महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षडयंत्र आहे.
पुण्यातल्या लालमहालातील पुण्यभूमी नांगरतानाचं दृश्य दाखवलेल्या बालशिवाजी, जिजामाता यांच्या समूहशिल्पात घुसडलेला दादोजी कोंडदेवचा पुतळा हटल्यानंतर शिवप्रेमींचं लक्ष आता रायगडावरील ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीकडे गेलंय. म्हणजे आता वादाची जागा कोंडदेवनंतर कुत्र्याने घेतलीय. ६ जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा होतो. यंदाच्या या उत्सवाच्या तयारीसाठी नुकतीच(१७ मे) कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात रायगडावरील ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा चर्चेला आला. वाध्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात वा संदर्भ साहित्य-साधनांत ‘वाघ्या’चा कुठेही उल्लेख नाही. कथा, कादंबऱ्या व नाटकातून रंगवलेल्या ‘वाघ्या’ कुत्र्याचा इतिहासाशी संबंध नाही. त्याचं शिल्प रायगडावर शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणं, हा इतिहासाचा-शिवचरित्राचा अपमान आहे. यामुळे ‘वाघ्या चं शिल्प पुरातत्त्व खात्याने रायगडावरून तातडीने हटवावं, असे मुद्दे-मागणी या बैठकीतून पुढे आलेत. या मुद्देमागणीला दुजोरा देणारी माहिती इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक इंद्रजित सावंत यांनी बैठकीत सविस्तर सादर केल्यावर ‘शिवराज्याभिषेक महोत्सव समिती’चे प्रमुख युवराज संभाजीराजे यांनी ‘वाघ्याचं शिल्प रायगडावरून शासनाने तातडीने हटवावं, त्यासाठी समिती नेमावी,’ अशी मागणी केलीय. कोंडदेवचा पुतळा हटवण्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी वादग्रस्त होणं अपेक्षित होतं. तसंच झालंय. आधी घाण करायची आणि ती साफ करण्याचा कुणी प्रयत्न केला की, ‘अकलेची मापं’ काढत थयथयाट करायचा, हा सनातन्यांचा जुनाच उद्योग आहे. त्याची सुरुवात आता झालीय. पण अशा थयथयाटी सोंगा-ढोंगाने आता सनातन्यांची हरामखोरी लपून राहाणार नाही. शिवरायांचं चरित्र कायम वादग्रस्त राहाण्यासाठी शेंडीला वर्णवर्चस्वाच्या गाठी मारून व्यवहार करणाऱ्या नीच कर्माला ‘वाघ्या’च्या शिल्पाने वाचा फोडलीय. त्यातून सनातन्यांचा लेखणीवाणी-कृती व्यवहार खोट्या इतिहासाची पेरणी करत इतरांच्या बुद्धीची छाटणी कशाप्रकारे करतो, ह्याची साक्षच मिळतेय. छत्रपती शिवरायांचं ३ एप्रिल १६८० रोजी निधन झालं. त्यानंतर जिथे त्यांच्या मृतदेहाचं दहन झालं, तिथे स्मृती चौथरा बांधण्यात आला; तर जिथे त्यांच्या अस्थी-राख पुरण्यात आल्या तिथे समाधी बांधण्यात आली. त्याचप्रमाणे शिवरायांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सती गेलेल्या पुतळाबाईंच्या स्मृतीची शिलाही रायगडावर आहे. याशिवाय ‘वाघ्या’चं शिल्प असलेला समाधी-चौथरा रायगडावर आहे. हा समाधीचौथरा सोयराबाईंचा असण्याची काहींना शक्यता वाटते. तथापि, ‘सोयराबाई शिवरायांच्या निधनानंतर संभाजी राजांच्या विरोधातील कारस्थानात सामील झाल्या होत्या; तेव्हा त्यांची समाधी संभाजीराजे कसे बांधतील,’ असा काही अभ्यासकांचा प्रश्न आहे. पण तो तर्कसंगत नाही.
