मराठा नेते कोठे आहेत?

ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.

वरील सर्व आंदोलन करणार्‍या नेत्यांवर नजर फिरवली तर आपल्या असे लक्षात येते की, यामध्ये एकही मराठा नेता नाही. अगदी जातीसहीतच सांगायचे झाले तर ऊसप्रश्नावर आंदोलन कराणारे नेते खा. राजू शेट्टी (जैन), कापूस प्रश्नावर आंदोलन करणारे आ. रवी राणा (राजपुत), आ. गिरीष महाजन (गुजर), कापूस प्रश्न संसदेत घेऊन जाणारे खा. गोपीनाथराव मुंडे (वंजारी), खा. चंद्रकांत खैरे (बुरूड), कापूसदिंडी काढणारे दिवाकर रावते (माळी), आ. पाशा पटेल (मुसलमान), विजेच्या प्रश्नावर मोर्चा काढणारे आ. प्रशांत बंब (मारवाडी) आहेत.

या सर्व नेत्यांच्या जाती दाखवून मला जातीवाद करायचा नाही, पण एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो, या यादीत एखाद्या तरी मराठा नेत्याचे नाव दिसते काय, मराठा नेत्यांना या प्रश्नांचे गांभीर्य नाही का? यांचा शेतीशी संबंध येत नाही का? गावांशी संपर्क तुटला आहे की त्यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क तूटला आहे? का मराठा नेते प्रस्थापित झाले आहेत? यावर महाराष्ट्रातील मराठा तरूण अत्यंत गांभीर्याने विचार करीत आहेत.

अगोदरच मराठा आरक्षण प्रश्नी सर्व मराठा नेते गप्प असल्यामुळे मराठा तरूण संतप्त आहेत. आजपर्यंत मराठा आरक्षणाला मुंडे-भुजबळ विरोध करतात, असे कारण सांगून मुख्यमंत्री मराठयांना आरक्षण देत नव्हते. परंतु परवा बीड येथील मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना खा. गोपीनाथराव मुंडे म्हणाले की, मी सत्तेत असताना वंजारी समाजाला सवलती दिल्या, यात माझे काय चुकले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार मराठा असताना ते मराठयांना आरक्षण का देत नाहीत. मराठा नेत्यांत मराठयांना आरक्षण देण्याची धमक नाही. कदाचित मी मुखमंत्री झाल्यावरच मराठयांना आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. असा दणका खा. मुंडे यांनी दिल्यामुळे मराठा समाज मराठा नेत्यांवर बिथरला आहे. आरक्षणप्रश्नी मराठा नेते बोलत नाहीत. ऊस, कापूस, वीजप्रश्नी मराठा नेते गप्पच आहेत. हे पाहून मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे.

ज्या नेत्याला समाजमन कळत नाही त्याचे नेतृत्व टिकत नाही, हा राजकारणाचा नियम आहे. बहुतेक मराठा नेते मराठा मतदान गृहीत धरतात. त्यामुळे ते समाजाच्या कार्यक्रमास विचारपिठावर येण्यासाठी उत्सुक नसतात. मराठयांचे एखादे काम केले तर आपल्यावर जातीवादी शिक्का बसेल याची त्यांना भीती वाटते. मराठा आरक्षण प्रश्न फक्त मुख्यमंत्र्यांनी सही केली तरी हा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण मराठा मुख्यमंत्री सही करीत नाही. कारण त्यांना वाटते मराठयांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला तर आपल्यावर जातीवादाचा शिक्का बसेल, इतर समाज नाराज होईल व आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल. आपल्याला मराठे सुध्दा मतदान करतात हे ते विसरतात. याचा अर्थच असा की, मराठा समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे आता हे जमणार नाही. आता समाज नेता जातीपेक्षा मातीच शोधत आहे. आजपर्यंत नेता लग्न, मौत, गृहप्रवेश याला हजर राहीला तरी लोक त्याला मतदान करीत. परंतु समाजाला आता लग्न, मौत, गृहप्रवेश याला हजर राहणार्‍या नेत्यापेक्षा समाजहिताचे काम करणारा, परिसराचा विकास करणारा नेता हवा आहे. म्हणुनच लोक खा. राजू शेट्टी, आ. बच्चू कडू यांना नोट आणि व्होट दोन्ही देऊन निवडून देत आहेत. खा. गोपीनाथराव मुंडे यांना भारतात सर्वात जास्त मतदान झाले आहे. त्यात विशेषतः कितीही अफवा पसरविल्या तरी मराठयांनी त्यांना भरभरून मतदान केले आहे.

