राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला. त्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षण, औद्योगिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, जलसिंचन क्षेत्राबरोबरच बहुजनांसाठी आरक्षण, समता यासाठी क्रांतिकारक कार्य केले. स्वतः शाहू महाराज उच्चशिक्षित होते. राजकोट, थारवाड या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ऐन तारुण्यात त्यांनी युरोप पाहिला. सार्वजनिक सभा, सत्यशोधक चळवळ यांना त्यांनी अभ्यासले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले. त्यांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता; पण ते प्रवाहपतित किंवा अनिष्ट परंपरेचे अभिमानी नव्हते. त्यांच्या ठायी असणाऱ्या बुद्धिप्रामाण्यामुळेच ते अनेक संकटांवर मात करून यशस्वी होऊ शकले. हे त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांवरून प्रकर्षाने जाणवते.
भारतातील समाजमनावर पिढ्यान्पिढ्या असे कोरण्यात आले होते, की समुद्रपर्यटन करणे धर्मबाह्य आहे. समुद्रपर्यटन करणाऱ्या अनेक नामवंतांना बहिष्कार, प्रायश्चित या बाबींना सामोरे जावे लागले; परंतु राजर्षी शाहू महाराज धार्मिक विरोध झुगारून १७ मे १९०२ रोजी मुंबईवरून इंग्लंडला सहकुटुंब गेले. ते २ जून रोजी लंडनला पोहोचले. युरोपचा यशस्वी दौरा करून ३० ऑगस्ट १९०२ ला भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी समुद्रपर्यटनाबद्दल प्रायश्चित घेतले नाही. याउलट त्यांनी (अवैदिक परंपरेतील) भवानी मातेचे व अंबाबाईचे दर्शन घेतले. यावरून शाहू महाराजांनी अनिष्ट प्रथा नाकारून सुधारणावादी भूमिका घेतली आणि निर्भयपणे जगभर फिरून ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा दिली. राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांना हक्क, अधिकार, सन्मान मिळवून दिला. स्त्री शिक्षणाला आपल्या राज्यात चालना दिली. आपली कन्या राधाबाई यांच्या विवाह स्मरणार्थ ‘राधानगरी धरण’ बांधले. विशेषतः राधानगरी धरणाच्या बांधकामाचा शुभारंभ (उद्घाटन) महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांच्या हस्ते केला. स्त्रियांच्या हस्ते धरण बांधकामाचे उद्घाटन करून शाहू महाराजांनी ऐतिहासिक कार्य केले. स्त्रियांना हक्क, अधिकार नाकारणाऱ्या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन शाहू महाराजांनी केले. हा शाहू महाराजांचा सुधारणावादी, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन होता.
अलीकडच्या काळात ज्योतिष, भविष्य, पंचांग, मुहूर्त यामध्ये अनेक लोक अडकत चालले आहेत; परंतु शाहू महाराजांनी ज्योतिषाबाबत काय भूमिका घेतली, याबाबतची आठवण भाई माधवराव बागल यांनी त्यांच्या ग्रंथात नोंदवलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांना भेटण्यासाठी एकदा एक ज्योतिषी आला. त्याला महाराजांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो ज्योतिषी बाहेर गेल्यावर शाहू महाराजांनी म्हैसकर नावाच्या फौजदाराला बोलावून त्या ज्योतिषाला दुसऱ्या दिवशी भेटायला येण्यापूर्वी अटक करून त्याला कैदेत ठेवण्यास सांगितले. शाहू महाराजांच्या सल्ल्याप्रमाणे फौजदाराने ज्योतिषाला अटकेत ठेवले. दुसऱ्या दिवशी ज्योतिषाला घेऊन फौजदार सोनतळी कॅम्पवर शाहू महाराजांकडे गेले. तेव्हा ज्योतिषी रडत रडत महाराजांना म्हणाला, “काही एक गुन्हा केला नसताना मला निष्कारण अटक केली आहे. आपण न्याय दिला पाहिजे.” तेव्हा शाहू महाराज त्या ज्योतिषाला म्हणाले, ‘तुम्ही तर मला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशीच येतो म्हणाला होता. तुम्हाला अटक होणार आहे, हे माहिती असते, तर तशी कबुली कशी दिली ? तुम्हाला हे अटकेचे भविष्य समजायला हवे होते.’ हे सगळे ऐकून ज्योतिषी हिरमुसला.
वरील प्रसंगावरून शाहू महाराजांनी ज्योतिष नाकारले व कर्तृत्वावर विश्वास ठेवला. सशक्त मेंदू, मन आणि मनगट हेच यशाचे गमक आहे, हे शाहू महाराजांनी दाखवून दिले. शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण विज्ञाननिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी समाजनिर्मितीचा संकल्प करू या. हेच राजर्षी शाहू महाराजांचे खरे स्मरण आहे.
–
श्रीमंत कोकाटे
(इतिहास संशोधक)
Source: 1