सोयराबाई संभाजीविरोधी कारस्थानात सामील झाल्या असल्या, तरी त्या शिवरायांच्या पट्टराणी होत्या. तसंच कट-कारस्थानी बाळाजी आवजीला हत्तीच्या पायाखाली चेचून मारण्याची शिक्षा संभाजी राजांनी दिली, तरीही त्याची समाधी परळीखाली त्यांनी स्वतः बांधली आहे. असा ‘सेवक-शत्रू विवेक’ चोख सांभाळणारे संभाजीराजे स्वराज्य निर्माणकर्त्या छत्रपतींच्या पट्टराणीची आणि ‘निर्मळ मनाची आई’ असा एका दानपत्रात उल्लेख केलेल्या सोयराबाईची समाधी रायगडावर बांधणारच नाही, असं ठामपणे म्हणता येत नाही. परंतु ‘वाघ्या’ स्वार झालेला स्मृती-चौथरा सोयराबाईंचाच असावा, याचा इतिहासपुरावा अजून सापडलेला नाही. परंतु त्यापूर्वीच आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांनी सखोल संशोधनाचा आव आणत सदर स्मृती चौथरा हीच शिवरायांची समाधी आहे आणि वाघ्याचं शिल्प असणं, हा शिवरायांचा अपमान आहे, असा त्रागा ‘रायगड एक अभ्यास(भाग १): शोध शिवसमाधीचा’ या पुस्तिकेतून व्यक्त केला आहे. ही पुस्तिका २०००मध्ये प्रकाशित झालीय. या पुस्तकाच्या ‘प्रास्ताविक’मध्ये गोपाळ चांदोरकर यांनी १९५८मध्ये रायगडावर कसे गेलो; त्यानंतर १९८४पासून रायगडाच्या बालेकिल्ल्याची मापं घ्यायला कशी सुरुवात केली, हे काम करीत असताना तिथे निनाद बेडेकर, प्र.के.घाणेकर, भोपटकर आणि नानिवडेकर या चौकडीची ओळख कशी झाली; ‘या चार ‘करा’त मी एक पाचवा ‘कर’ चांदोरकर’ जोडला गेलो. कसा; आणि या चौघांच्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झाल्यावर रायगड अभ्यासाला वेगळं वळण, दिशा कशी मिळाली, त्याचं खास ठेवणीतलं वर्णन केलं आहे. चांदोरकरांना भेटलेल्या या चौकडीतल्या निनाद बेडेकरांनीच बाबासाहेब पुरंदरेंसह लालमहालातील शिल्पसमूहात दादोजी कोंडदेवला घुसवण्याचं मार्गदर्शन पुणे महानगरपालिकेला केलं होतं. तर प्र.के.घाणेकरांचं, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड शिवरायांनी बांधलेला नाही, तो आधीपासून होता, असं म्हणणं आहे. यावरून त्यांच्या मैत्रीमुळे कोणतं वळण-दिशा चांदोरकरांना मिळाली, ते सांगायला नको. यातील साऱ्या चलाखीचा समाचार इंद्रजित सावंत यांनी ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध’ (प्रकाशनः सह्याद्री संशोधन केंद्र, २६२/६, ‘ब’, गजानन महाराज नगर, रेसकोर्स, मंगळवार पेठ, कोल्हापूर; पृष्ठे ९८, मूल्य १००रु.) या पुस्तकात सविस्तर घेतला आहे. त्यात त्यांनी सांगितल्यानुसार, ‘शिवरायांच्या चितेत उडी घेणाऱ्या कुत्र्या’च्या दंतकथेचा उल्लेख लिखित स्वरूपात १९०५मध्ये प्रकाशित झालेल्या चि.ग.गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात झाला आहे. तो असा-महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे, असे पाहाताच, त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घातली आणि स्वतःस जाळून घेतले. १८१८मध्ये पेशव्याच्या ताब्यात असलेला रायगड इंग्रज सैन्याने लढून ताब्यात घेतला. यावेळी रायगडाजवळील काळकाईच्या डोंगरावरून इंग्रजांच्या तोफखान्याने तुफानी हल्ला केल्याने रायगडाचं प्रचंड नुकसान झालं. यातील एक तोफगोळा रायगडावरील दारूकोठारावर पडल्याने रायगड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शेवटी पेशव्यांचा सरदार, रायगडचा शेवटचा किल्लेदार शेख अबूद यांनी रायगड १० मे १८१८ रोजी इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी शेख अबूदच्या बरोबर दुसऱ्या बाजीरावची बायको वाराणशीबाई होती, हे विशेष! इंग्रजांच्या ताब्यात रायगड आल्यावर त्यांनी रायगडच्या वाटा खणून बंद केल्या आणि किल्ला तेव्हाच्या वनखात्याच्या ताब्यात दिला. परिणामी, थोड्याच दिवसांत रायगडावर जंगली झाडाझुडुपांचं आणि प्राण्यांचं साम्राज्य वाढलं. रायगड आणि रायगडावरील शिवरायांची समाधी विस्मरणात गेली.
