीकडेच सुरू असते.

भारतात चळवळीत फूट पाडण्याचा इतिहास बराच जुना आहे. त्यासाठी नेत्यांची वैयक्तिक स्वार्थी प्रवृत्ती, नेत्यांचा अहंकार, नेत्यांचे मानसिक संतुलन, नेत्यांचा गैरसमज, नेत्यांचा आत्मकेंद्रीत स्वभाव, नेत्यांची पदासह पैसा व प्रतिष्ठेची अभिलाषा, सत्ता, संपत्ती वा सौदर्याची लालसा, नेत्यांच्या जीवाची भीती, नेत्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना प्रबळ होणे, नेत्यांना चळवळीत आपणास योग्य मानसन्मान मिळत नसल्याची भावना प्रभावित होणे, आपली चूक नसतानाही अपमानजनक जीवन जगत असल्याची नेत्यांची भावना कर्मठ होणे, या व अशा अनेक कारणास्तव चळवळीमध्ये फूट पडत असते. ती टाळायचे म्हणले तरी टळत नसते. हा इतिहासच आहे. तरीही चळवळी फुटण्याचे एक तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान आहे. प्रत्येक चळवळीत अगदी सुरू झाल्यापासून नियमितपणे स्वार्थी लोक घुसत असतात. हे स्वार्थी लोक प्रभावी असतात. त्यांच्या प्रभावाच्या वलयाने ते एका उंचीवर पोहोचत असतात. या पैकी काही प्रत्यक्ष चळवळीत पदाधिकारी वा सक्रिय कार्यकर्ता होऊन कार्यरत होतात, तर काही सहानुभूतीदार म्हणून प्रत्यक्ष चळवळीला दूर राहून पाठिंबा देत असतात. काळाच्या ओघात अशा स्वार्थी लोकांच्या जर लक्षात आले, की इथे कितीही वर्षे आपण राहिलो, तरी आपला स्वार्थ सफल होऊच शकत नाही.

अशावेळी ते स्वार्थी लोक चळवळीशी आपला संबंध एकदम, अचानक वा सोयीनुसार कमी करतात या तोडून टाकतात. काहीजण चूपचाप बसतात. काहीजण पेपरबाजी करतात अथवा कुजबूज पद्धतीने त्यांच्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती पुरवितात. उदाहरणासाठी आपल्याला सध्या भारतात व महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार चालवण्याचे घेता येईल. केंद्रात अनेक पक्ष प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होतात, तर अनेक पक्ष सत्तेबाहेर राहून बाहेरून पाठिंबा देतात. सत्तेत असलेले लहान-लहान पक्षही सोनिया कॉंग्रेसशी दादागिरी करत असतात. प्रत्यक्षात ते आपल्या ताकदीवर काहीच करू शकत नसतात. तसेच चळवळीतील पदाधिकारी अनेकदा समवयस्क व समविचारी असतात. एकजीव असतात. एकमेकांसाठी जीव देणारे असतात. त्यांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो. त्याला भावनिक जोडही असते. काळाच्या ओघात कुठेतरी खट्ट झाल्यास ठिणगी पडते आणि अत्यंत जिव्हाळ्याची, विश्वासाची माणसे एकमेकांपासून दूर होतात. जेथे विश्वास असतो, तेथेच विश्वासघात होत असतो. म्हणून चळवळीत फूट पडत असते. बाहेरून पाठिंबा देणारे पाठिंबा काढून घेतात.

चळवळ फुटताच प्रतिचळवळीचे समर्थक फुटीरवाद्यांना मान-सन्मान व बळ देण्यास तयारच असतात. चळवळीतून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांची चळवळीत प्रचंड मुस्कटदाबी झालेली असते. त्यांचा स्वाभिमान कुस्करण्यात आलेला असतो. त्यांनी अपमानाचे पेलेच्या पेले पोटात रिचवत, मरणाला दूर- दूर सारलेले असते. चळवळीतील सख्खे सहकारीही आपल्याबद्दल सहानुभूती दाखवत नव्हते. हिमालयापेक्षाही कित्येक पट मोठा दुःखाचा डोंगर, अपमानाचे डोंगर, मानहानीचे डोंगर या फुटलेल्या नेत्याने पचवलेले असतात. अशा सर्वहारा व महादुःखी नेत्यासाठी ब्राह्मणी प्रतिचळवळी रेशमी गालिचेच अंथरून स्वागतास तयार असतात. हा भारतीय जीवनातील राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक इतिहास आहे. या फुटीरवादात प्रमुख नेते अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अथवा अत्यंत विश्वासू सहकारी अथवा प्रत्यक्ष चळवळीत असलेली अथवा नसलेली कुणीही समंजस व्यक्ती सहभागी असू शकते, अथवा नसते.

