पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.

पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच आपल्याकडे झाले आहे. त्यांच्या शिवचरित्राचा प्रचंड प्रभाव समाजमनावर पडलेला आहे. अनेक लोकांचे असे मत आहे, की पुरंदरे यांचेमुळे आम्हाला शिवचरित्र समजले; पण त्यांना महाराष्ट्र शासनाने अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर केल्यामुळे त्यांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. यापूर्वी १६ पैकी १३ पुरस्कार ब्राह्मणांना दिले, पण बहुजनांनी कधी विरोध केला नाही; पण पुरंदरेंनाच विरोध का?

इतिहासाची मांडणी धार्मिक द्वेष निर्माण करणारी:

ब.मो. पुरंदरे यांच्या शिवचरित्राची मांडणी हिंदु-मुस्लीम संघर्षाला खतपाणी घालणारी आहे. ऐतिहासिक वस्तूस्थितीचा विपर्यास करून जातवादी-जमातवादी मांडणी पुरंदरे यांनी केलेली आहे. शिवकालीन संघर्ष हा राजकीय संघर्ष होता, धार्मिक संघर्ष नव्हता, शिवरायांनी जसे अफजलखानाला मारले, त्याप्रमाणेच खानाचा कैवार घेऊन अंगावर धावून येणाऱ्या कृष्णा कुलकर्णी आणि महिलेवर अत्याचार करणा-या रांझे गावच्या बाबाजी गुजरला देखील ठार मारले. अनेक मराठा सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामशाहीत होते, तसेच अनेक मुस्लीम सरदार, अंगरक्षक, आरमार प्रमुख शिवरायांच्या पदरी होते. यावरून स्पष्ट होते, की शिवरायांची तलवार कोणत्याही धर्मासाठी नव्हती किंवा धर्मविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी ती तळपत होती. शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे स्वराज्य होते; पण पुरंदरे यांनी शिवकालीन लढा म्हणजे हिंदु-मुस्लीम दंगल अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. मुस्लीम हिंदुना कसे छळत होते, हे पुरंदरे पुढीलप्रमाणे लिहितात.

“जिवंत जाळणे, तेलात तळून काढणे वगैरे जुलूम शिगेला गेले होते.” (‘राजा शिवछत्रपती’- आवृत्ती सोळावी-२००८, उत्तरार्ध, पृष्ठ क्र. ५४) याला पुरावा दिलेला नाही. मुस्लीम हिंदुना तेलात तळत होते, हे ऐकून हिंदु-मुस्लीम प्रेम निर्माण होणार की द्वेष? तुळजापूरची मूर्ती अफजलखानाने फोडल्याचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही; पण पुरंदरेंनी केलेली मांडणी पुढीलप्रमाणे, ”महाराष्ट्राच्या आणि महाराजांच्या कुलदेवता तुळजाभवानीचे घणाच्या घावाखाली तुकडे उडविण्यासाठी हा महिषासूर चौखूर उधळत निघाला होता.” (उत्तरार्थ, पृष्ठ क्र.२५३). “खान आला सारा गाव भयाने सैरावैरा धावत सुटला. तुळजापुरात तोडाफोडीला उधाण आले. मूर्ती खडाखड फुटू लागल्या. संबंध क्षेत्र खानाने पार उद्ध्वस्त केले. देवीचे पुजारी भोपे होते. त्यांना खानाने पिटाळून लावले.” (पृष्ठ क्र. २५४). असे घडलेले नाही; पण हिंदूंनी मुस्लीमांविरुद्ध पेटून उठावे, यासाठीच पुरंदरेंनी अशी मांडणी केलेली आहे. दंगलीला चिथावणी देणारे पुरंदरे यांच्यावर खरे तर पोलिस कारवाई करायला हवी; पण फडणवीस सरकार पुरस्कार देत आहे. म्हणजे फडणवीसांना महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवायचा आहे? हिंदू-मुस्लीम संघर्षाला खतपाणी घालणा-या अनेक अनैतिहासिक बाबी सदर पुस्तकात आहेत; पण नमुन्यादाखल दोनच बाबी येथे देतो.