या विस्मृतीला इतिहासाच्या अभ्यासामुळे आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या ओढीने महात्मा जोतिराव फुलेंनी पुसून टाकलं. ते १८६९मध्ये रायगडावर गेले. २-३ दिवसांच्या अथक परिश्रमाने शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. समाधीची जागा स्वच्छ केली. तिथे फुलं वाहून पूजा केली. ही वार्ता ग्रामभटास कळताच तो तरातरा रायगडावर आला. जोतिरावांनी समाधीवर वाहिलेली फुलं लाथेने उधळत तो म्हणाला, ‘अरे कुणबटा, शिवाजीच्या थडग्याचा देव केलास! मी ग्राम जोशी असता दक्षिणा, शिधा देण्याचं राहिलं बाजूस! केवढा माझा अपमान! तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केलीस? तो शूद्रांचा राजा! त्याची मुंजसुद्धा झाली नव्हती!’ या प्रसंगाने जोतिराव अपमानित झाले. त्यांनी लिहिलंय, ‘ज्यांच्या जीवावर पेशव्यांना राज्य मिळालं त्या शिवप्रभूची पूजासामग्री, या भटभिक्षुकांनी पायाने लाथाडावी काय? मी संतापवायूने वेडा होऊन गेलो. त्यांचं स्मारक म्हणून मी अल्प काव्य केलं आहे. ते त्यांना समर्पण करतो.’ हे ‘अल्प काव्य’ म्हणजे ‘कुळवाडी कुलभूषण’ हा शिवरायांची कीर्ती सांगणारा त्यांच्या मृत्यूनंतरचा पहिला प्रदीर्घ पोवाडा. या पोवाड्याने आणि त्याआधी जोतिराव फुलेंनी रायगडला दिलेल्या भेटीने छत्रपती शिवराय व रायगडचं महत्त्व लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. यानंतर १८८१-८२मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज अधिकारी रायगडावर गेला. त्याने आपल्या ‘बुक्स ऑफ बॉम्बे’मध्ये रायगडचं वर्णन लिहून ठेवलंय. त्यात त्याने नकाशासह शिवरायांच्या समाधीचा तपशील सांगितलाय. त्यानंतर १८८५मध्ये मुंबई इलाख्याचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल हेदेखील रायगड पाहाण्यासाठी आले. त्यावेळी शिवरायांच्या या उत्तुंग राजधानीच्या दर्शनाने भारावलेल्या टेम्पल यांनी रायगडावरील अनेक वास्तूंची स्केचेस काढली. त्यांच्या सोबत असलेल्या क्रॉफर्ड यांनी टेम्पल यांच्या या रायगड भेटीवर आधारित ‘अवर ट्रबल इन पूना अॅण्ड डेक्कन’ हे पुस्तक लिहिलं. ते १८९७मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकात क्रॉफर्ड यांनी शिवरायांच्या शवाचं दहनस्थळ आणि समाधी यांचं स्वतंत्र चित्र रेखाटलं आहे. जोतिराव फुलेंच्या पोवाड्याप्रमाणेच डग्लस आणि क्रॉफर्ड यांच्या पुस्तकात कुठेही ‘वाघ्या कुत्र्याचा वा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही. मग हा ‘वाघ्या’ रायगडावर स्वार झाला कसा? ही चि.ग.गोगटे यांच्या पुस्तकाची करणी? अजिबात नाही!
