चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही. याचाच अर्थ राम वनवास व पाडव्याचा संबंध नाही. मग पाडवा साजरा का होतो? राम हे भारतात पुजनीय असताना फक्त महाराष्ट्रातच गुढी उभारण्याची प्रथा कशी? गुढी हे लक्षण प्रगतीचं की अधोगतीचं? संतांनी गुढीचे समर्थन केलंय का? या गुढीमागे आमच्या पूर्वजांच्या इतिहासाशी काही गूढ रहस्य आहे का? विज्ञानयुगातील तरुणांनी यावर थोडा विचार करण्यास काही हरकत आहे का? या सर्वांवर विस्तृत विवेचन करण्याकरिता जाणून घेऊया गुढीपाडव्याचे गूढ रहस्य.
गुढीची उभारणी:
गुढीची साधारण उभारणी अशी असते:- लाकडी काठीवर पालथा तांब्या अडकविणे. त्या तांब्याखाली काठीवर साडीचोळी अडकवून टांगणे. स्त्रीचे अलंकार टांगणे. एक गाठीचे पदक गुंडाळणे. स्त्रीचे अलंकार व कडुलिंबाचा पाला बांधून तिची पूजा करून ती गुढी घरावर टांगणे. ही झाली आमची गुढी. इतर समाजाने, राष्ट्राने आमच्या बुद्धीची कीव करावी अशी आमची स्वाभिमान संस्कृती जपणारी गुढी आहे. या संदर्भात काही प्रश्न आपल्याला पडायला हवेत.
प्रश्न १ – घरात लग्नापासून बारोमास चालणा-या सर्व विधीमध्ये तांब्या अर्थात कलश सरळ ठेवणे याला अपशकुन म्हणतात. मग प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी तांब्या उलटा ठेवून आपण नववर्षाचे स्वागत अपशकुनाने करतो का?
प्रश्न २- आईच्या साडीचोळीकडे वाईट नजरेनं पाहणे आपल्याला सहन होत नाही, इथं साडीचोळी घरावर टांगणे म्हणजे आपण स्त्रीसुरक्षेबाबत जागरूक आहोत का?
प्रश्न ३ – कडू व गोड म्हणून गाठी व कडुलिंबाचे प्रतीक गुढीवाल्यांनी का निवडावे? यामागची त्यांची काय भूमिका असेल? या सर्व प्रश्नांचा अगदी शांत डोक्याने विचार करूया!
गुढीपाडवा अर्थात शंभूराजे विटंबना दिन:
१ फेब्रुवारी १६८९ मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील काळा व भयंकर दिवस. संगमेश्वरी सरदेसायांच्या वाड्यात किल्ले खेळणा येथे राजकीय डावपेच आखित मराठ्यांचा छत्रपती ३०० भालाईत सोबत घेऊन चर्चा करीत बसला असता अचानक मुकर्रबखान चालून येतो व रंगनाथ स्वामीच्या अंगुलीनिर्देशावरून अचानक संभाजीराजांवर तुटून पडतो. दीन दीन असा आवाज येताच शंभूराजे सतर्क होतात व दहा हजारी सैन्यावर तुटून पडतात. सैन्य तोकडे पडताच पाहून प्रसंगावधान साधून शिवसुत्रानूसार तिथून मुकर्रबखानाच्या सैन्याला हुलकावणी देऊन दोन फलांग निघून जातात, मात्र दुर्दैवानं कवी कलश याचा मागाहून आवाज येतो. “राजाजी मुझे बचाइए।’ हा आवाज ऐकताच संभाजी राजे आपला अश्व पलटवितात व कवी कलशला वाचवण्याकरिता माघारी फिरतात. त्याच क्षणी मित्राला वाचवताना संभाजी राजे कैद केल्या जातात. इथ कवी कलशबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात. तो मुद्दा थोडा बाजूला ठेवू व ज्यावेळी शंभूराजे पकडल्या जातात, त्या वेळपासून अवघा महाराष्ट्र बंद होतो व उघड्या डोळ्यांनी अनुभवतो शिवपुत्र छत्रपती शंभूराजांच्या देहाची जाहीर विटंबना!
१ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी १६८९ च्या १३ दिवसांच्या काळात शंभूराजांच्या तेजःपुंज शरीराचा लिलाव होतो. मुकर्रबखान औरंगजेबाच्या सूचनेची अंमलबजावणी सुरू करतो. उंटाच्या पायाशी शंभूराजांना बांधलं जातं. अंगावर तख्ता कुलाह अर्थात विचित्र कपडे व टोकदार लाकडी विदुषकी टोपी चढवल्या जाते. हातापायात व अणुकुचिदार सळ्या असलेली लोखंडी दोरखंड बांधली जातात व सह्याद्रीच्या राजाला कोल्हापूर, विजापूर, अकलूजमार्गे जेथे औरंगजेबाचा मुक्काम असतो, त्या तुहापूर बडुबद्रुक हवेली इथं दरबारात हजर केल्या जातं. इथं रहुल्लाखानास संभाजीराजांकडे पाठवितात व तिथ दोन प्रश्न विचारले जातात.१) स्वराज्याचा खजिना कोठे आहे? २) आमच्या सैन्यातील फितुरांची नावे सांगा? मात्र स्वाभिमानी शंभूराजे त्याला माघारी पाठवतात. परंतु औरंगजेब रायगिराला तहाची बोलणी करायला पाठवतो. मात्र हाही प्रयत्न निष्फळ ठरतो. शेवटी औरंगजेबाच्या दरबारात धर्माच्या ठेकेदारांकडून मनुस्मृतीतील कायदे वाचल्या जातात व एक दिवस अनन्वित अत्याचार सुरू होतात. मनुस्मृतीचा हा श्लोक रंगानाथ स्वामी श्रीधर रायरीकर वाचून दाखवतो व बादशहाची मर्जी मिळवतो. हा श्लोक पाहा:
“धर्मोपदेश दर्पणं। विप्रनामस्य कर्वतः। तत्यमासैचैयटौल। श्रोते वक्ते च पार्थिवः।।”
अर्थात बहुजनाने धर्माचा उपदेश व पंडितांशी चर्चा करणे धर्मद्रोही कृत्य असून असे करणाऱ्यास हालहाल करून ठार मारावे हा ठराब दरबारात मंजूर झाला कारण शंभूराजांनी बुधभूषणम ग्रंथ लिहून कायदा हातात घेतला. गागाभट्टांना वयाच्या ९ व्या वर्षी संस्कृत भाषेत हरवलं व स्वराज्याशी द्रोह करणाया पंडितांना देहांत प्रायश्चित्त दिल्यामुळे पंडितांच्या नजरेत शंभूराजे सलत होते. वटहुकूम निघाला १६ फेब्रुवारी १६८९ पहिल्याच दिवशी तेज:पुंज डोळे मस्तकाच्या पात्रातून तप्त लालबुंद सळ्या फिरवून अलग केले गेले. ४ दिवस माझ्या स्वाभिमानी राजानं अन्नपाणी सोडलं. जीभ छाटल्या गेली. कानात तप्त शिसं ओतल्या गेले. हातापायाची नख सांडशीने उपडण्यात आली. अंगावरचं चामडं बोकड सोलावं तसं सोलल्या गेलं. त्यावर मिठाचं पाणी टाकल्या गेलं. असा क्रूर अनन्वित अत्याचार तब्बल ४० दिवस चालत राहिला. सर्व सोसत राहिला शंभूराजा इथल्या स्वाभिमानी तरुणांसाठी.
