महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते

यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेली विचारांची व कृतीची धडपड, फूले-शाहू-आंबेडकर या विचारप्रवाहावर त्याची असलेली अविचल निष्ठा, भारतात लोकशाही समाजवाद यावा याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा महाराष्ट्रातील जनतेला परिचय झाला पाहिजे.

यशवंतराव मोहिते यांच्यावर कार्ल मार्क्स, म. ज्योतिबा फुले, शाहूराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी पुरोगामी धोरणांचा खंबीरपणे पाठपुरावा केला. कोणत्याही धर्माच्या लोकांनी आपला देव रस्त्यात आणू नये, त्याचे प्रदर्शन करू नये. आपल्या धर्म भावनेप्रमाणे जी काही पूजा करायची असेल ती चार भिंतींच्या आतच करावी असे त्यांचे ठाम मत होते. राजकीय सत्तेसाठी धर्माचा वापर करणे ही शुद्ध फसवणूक आहे असे भाऊ म्हणत.

बहुजन समाजाच्या हितासाठी झटत असल्याने नेहमी भाऊंची बदनामी करण्याचे प्रयत्न झाले. प्र. के. अत्रे यांच्याशी झालेला त्यांचा संघर्ष फार गाजला. यावेळी तत्कालीन प्रसारमाध्यमे भाऊंच्या विरोधात गरळ ओकत होती. उच्च न्यायालयाच्या १०९ वर्षाच्या इतिहासात एकही ब्राम्हणेतर न्यायाधीश का झाला नाही असा खडा सवाल मंत्री असताना न्यायालयाला विचारणारे भाऊ खरोखर निर्भीड होते.

भाऊ जातीयवादी पक्ष-संघटनाबद्दल म्हणत- “आजही या देशातील जवळ-जवळ सर्व राजकीय पक्षांचे, प्रजासमाजवादी, संयुक्त सोशालिस्ट पक्ष, कॉंग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट धरून नेतृत्व ब्राम्हणच करत आहेत. आणि त्यात मी काही वावगे मनात नाही. नेतृत्व एका ठराविक प्रक्रियेतून वाढावे लागते. ही प्रक्रिया करण्याची आजवरची मूस वर्णश्रेष्ठत्वाची होती. त्यातून श्रेष्ठ वर्णाचे नेतृत्व आले. वावगे काही घडले नाही, मी वृथा तक्रार करणार नाही. पण आज राजकीय क्रांती झाल्यावर, स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक क्रांतीचा आग्रह या नेतृत्वाने धरू नये, हे खटकते.”

सामाजिक क्रांतीबद्दल भाऊ म्हणतात, “महात्मा फुले, शाहू महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना जी सामाजिक क्रांती अभिप्रेत आहे ती यशस्वी झाली असे आपण कधी म्हणू शकू ? त्या क्रांतीतून निर्माण होणार्‍या नवसमाजाच्या कसाची खरी कसोटी कोणती ? तो समाज एकसंघी, एकजिनसी असला पाहिजे. म्हणजेच त्याची न चुकणारी कसोटी ठरते त्या समाजात चालणारा अनिर्बंध रोटीबेटी व्यवहार.”

भाऊनी ३०-३५ वर्षे महाराष्ट्रात अनेक मंत्रीपदे भूषवली. अनेक बहुजन, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदे भूषवली. पदासाठी कधी लुच्चेगिरी केली नाही. राजकारणासाठी स्वतःचा गट निर्माण केला नाही. भाऊची फुले-शाहू-आंबेडकरवादावर अविचल निष्ठा होती. १९८५ साली भाउंनी राजकारणातून निवृत्ती घेतली. भाऊसारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव.

भाऊंच्या पुरोगामी कार्याला आणि परखड विचारांना विनम्र अभिवादन..

-प्रकाश पोळ
(साभार- http://www.sahyadribana.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.