जिजामातेचे चारित्र्यहनन:

ज्या राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी शिवरायांना घडविले. वाढविले. सर्व प्रकारचे शिक्षण दिले. शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांचादेखील सन्मान केला. भाऊ जसा बहिणीशी वागतो, मुलगा जसा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज शत्रूच्या स्त्रियांशीदेखील वागायचे, असे समकालीन खाफीखान म्हणतो. अशा शिवरायांच्या मातेबद्दल पुरंदरेंनी काय लिहिले आहे? जे रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवरायांचे कधीही गुरू, मार्गदर्शक किंवा शिक्षक नव्हते, हे ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध झालेले आहे, त्या रामदास-कोंडदेव यांचे उदात्तीकरण करताना पुरंदरेंच्या लेखणीला बहर येतो.

‘पंतांची व आईसाहेबांची लगीनघाई उडून गेली.” (पृष्ठ क्र.१३२). “शहाजीराजे या लग्नास येऊ शकले नाहीत.” (पृष्ठ क्र. १३२). शहाजीराजे आणि जिजाऊ यांनीच शिवरायांचे लग्न लावले, असे वा.सी.बेंद्रे देखील सांगतात; पण शहाजीराजांना गैरहजर दाखविण्यामागे पुरंदरेंचा उद्देश काय? ‘पंताच्या सारखीच शिस्त आणि साखरमाया शिवरायांत उतरली होती.’ (पृष्ठ क्र.१७३)

‘पंतांनी व आईसाहेबांनी कोरलेले संस्कार त्यांच्या मनावर शिलालेखासारखे कोरले गेले होते.’ (पृष्ठ क्र. १७४). पुरंदरेंच्या मनात काय पाप आहे हे वरील अनैतिहासिक वाक्यांवरून स्पष्ट होते. ”पंत (कोंडदेव) भोसल्यांच्या कुटुंबातीलच राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दराऱ्याचे, मायेचे आणि ममतेचे वडीलधारी पुरुष होते…… आईसाहेबावर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही, हिची जडणघडण काही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते.” (आवृत्ती पंधरावी, २००३, पृष्ठ क्र.१२६).

जे कोंडदेव गुरू नाही, त्यांना थेट भोसल्यांच्या घरात पाठवणे. ते वडीलधारी होते. ते जिजाऊंवर खूप माया करीत, असे लिहिण्यामागे पुरंदरेंचा उद्देश काय? कोणत्याही मुलीची जडणघडण प्रथम त्या मुलीच्या आईला आणि त्यानंतर पतीला माहीत असते. कोंडदेव यांना जडण-घडण माहीत असण्याचे कारण काय? पुरंदरेंच्या मनात काय उद्देश आहे, हे लपून राहत नाही. पुढे पुरंदरे लिहितात, ”शिवबावर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल एवढा जीव पंतांचा होता…. त्यांचे (पंतांचे) आई साहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते- सह्याद्री!” (पृष्ठ क्र. १२६)

पुरंदरेंच्या वरील मांडणीवरून स्पष्ट होते, की जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला, असे घडले नाही, कारण बदनामीकारक जोक (मजकूर) लिहिल्यानंतर लेन असे लिहितो, की ही सत्यता यावरून पटते, की शहाजीचा शिवरायांवर प्रभाव नव्हता, तर दादोजी कोंडदेव- रामदासांचाच होता. अशा कथा महाराष्ट्रात आहेत. जेम्स लेनच्या पुस्तकाची पाळमुळे पुरंदरेंच्या पुस्तकात आहेत. शहाजीराजांना गैरहजर दाखविणे आणि रामदास- कोंडदेव यांना जिजाऊ- शिवरायांसोबत दाखविणे यापाठीमागे पुरंदरेंच्या मनात कोणती विकृती होती, हे लेनमुळे महाराष्ट्राला समजले. गोत्र एकच होते याचा अर्थ काय? सहयाद्री हे गोत्र नाही. तो पर्वत आहे. पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचे सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेत(२००३) कौतुक केले होते.

