१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाटय, लोकनाट्य, कादंबर्‍या, चित्रपट गीते, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाऊ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते.

अण्णाभाऊंची एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या “७७” आहे!

अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान देखील झाला. तमाशात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी नाकारून मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी-

“प्रथम मायभूच्या चरणा,
छत्रपती शिवबा चरणा,
स्मरोनी गातो | कवना ||”

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाऊंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्य दृष्टीमुळेच साकार झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “यह आझादी झुठी है, इस देश कि जनता भूखी है!” असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णाभाऊंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबर्‍यांवर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले.

अण्णाभाऊंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले!

याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच १४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामनशाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्यभर मराठीची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले…!

…पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणार्‍या समाजात, धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे.

म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणार्‍या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!


शिवश्री विकासराव चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.