‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल

दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज कोठे आहे, यावर विकासाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. पूर्वी शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा होता. कुणबी, मराठा म्हणून ओळखला जाणारा बहुतांश समाज शेतीवर अवलंबून होता. एकर, दोन एकरापासून काही हजार एकरांपर्यंत हा समाज शेतीचा मालक होता.

परंतु ९० टक्क्यांपर्यंत अल्पभूधारक असलेला आणि ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज निरक्षर, अल्पशिक्षित होता. सामाजिक अंगाने पाहिले तर मराठा समाज स्त्रियांबद्दल प्रतिगामी, कर्मठ परंपरावादी होता. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डाॅ. आंबेडकरांचा वैचारिक कृतिशील वारसा आपण पुढे न्यायचा, असा निर्णय त्या अधिवेशनात घेतला गेला. आज दलित समाजाने शिक्षणात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नवे विचार आणि नवी दिशा द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर डाॅ. आंबेडकरांप्रमाणे काम करावे लागेल हे त्या वेळी झालेल्या विचारमंथनातून पुढे आले आहे. आम्ही शिक्षणापासून सुरुवात करायचे ठरवले. त्यात बाबासाहेबांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. सुरुवात तिथूनच केली.

सनातन्यांनी वा प्रतिगाम्यांनी समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करताना स्वातंत्र्यानंतर मराठा दलित समाज एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्यांतून चुकीचा इतिहास रंगवला गेला. त्याचा पगडा समाजावर अजूनही काही प्रमाणात आहे. तो पूर्णपणे पुसून टाकायला काही वेळ जावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती- जमातीतील लोकांना एकत्र केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे आणि धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी मराठे महारांना एकत्र आणले. अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. कारण मराठा दलित समाज एकत्र आला, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल, हा आशावाद त्यामागे आहे.

मराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. त्याला रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही विकृत लोकांचाही विरोध आहे. कारण दलित समाजातील विकृतांना आंबेडकर, फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. तर मराठा समाजातील विकृतांना शिवाजी महाराज फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. आम्ही सांगू तेच आंबेडकर आणि आम्ही सांगू तेच शिवाजी महाराज, असा त्यांचा हट्ट आहे. पण या विरोधाला भीक घालता, आम्ही समाजाला आंबेडकर समजावून सांगू. कारण ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आहेत.

पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

Pradeep Solunke on Maratha Community

Prominent Speaker Pradeep Solunke speaks on Maratha community, importance of Maratha Seva Sangh, problems of farmers and social problems in India.

ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठा समाज, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्या व मराठा सेवा संघाचे महत्व यावरील मत.

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख.

लेखक – अविनाश दुधे

महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं. या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या स्वत्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्डू ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला.

हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत.

माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, ‘लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,’ असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

प्रकाशित: दै. पुण्यनगरी १६ जानेवारी २०१४

मराठा समाजाची शक्तीस्थळे…

मागे बर्‍याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध लेखकाने महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता लवकरच जाणार या अर्थाचे भाकीत करणारा एक लेख लिहिला होता. महाराष्ट्रातील काही, नव्हे अनेक लोकांना महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावी असे मनापासून वाटत असते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे अतिशय अवघड आहे, किंबहुना मराठ्यांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण या गोष्टी केवळ अशक्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मराठा समाज सत्ताधारी आणि शक्तिशाली आहे. त्याची काही शक्तिस्थळे आहेत. अशी शक्तिस्थळे महाराष्ट्रातील इतर कोणत्याच समाजाकडे नाहीत. काय आहेत ही शक्तिस्थळे?

मराठ्यांची संख्या
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मराठ्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मतभेद आहेत. खुद्द मराठा समाज आपल्या समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे असे मानतो, तर मराठाविरोधी मानसिकता असणारे लोक ही संख्या फारतर २२ टक्के असावी असे म्हणतात. ते काहीही असले तरी मराठा समाज इतर कुठल्याही समाजापेक्षा संख्येने जास्त आहे ही गोष्ट नक्की आहे. तो किमान ४० टक्के तरी असावा. भारताच्या कोणत्याही राज्यात लोकसंख्येचा एवढा मोठा भाग असणारा दूसरा समाज नसावा. मराठ्यांची ही मोठी संख्या हे त्यांचे सगळ्यात मोठे शक्तिस्थळ आहे. वर उल्लेख केलेल्या लेखकाने असे म्हटले होते की महाराष्ट्रातील माळी, धनगर आणि वंजारी हे समाज एकत्र आले तर त्यांची लोकसंख्या मराठ्यांच्यापेक्षा जास्त होते, त्यामुळे ते एकत्र आले तर महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावू शकते. पण ही तर जर-तरची भाषा झाली. पहिली गोष्ट म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या मराठ्यांच्या पेक्षा जास्त असेल तर आणि आपण ती किमान ४५ टक्के आहे असे गृहीत धरले तर या चार समाजांची एकत्रित संख्या ८५ टक्के आहे असे मानावे लागेल. त्यात १२ टक्के मुस्लीम लोकसंख्या मिळवली की एकूण बेरीज ९७ टक्के होते. उरलेल्या तीन टक्के लोकसंख्येत ख्रिश्चन, जैन, बौद्ध, बौद्धेतर दलित, ब्राम्हण, लिंगायत, कुणबी, बलुतेदार जाती, आदिवासी आणि इतर शेकडो समूहांना बसवावे लागेल. याचाच अर्थ असा आहे की माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या फार मोठी आहे ही गोष्ट खोटी आहे.