ही तर भाषाप्रभूची करणी
नाटककार, विनोदकार आणि कवी अशी ओळख असलेले राम गणेश गडकरी अल्पायुषी होते. (जन्म २६ मे १८८५, मृत्यू २३ जानेवारी १९१९) अफाट कल्पनाशक्ती आणि शब्दशक्ती हा गडकरींच्या साहित्याचा विशेष आहे. कारुण्य आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती त्यांनी आपल्या लेखणीतून सारख्याच प्रभावीपणे साधली आहे. त्यात अतिशयोक्ती असली, तरी त्यांच्या लेखणीनं वाचकांचं आणि प्रेक्षकांचं मन पकडून ठेवण्याचं सामर्थ्य कमावलं होतं. ते शेवटची काही वर्ष क्षयरोगाने आजारी होते. तशाही अवस्थेत त्यांनी भावबंधन नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिला आणि थोड्याच वेळात त्यांचं निधन झालं. हे नाटक १९२०मध्ये रंगभूमीवर आलं आणि प्रकाशित झालं. तसंच त्यांचं अपूर्ण ‘राजसंन्यास’ हे नाटक १९२१मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झालं. या नाटकाची सुरुवातच सौंदर्याच्या मोहनबाधेने धुंद झालेल्या तुळसाला संभाजीराजे रायगडावर आणतात, या प्रसंगाने झालेली आहे. संभाजीराजांचा रंगेलपणा, त्यामुळे शिवरायांशी झालेला त्यांचा मनभेद, आणि शिवरायांच्या पश्चात या साऱ्याबद्दल संभाजीराजांना झालेली उपरती यावर बेतलेलं हे नाटक आहे. संभाजीराजांचा हा रंगेलपणा त्यांची बदनामी करण्यासाठी भटी इतिहासकारांनी रचलेला कट होता, हे इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे, कमल गोखले यांनी पुराव्यांसह सिद्ध केलं आहे. तथापि, राजसंन्यास नाटकावरून या संभाजीविरोधी कटात राम गणेश गडकरीही सामील झाले होते, ह्याची साक्ष मिळते. या नाटकात त्यांनी संभाजीराजांच्या तोंडून रामदासाच्या झोळीत शिवरायांनी मिळवलेल्या स्वराज्याच्या सनदा टाकल्या आहेत. संभाजीराजे म्हणतात, ‘राजाने वैराग्याला भीक घातली. खरा शिष्य, खरा सद्गुरू! हाच राजसंन्यास!’ गडकऱ्यांच्या कल्पनाशब्दशक्तीचा हा भिकारपणा इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी ‘शिवराय-रामदास भेट’ झालीच नव्हती, हे सप्रमाण सिद्ध करून उघडा पाडला. त्यामुळे भाषांप्रभूचं शब्दवैभव अखेरीस तळीरामी झोकांड्याच ठरलं.
यातली पहिली झोकांडी त्यांनी नाटकाच्या अर्पणपत्रिकेत मारली आहे. ती वादग्रस्त ठरलेल्या ‘वाघ्या कुत्र्यासंबंधाने आहे. या अर्पणपत्रिकेत गडकरी लिहितात, ‘इतिहास छातीला हात लावून कथा सांगतो आहे, तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायलाच हवी, थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता. हे समर्था घरीचे श्वास खरोखरीच सर्वांना मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर, त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर, त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधीशेजारी मांडीला मांडी लावून बसलेली, तिन्ही लोक डोळ्यांनी पाहात आहेत. त्या समाधीवर, त्या चतुष्पाद पशूची पूजा बांधण्यासाठी, नरदेहाचा नसता अभिमान सोडून, माझ्या या राजसंन्यासाच्या पामर बोलाची-डोंगरपठारीवरच्या या रासवट रानफुलांची पांखरण करून ठेवीत आहे.’ नाटक अपूर्ण असताना गडकऱ्यांनी अर्पणपत्रिका आधीच कशी लिहिली, हा प्रश्नच आहे. हा अपूर्ण राजसंन्यास गडकऱ्यांनी रेखाटलेल्या नाटकाच्या आराखड्याच्या टिपणासह पुस्तकरूपात प्रकाशित करणाऱ्याचं तर सिद्धहस्त लेखन कौशल्य नसेल ना? या नाटकात ‘जिवाजी कलमदाने’ हे कारकुनी पात्र आहे. हा जिवाजी पेहलवान देहूला सांगतो, ‘कारकुनाच्या लेखणीप्रमाणे, शेंडा कापून जिभेचाही टाक तोडायचा, जिभेचे कलम करायचे आणि कलमाने दस्तर कुठे गंतवायचा नाही!’ अर्पणपत्रिकेबाबत असं झालंही असेल! पण जिवाजीच्या तोंडची पुढची वाक्यं वाचली की, अशी काही शंका राहात नाही. जिवाजी म्हणतो, ‘अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन फूट उंचीचा…त्याची काय मातब्बरी सांगतोस एवढी देहू!… म्हणे हिंदूपदपाच्छाई उठवली! काय रे, मोगलाई मोडलीन् मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते? शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे आले, का शेळीने आपली पोर वाघाच्या बेट्याला दिली, का कणसातून माणसं उपजली? अरे, केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठेशाहीत कवटीवर चढली, एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून त्याचे नाव झाले इतकेच! त्यातून खरं सांगू?…शिवाजीची खरी लायकी चारचौघांना पुढे कळणार आहे! त्या माणसात काही जीव नव्हता रे!’ हे जिवाजी बोलतोय; पण तो गडकरींच्या डोक्याने बोलतोय. हे डोकं ज्यांना उपयुक्त वाटलं, त्यांनीच गडकरींच्या अर्पण पत्रिकेतील वाक्यं ‘वाघ्या’ कुत्र्याच्या शिलाफलकावर कोरली आहेत.
शिवरायविरोधी नतद्रष्टांचा शोध
रायगडावरील वादग्रस्त कुत्र्याचं ‘वाघ्या’ हे बारसंही गडकरींनच केलं आहे. तथापि, गडकरींच्या या काल्पनिक झोकांड्या निर्माण होत असताना ‘शिल्पावतारी वाघ्या’ रायगडावर नव्हता. तो १९३६मध्ये तिथे आला. बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केल्यानंतर रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘श्री शिवाजी मेमोरियल ट्रस्ट’ स्थापन केला. त्याचे दाजी आबाजी खरे हे अध्यक्ष होते; तर टिळक सेक्रेटरी होते. टिळकांच्या हयातीत हे समाधी जिर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं नाही. ते १९२७मध्ये झालं. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.एम.जी.देशमुख आणि सेक्रेटरी न.चिं.केळकर होते. समाधीचा जिर्णोद्धार झाल्यानंतरही ‘रायगड स्मारक समिती’चं पैसे जमवण्याचं काम सुरूच होतं. त्यावेळी महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जोरात सुरू होता. त्याचे पडसाद ‘वाघ्या’च्या रूपात उमटलेले दिसतात. त्याला उजाळा मिळावा, या हेतूने गोपाळ चांदोरकरांनी ‘शोध शिवसमाधीचा’चं संशोधनलेखन केलेलं दिसतं. चांदोरकर लिहितात, ‘स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. होळकर पडले संस्थानिका तसे पैसे द्यायची त्यांची ऐपत होती. परंतु, शिवस्मारकाला पैसे देणं कदाचित इंग्रज सरकारला आवडणार नाही, याचीही त्यांना मनोमन खात्री होती. तेव्हा ही श्रृंगापत्ती टाळावी म्हणून त्यांनी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली. कारण सांगितलं, महाराज सुतकात आहेत. सुतक कसलं? तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे गेले होते, त्याचं सुतक! पण समितीची माणसं चिकाटीची आणि चाणाक्ष असावीत. आपली गरज आणि महाराजांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणर्ग द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चुन समितीने त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही, इंग्रज अवकृपेची भीती नाही!