त्यातल्या त्यात अज्ञानातून, अहंकारातून, गैरसमजातून, अपमानातून आरोप- प्रत्यारोपातून पडलेली चळवळीतील फूट जुळण्याची खूप मोठी शक्यता असते. कारण या सर्व फुटीसाठी कारण असलेली कारणे ही चळवळीच्याच मूळच्या गाभ्यास छेद देणारी नसतात, तर ती वैयक्तिक मानसिकतेत असतात. मराठीत एक म्हण आहे. झोपलेल्यांना जागे करता येते; पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे अवघड असते. चळवळीत फूट पाडणाऱ्यातही असेच वर्गीकरण होत असते. म्हणून मुद्दाम, विचारपूर्वक, नियोजनबद्ध, जाणीवपूर्वक व तेवढ्याच क्रूर पद्धतीने अथवा प्रतिचळवळीकडून दाखविलेल्या प्रचंड लालसेपोटी जर एखाद्याने चळवळीत फूट पाडली या पाडण्यासाठी प्रयत्न केले, तर अशा व्यक्तींना परत आणणे अवघड होते. त्या परततात; पण तोपर्यंत चळवळीचे प्रचंड व न भरण्याएवढे नुकसान झालेले असते. तसेच परत आलेल्या नेत्याची चळवळीसाठी तसेच प्रतिचळवळीसाठी असलेली उपयुक्तताही संपलेली असते. अनेकदा असे प्रतिचळवळीत रमलेले नेते उत्तर आयुष्यात नैराश्याने ग्रासल्यामुळे आत्महत्या करतात. अथवा अत्यंत व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. मानसिक ताण-तणावग्रस्त अथवा पश्चातापद्ग्ध आयुष्य आनंदात घालवणे अत्यंत कठीण असते. सगेसोयरे, जवळचे, बायको – पोरं, तारुण्य, मान, धन, प्रतिष्ठा, स्नेही, सहकारी चळवळीतले, प्रतिचळवळीतले सारे- सारे दूर दूर नजरेच्या व हुंदक्याच्या आवाजापलीकडे गेलेले असतात. आणि मरणही जवळ घ्यायला तयार नसते. म्हणून आत्महत्या हाच पर्याय उरतो. प्रतिचळवळीतील सोनेरी दिवस मृगजळच ठरतात. नक्षलवादी नेत्याने नुकतीच आत्महत्या केल्याचे माहीत आहे.

नावेचा प्रवास हा पाण्यावर होत असतो. नाव पाण्यावर तरंगत असते. त्याच सिद्धांतानुसार चळवळीचा पूर्ण आधार प्रशिक्षित, नामवंत नेते य कार्यकर्ते असतात. त्यांच्यावरच चळवळीचा यशाचा या अपयशाचा प्रवास सुरू असतो. नावेची शानच पाण्यावर आहे. पाणी गोठले तरी त्याची केमीस्ट्री गोठत नाही; परंतु नाव बर्फावर चालूच शकत नाही. एवढा नावेचा व पाण्याचा अनन्य साधारण संबंध आहे. म्हणून पाण्यानेच नावेत प्रवेश केला असता, नाव चालेल असे मानणे चूक आहे. नावेला भोक पडून बाहेरचे पाणी नावेत येत असल्यास नाव बुडते. याचप्रमाणे चळवळीतील कार्यकर्ते व नेते एकत्रित व एकजीव आहेत तोपर्यंत चळवळीत जीव असतो. चळवळ जिवंत असते. म्हणून चळवळ फुटू नये, मतभेद मिटवता येतात. मन भेद घातक ठरतात. चळवळ फुटून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांनी चळवळीस समांतर पूरक चळवळ चालविल्याने चळवळीचे नुकसान होत नाही. अनेकदा त्या उत्तम स्पर्धेतून सामाजिक प्रश्न लवकर मार्गी लागतात. म्हणून चळवळ फुटण्याने कधी कधी सामाजिक फायदे होतात. चळवळीतले लोक प्रतिचळवळ मजबूत करण्यासाठी वापरल्या गेल्यास नुकसान होते. चळवळीच फुटतात असे नाही. प्रतिचळवळी ही फुटतात, परंतु प्रतिचळवळीची फूट ही मूळच्या प्रतिचळवळीच्या बहुजन विरोधी कामास गतिमान करत असते. प्रतिचळवळीतून फुटून निघालेला ब्राह्मण वा त्यांचा हस्तक कधीही चळवळ मजबूत करण्यात सहभागी होत नाहीत. त्यांच्या आजीवन वा प्रचंड निष्ठा या केवळ व केवळ वामन, परशूराम, रामदास, टिळक, हेडगेवार, गोळवलकर, रामदासी, आरएसएस, सावरकर, अभिनव भारत, जनसंघ, भाजपा, शिवसेना अशा प्रतिगामी विचारांशीच बांधलेल्या असतात. म्हणून आरएसएसमधून बाहेर पडलेल्या एकाही सज्जन व पुरोगामी ब्राह्मणानी बहुजन हिताचे एकही काम कधीच हाती घेतल्याचे उदाहरण नाही. एवढेच काय बहुजन गोविंदाचार्य, उमा भारती, महाराज जसवंतसिंग फुटून ही भाजपच मजबूत करतात. तीच गत राज ठाकरेंची आहे. मनसे माध्यमातून शिवसेना जतन होत आहे. आम्हीच भैताड, ‘बेगाने शादीमे, अब्दुल्ला दिवाना’, असे जगत व नासत नाचत असतो.