आता राहिली गोष्ट माळी, धनगर आणि वंजारी यांनी एकत्रित येण्याची. भारतीय जातीव्यवस्थेचे स्वरूप बघितले तर अशा वेगवेगळ्या जाती एकत्र येवून राजकारण करतील ही गोष्ट अशक्य कोटीतील आहे. जिथे एकाच जातीच्या उपजाती एकत्र येण्याची मारामार, तिथे अशा वेगवेगळ्या जाती एकत्र कशा येणार? शिवाय एकगठ्ठा मराठा समाजाशी वेगेवगळ्या जातींनी एकत्र येवून स्पर्धा करणे आणि ती जिंकणे हेही अशक्यच आहे.

मराठ्यांचे नेटवर्क
मराठ्यांचे दुसरे मोठे शक्तीस्थळ म्हणजे त्यांचे जबरदस्त नेटवर्क. मराठा समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, खेड्या-पाड्यांमध्ये मोठ्या संख्येने आहे. हा समाज एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडला गेलेला आहे. या नेटवर्कचे प्रचंड फायदे या समाजाला राजकारणात आणि इतरही क्षेत्रात मिळत असतात. इतर समाज महाराष्ट्रभर पसरलेले नसल्याने त्यांचे ऑल महाराष्ट्र नेटवर्क तयार होवू शकत नाही. ज्यांचे होवू शकते त्यांची संख्या राजकारणाच्या दृष्टीने नगण्य आहे.

मराठ्यांची सत्तेची परंपरा
मराठा समाजाचे तिसरे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांना असलेली सत्तेची परंपरा. ही परंपरा अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरपासून चालत आली आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाला गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सत्ता सांभाळण्याचा शेकडो वर्षांचा अनुभव मिळाला आहे. अर्थातच या अनुभवाचा फायदा त्यांना मिळत आला आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाकडे सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती आली आहे, नेत्यांकडे संयम, मोजके आणि नेमके बोलणे, धडाडी, लोकसंग्रह करण्याचे वृत्ती यासारखे अनेक गुण आले आहेत.

सहकार चळवळ
मराठा समाजाचे चौथे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांची सहकार चळवळ. या समाजाने सहकार चळवळ गावोगावी नेली. त्यांनी अनेक सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअर्‍या काढल्या. इतर समाज सहकारी क्षेत्रात मराठ्यांएवढे काम करू शकले नाहीत. याचा राजकीय फायदा मराठा समाजाला नेहमीच होत राहिला.

आज मराठा समाजावर उघडपणे किंवा कुजबूज मोहिमेतून टीका करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. पण त्याचा फारसा कांही उपयोग होणार नाही. कारण मराठ्यांची ही शक्तीस्थळे त्यांना पुढील काळातही राजकीय फायदा देत रहाणार आहेत. शिवाय इतर कोणत्याही समाजाकडे अशी शक्तीस्थळे नाहीत आणि ती मिळवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील कोणताही पक्ष मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. ज्या पक्षात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही, त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहातोच. (आठवले का, कोणते ते पक्ष?) दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला मराठाविरोधी लोक मराठ्यांचा पक्ष म्हणून संबोधतात, पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष सर्व समावेशक आहेत. मराठ्यांना त्यात जास्त प्रतिनिधित्व आहे असे दिसते, पण ते त्यांच्या लोकसंख्येतील टक्केवारीला अनुसरूनच आहे. या पक्षांचे नेते मराठा या जातीचे नेते नसून सगळ्यांचे नेते आहेत, याउलट इतर पक्षांचे नेते त्यांच्या जातीचे नेते असल्याप्रमाणे वागत असतात.

-महावीर सांगलीकर
( महाविचार या ब्लॉगवरून साभार )

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती.

उठ मराठया जागा हो!
आरक्षणाचा धागा हो!!

१) प्रदीप सोळुंके
प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

२) किशोरभाऊ चव्हाण
संस्थापक अध्यक्ष, छावा मराठा संघटन, महाराष्ट्र

मराठा सेवा संघाची ओळख – About Maratha Seva Sangh

मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेविषयी थोडक्यात
Click to Download PDF: मराठा सेवा संघ – ओळख माहिती

About Maratha Seva Sangh
Click to Download PDF: Maratha Seva Sangh – Introduction and work