जिजाऊंची बदनामी करण्यामागील पुरंदरे आणि ब्राह्मणी छावणीचा उद्देश काय? याचे विश्लेषण, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याच्या आंदोलनप्रसंगी पुढीलप्रमाणे केलेले आहे. “बहुजन समाजातील एखादा शूर, पराक्रमी, बुद्धिमान, कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण झाला, तर तो आमच्या रक्तापासूनच जन्माला येतो, अशा विकृत आणि सडक्या विचारसरणीचे लोक आहेत. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जिजाऊं शेजारी उभारणे अशा विकृत लोकांचेच काम आहे. त्यांच्या विरोधात आम्ही वेळोवेळी रस्त्यावर येऊ.”

ब. मो. पुरंदरेंनी जिजाऊंना बदनाम करण्यासाठी कपोलकल्पित मांडणी पुढीलप्रमाणे केलेली आहे.

‘तिला वाटे आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसू शकणार?…. मला तिच्या पंगतीला बसायचेच!” (पृष्ठ क्र.८४)

कुंतीच्या मुलाचे जन्म कसे झाले आहेत, ही पुराणकथा सर्वांना ज्ञात आहे. जिजाऊंना कुंतीच्या पंगतीला नेऊन बसवायचा पुरंदरेंचा उद्देश काय?

सरदारांबद्दल पुरंदरे पुढील प्रमाणे लिहितात, ”सरदार मोठेपणासाठी स्वतःची आई विकायला कमी करणार नाहीत. हे लाचार, स्वार्थी गुलाम, पुरुष कसले हे?’ (पृष्ठ क्र.८३)

ज्या मावळ्यांनी, बहुजन सरदारांनी रक्त सांडले, स्वराज्य मिळविले, त्यामध्ये घोरपडे, निंबाळकर, भोसले, जाथवराव, जेथे, बांदल, पासलकर, शिंदे, होळकर, शिके, काटे, जगताप, काटकर, मोरे, निंबाजी पोटोळे, रामाजी गडदरे, काकडे, घाटगे, मोहिते, थोरात, बळवंतराव देवकाते, शितोळे, बहिरजी वड़गरे, शिवतरे, सणस, कोंढाळकर, कंक, शिळीमकर, इंद्राजी गावडे, मायनाईक भंडारी, जानराव वाघमारे (सभासदाने मोठी यादी दिलेली आहे.) इत्यादी सरदारांच्या मातांचे चारित्र्यहनन करण्याचा कट आहे. अॅड. अनंत दारवटकरांनी पुरंदरेंना पुणे कोर्टात साक्ष घेताना विचारले, की ”कोणत्या सरदाराने हौसेसाठी स्वतःची आई विकली, तो पुरावा द्या.” पुरंदरेंनी पुरावा दिला नाही.

पुरंदरेंनी स्त्रियांचे जे चारित्र्यहनन केलेले आहे, हा अक्षम्य अपराध आहे. स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची कारणे ब्राम्हणी पुरुषसत्ताक स्त्रीदास्य मानसिकतेतून लिहिलेल्या इतिहासात आहेत. पुरंदरेंनी इतिहासाची मांडणी स्त्रियांना हीन लेखणे, स्त्रियांचे चारित्र्यहनन करणे, यांसाठी केलेली आहे. ही पुरंदरेंची विकृती आहे. त्यामुळेच कोल्हापूर न्यायालयात पुरंदरेंच्या विरोधात डॉ.राजीव चव्हाण यांनी एक कोटीचा दावा दाखल केलेला आहे. पुणे न्यायालयात पुरंदरे विरुद्ध सुधाकर लाड, असा खटला सुरू आहे. अशा आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देणे हा पुरस्काराचा, महाराष्ट्राचा, जिजाऊंचा, शिवरायांचा, स्त्रियांचा आणि बहुजनांचा अपमान आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्ती करताना देखील संबंधित उमेदवाराचे वर्तन, चारित्र्य तपासले जाते. हा तर मानाचा पुरस्कार आहे. निवड समितीने पुरंदरेंसाठी कोणते निकष लावले? पुरंदरेंचे काय तपासले? अशा प्रवृत्तीच्या व्यक्तिला पुरस्कार देऊन फडणवीस सरकारला काय साध्य करायचे आहे?

