Advertisements

‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल

दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज कोठे आहे, यावर विकासाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. पूर्वी शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा होता. कुणबी, मराठा म्हणून ओळखला जाणारा बहुतांश समाज शेतीवर अवलंबून होता. एकर, दोन एकरापासून काही हजार एकरांपर्यंत हा समाज शेतीचा मालक होता.

परंतु ९० टक्क्यांपर्यंत अल्पभूधारक असलेला आणि ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज निरक्षर, अल्पशिक्षित होता. सामाजिक अंगाने पाहिले तर मराठा समाज स्त्रियांबद्दल प्रतिगामी, कर्मठ परंपरावादी होता. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डाॅ. आंबेडकरांचा वैचारिक कृतिशील वारसा आपण पुढे न्यायचा, असा निर्णय त्या अधिवेशनात घेतला गेला. आज दलित समाजाने शिक्षणात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नवे विचार आणि नवी दिशा द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर डाॅ. आंबेडकरांप्रमाणे काम करावे लागेल हे त्या वेळी झालेल्या विचारमंथनातून पुढे आले आहे. आम्ही शिक्षणापासून सुरुवात करायचे ठरवले. त्यात बाबासाहेबांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. सुरुवात तिथूनच केली.

सनातन्यांनी वा प्रतिगाम्यांनी समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करताना स्वातंत्र्यानंतर मराठा दलित समाज एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्यांतून चुकीचा इतिहास रंगवला गेला. त्याचा पगडा समाजावर अजूनही काही प्रमाणात आहे. तो पूर्णपणे पुसून टाकायला काही वेळ जावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती- जमातीतील लोकांना एकत्र केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे आणि धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी मराठे महारांना एकत्र आणले. अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. कारण मराठा दलित समाज एकत्र आला, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल, हा आशावाद त्यामागे आहे.

मराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. त्याला रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही विकृत लोकांचाही विरोध आहे. कारण दलित समाजातील विकृतांना आंबेडकर, फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. तर मराठा समाजातील विकृतांना शिवाजी महाराज फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. आम्ही सांगू तेच आंबेडकर आणि आम्ही सांगू तेच शिवाजी महाराज, असा त्यांचा हट्ट आहे. पण या विरोधाला भीक घालता, आम्ही समाजाला आंबेडकर समजावून सांगू. कारण ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आहेत.

पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

Advertisements

Leave a Reply