तोडगा उपयोगी पडला!’ या तोडग्यानुसार जे पैसे मिळाले,ल्या पैशाने आज जिथे मेघडंबरी शिवसमाधी म्हणून आहे, त्या जवळच्या दुर्लक्षित चौथऱ्यावर कुत्र्याचं शिल्प उभारण्यात आलं. या कुत्र्याखालचा चौथरा हीच खरी ‘शिवसमाधी’ आहे, असं गोपाळ चांदोरकरांचं म्हणणं आहे. ‘एका संस्थानिकाची लहर, एका कवीची कल्पना आणि समितीची पैसे जमवण्याची हातोटी, यातून वाध्याचा ऐतिहासिक वा तार्किक शक्यता नसलेला पुतळा उभारला गेला,’ अशीही मल्लिनाथी चांदोरकर यांनी केली आहे. यातील एका संस्थानिकाची लहर’ हे त्यांच म्हणणं भटीभेजाला साजेसं असलं, तरी ते तर्काला धरून नाही. कारण त्यावेळी इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते. ते शिवप्रेमी होते. राजर्षि शाहूंनी पुण्यात पायाभरणी केलेल्या शिवस्मारकाला तुकोजीरावांनी मोठी देणगी दिली होती. वेंगुर्त्यांचे कृष्णराव अर्जुनराव केळुसकर (जन्म १८६०, मृत्यू १९३४) यांनी पहिलं ‘शिवचरित्र’ लिहिलं. त्याच्या होळकरांनी शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या. त्याचं शिवराय प्रेम आणि आदर, राजर्षि शाहू, बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड, फलटणचे राजे निंबाळकर यांच्याप्रमाणे उघड होता. त्यांना शिवसमाधी जीर्णोद्धाराला मदत करताना इंग्रज सरकारला घाबरण्याचं कारणच नव्हतं. तसंच इंग्रज सरकारलाही शिवरायांच्या जीवन-कार्याबद्दल तिटकारा नव्हता. उलट आदरच होता. म्हणूनच इंग्रज सरकार पहिल्या महायुद्धाच्या वेळेस वर्तमानपत्रातून शिवरायांचा मोठा फोटो छापून ‘शिवरायांचे तुम्ही वारस आहात, तेव्हा सैन्यात भरती व्हा, असं आवाहन करीत होतं. १८८६, १८९१, १९११ या काळात इंग्रज सरकारने पुढाकार घेऊन शिवसमाधीची डागडुजी केली. तिथे दररोजच्या दिवाबत्तीची सोय केली. हा इतिहास दर्लक्षून गोपाळ चांदोरकर तुकोजीरावांच्या दानशूरतेला ‘एका संस्थानिकाची लहर’ म्हणून हिणवतात, तेव्हा तो जातीय तेढ वाढवणारा हिणकस डावपेच ठरतो. होळकर हे धनगर. म्हणूनच त्यांनी कुत्र्याच्या स्मारकाला देणगी दिली; पण शिवस्मारकाला दिली नाही, असंच गोपाळ चांदोरकरांना सुचवायचं असावं. हे सुचवणं संतापजनक व्हावं यासाठी खऱ्या शिवसमाधीवर होळकरांच्या लहरीपणामुळे कुत्रा बसला, असं तर्कट ते मांडत आहेत. आणि तेच मान्य करायला भाग पाडून वर उपायांचा आगाऊपणाही करीत आहेत, तो संतापजनक आहे. ‘वाघ्याच्या शिल्पाखालील चौथरा ही सोयराबाईंची समाधी असण्याची शक्यता आहे,’ असं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे. तथापि, कुत्र्याचं शिल्प हा प्रत्यक्षात आलेला काल्पनिक बनाव आहे. यावर दोघांचं एकमत आहे. इतिहासही तेच सांगतोय, तथापि, इतिहास म्हणजे कल्पनाविलास नाही, हे न कळणाऱ्या भाषाप्रभूची आणि त्या कल्पनाविलासाला ऐतिहासिकतेचा साज चढवून स्वार्थ-अहंकारांची खाज भागवणाऱ्यांना हा माज कधीतरी आपल्यावरती उलटेल, याचा अंदाज नसणाऱ्यांची कधीतरी माती होतेच. अशा मातीमोल लायकीच्यांना वसंत कानेटकरांनी ‘शिवशाहीचा शोध’ या आपल्या अखेरच्या ग्रंथात ‘नतद्रष्ट’ म्हटलंय. रायगडावरून वाघ्याच्या शिल्पाला नष्ट करताना, खोटा इतिहास सांगणाऱ्या नतद्रष्टांच्या हरामखोरीचीही माती केली पाहिजे.
–
ज्ञानेश महाराव
(संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)