शिवजयंतीच्या तारीख- तिथीचा वाद पुरंदरेंनी निर्माण केला. एका बाजूला शासनाला तारखेप्रमाणे पत्र द्यायचे, तर दुसऱ्या बाजूला जयंत साळगावकरांना तिथीसाठी पत्र द्यायचे, हा पुरंदरेंचा डाव पंढरपूरच्या अमरजित पाटील यांच्यामुळे उघड झाला. त्याबाबतचे माफीपत्र पुरंदरेंनी अमरजित पाटील यांना दिलेले आहे. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. म. फुले त्यांना ‘कुळवाडीभूषण’ शिवाजी महाराज असे म्हणतात; पण पुरंदरेंनी शिवरायांना गोब्राम्हण प्रतिपालक ठरविले. दिलेरखानाच्या यशासाठी कोटीचंडी यज्ञ करणारे पुण्याचे चारशे ब्राह्मण, शिवरायांवर वार करणारा कृष्णा भास्कर कुळकर्णी, राज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण हे पुरंदरेंनी ठळकपणे का मांडले नाहीत? कायस्थांचे योगदान पुरंदरेंना का प्रभावीपणे मांडावे असे वाटले नाही? आदिवासी, दलित, अल्पसंख्याकाचे योगदान पुरंदरेंना का ठळकपणे आठवत नाही?

त्यामुळेच शिवचरित्राचे गाढे अभ्यासक त्र्यं.शं. शेजवलकर म्हणतात, की ‘पुरंदरेंचे इतिहासलेखन राष्ट्रीय स्वयंसेवक धाटणीचे आहे.” जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या अभ्यासक कॉ.शरद पाटील म्हणतात, “एका बाजूला शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचायचे, शूद्रातिशूद्रांना नादी लावायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची बदनामी करायची यामध्ये सर्वात वाकबगार कोण आहेत, तर पुरंदरे.” ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात, “शिवरायांच्या सोबत असणाऱ्या दौलतखान, नूरखान, सिधी हिलाल, मदारी मेहतर, इब्राहीम खान यांची नावे पुरंदरेंच्या तोंडात येत नाहीत.”

शेजवलकार, कॉ. पाटील, डॉ. नेमाडेपेक्षा फडणवीस सरकार आणि त्यांची निवड समिती अधिक शहाणी आहे काय?

ॲन्तोनिओ ग्रामची नावाच्या जागतिक किर्तीच्या इतिहासकाराने ‘हेजिमनी’ (सांस्कृतिक धुरिणत्व) नावाचा सिद्धांत मांडला आहे. तो म्हणतो, की एखादा छोटा समुदाय मोठ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी वर्गावर वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांचा इतिहास बदलतो. आपले वर्चस्व अबाधित ठेवणारा इतिहास लिहिला, की आपोआप मोठा समुदाय त्यांचा गुलाम होतो. पुरंदरेंच्या इतिहासाची-कथेची मांडणी ब्राम्हणीवर्णवर्चस्ववादी आहे. दादोजी कोंडदेव, रामदास हे शिवरायांचे गुरू म्हणून सांगितले, की आपोआप शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय ब्राम्हणांकडे जाते. शिवाजीराजे मुस्लीम विरोधी होते, असे मांडले की आपोआप आजचे मावळे आणि मुस्लीम संघर्ष सुरू होतो. आजच्या मावळ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलेक्टर, न्यायाधीश, उद्योगपती होण्याऐवजी हिंदू-मुस्लीम संघर्षात त्यांची उर्जा खर्च व्हावी, तीन टक्के ब्राम्हण सर्व क्षेत्रांत राहावा, आणि बहुजन त्यांचा गुलाम राहावा, अशा प्रकारची मांडणी पुरंदरे यांनी केलेली आहे. ही बहुजन समाजाला धोकादायक आहे.

अशाप्रकारे पुरस्काराचे अवमूल्यन होत असताना देण्यात येणाऱ्या पुरस्काराला विरोध व्हायला हवा.


श्रीमंत कोकाटे
(शिवचरित्र अभ्यासक)

Source: 1

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.