जगातील प्रत्येक चळवळ व प्रतिचळवळ फुटल्याचाच इतिहास आहे. चळवळ फुटल्यानंतर मित्रांना शत्रू करू नये अथवा मानू नये. चळवळीतल्या प्रमुखांनी अशा फुटलेल्या कार्यकर्त्यांशी सतत संवाद ठेवावा, तसेच त्यांचे गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न करावा. केवळ एखादा सक्रिय कार्यकर्ता वा नेता विरोधी बोलतो, विरोधी वागतो, विरोधी लिहितो, विरोधी गोटात फिरतो… अशामुळेच तो मूळ गाभा असलेल्या चळवळीच्या विरोधात गेला असेही होत नाही. अनेकदा मूळ चळवळीचा गाभाच काळाच्या ओघात, नव्या पदाधिकाऱ्यांच्या अज्ञानात, बदलत्या सामाजिक वातावरणात जाणीवपूर्वक धोरणात्मक करण्यात आलेल्या निर्णयामुळे वा अशाच काही कारणांनी बदलल्या जातो. म्हणजेच मूळ चळवळ आपल्या मूळच्या उद्देश वा धोरणापासून फरफटत जाते अथवा सोयीनुसार दूर जाते. श्रीमंत, विचारवंतही आपल्या मनाविरुद्ध चळवळीत काम करण्याचे टाळतात. त्यांच्यातील उर्मी व ऊर्जा त्यांना बदललेल्या उद्दिष्टाशी एकरूप होऊ देत नाहीत. चळवळीचे पदाधिकारी व असे संदिग्ध मानसिकतेचे कार्यकर्ते यांच्यातही मतभेद वाढत जातात. एका विशिष्ट पातळीवर संवादही तुटतो आणि निसर्ग नियमानुसार काही सक्रिय कार्यकर्ते या नेते चळवळीतून बाहेर पडतात. बाहेर पडल्यावर ते विरोधी काम न करता स्वस्थ बसतात. अथवा चळवळीस पोषक काम करतात. अथवा तशा एखादा जवळच्या चळवळीशी जुळवून घेतात. ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरूच आहे. विघटन ही एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणूनच पाहायची असते. प्रत्येक बाब एका विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर तिचे विघटन क्रमप्राप्त होते. फक्त विघटनानंतर मूळचा चळवळीचा गाभा उद्ध्वस्त होऊ नये.

अनेकदा विघटनानंतरच अनेक चळवळींनी उभारी घेतली आहे. पदाधिकाऱ्यांनी फक्त चळवळीच्या भल्यासाठी अशा विघटनानंतर काही पथ्ये पाळावीत. आपणास सोडून गेलेल्या अथवा आपणाविरोधात काम करणाऱ्या वा आपणास पूरक काम दूर राहून करणाऱ्या अशा कोणत्याही आपल्या जुन्या-नव्या सहकाऱ्याविरोधात आपली वाणी, लेखणी, नाणी, करणी वापरू नये. मोठे होणाऱ्यास संयमाची गरज असते. अनावश्यक टीका-टिपण्णी करून आपणच आपल्या जवळच्या जुन्या सहकाऱ्यास जास्त कडवट वागून बोलून शत्रू बनवत असतो. मला वाटते आम्ही एवढे भान ठेवल्यास फुटीर चळवळीही उपयुक्तच ठरतील. आज देशभर बहुजनांच्या कल्याणासाठी हजारो चळवळी कार्यरत आहेत. त्यांचे नेते, त्यांची नावे अलग आहेत; पण उद्दिष्ट एकच आहे. तरी त्या एकमुखी नाहीत. याची अनेक कारणे आहेत. त्यात जात समीकरण प्रमुख आहे. म्हणून जाती-अंत बोलणारेच जात्यांध निघतात. भांडवलशाहीला विरोध करणारेच भांडवलशाहीचे हस्तक निघतात. हे समजून काम सुरूच ठेवायचे असते.


पुरुषोत्तम खेडेकर

पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.