वारं फिरलं आहे. मराठा नेत्यांनो सावधान!

महाराष्ट्रात असा एक मतदारसंघ दाखवा की, ज्या मतदारसंघात मराठा मतदार नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला आहे. उदा. ना. राजेंद्र दर्डा जैन समाजाचे कमी मतदान असतानाही निवडून येतात. ना. हसन मुश्रीफ कागलमध्ये मुस्लीम मतदान कमी असतानाही निवडून येतात. ना. जयदत्तजी क्षीरसागर बीडमधून तेली समाज नसतानाही निवडून येतात. अपवाद सुध्दा नाही. याचा अर्थ असा की, सध्यातरी मराठा नेते हे मराठयांचे मतदान पडल्याशिवाय निवडून येऊच शकत नाहीत. त्यामुळे मराठा उमेदवारांना मराठा मतदारांना नाराज करून निवडून येणे शक्यच नाही. आजपर्यंत मराठा नेते जातीचे भावनिक आवाहन करून निवडून येत होते. आता मात्र जातीच्या भावनिक आवाहनावर निवडून येण्याचे दिवस संपले आहेत. याची जाणिव मराठा नेत्यांनी ठेवावी.

शेती जुगारी धंदा आहे. शेती पिकत नाही. पिकली तर विकत नाही. विकले तर भाव मिळत नाही. नोकरी लागत नाही. धंदा करण्यास भांडवल नाही. भांडवल असेल तर धंद्याचा अनुभव नाही. त्यामुळे तरूण दिशाहीन झाला आहे. ही सर्व शेतकरी व मराठा समाजाची अवस्था आहे. ज्यावेळेस तो निराश होईल त्यावेळी तो आत्महत्या करतो. कारण शेतकर्‍यांला ब्राम्हणी धर्मसंस्थेने प्रयत्नवादी बनविण्याऐवजी देववादी, दैववादी व व्यक्तीपूजक बनविले आहे. त्यामुळे त्याला वाटते कोणीतरी देव मदतीला येईल. नशीब साथ देईल. किमान आपल्या भागाचा नेता आपल्या समस्या सोडविल. देव आणि नशीबाने तर त्याला पिढ्यानपिढ्या साथ दिली नाही. ज्याला आपले म्हणावे तो नेता पक्षश्रेष्ठीचा उदोउदो करण्यात, हुजरे करणार्‍या, भाटगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांच्या गराड्यात, दिल्ली, मुंबईच्या वार्‍या करण्यात, आपल्या जवळील पैशाची गुंतवणूक करण्यात मग्न असेल व जनतेकडे दुर्लक्ष करीत असेल तर येणार्‍या काळात त्याला काळ आणि जनता दोन्हीही माफ करणार नाहीत.

शेतकर्‍यांकडे दूर्लक्ष करणार्‍या मराठा नेत्यांनो सावध व्हा! नसता भविष्यात मराठा समाजच मराठा नेता पाडो अभियान हाती घेईल व तुम्हाला भूईसपाट करेल. सावध व्हा! लोकांशी नाळ तुटून देवू नका. जनमत समजून घ्या. लोकांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करा. एक पाय जनतेत व एक पाय प्रगतीकडे टाका व आहेत त्या खुर्च्या, पदे, सत्ता किमान शाबूत ठेवा. तूर्त एवढेच..

-प्रदीप सोळुंके

साभार-दैनिक पुण्यनगरी (दिनांक २५ नोव्हेंबर 2011)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.