शेवटी अमावस्या आली. फाल्गुन वद्य अमावस्या! ११ मार्च १६८९ गुढीपाडव्याचा पहिला दिवस! संभाजीराजांची गर्दन मारल्या गेली. ती भाल्याच्या फडाला रोवल्या गेली. शरीराचा सांगाडा अडकविल्या गेला. प्रेताला वास लागू नये म्हणून कडुलिंबाची पानं लावली गेली व उभारली गुढीशंभूराजांच्या स्वाभिमानी मस्तकाची औरंगजेबाच्या किल्ल्यावर! महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांनी संभाजीराजांच्या प्रेताभोवती शिमगा साजरा केला. गुढीपाडव्याच्या दिवशी शंभूराजाच्या देहाचे तुकडे तुकडे केल्या गेले. हात-पाय कुन्हाडीने तोडल्या गेले. भीमा-इंद्रायणीच्या संगमावर बटूबदुकाच्या जंगलात प्रेताचे तुकडे करून कपड्यात भरल्या गेले व फतवा काढला जो कुणी प्रेताला हात लावील, त्याचे असेच हाल करण्यात येतील. अशावेळी गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलितांनी संभाजीराजांच्या प्रेताचे तुकडे निर्भिडपणे गोळा करून महार समाजातील सरदाराने त्या प्रेताचे साश्रु नयनांनी स्वतःच्या महारवाड्यात अंत्यसंस्कार करून मराठे महार एकच मायची स्वाभिमानी लेकरं आहेत, हे दाखवून दिले. पुणे पेशव्यांनी याच महारांवर या प्रकरणापासून धडा शिकविण्याचे ठरविले व मांगमहारांना इमारतीच्या पायात तेल शेंदूर पाजून पुरविले. पेशवेकाळापासून संभाजीराजांची विटंबना जगजाहीर करणारा गुढीपाडवा सुरू झाला. तो आजतागायत.
गुढीपाडवा व आजच्या तरुणांपासून अपेक्षाः
बालपणापासून आम्ही धार्मिक दहशत अनुभवतो. आजही आमच्या आई-वडिलांची, घरातील वृद्धांची, शेजाऱ्यांची मानसिकता बदलायला थोडा वेळ लागेल. तरीही त्यांच्या सन्मानार्थ आपण जय शिवराय म्हणताच पेटून उठणारी सळसळत्या रत्ताची तरुण मंडळी एखाद्या षंढाप्रमाणे शंभूराजांची विटंबना करत असू तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते? आम्हाला हेही समजतं की सर्वच हे मान्य करणार नाहीत. कारण आमची बदल स्वीकारण्याची मानसिकता अजून बनली नाही. तरीही या बलिदानाला हृदयात कोरून ठेवण्यासाठी तरुणांनी विरोध पत्करुन पुढे यावं व दैदिप्यमान शंभूराजांच्या बलिदानाला स्मरण करून पुढची पावलं टाकावीत. रुढीबद्ध व गुलाम समाजाकडून बदलाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मात्र आमच्या महापुरुषांच्या मराठ्यांच्या इतिहासाला नजरेआड करणं हेही महापापच!
गुढीपाडवा बलिदान दिन व्हावा!
यावर्षी ११ एप्रिल गुढीपाडवा म्हणून साजरा होईल. मात्र ही पराभवाची गुढी घरावरून उतरवू या व गुढीपाडव्याला छत्रपती संभाजीराजांच्या दैदिप्यमान बलिदानाला स्मरून सरळ कलश ठेऊन त्यामध्ये गव्हाची रास व स्टील अथवा लाकडी काठीवर भगवा ध्वज जो एक पाती शिवकालीन असेल, अशा ध्वजावर जयशंभू कुंकवाने लिहून त्या ध्वजाजवळ संभाजीराजांच्या प्रतिमेला वंदन करून गोडधोड पदार्थ न करता साध्या पद्धतीने बलिदान दिन साजरा करावा व आपल्या राजाच्या बलिदानाशी इमानेइतबारे प्रामाणिक राहून राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन इतिहास घडविण्याचा संकल्प या दिनी करून बलिदान दिन साजरा करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“जी माणसं आपला इतिहास विसरतात, ती इतिहास घडवत नसतात व इतिहास घडवणारी माणसं, इतिहास विसरत नसतात…”
छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाला जड अंतःकरणाने मानाचा मुजरा.
–
अमोल रा. मिटकरी
अकोला
Source: 1