महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला.  महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले.

महात्मा फुल्यांनी त्यांच्या ग्रंथात ब्राम्हणी देव-देवतांचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला लागलेला जातिभेदाचा रोग इतका गंभीर आहे की त्या रोगाने आमच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या. एखाद्या अनुवांशिक रोगाप्रमाणे हा रोगही एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित होत आहे. अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार हे समाजशास्त्राच्या डॉक्टर महात्मा फुलेंनी ओळखले. त्यासाठी त्यांनी ब्राम्हणी गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला. ज्या धर्म ग्रंथांच्या आधारे ब्राम्हणांनी आजपर्यंत बहुजन समाजाला गुलामीत ठेवले त्या धर्मग्रंथांनाच फुल्यांनी लक्ष बनवले. धर्म ग्रंथातील थोतांड, अवतार कल्पना यांची चिरफाड केली. इतकी केली की ब्राम्हणांना कुठे कुठे सावरावे तेच कळेना झाले. महात्मा फुल्यांनी समाजाला सत्यशोधनाची दिशा दिली. समाजाच्या हलाखीचे मूळ जे गोडबोल्या ब्राम्हणांच्या धर्मग्रंथात आहे ते दाखवले आणि चिकित्सक इतिहास समाजासमोर ठेवला.

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…

-Prakash Pol

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.